नवीन लेखन...

स्वप्न

उंच भरारी

नवी कोरी चमचमती फेरारी सभागृहाच्या दारापाशी येऊन थांबली. सर्वांच्या नजरा त्या  आलिशान गाडीवर खिळल्या. ड्रायव्हर ने कारचा  दरवाजा उघडला. प्रेस वाले, फोटोग्राफर्स यांनी गाडी भोवती एकच गलका केला. फ्लॅश च्या प्रकाशाने परिसर लखलखून गेला. कारमधून एक 28 वर्षाचा हँडसम युवक बाहेर आला. नेव्ही ब्लु कलरचा कोट, आणि आत व्हाइट टीशर्ट,  डोळ्यावर रे बॅन चा गॉगल, पायात महागडे फॉर्मल शूज आणि हातात लेटेस्ट आईफोन कानाला लावलेला.  तो तरुण बाहेर पडताच त्याच्यावर शुभेच्छांचा एकच वर्षाव झाला. जो तो त्याला
“अभिनंदन सर”, “अभिनंदन सर”, अस म्हणत  शुभेच्छा देत होता.

फोन वरचं बोलणं थांबवत त्याने आपला हात उंचावला आणि सर्वाचे आभार मानले.

एवढ्यात महाराष्ट्र उद्योजक संघटनेचे अध्यक्ष तिथे आले. त्यांनी त्याच्या गळ्यात  पुष्पहार घालून  स्वागत केले. त्याचा हात आपल्या हातात घेत अध्यक्ष म्हणाले,

“अभिनंदन सर, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. या वर्षी आमच्या संस्थेने उगवते उद्योजक पुरस्काराचा सन्मान आपल्याला देण्याचे ठरवले आहे”..

अध्यक्षांनी त्याला सभागृहात येण्याची विनंती केली.  त्याच्या साठी आरक्षित असणाऱ्या आसनावर त्याला आदराने बसवलं. प्रेसवाल्यानी पुन्हा त्याच्याभोवती गराडा घातला. पुन्हा परिसर प्रकाशमय झाला.

थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाला सुरुवात झाली.

आता पुरस्कार विजेत्याच नाव घोषित करण्याची वेळ आली होती . “मित्रानो…  पुढील पुरस्कार विजेत्याचं नाव घोषित करण्या आधी मी त्यांच्या विषयी थोडं बोलू इच्छितो, ज्यांनी अगदी अल्पावधीत आपल्या उद्योगाला एक नवी उंची गाठून दिली. वयाच्या 28 व्या वर्षी अगदी जिद्दीने आणि चिकाटीने ज्यांनी आपला उद्योग नावारूपाला आणला, एका नव्या उंचीवर आणून ठेवला, इतक्या कमी वयात  अजून पर्यंत कुणीच एवढी  मजल मारली नव्हती. मला या विजेत्याचं नाव घोषित करण्यात अत्यंत आनंद होत आहे. तर लेडीज अँड जंटल मन त्या विजेत्याचं नाव आहे …..”

निवेदकाने लोकांची उत्सुकता वाढवण्यासाठी थोडा पॉज घेतला, सभागृहात शांतता पसरली.

“ आणि  त्यांचं नाव आहे ….. मिस्टर… नितीन सोनवणे….”

सगळीकडे  टाळ्यांचा कडकडाट झाला, आयोजकांनी नितीन ला स्टेज वर येण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या हातात पुरस्काराची ट्रॉफी चमकत होती , नितीन स्टेजवर चढला, त्याने मुख्यमंत्र्यांकडे स्मित हास्य केलं, त्यांच्याकडे पुरस्कार घेण्यासाठी हात पुढे केला  आणि……

आणि नितीन बेडवरून खाली कोसळला… तेवढ्यात त्याच्या कानावर त्याच्या आई चा आवाज आला,

“ नितीन… ए नितीन….  उठ लवकर..,  अरे कामावर जायचं नाही का तुला ?  8 वाजत आले, तुला रोजच उशीर होतो बघ”.

आता कुठे नितीन ला कळलं की हे सर्व जे घडलं ते एक स्वप्न होत….

“काय ही आई पण.. , मस्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार घेत होतो, आणि ही मधेच आली, थोड्या वेळाने आवाज दिला असता तर कमीत कमी स्वप्नात तरी अवार्ड घेतला असता.”

डोळे चोळत नितीन उठला,  ब्रश वर टूथपेस्ट लावत बाथरूम जवळ गेला, ब्रश करून झाल्यावर लगेच घाईघाईत अंघोळ केली. त्याला नाश्ता करायला सुद्धा वेळ नव्हता, तसाच तो आरशासमोर गेला, हाताला जेल लावले आणि आपले दोन्ही हात केसांवरून फिरवत त्याला स्पाईक चा लुक देऊ लागला, विराट कोहली सारखी वाढवलेली दाढी व्यवस्थित ट्रिम झाली की नाही हे पाहण्यासाठी दाढीवरून हात फिरवत तो कधी या अँगलने तर कधी त्या  अँगलने आरश्यामध्ये आपले प्रतिबिंब पाहत होता, मधेच  लयबध्द शिटी सुद्धा वाजवत होता. तेवढ्यात पुन्हा त्याच्या आईने त्याला आवाज दिला,

“झालं का तुझं, चहा नाश्ता तयार आहे ,लवकर खाऊन घे.”

“नको नको , मला लेट होतोय, मी बाहेरच खाईन काहीतरी”, अस म्हणत तो दाराबाहेर पडला.

आज सुद्धा त्याला ऑफिस ला लेट झाले होते, पोचल्यावर शिपायाने  सांगितले की सरांनी तुला आत बोलावलंय. बिचारा घाबरतच सरांच्या कॅबिन जवळ गेला. काचेचा दरवाजा एका हाताने उघडला आणि दुसऱ्या हाताने केस व्यवस्थित करत म्हणाला,

“गुड मॉर्निंग सर,”.

बॉस त्याच्याकडे बघून बोलले, “काय हे ! …   तुझं हे आता रोजचंच झालंय, तुला काम करायचं नसेल तर हा जॉब दे सोडून”.

“ नाही सर मला जॉब ची गरज आहे, मी उद्यापासून वेळेवर येत जाईन”.

“ओके, जा आता, पण लक्षात ठेव, ही शेवटची वॊर्निंग आहे तुला.”

“ओके ”

“ थँक यु सर”.

नितीन आपल्या टेबलाजवळ येऊन बसला, मनातल्या मनात बॉसला शिव्या देत होता,

“अरे कुणाला तुझ्यासारख्या भिकाऱ्या कडे काम करायचंय, सध्या माझा टाईम खराब आहे म्हणून.., नाहीतर आताच लाथ मारली असती तुझ्या नोकरीला,”  नितीन मानातल्या मनात बडबडत होता..

नितीन, साधारण 28 वर्ष वयाचा,चांगला बी कॉम पास झालेला. लवकरात लवकर  श्रीमंत बनायचं स्वप्न तो उराशी बाळगून होता. तशी स्वप्ने सुद्धा तो रोज बघत होता, पण पुढे काही होत नव्हते. येईल तो दिवस ढकलला जात होता. ह्या कंपनीत तो गेले 3 वर्ष अकाउंटंट म्हणून काम करतोय पण त्याच मन काही रमत नव्हतं, लवकर श्रीमंत कस व्हावं एवढेच  स्वप्न तो बघायचा.

दहावीला त्याला 58 टक्के  मार्क्स पडले होते. लोकांनी सांगितलं की हुशार मूलं सायन्स घेतात आणि कमी मार्कस् वाले आर्ट्स घेतात, तुला बरे मार्कस् आहेत तर तू बी कॉम घे, म्हणून त्याने बी कॉम घेतलं, एवढं साधं लॉजिक होत त्याचं.

एके दिवशी त्याने न्यूजपेपर मध्ये ऍड पाहिली,  एक फ्री मोटीवेशनल सेमिनार आयोजित केल्याची जाहिरात होती ती.  व्हॉट्सऍप करून रजिस्ट्रेशन करायचं  त्यात लिहिलं होतं. त्याने पटकन मोबाइल हातात घेत रेजिस्ट्रेशन केलं. उद्या सकाळी सेमिनार होतं.पण त्यासाठी त्याला ऑफिस ला दांडी मारावी लागणार होती. एकीकडे सेमिनार अटेंड करायचं होतं तर दुसरीकडे ऑफिस ला दांडी मारावी लागणार होती. शेवटी बराच विचार केल्यावर त्याने सेमिनार अटेंड करायचं ठरवलं.

तो बरोबर सकाळी 9 वाजता सेमिनारला हजर झाला. कधी नव्हे तो आज अगदी वेळेवर पोहचला होता, त्याला कारणही तसंच होत. कारण आज तो इथे आवडीने आला होता. त्याला भविष्यात काहीतरी मोठं करण्याचं त्याने स्वप्न बाळगलं होत, आणि त्या साठीच तो आज अगदी वेळेवर पोहचला होता.

बरोबर 9.30 ला सेमिनार सुरू झाला. साधारण 35 तल्या एका तरुणाने अगदी उत्साहात  स्टेजवर प्रवेश केला. लगेच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं तेज होत, तो अति उत्साहित वाटत होता. त्या तरुणाने अगदी आनंदाने टाळ्यांचा स्वीकार केला आणि म्हणाला, “मित्रांनो, तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात कारण तुमच्यात काहीतरी मोठं काम करण्याची उर्मी आहे म्हणुन…..”

पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याच्या शब्दात एक प्रकारची जादू होती.

“तुम्हाला भविष्यात खूप मोठं व्हायचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही उराशी एक मोठं स्वप्न बाळगलं  पाहिजे. आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही स्वप्न पाहता तेव्हाच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते…”

पुन्हा जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला.

“मित्रांनो स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा ही कधीच अडचण ठरत नाही, ते तर आपण कसेही उभे करू शकतो. एखाद्या कडून उसने घेऊन किंवा बँकेकडून कर्ज घेऊन ही आपण पैश्याची व्यवस्था करू शकतो. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्यात मेहनत करण्याची उर्मी असावी लागते. दिवस रात्र स्वप्नाला जगावे लागते,  ते पूर्ण कसे होणार यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे लागतात तेव्हाच ते स्वप्न पूर्ण होत.”

नितीन ला अचानक ऊर्जा मिळल्यासारखं झालं, आपण आजच मोठे झाल्यासारखे त्याला वाटू लागले. सेमिनार पूर्ण झाल्यावर त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता.

त्याच्या डोळ्यासमोर त्या मेंटर चे शब्द दिसत होते, त्यामुळे त्याला प्रोत्साहन मिळत होते, पण नक्की काय करायचं हे मात्र त्याला कळत नव्हते. काहीतरी करायचं पण नक्की काय ह्याच विचारात तो सतत असायचा.

एके दिवशी त्याला एका लग्नासाठी सुरत ला जायचं होतं. तिथे गेल्यावर त्याने  लग्नकार्य उरकलं. त्याचे बरेचशे नातेवाईक लग्नाला आले होते.सर्व तरुण मंडळी सुरत फिरण्यासाठी बाहेर पडली. नितीन सुद्धा त्यांच्यासोबत गेला. त्याला त्याच्या नातेवाईकाने सांगितले की तुला जर काही शॉपिंग करायची असेल तर चल आपण बाजारात जाऊ. नितीन ला माहीत होते की सुरत ला चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळतात, म्हणून त्याने टीशर्ट आणि जीन्स घ्यायचा विचार केला. कपड्यांच्या बाबतीत त्याची चॉईस चांगली होती. त्याने एकूण 4 टीशर्ट आणि 4 जीन्स घेतल्या. या घाईगडबडीमध्ये त्याला परत यायला उशीर झाला. आता त्याच्या गावी जाण्यासाठी सकाळचीच ट्रेन होती. मात्र त्यासाठी त्याला घरी न जाता थेट ऑफिस लाच जावं लागणार होतं. नाहीतर त्याला कामावर जायला उशीर झाला असता. रात्रभर नातेवाईकांकडे मुक्काम केल्यावर सकाळी तो थेट ऑफिस ला पोहचला.

ऑफिस मधल्या मित्रांना त्याने खरीदी केलेले टीशर्ट आणि जीन्स खूपच आवडले. त्यातल्या दोघांनी तर तिथल्या तिथेच दोन टीशर्ट आणि जीन्स पसंत केली. त्यांनी त्यासाठी नितीन ला पैसेही दिले. मित्रांना नकार देऊ न शकल्याने बिचाऱ्याला 2 टीशर्ट आणि 2 जीन्स वर समाधान मानावे लागले. संध्याकाळी घरी आल्यावर न जेवताच तो झोपी गेला.

नेहमी प्रमाणे त्याला स्वप्न पडले की तो कपड्यांचा एक मोठा व्यापारी झालाय आणि त्यात तो सक्सेस झालाय. तो खळबळुन जागा झाला. त्याला त्याचा मार्ग सापडला होता. त्याला कळलं की आपल्याला कपड्यांची चांगली पारख आहे आणि म्हणूनच तर मित्रांनी लगेच कपडे खरेदी केले आणि त्याला  त्या बदल्यात पैसेही मिळाले. त्यावरून त्याने ठरवले  की आपण कपड्याचा व्यवसाय करायचा.

बस ठरलं, सकाळी  तो अगदी लवकर  उठला, आईला आवाज दिला,

“आई.. ए आई…”

आई  पण गोंधळली, की हा आज लवकर कसा उठला?

“काय रे..? काय झालं…”

“काही नाही , तू इकडे ये लवकर..”

“हो हो.. आली थांब..”

“आई मी नोकरी सोडतोय आजपासून”

“आं…?”

“मी नोकरी सोडतोय….”

“अरे… डोकं ठिकाणावर तर आहे ना तुझं?”

“हो..”

“काय खूळ लागलंय तुला? अस अचानक नोकरी का सोडाविशी वाटते तुला?”

“ मी कपड्यांचा व्यवसाय करणार”

“अरे… देवा…!”

“अरे, त्यासाठी भांडवल लागतं मोठं, एवढे पैसे कुठून येणार..?”

“काही भांडवल वगैरे लागत नाही, सुरुवातीला मी मित्रांना कपडे विकीन, आणि हळूहळू बघू पुढे,”

“मी एवढा विचार नाही केला अजून, फक्त नोकरी सोडणार आणि कपडे विकणार, बास….”

“ बघ बाबा, मला तर भीतीच वाटते..”

“तू घाबरू नको ग आई.. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा?”

“हो रे बाबा..  तुझ्यावर विश्वास आहे पण…”

“पण बिन काही नाही, तुझ्याकडे  काही पैसे आहेत का?”

“हो आहेत 5 हजार ”

“गुड..”

“दे ते मला, मी आजच सुरत जातो”.

“ अरे.., एवढी घाई कसली झाली तुला? थोडा विचार तर करून बघ?”

“तू पैसे देतेस की नाही…! ”

आई नाईलाजाने घरात गेली आणि कपाटातून 5 हजार रुपये घेऊन त्याच्या हातात देत म्हणाली,

“हे बघ, तुझ्या बाबांना जर हे कळलं तर ते खूप रागावतील.”

“काळजी करू नको आई ,मी काय चोरी किंवा दरोडा नाही टाकत?.. बाबांना नंतर चांगलंच वाटेल बघ…”

आईकडून पाच हजार रुपये घेऊन तो सुरतला गेला.तिथे बराच सर्व्हे केल्यावर चांगल्या ब्रँड चे आणि त्याच्या पसंतीचे काही टीशर्ट आणि जीन्स होलसेल भावात घेतले. त्या दुकानदाराला त्याने प्रामाणिक पणे सांगितले की मी पहिल्यांदाच हा व्यवसाय करतोय तर मला तुमची मदत हवी आहे. दुकानदार चांगला माणूस होता, त्याने त्याला योग्य भावात कपडे दिले. दुकानदाराचे आभार मानून नितीन आपल्या घरी परत आला. त्याला त्याच्या पसंतीची पूर्ण गॅरंटी होती की त्याने आणलेले कपडे मित्रांना नक्की आवडतील.

संध्याकाळी त्याने चार पाच मित्रांना फोन करून सांगितले की मी काही कपडे विकायला आणलेत तुम्ही जर बघितलेत तर बरं होईल, आवडलं तर घ्या.

पुढच्या दोन तीन दिवसात त्याने आणलेले सर्व कपडे त्याच्या मित्रांनी लगेच खरेदी केले, आणि त्याला आणखी काही कपड्यांची आगाऊ मागणी सुद्धा केली. या सर्व प्रकारामुळे नितीनला एक वेगळाच हुरूप आला होता, आता तो जोमाने काम करण्यास सज्ज झाला होता. विशेष म्हणजे त्याला हे काम करण्यात आनंद मिळत होता. तो न थकता न कंटाळा करता सतत नवीन नवीन प्रयत्न करत होता.

आता  व्यवसाय सुरू करून एक महिना झाला होता, हळू हळू सर्व मित्रांकडे तो जाऊन आला होता.पुढे काय करायचं  हा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला. त्याला त्या वक्त्याचे शब्द आठवले.

“स्वप्न  आपण बघितले आहे आणि त्याला पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी आपलीच आहे, स्वप्न सतत डोळ्यासमोर दिसले पाहिजे.  अडचणीतून मार्ग आपणच काढला पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नये”.

मग नितीन ला एक कल्पना सुचली. त्याने मोबाईल बाहेर काढला.  त्याचं फेसबुक पेज ओपन केलं. त्यात त्याच्याकडे असणाऱ्या कपड्यांचे फोटो पोस्ट केले. त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील सर्वाना ती पोस्ट फॉरवर्ड केली. आणि काय चमत्कार… ज्या जुन्या मंडळींपासून तो दूर गेला होता त्या मित्रांना ही बातमी कळताच त्यांनी पोस्ट ला रिप्लाय दिला आणि ऑनलाइन ऑर्डर सुद्धा बुक  केल्या.

आता नितीन मध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास जागृत झाला. तो जोमाने कामाला लागला. त्याने फेसबुक पेजवर  पेड जाहिरात करायला सुरुवात केली. जाहिरात म्हणून त्याने पाम्प्लेट्स छापले. जवळच्या पेपर विक्रेत्याकडे जाऊन त्याने  त्या वृत्तपत्रातुन वाटल्या. त्या जाहिरातीमुळे  अनोळखी लोकांकडून कपड्यांची मागणी वाढली.  आता त्याचा व्यवसाय जोरात सुरू होता. धंद्यावरील लक्ष अजिबात ढळू नये म्हणून त्याने घराच्या भिंतीवर एक भलंमोठं धीरूभाई अंबाणीचं छायाचित्र फ्रेम करून लावलं होतं. त्या फोटोला बघून त्याला प्रेरणा मिळत होती. हातात दमडी नसतानाही धीरूभाईंनी एक भलंमोठं साम्राज्य उभं केलं होतं. तेच नितीन ला आता  करायचं होतं.

व्यवसायाचा आलेख वाढत असताना एके दिवशी नितीन  सुरत ला गेला. ज्या व्यापाऱ्याकडून माल घेत होता तिथे पोहोचला. व्यापाऱ्याशी व्यावसायिक सल्लामसलत करत असताना अचानक समोरून एक सुंदर युवती आत आली. नितीन तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. दोघांची नजरानजर झाली. तिने डोळ्यासमोर आलेले केस हळूच बाजूला सारत  न बघितल्याचा दिखावा केला. नितीनला हे कळलं होतं. तिला बघता क्षणात तो तिच्या प्रेमात पडला. पडणार का नाही ती होतीच तशी सुंदर. रेखीव चेहरा, ते सुंदर  मृगनयनी डोळे, आणि लांब काळेभोर केस नितीन ला आकर्षित करत होते. तो तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला होता. तिने  फिकट गुलाबी रंगाचा टॉप घातला होता आणि त्या टॉपशी मॅच करेल अशी जीन्स घातली होती.  डोळ्यावरून गॉगल काढत ती त्या व्यापाऱ्याशी काहीतरी गुजराती मध्ये बोलत होती, त्या क्षणी नितीनला शाहरुख खाणच मै हु ना मधलं गाणं आठवलं. …..  “तुमसे मिल के  दिल का है जो हाल क्या कहे …   हो गया है कैसा ये कमाल क्या कहे …धूम तर धूम तारा धूम ता…..”

नितीन भानावर आला तो पर्यंत ती तरुणी निघून गेली होती. ती त्या व्यापाऱ्याची मुलगी होती असे त्याला नंतर कळले.

व्यापाऱ्याने त्याला विचारलं,

“कैसा चल रहा है तुम्हारा बिजनेस..?”

“आपकी दुआ से  अच्छा चल रहा है”

“ देखो नितीन भाई, मैने तुमको ठीक से देखा है तुम क्या चीज हो”.

नितीन गोंधळलाच, त्याला वाटलं की याने मला त्याच्या मुली कडे पाहताना  बघितलं की काय.

“ मै समझा नही सर”.

“ अरे भाई तुम एक नंबर के इमानदार आदमी हो, अब तक तुमने पैसे के बारे मे कभी अनाकानी नही की. टाईम पे सब चुकता किया. इसलीये मै तुमको क्रेडिट पे माल देने के लिये तैयार हु, बोलो कितना माल चाहीये?”

“नहि शेटजी,मै इतना माल लेकर  रखुंगा कहा.  मेरे पास दुकान नही है.”

“तो क्या हुआ, दुकान डाल दो.”

“  इतने पैसे नही है मेरे पास”

“ तो बँक से लोन लेलो. दुकान डालो, मै तुम्हे चाहे जितना  माल देता हु क्रेडिट पे”

“तुम्ही एखादी गोष्ट मनापासून आणि चिकाटीने करण्याचा प्रयत्न करता तेव्हा निसर्ग आपोआप तुम्हाला मदत करण्यास सुरुवात करतो. फक्त तुम्ही  तुमच्या कामाविषयी एकनिष्ठ राहिले पाहिजे.” त्या वक्त्याचे शब्द त्याला पुन्हा आठवले.

नितीन ला ही कल्पना चांगली वाटली, त्याने विचार करून सांगतो अस म्हणत व्यापाऱ्याची रजा घेतली. घरी आल्यावर त्याने आईला ही योजना सांगितली. आई ने त्याला बँकेत प्रपोजल टाकण्यास सांगितले. नितीनचे बॅंकेतले व्यवहार पाहून बँकेने त्याला दोन लाखांचं कर्ज देण्याचं मान्य केलं. त्याने आणखी काही पैश्यांची जुळवा जुळव केली. बँकेचे दोन लाख आणि त्यांच्याकडचे काही पैसे असे एकत्र करून त्याने एक दुकान भाड्याने घेतलं. त्यात व्यवस्थित शोभेल अस फर्निचर केलं. कपड्याच्या व्यापाऱ्याकडून क्रेडिट वर कपडे खरेदी केले. सेल्स काउंटर वर एका माणसाची सेल्समन म्हणून नेमणूक केली आणि त्याला सोबत म्हणून तो स्वतः होताच.

नितीन भल्या पहाटे उठला . आई आणि बाबा सुद्धा त्याच्यासोबत होते. बाबांना त्याचा अभिमान वाटत होता. आज त्याच्या दुकानाचं ओपनिंग होत.  त्याने आई बाबांचा आशीर्वाद घेतला. तिघे दुकानाकडे गेले. रिक्षातून उतरले , समोरचं दृश्य पाहून सर्वांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दुकानाच्या  नाम फलकावर झेंडूच्या फुलांची रांगोळी काढली होती आणि मधोमध दुकानाचं नाव लिहिलं होतं. ‘नितीन्स कलेक्शन’. दुकानाचा समोरचा भाग संपूर्ण काचेचा होता. त्यात दोन पुरुषांचे मॉडेल्स पुतळे ठेवले होते. त्याच्या अवतीभोवती खाली जमिनीवर झेंडूची फुलं पसरवली होती. दुकानाच्या गेट वर एक प्रशस्त आणि सुंदर रांगोळी काढली होती. दुकानात प्रखर लाइट ची व्यवस्था करण्यात आली होती. कारण ग्राहकांना कापड पसंत करताना त्याचा उपयोग व्हावा म्हणून. डाव्या बाजूला अर्धवर्तुळाकार पद्धतीचा कॅश काउंटर बनवला होता. त्याच्या अगदी समोर धीरूभाई अंबाणीचं छायाचित्र असलेली फोटोफ्रेम लावली होती. ती अगदी नितीन च्या समोरच होती. त्याला प्रत्येक वेळी प्रोत्साहन देण्यासाठी ती लावली होती. एका बाजूला टिशर्टस रचलेले होते तर दुसऱ्या बाजूला जीन्स लावलेल्या होत्या. कपड्यांची रचना अगदी प्रोफेशनल पद्धतीने केलेली होती.  रंगीबेरंगी टिशर्टस मुळे दुकानाला  आर्ट गॅलरीचा लूक आला होता.

दुकानाचं उदघाटन आई आणि बाबांच्या हस्ते करण्याचं ठरलं होतं. आईच्या हाताने रिबीन कापून दुकानाचा उद्घाटन सोहळा पार पडला. सर्व उपस्थितांसाठी नितीन ने स्नॅक्स ची व्यवस्था केली होती. त्याची जवळची मित्र मंडळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती.

नितीन बद्दल आधीच जाहिरात चांगली झाली असल्यामुळे त्याच्या दुकानात विक्री चांगल्या प्रकारे होत होती . नितीन स्वतः ग्राहकांना अटेंड करत होता. त्यांच्याशी आपलेपणाने वागत होता. त्यांना वस्तू आवडेलच याचा तो प्रयत्न करत होता.

हळू हळू नितीन वरच कर्ज कमी होत आल होतं . तो आता व्यवसायात चांगलाच स्थिरावला होता.

असंच एके दिवशी नितीन सुरतला माल घेण्यासाठी गेला होता, मात्र शेटजी तिथे नव्हते. त्यांच्या जागी तीच तरुणी बसली होती. तो तिच्या कडे गेला.

“हाय..”

तिने त्याच्याकडे पाहत म्हटलं,

”हाय”

“सेठजी नही आये क्या आज?”

“नही, वो बाहर गये है,  थोडी देर मे आ जायेंगे , आप बैठो ना”

नितीन बाजूला असलेल्या सोफ्यावर बसला,

काहीतरी विषय काढायचा म्हणून तो मुद्दाम बोलला,

“आप हमेशा आते हो क्या दुकान पे”

“नही, कभी कभार आती हु”

“अच्छा”

नितीनच्या  तोंडचे शब्दच पळाले होते. त्याला काय बोलू ते सुचतच नव्हते.

तेवढ्यात शेटजी आले.

”अरे नितीन भाई कैसे आना हुआ”

“कुछ नही, सुरत आया था तो सोचा आपसे मिलता चलू.”

“अच्छा हुआ”

थोड्या फार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. नितीन तिला बघण्यासाठी तिथेच घुटमळत होता. दोघे एकमेकांकडे चोरून पाहत होते. अखेर नितीन तिथून बाहेर पडला. पण नजर मात्र  तिच्या कडेच होती. ती पण त्याला शेवटपर्यंत पाहत होती. असच नीतीन तिला भेटण्यासाठी काहीतरी बहाणे काढून दुकानात  सतत जात होता.  ती सुद्धा दुकानात काही काम नसताना वारंवार येत होती . या निमित्ताने त्यांची दोघांची ओळख वाढू लागली. दोघेही एकमेकांना पसंत करत होते.

एक दिवस मात्र त्याला राहवलं नाही त्याने थेट शेटजींनाच विचारलं,

“शेटजी मै आपकी बेटी से शादी करना चाहता हु. आप इजाजत दे  तो.”

“कौन किंजल !”

“हा”

शेठजीने तिच्याकडे पाहिलं, ती लाजून खाली पाहू लागली. तिच्या लाजण्यात शेठजीना तिची सहमती दिसली . नितीन ने पण त्याच्या आईवडिलांची परवानगी घेतली.  नितीन महाराष्ट्रीयन आणि किंजल गुजराती असून सुद्धा दोन्ही कडच्या परिवाराच्या संमतीने दोघांचे लग्न झाले.

किंजल नितीन ला त्याच्या व्यवसायात जमेल तेवढी मदत करत होती.दोघेही मन लावून व्यवसाय सांभाळत होते.

दिवाळीच्या दिवसात घरात सगळीकडे आनंदी आनंद असताना अचानक रात्री त्याच्या सेल्समन चा फोन आला की दुकानाला आग लागली आहे. नितीन आणि किंजल दोघांनाही ही बातमी ऐकून धक्काच बसला. दोघेही घटनास्थळी लगेच हजर झाले. तो पर्यंत अग्नी शामक दलाच्या जवानांनी आग विझवली होती.  बाजूच्या दुकानात गॅस सिलेंडर चा स्फोट झाला होता, त्यामुळे नितीन च्या दुकानात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली होती. मात्र दुकानातील सर्वच्या सर्व माल जळून खाक झाला होता. नितीन च्या  स्वप्नाची  या आगीत राखरांगोळी झाली होती.

पुढचे दोनतीन आठवडे नितीन घरातून बाहेर पडला नव्हता . त्याच स्वप्न धुळीस मिळालं होतं. तो पुन्हा शून्यावर आला होता. त्याचा आत्मविश्वास ढळला होता. पण किंजल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.  तिने त्याला आधार दिला. त्याची समजूत काढली. तिने संगीतल की आपण पुन्हा नवीन कर्ज काढू आणि परत जोमाने आपला व्यवसाय उभा करू.
नितीन ला त्या व्याख्यानातील  शब्द आठवले.

“तुम्ही प्रगतीच्या वाटेवर असताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, जेवढी जास्त संकटे येतील तेवढ्या जास्त जोमाने तुम्ही आपल्या लक्षाकडे मार्गक्रमण करत असता. अडचणींना न जुमानता आपल्या लक्ष्यावर मन केंद्रित करा तुम्हाला यश नक्की मिळेल”

नितीन ने किंजल च्या सांगण्यावरून पुन्हा बँकांकडून कर्ज घेतले. नवीन फर्निचर बनवले गेले. पुन्हा दुकानात माल भरण्यात आला आणि आता नितीन दुप्पट जोमाने कामाला लागला. संपूर्ण शहरात त्याने दुकानाची जोरदार जाहिरात केली. वर्तमान पत्रांमधूनही त्याने जाहिरात सुरू केली. लोकांचा त्याच्यावर असलेला विश्वास आणि उत्तम प्रतीची मालाची गॅरंटी याच्या जोरावर नितीन पुन्हा कापड व्यवसायात अग्रेसर झाला. हळुहळू शहरात  त्याच्या चार शाखा निर्माण झाल्या होत्या. लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या.

अस असताना एके दिवशी किंजल सहज बोलली की आपण एखाद्या कापड गिरणीतून  आपल्याला हवा तसा कापड डायरेक्ट  खरेदी करायचा. तो शिलाई करणाऱ्या  कंपनी कडून  शिवून घ्यायचा आणि त्यावर आपल्या ब्रँड च नाव जर छापलं तर लोकांमध्ये आपल्या दुकाना बद्दल विश्वासार्हता आणखीन वाढेल. हे प्रपोजल नितीन ला खूपच आवडले. त्याने लगेच कापड गिरण्यानां भेटी द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडून उत्तम प्रतीचे कापड खरीदी केले गेले. जवळच्या शहरातील उत्तम शिलाई करणाऱ्या कंपनीला त्याने शिलाईचे कॉन्ट्रॅक्ट दिले. आता ब्रँड चे नाव काय द्यावे असा प्रश्न उपस्थित झाला. जस रेंमंडस आहे त्याप्रमाणे नितीन्स अस नाव ब्रँड ला देण्याचं ठरलं.त्याच्या ब्रॅंडला बाजारात मागणी वाढू लागली. अनेक नामांकित कंपन्या त्याच्याकडे फ्रांचाईसी घ्यायला तयार झाल्या.  बघता बघता जवळपासच्या शहरांमध्ये नितीन्स च्या एकूण बावीस शाखा निर्माण झाल्या. हे सर्व नितीन ने फक्त चार वर्षात केलं होतं.
एक दिवस सकाळी सकाळी आईने नितीन ला आवाज दिला.

“ नितीन, अरे कसलं तरी पत्र आलय बघ तुला”

नितीन आईजवळ गेला त्याने तो लिफाफा उघडला आणि त्यातला मजकूर वाचून त्याच्या डोळ्यातून आपोआप आनंदाश्रू वाहू लागले.

त्याच्या डोळ्यात पाणी बघून आईने विचारणा केली, तेव्हा नितीन आईच्या कुशीत शिरला आणि मनसोक्त रडला.

“काय  झालं बाळा, का रडतोस?”

“आई,  मी पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरलं , माझा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार आहे पुढच्या आठवड्यात.”

आईलाही भरून आलं, किंजल नितीनला मिठी मारून ती सुद्धा आनंदात सहभागी झाली.

आज तो दिवस उगवला, सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरलं होत. पहिल्या रांगेत नितीन चे आईबाबा बसले होते, त्यांच्या शेजारी किंजल बसली होती आणि तिचा हात आपल्या हातात घेत तो 32 वर्षाचा तरुण बसला होता.

निवेदकाने घोषणा केली, पुढील पुरस्कार विजेत्यांच नाव आहे……

नितीन सोनवणे….

टाळ्यांच्या गजरात नितीन स्टेजवर गेला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याने पुरस्कार स्वीकारला… पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर आले…. त्याने माईक हातात घेत उपस्थितांना उद्देशून आपल्या भावना व्यक्त करत म्हणाला,

“मित्रानो, मोठी स्वप्ने अवश्य पाहत जा आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकतीनिशी प्रयत्न करा,  यश  लोटांगण घालत तुमच्या पायाशी येईल….

— भैय्यानंद वसंत बागुल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..