स्वामी विवेकानंदानी सर्वधर्मपरिषदेला हजर रहावं आणि त्या परिषदेत धर्माबद्दल एक नवाच विचार मांडावा, ही नियतीचीच इच्छा असावी. स्वामीजींचे समर्थक, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणारे राजे, त्यांचे शिष्य कोणालाही परिषदेच्या तारखा जाणून घ्याव्या हे सुचलं नव्हतं. आमंत्रण वगैरेचा प्रश्नच नव्हता. स्वामीजींचे व्यक्तीमत्त्व हेच त्यांच्या दृष्टीने त्यांना परिषदेत सहभागी करून घेण्यास पुरेस वाटलं होतं. या सर्व गोंधळाबद्दल पुढे त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता म्हणतात, “स्वामीजी स्वतः इतके सरळ मनाचे होते की एकदा आपण परिषदेला हजर रहावं अशी परमेश्वरी इच्छा आहे असं त्यांना वाटल्यावर त्यांनी अडचणींचा कांही विचारच केला नव्हता. भारतातील लोकांचा प्रतिनिधी आमंत्रण अथवा ओळख याशिवाय परिषदेसाठी जावा, यापेक्षा दुसरं कांही भारतीयांच्या एकूण ‘अनआॕर्गनाईजडनेस’शी सुसंगत नसेल.”
◼
अन्नपाण्याशिवाय वणवण करून थकून त्या दगडावर स्वामीजी बसलेले असतानाच समोरच्याच इमारतीमधील एका स्त्रीने त्यांना तसे बसलेले पाहिले. तिला भारताबद्दल थोडी फार माहिती होती. साधु, संन्यासी भगव्या रंगाचे कपडे वापरतात इतपत तिला ज्ञान होतं. त्यामुळे तिने त्यांची चौकशी केली. तिला अटकळ होती की हा साधु सर्वधर्मपरिषदेसाठी आला असावा. स्वामीजी कोणत्या परिस्थितीत तिथे बसले हे कळताच, ती कनवाळु स्त्री त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेली. प्रथम तिने त्यांना खाऊ घातले. मग भरपूर विश्रांती घेऊ दिली. तिचे नांव होते जाॕर्ज हेल (Mrs. George W. Hale). सर्वधर्मपरिषदेचे अध्यक्ष मिस्टर बॕरोज (Mr. J.S.Barrows) हे तिचे मित्र होते. ती स्वामींना सरळ त्यांच्याकडेच घेऊन गेली. मिस्टर बॕरोंजनी आदराने आणि अगत्त्याने स्वामीजींना परिषदेचे औपचारिक निमंत्रण दिले. त्यांनी त्यांची रहायची व्यवस्था श्री व सौ.लीयान्स (Lyons) यांच्याकडे केली. पुढे ह्या लीयाॅन्स कुटुंबाबरोबर झालेली मैत्री त्यांच्या अंतापर्यंत राहिली.
◼
त्यानंतर स्वामीजींना कांही अडचण येण्याची शक्यताच उरली नाही. शिकागोला प्रथम पाऊल ठेवल्यावर अडचणीत असतानाच स्वामीजींनी आपल्या मित्राला पत्रांत लिहिलं होतं, ” I am here among the children of Son of Mary and the Lord Jesus will help me.” आता तर त्यांची खात्रीच झाली की परमेश्वरच आपल्याला मार्ग दाखवतोय आणि ते प्रार्थना करू लागले की त्यांना परमेश्वरी इच्छेबरहुकुम कार्य करण्याची शक्ती मिळो. सोमवार, ११ सप्टेंबर १८९३ ला तो दिवस उजाडला. सर्वधर्मपरिषदेचा पहिला दिवस. खर तर ही परिषद हा एका मोठ्या सोहोळ्याचा एक भाग होती. दर्यावर्दी कोलंबस याने अमेरीकेचा शोध लावल्याला चारशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अनेक कार्यक्रमांच आयोजन करण्यांत आलं होतं. “वर्ल्ड कोलंबीयन एक्स्पोजीशन” या नावाने पाश्चात्त्यांनी केलेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचं प्रदर्शन आणि त्यावरील विचार तिथे मांडण्यात आले होते आणि तो त्या सोहोळ्याचा मुख्य भाग होता. मानवाच्या जीवनांत धर्म हा ही एक भाग आहे हे लक्षात घेऊन सर्वधर्मपरिषदेचही त्यासोबतच आयोजन करण्यांत आलं होतं. स्वामीजी पुढे एकदा गंमतीने म्हणाले होते, “मला सनातन हिंदु धर्म सर्व जगासमोर आणता यावा म्हणून माँदेवीनेच आपल्या इच्छेनुसार ही परिषद भरवली होती. ” जर आपण हे लक्षांत घेतलं की आज शंभर वर्षांनंतर त्या परिषदेतील इतर कोणत्याही गोष्टीबद्दल बोललं जात नाही पण स्वामीजींच्या भाषणाबद्दल आजही बोललं जात तर स्वामीजींच गमतीतलं बोलणं सुध्दा अर्थपूर्ण वाटेल.
◼
बरोबर १० वाजता परिषदेची सुरूवात झाली. सभागृह त्यावेळच्या पध्दतीप्रमाणे गोलाकार होते. मधोमध उच्चासनावर अध्यक्ष कार्डीनल गिब्बन्स बसले होते. त्यांच्या डाव्या उजव्या बाजूला जवळच ब्राम्हो समाजाचे कलकत्त्याचे प्रतापचंद्र मुजुमदार आणि मुंबईचे नगरकर, श्रीलंकेच्या बुध्दधर्मियांतर्फे धर्मपाल, जैन धर्मातर्फे श्री गांधी, थिआॕसाॕफीकल सोसायटीचे श्री चक्रवर्ती आणि ॲनी बेझंट हे बसले होते. त्या सर्वांबरोबरच स्वामी बसले होते. ते कोणत्या धर्माबद्दल बोलणार हे कुणास ठाऊक नव्हतं. त्यांचा भव्य भगवा डगला, त्यांचा तो फेटा, त्यांच शरिरसौष्ठव, तांबूस वर्ण यांमुळे त्या मंचावर ते उठून दिसत होते आणि सर्वांच त्यांच्याकडे लक्ष जात होतं. वक्ता म्हणून त्यांचा क्रम एकतीसावा होता. प्रत्येकाने आपली व आपल्या धर्माची ओळख करून द्यायची होती. एक एक प्रतिनिधी उभा रहात होता आणि तयार केलेले भाषण करत होता. त्यांत कांही आपल्या धर्माबद्दल बढाया मारत होते. हिंदु संन्याशाने कांहीच तयारी केली नव्हती. जेव्हां त्यांनी बोलण्याची वेळ आली तेव्हां त्यांना मंचावरून बोलण्याच्या भीतीने घेरलं. त्यांनी आपलं नाव पुढे ढकलायला सांगितलं. पुन्हां पुन्हां ते नाव पुढे ढकलत राहिले. स्वामी स्वतःबद्दल नंतर एकदा म्हणाले, “अर्थातच माझं हृदय धडधडत होतं आणि जीभ कोरडी पडली होती.” ते बोलायला उभे राहीपर्यंत ७००० प्रेक्षक त्या भाषणांनी थोडेसे कंटाळले होते. शेवटी ते पुढे झाले. डाॕक्टर बॕरोजनी त्यांचे नांव पुकारताच त्यांनी मनांत देवी सरस्वतीचं स्मरण केलं आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी सगळ्या श्रोतृसमुदायाला साद घातली, “सिस्टर्स अँड ब्रदर्स आॕफ अमेरिका” त्यांच्या या शब्दांसरशी टाळ्यांचा कडकडाट तर झालाच पण एक एक करत सर्व श्रोते उभे राहिले आणि टाळ्या वाजतच राहिल्या. शेवटी कोणीतरी औपचारीकता बाजूला ठेवून आपुलकीने भावाच्या नात्याने त्यांच्याशी कांही बोलू इच्छित होता, त्यासाठी या टाळ्या होत्या.
टाळ्या थांबेपर्यंत कांही मिनिटे स्तब्ध राहून स्वामीजी पुढे म्हणाले, “सर्व नद्या जशा समुद्राला मिळतात तसेच सर्व धर्म तुम्हाला परमेश्वर प्राप्ती करून देतात. तेव्हा तुम्ही ज्या धर्माचे असाल त्याचे अधिक चांगले पालन करा. कुठलाही धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. वेगवेगळ्या महान व्यक्तीना जी अनुभूती झाली तसा त्यांनी मार्ग दाखवला. ते सर्वच धर्मसंस्थापक महान होते आणि त्यांनी तुम्हाला परमेश्वराप्रत नेणारा एक चांगला मार्ग सांगितला. तुमचं राष्ट्र हे सर्वात तरूण राष्ट्र आहे आणि मी सर्वात जुन्या “सहानुभूती आणि स्वीकृती(Tolerance and Acceptance) मानणा-या संस्कृतीतर्फे तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे.”
◼
स्वामी विवेकानंदांच्या छोट्या भाषणाला तिथे उपस्थित असणा-या सात हजार लोकांनी प्रचंड टाळ्यांनी प्रतिसाद दिला. त्यांच्या पहिल्या संबोधनानंतरच अनेकांनी, विशेषतः स्त्रीयांनी, पुढे सरकण्याचा प्रयत्न केला होता. तिथे हजर असणा-यांनी तर भाषण डोक्यावर उचलून धरलेच पण त्या काळांतल्या अमेरीकन मीडीयाने, वृत्तपत्रांनी स्वामीजींवर मोठमोठ्या हेडलाईन्स दिल्या, लेख लिहिले. एका दिवसांत स्वामीजी हे नांव अमेरीकेत सुपरिचयाचे झाले. स्वामीजींनी खरोखरीच आधुनिक जगाची वर्ण, जात, वंश, इ. भेदाभेद विसरून मानव तितका एक म्हणून एकत्र जगण्याची इच्छाच स्वामीजीनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी तीन वर्षे अमेरिकेत अनेक ठीकाणी भाषणे देऊन भारतीय संस्कृतीचा, हिंदु धर्माचा पाश्चात्य जगाला परिचय करून दिला. मोजक्या लोकांना वेदांत शिकवण्यासाठी वर्ग चालवले आणि वेदान्त सोसायटीची स्थापना केली. भारतातून निघतानाच त्यांनी पाश्चिमात्यांना कोणता संदेश द्यायचा हे ठरवलं होतं. पाश्चात्त्यांचा सगळा भर व्यक्तीगत व सामाजिक मालमत्ता वाढवण्यावर होता. पण त्यांनी माणसाच्या आध्यात्मिकतेचा विचार केला नव्हता. ही पश्चिमेला ग्रीक संस्कृतीची देणगी होती. ग्रीक संस्कृतीने manliness वर भर दिला होता. सामाजिक व राजकीय जीवनावर भर दिला होता. ग्रीकांच्या या विचारांना फक्त साॕक्रेटीसने छेद दिला होता. फक्त त्यानेच माणसाच्या अंतर्यामी वसणा-या शक्तीचा विचार केला होता. म्हणूनच त्या काळच्या राजसत्तेने व तिच्या अधीन असणा-या विद्वानांनी त्याला विष प्राशन करून मरण्याची शिक्षा दिली होती. तो विष प्राशन करत होता, तेव्हां आजूबाजूस त्याचे शिष्य रडत होते.
एकाने विचारलं, “मरणानंतर तुम्हाला कसं…….” साॕक्रेटीस म्हणाला, “खरा मी तुला ओळखता आला तर ना! तू फक्त माझ्या देहाचं काय करायचं ते विचारतोयस. इतरांच करता तेंच करा.” परंतु हा आध्यात्मिक विचार पुढे पश्चिमेत मागे पडला. येशूच्या सांगण्यातील आध्यात्मिकता अशीच ज्यूना चुकीची वाटली होती व त्यांनी त्याला सुळी चढवले. त्याच्या अनुयायांनीही नंतर धर्माकडे फक्त सामाजिक, राजकीय प्रभावाचा एक भाग म्हणून पाहिले. पाश्चिमात्यांतली भयानक युध्दे, त्यांत होणारा नरसंहार, रक्तपात, विधवांचे हुंदके हे सर्व त्या आध्यात्मिक अभावाचा परिपाक आहे असं स्वामीजीनी म्हटलं आहे. (तरी दोन महायुध्दे अजून व्हायची होती.) त्यामुळेच भारतीयांच्या आध्यात्मिक विचारांच अधिष्ठान त्यांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीला असावं असा त्यांचा पश्चिमेला संदेश होता.
◼
तो संदेश ह्या तीन वर्षात अमेरीकेत व युरोपात व्याख्याने देऊन त्यांनी पाश्चात्त्यांना सांगितला. अशाच एका लंडनमधील व्याख्यानाला कु. मार्गारेट नोबल आल्या होत्या. त्या स्वामीजींच्या व्याख्यानाने प्रभावित झाल्या. स्वामीजींच्या दुसऱ्या लंडनभेटीनंतर त्या भारतीय जनतेची सेवा करायला भारतात आल्या व अखेरपर्यंत भारतीयांची सेवा करण्यांत व भारतावर प्रेम करण्यांत आयुष्य व्यतीत केलं. त्यासाठी तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांचा अनेकदा रोषही ओढवून घेतला. पण त्या कायम भारताची बाजू मांडत राहिल्या. भारतीय स्त्रीयांना आधुनिक शिक्षण मिळावं म्हणून त्या प्रयत्नशील राहिल्या. स्वामीजींनी त्यांचा नांव ठेवलं होत, भगिनी निवेदिता, देवाला नैवेद्य दिलेली. तिने अविवाहित राहून या देशाची सेवा केली.
◼
पश्चिमेला स्वामींचा संदेश आध्यात्मिकतेबद्दल होता तर भारतीयांसाठी तो अगदी विरूध्द होता. ग्रीक संस्कृतीतला manliness, प्रयत्नवाद, संकटांवर आणि बाह्य सृष्टीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न, इ. चा स्वीकार करून भारतीयांनी स्वतःची आणि देशाची उन्नती केली पाहिजे. अंधश्रध्दा, भाकड ज्योतिष यांवर विश्वास ठेवू नये. भाकड ज्योतिष्याची गोष्ट आपणांस माहित आहेच. राजाला भविष्य सांगायला आलेल्या ज्योतिषाला प्रधान विचारतो, “प्रथम तुझं आयुष्य किती ते सांग.” थोडा हिशोब करून ज्योतिषी म्हणतो, “अजून ६०वर्षे.” प्रधान तलवार काढून त्याचे मस्तक धडावेगळे करतो आणि सर्वांना म्हणतो, “पहा, हे ह्याचे भविष्य.” तर भिरूता, नकारात्मक वृत्ती, संकुचितपणा यांचा त्याग करून एक राष्ट्र, एक समाज म्हणून स्वतःच्या पायावर उभं रहावं, ही त्यांची इच्छा होती. याचा अर्थ आध्यात्मिकतेचा त्याग करावा असा नाही. त्यांच असं मत होतं की आध्यात्मिकता भारतीयांच्या नसानसांतून भरली आहे. ती हजारो वर्षांपासून त्यांच्या रहाणींत, विचारांत मुरलेली आहे. तेव्हां त्याच भान त्यांना देण्याची गरज नाही. परंतु समाजाच्या ऐहिक प्रगतीकडे भारतीयानी दुर्लक्ष केलं आहे, तिथे अधिक लक्ष दिले पाहिजे. तीन वर्षे आठ महिन्यांच्या दीर्घ प्रवासानंतर स्वामीजी प्रथम कोलंबोच्या किना-यावर उतरले. कोलंबो, पांबन, रामेश्वर, मदुराई, कुंभकोणम, मद्रास असा प्रवास त्यांनी जयजयकाराच्या घोषांत केला.
मद्रासमध्ये त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला व रथावरून मिरवणूक काढण्यात आली. मद्रासहून ते कलकत्त्याला आले व तिथून व्याख्याने देत देत ते अलमोड्यापर्यंत गेले. त्या व्याख्यानांत त्यांचा सारा भर भारतीयांच जीवनमान उंचावणं, जातिप्रथा नष्ट करणं, विज्ञानाचा अभ्यास करणं, औद्योगीकरण करून गरीबी दूर करणं यावर होता. या प्रयत्नातूनच परदास्यांतून मुक्त होता येईल असा त्यांना विश्वास होता.
◼
याच कारणांसाठी त्यांनी पुढे रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनच्या सदस्यांनी सेवेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या प्रेरणेने सर जमशेटजी टाटांनी रिसर्च इन्स्टीट्यूट आॕफ सायन्सची स्थापना केली. सन १९०० मधे ते पॕरीस येथे भरलेल्या दुस-या धर्मपरिषदेलाही ते हजर राहिले. त्यानंतर त्यांनी युरोपीय देश आणि इजिप्तला भेट दिली. पण ह्या सर्व धांवपळीचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झालाच. १९९३ साली म्हणजे वयाच्या तीसाव्या वर्षी सर्वधर्मपरिषदेपासून धडाडीने काम करणा-या स्वामीजींनी केवळ दहा वर्षात हिमालयाच्या उंचीच काम केलं आणि वयाची चाळीशी गाठायच्या आतच आपला अवतार संपवला. शेवटच्या दिवशीसुध्दा ते कार्यरत होते आणि त्या दिवशीच जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं. ४ जुलैला रात्री ९ वाजतां त्यांनी देह ठेवला. असं म्हणतात की कॕलेंडरमध्ये त्यांनी ह्या तारखेवर खूण करून ठेवली होती आणि आपण चाळीशीपर्यंत जगणार नाही असं ते म्हणत. आता त्यांनी ४ जुलैवरच कां खूण केली होती कुणास ठाऊक? ज्या देशातल्या भाषणामुळे त्यांच नांव जगप्रसिध्द झालं त्या अमेरीकेचा स्वातंत्र्य दिन चार जुलैलाच असतो.
आपल्या रात्रीच्या नऊला त्यांचा दिवस सुरू होतो. स्वामीजींनी हाच दिवस कां निवडावा? अनेक प्रश्नांना उत्तरे नसतात. फक्त त्याच्या मागच्या भावना समजून घ्यायच्या असतात.
◼
त्यांच्या या दोन्ही संदेशांचा आपण वर्तमानाच्या संदर्भात करूया. विश्वधर्माची त्यांची कल्पना जरी विचारवंतानी मान्य केली तरी सत्तेची समीकरणे मांडणा-यांना आजही आपला धर्म सुरक्षित रहावा व दुसरा धर्म आपल्यावर आक्रमण करेल अशी भूमिका घ्यायची इच्छा होतेच. आजही धर्माधर्मातील दरी मिटलेली नाही व सर्व धर्मांनी एकमेकांचा मैत्रीपूर्ण स्वीकार केलेला नाही. तेव्हां इतर धर्मांबाबत “सहनशीलता आणि स्वीकृती” ह्या तत्त्वांचा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी पश्चिमेला आध्यात्मिक विचारांची बैठक स्वीकारायला सांगितले. पण पाश्चिमात्य देशांना ती पूर्णपणे स्वीकारतां आलेली नाही. स्वामीजींच्या निधनानंतरच्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी जी अफाट प्रगती केली, त्याच्या बळावर अमेरिकेने आपली “स्ट्रायकींग पाॕवर” वाढवण्याचाच प्रयत्न केला. युरोपच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. त्यांनी दोन युध्दांत जे गमावले, त्यापासून ते थोडे फार शिकले. आध्यात्मिकतेला मात्र पाश्चात्त्य सुशिक्षित जगांत खूप मागणी आली. कांहीजणांनी आध्यात्मिकतेची दुकाने परदेशांत उघडली. खरं अध्यात्म त्यांत किती होतं यावर भाष्य करण्याची माझी योग्यता नाही. भारतीयांची आजची अवस्था तर अशी आहे की भौतिक आणि सामाजिक प्रगती म्हणजे पाश्चात्त्यांची भ्रष्ट नक्कल करायला आपण शिकलो. लोकशाहीची सुध्दा भ्रष्ट नक्कल आपण केली. अत्यंत विचारपूर्वक केलेल्या घटनेचा आणि घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा अनेकांनी स्वतःसाठी गैरफायदा घेतला. स्वामीजीनी पाहिलेली बहुसंख्य गरीब जनता अजूनही बहुसंख्येने दारिद्र्यातच राहिली आहे. दुस-या बाजूला खोट्या आध्यात्मिकतेच्या सोंगामुळे देवळापुढच्या रांगा वाढल्या. यज्ञ, आरत्या, केस वहाणे, उपासतापास, दूरवर चालत जाणे, इ. अनेक कर्मकांडांची महती वाढली. स्वामीजीना ना ही कांही जणांची ऐहिक प्रगती अपेक्षित होती, ना अशी आध्यात्मिकता. आपल्यांतल्या एका वर्गाची, सत्ताधारी आणि सत्तास्पर्धी राजकारण्यांची, आध्यात्मिकतेची नस संपत्तीच्या दाबाने बधीर झाली आहे. स्वामीजींना सर्वात वाईट या गोष्टीचं वाटत असेल की आपण ‘सहनशीलता आणि स्वीकृती’ या तत्त्वांचा त्याग केला. विवेकानंदानी अभिमानाने अमेरिकेत सांगितलं होतं की हिंदुनी धार्मिक आक्रमण केल्याचं, दुस-याचं प्रार्थनास्थळ पाडल्याच एकही उदाहरण नाही. त्याला शंभर वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच आपण त्यांचे उद्गार खोटे ठरवले. हिंदुच्या सहीष्णुतेला कलंक लागला. अशा परिस्थितीत स्वामीजींना स्वर्गसुखाचा त्याग करून देशाला जागं करण्यासाठी, फटकारून जागं करण्यासाठी, पुन्हां या देशांत जन्म घ्यावा असं वाटत असेल. पण मला खात्री आहे की आपण अजूनही हा कलंक पुसून काढायला ठोस कृती करू.
◼
मी माझ्या परीने मला अल्पसे समजलेले स्वामी विवेकानंद मी आपल्यापुढे सादर केले. तुम्ही त्यांच लिखाण मुळातूनच वाचावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि जाता जाता वाचनाबद्दल त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेली एक कथा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं वाचावं. एका पंडिताच्या मनांत असतं की राजाला भागवत वाचून दाखवावं म्हणजे राजाकडून कांही दक्षिणा मिळेल. तो राजाकडे जातो. पण राजा त्याला म्हणतो की भागवताचा पाठ तू नीट समजून घे आणि उद्या ये. पंडित घरी येऊन पुन्हा एक पाठ करतो आणि दुस-या दिवशी परत राजाकडे जातो. राजा पुन्हां त्याला तेंच सांगतो. असं कांही दिवस होत असतांना तो पंडित भागवत दिवसेदिवस मन लावून वाचू लागतो. मग त्याला भागवताचा अर्थ कळू लागतो व त्याचं आचरण बदलू लागतं. मानलौकीक, द्रव्य यांची इच्छा गळून पडते. राजाकडे जाणं तर बंदच केलेलं असतं आणि त्याची आठवणही बूजते. तो भागवताचा पाठ रोज वाचत असे आणि तो ऐकायला लोक येऊ लागले. एक दिवस पाठ वाचून संपला आणि श्रोत्यांत येऊन बसलेला राजा पुढे झाला आणि म्हणाला, “पंडितजी आज तुमचा पाठ ऐकून मी धन्य झालो. काय हवं ते मागा.” पंडिताला आता कांहीच नको होतं. त्याने फक्त स्मित केलं. राजाने जाणलं की आता ह्याला भागवत समजले आहे. असंच वाचा म्हणजे जे वाचाल ते तसंच तुम्हालाही समजेल. माझं भाषण आपण सर्वांनी ऐकलत, सतत उत्तेजन दिलंत, वेळ वाढवून देऊन साथ दिलीत, याबद्दल मी सर्व श्रोत्यांचा खूप आभारी आहे.
धन्यवाद.
अरविंद खानोलकर
Leave a Reply