ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या,
स्वप्न मजला आवडते भावते
कल्पनेचे राज्य जरी,
आनंददायी वाटते….II धृ II
तव प्रतिमा मनी बसवली,
आठवण सदैव येवू लागली ।
जागेपणी मिळे न मजला,
स्वप्नी सारे तेच अनुभवते…….१
स्वप्न मजला आवडते ,
पूर्णत्वाचे सुख आगळे,
जीवन प्रवाही येती अडथळे ।
हवे हवेसे मनी ठरवी ते,
केवळ स्वप्नची मिळवूनी देते….२
स्वप्न मजला आवडते ,
कल्पना भाव तरंगे उठूनी,
रात्री गेल्या कित्येक रंगूनी ।
क्षणीक असूनी भ्रामक जरी,
स्वप्न दिलासी देवून जाते….३
स्वप्न मजला आवडते,
विश्वपसारा मायेचा हा,
जीवन गुंता दिसतो पहा ।
किरण आशेचे त्यात चमकूनी,
स्वप्न हे वरदान ठरते….४
स्वप्न मजला आवडते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply