देवेंद्रांनी तातडीने इंद्रप्रस्थाच्या रिझर्व बँकेचे गर्व्हनर श्रीयुत कुबेरचंद्र यांना तातडीने कार्यायलात बोलावून घेतले. तातडी इतकी त्यांनी स्वत:चा सप्तअश्व जोडलेला विशेष रथ कुबेरचंद्रांकडे पाठवला.देवेद्रांचे विशेष वाहन महाली आल्याचे बघून कुबेरचंद्र यांच्या ह्रदयात टीकटीक सुरु झाली.कारण आताशा देवेंद्राच्या मनी बँकेसाठी नवे गर्व्हनर जनरल यांची नियुक्ती करण्याचे चालले होते.
कुबेराचा खजिना म्हणून ज्याचा एवढा गवगवा होत होता तो रिता रिताच होत चालला होता.इंद्रप्रस्थ राजधानीचे पूर्वी काय वैभव होते.या वैभवाने रावण ते नरकासूर साऱ्यांनाच भूरळ घातली होती.राक्षस गणातील अनेक थोरांनाच नव्हे मानव गणातील काही बहादुरांनाही स्वर्गावर स्वारीचे स्वप्न पडत असे.त्यातील काहीजण हे स्वप्न वास्तवातही उतरवित असत.तेव्हा काही काळ देवेद्रांना परांगदाही व्हावे लागे.गेले ते दिवस आणि गेले ते वैभव. खजिन्याला कधी भोक पडले ते त्या मठ्ठ कुबेराला कळले नाही.वित्तीय व्यवस्थापन म्हणून काही तंत्र असते आणि त्याचे काही मंत्र असतात हे त्यास समजावून घ्यावे वाटले नाही.सदासर्वकाळ आमच्यासोबत नृत्यदरबारी मदहोश.हाती रम आणि सोबतीला रमणी अशा वेळी रोम म्हणजे खजिना गळणार नाही तर काय?
अशा या कुबेरास आता बाजूला सारून नव्या दमाच्या कुबेराची नियुक्ती करण्याची वेळ आली आहे.ही वेळ आपण चुकवली तर काळ आम्हास माफ करणार नाही.ताबडतोब हालचाली करुन कुबरेचंद्राला नारळ दिला पाहिजे.असे विचारचक्र देवेद्रांच्या मनी घोळत असतानाच कुबरेचंद्रांचे महाली आगमन झाले.
कुबरेचंद्र धावतच कार्यालयीन कक्षात आले. देवेद्रांनी आसनस्थ होण्याचे सांगून त्यांचे क्षेमकुशल विचारले. कुबेरचंद्र रिलॅक्स झाले. देवेंद्र काय सांगतात हे ऐकण्यासाठी त्यांचे कान उत्सुक झाले.
देवेंद्रांनी त्यांना विचारलं,कुबेरचंद्र तुम्ही किती तास झोपता हो.
महाराज प्रकृतीसाठी आठ तास झोप आवश्यक असल्याचे वैद्य महोदय अश्विनीकुमारांनीच सांगितलं असल्याने आठ तास तर नक्कीच झोपतो. आमची निद्रा बहुतेक वेळेस दहा-बारा तासांच्या पलिकडे कशी काय अलगद पोहचते याचं रहस्य आम्हास अजून सापडलेलं नाही.
बरंं.आता मला सांगा ,तुम्ही झोपेत करता काय..देवंद्रांनी प्रश्न विचारला.
या प्रश्नाने कुबेरचंद्रांपुढे अंधारी आली.झोपेत झोपेशिवाय आणखी करणार काय? हा प्रश्न विचारण्याचा हेतू काही चांगला दिसत नाही महाराजांचा.कुबेरचंद्र स्वत:च्या मनी बोलू लागले.त्यामुळे त्यांना देवेंद्रांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास विलंब झाला.
देवेंद्र गरजले ,कुबरेचंद्र झोपलात की काय?आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या..
महाराज झोपेशिवाय,झोपेत काय करु शकतो.
कुबेरचंद्रा झोपेत चालू शकतो. बडबडू शकतो.बाजुला झोपलेल्याच्या कंबरेत लाथ हाणू शकतो,हे दीपिका पदुकोन नामे अप्सरेने चेन्नई एक्सप्रेसनामे चित्रपटात दाखवून दिल्याचे परवाच नारदेश्वरांनी सांगितले आहे.झोपेत स्वप्न पाहु शकतो.तुम्ही स्वप्न सुध्दा पाहत नाही काय?याचा अर्थ तुम्हास झोपण्याचा अधिकारच नाही.
महाराज असं काही म्हणू नका..आम्हास झोपेत स्वप्न पडतात.आपल्या प्रश्नाच्या गुगलीने आम्हास चकवले नि आम्ही निरुत्तर झालो मघा.
तुम्हास स्वप्न कुणाची पडतात.
महाराज आठवत नाही .
प्रयत्न करा..
खरच,काहीच आठवत नाही.
कुबेरचंद्रा तुम्ही स्मरणशक्तिला ताण द्या.काल तुमच्या स्वप्नात माधुरी दीक्षित नव्हत्या का आल्या..
या कोण महाराज..कुबेराने विचारलं.
बरं ते जाऊ दे परवा मध्यरात्री तुमच्या स्वप्नात मर्लिन मन्रो नव्हत्या का आल्या..
तुम्हास कसे ठाऊक?
मेनकाने सांगितले का.तिची ही चुलत बहीण.
हे आम्हास ठाऊक नव्हते महाराज..
कुबरेचंद्रा..तुम्हास काहीच कसे ठाऊक नसते .तुम्ही इंद्रप्रस्थाच्या खजिन्याचे प्रमुख आहात हे तरी ठाऊक आहे की नाही.
आम्ही समजलो नाही महाराज..
तुमच्या खजिन्याला लागलेली गळती तुम्हाला दिसतेय की नाही?
महाराज महागाई स्वर्गाला भेदून मंगळापर्यंत पोहचली असताना कुबेराचा असला म्हणून काय झाला खजिना रिता होणारच.
मग,तुम्ही काय हातावर माणिकचंद चोळत बसणार? आता तरी जागे व्हा. राखी ,उर्सूला,मर्निलचे स्वप्न बघण्याचे तुमचे दिवस आणि वयही राहिले नाही.जरा जबाबदारीने स्वप्न बघा.
म्हणजे काय महाराज..
कुबेरचंद्रा,पृथ्वीतलावरील कुणा साधूस सोन्याच्या खजिन्याचे स्वप्न पडतात. तसे तुम्हास का पडू नये? पहाटेच्या स्वप्नात आता फक्त तुम्हाला कोणतीही सोनाक्षी दिसायला नको,दिसायला हवे ते फक्त सोनेच. पाहटेची स्वप्न खरी ठरतात असं आपले गुरुवर्य वशिष्ठ नेहमीच सांगतात.मग हे सोन्याचे स्वप्न बघा..खोदकामाचे आम्ही बघतो.कर्नाटक प्रांती असलेले आमचे भक्त शिरोमणी शेट्टी बंधूस खोदकामाचे सांगून ठेवतो.चला चालू लागा नि झोपू लागा तत्काळ..देंवेद्रांनी कुबेरचंद्रांना आदेश दिला.
Leave a Reply