नवीन लेखन...

स्वामी विवेकानंद- भाग १

आज १२ जानेवारी २०१८. स्वामी विवेकानंदांची १५५ वी जयंती. १२ जानेवारी २०१२ ला त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू झाले. त्यादिवशी एका कार्यक्रमांत मी वक्ता म्हणून त्यांच्या जीवनावर दीड तास बोललो. ४० मिनिटे बोलायचे होते पण माझे बोलणे पूर्ण होईना. सर्वांच्या आग्रहाखातर वेळ वाढत वाढत दीड तासावर पोंचली. एकही श्रोता सभा सोडून गेला नाही. ही विवेकानंदांची मोहिनी. हे भाषण लिखित स्वरूपांत माझ्याकडे आहे. त्यातील पहिला भाग-

स्वामी विवेकानंद- भाग १
१२ जानेवारी १८६३ला स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. या गोष्टीला १४९ वर्षे पूर्ण होऊन आज १५०वे वर्ष सुरू झाले. १५० वर्षांनंतरही त्यांचे स्मरण कां करायचे ? १५०वे वर्ष जयंती वर्ष आजपासून कां साजरे करायचे ? त्यांच्या कार्याचा वर्तमानाशी काही संबंध आहे कां ? त्यांचे विचार या १५० वर्षात कालबाह्य झाले कां ? की आजही त्या विचारांच कांही महत्व आहे ?

एखाद्या व्यक्तीला महापुरूष किंवा महामानव म्हटलं जातं. एकदा महापुरूष किंवा महामानव उपाधी लावली की त्याला अवतार ठरवून त्याची पूजा करायला मोकळे होतो. त्याचे विचार अंमलात आणणे तर दूरच पण समजून घेण्यातही आपल्याला रस नसतो. तो वंदनीय आहे. त्याचे पुतळे ठिकठिकाणी आहेत. त्याच नांव अनेक मार्गांना देण्यात आलं की आपलं काम झालं. त्याचे विचार त्याच्याबरोबर गेले. त्याने आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या विचारधनाचा आपल्याला पत्तासुध्दा नसतो.

स्वामी विवेकानंद योगी होते. त्यांनी पाश्चात्त्य जगाला, विशेषतः अमेरिकेला हिंदु धर्माची किंवा संस्कृतीची ओळख करून दिली, महती पटवून दिली. इतकी ढोबळ माहिती आपल्याला असते. अनेक ठिकाणी त्यांची भगव्या वेषांतील तेजस्वी छबी आपल्या नजरेंत भरलेली असते. संन्यासी असून इतर साधूंप्रमाणे त्यांनी दाढी, केस वाढविलेले नाहीत हेही कळतं. ह्यापेक्षा जास्त कांही माहिती असायची आपल्याला गरजच काय ? एरव्ही हे ठीक असेलही. पण आता आपण त्यांच्या जयंतीचं १५०वे वर्ष साजरे करणार आहोत तर त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवून त्यांचे विचार समजून घ्यायलाच हवेत. नाही तर हे वर्षभर चालणारे कार्यक्रम निरर्थक ठरतील.

आपल्या कोत्या बुध्दीने एखाद्या महापुरूषाला समजून घेणं कठीण असतं. परंतु त्याच्याबद्दल इतरांनी काढलेले उद्गार, त्यांनी स्वतः मांडलेले विचार, त्यांची पार्श्वभूमी, त्यांचे ऐतिहासिक कार्य या गोष्टी जाणून घेऊन आपण त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकतो. तेव्हां प्रथम आपण त्यांच्या जन्माच्या वेळेचा वेध घेऊया. त्यांचा जन्म १८६३चा, म्हणजे पहिल्या स्वातंत्र्य युध्दानंतर किंवा ब्रिटीशांविरूध्द स्वकीयांनी केलेल्या पहिल्या एकत्रित लढ्यानंतर सात वर्षांनी त्यांचा जन्म झाला. लोकमान्य टिळकांचा जन्म सात वर्षे आधी झाला तर महात्मा गांधींचा जन्म सहा वर्षे नंतर. १८६१ मधे जन्मलेले रविंद्रनाथही त्यांचे समकालीनच. १८५७नंतर ब्रिटीशांच्या राणीने मोठ्या कनवाळुपणे भारतीय जनतेला अभय देऊन आपली जनता म्हणून साम्राज्यात सामावून घेतलं होतं आणि कोट्यावधी भारतीयांवर मूठभर इंग्रज राज्य करत होते आणि जगांत भारताला “ज्युवेल इन द क्राऊन” म्हणून मिरवत होते. भारत आपलं गुलाम राष्ट्र आहे ह्याचा त्यांना अभिमान होता. कां नाही असणार ? खंडप्राय देशाचे लोक त्यांची थुंकी झेलायला तयार होते. भारतामधे ब्रिटीशांची संख्या कधीही दीड दोन लाखांपेक्षा जास्त नव्हती. तरीही सुखाने त्यांनी १५० वर्षे इथे राज्य केलं.

१८५७च्या पराभवानंतर इथल्या संस्थानिकांमधे, राजांमधे ब्रिटीशांना विरोध करण्याची हिंमतच राहिली नव्हती. त्यांची हांजी हांजी करणं आणि आपापली गादी टिकवणं, ब्रिटीशांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रजेला छळणं, एवढच त्यांच्या हातात होतं. बहुसंख्य संस्थानिक ब्रिटीशांची भ्रष्ट नक्कल करण्यांत गुंग होते. परंपरेने शिपाईगिरी करणारे हतबल झाले होते तर ब्राम्हणवर्ग ब्रिटीशांनी फेकलेल्या नोकरीच्या तुकड्यासाठी लांचावले होते. अशा या अंधारलेल्या काळांत या तेजस्वी सूर्याचा जन्म झाला.
अरविंद खानोलकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..