पुन्हा एकदा त्याच स्वप्नामुळे स्नेहा ला जाग आली. गेले काही दिवस हेच स्वप्न तिला दिसत होतं. ” एका घरातून बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. सकाळी वॉक ला बाहेर पडलेली स्नेहा त्या आवाजाकडे ओढली जाते. बंगल्याचं दार नुसतं लोटलेलं असतं. दार ढकलून स्नेहा आत जाते , नजरेला कुणीही पडत नाही. हाकेलाही कुणी ओ देत नाही. रडण्याचा आवाज वरच्या मजल्यावरून येतोय हे लक्षात येताच स्नेहा धावत वर जाते. वरती २ खोल्या दिसतात. आवाजाची दिशा हेरत स्नेहा त्या खोलीत शिरते तसा एक सुंदरसा पाळणा तिला दिसतो. आजूबाजूला कुणीही नाही …स्नेहा पाळण्याजवळ जाते.. ते गोंडस बाळ तिचं लक्ष वेधून घेतं. स्नेहाकडे बघताच ते बाळ रडायचं थांबून गोड हसतं तशी ती बाळाला उचलून घ्यायला पुढे जाते …आणि …..
नेमकी आजही स्नेहाला याच वेळी जाग आली. दर वेळी हे असंच व्हायचं …स्वप्नाच्या या टप्प्यावर आल्या नंतरच तिला जाग यायची …आणि स्नेहा अस्वस्थ व्हायची.
स्नेहा … वय वर्ष ३२..व्यवसायाने फिटनेस ट्रेनर . शहरातल्या एका नामांकित जिम मधली एक कुशल फिटनेस ट्रेनर म्हणून ती प्रसिद्ध होती. स्नेहा ने अनेकांना फिटनेस फ्रीक करून सोडलेलं…लोकांना व्यायामाची गोडी कशी लावायची याची स्नेहाला उत्तम जाण होती आणि म्हणूनच तिला इतर ठिकाणहून खूप ऑफर्स येत असत. पण जिथे पहिली संधी मिळाली त्या कामालाच सर्वस्व मानून तिथेच कार्यरत रहायचयं आणि बाकी कामं फ्री लान्स पद्धतीने सुरु ठेवायची असं तिचं ठरलेलंच होतं. मुळात चार दगडांवर पाय ठेवण्याचा तिचा स्वभाव नव्हताच मुळी . एक काम घेऊन त्यातच झोकून देण्याची तिची वृत्ती अनेकांना भावत असे.
स्नेहा आणि धीरज च्या लग्नाला ६ वर्ष होऊन गेलेली. एका सुखवस्तू एकत्र कुटुंबात ती दोघं राहत होती. धीरज आय टी क्षेत्रात सॉफ्ट स्किल्स प्रोफेशनल म्हणून कार्यरत होता. त्यांची ओळख जिम मधलीच.स्नेहा कडून व्यायामाची गोडी लावून घेण्याऱ्यांपैकी एक तोही होताच. आणि असं होता होता कधी दोघांना एकमेकांची गोडी लागली हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही. खरंतर दोघांचे स्वभाव तसे विरुद्धच . स्नेहा अबोल गटात येणारी तर धीरज प्रचंड गप्पिष्ट आणि विनोदी.. पण होकार द्यायला स्नेहाला त्याने बोलतं केलंच बरं का! त्यांच्या नात्यातली सर्वात खास गोष्ट म्हणजे ते कायम एकमेकांचे उत्तम मित्र होते. नवरा बायको या नात्यातला ताण त्यांच्यात कधीही नव्हता.
आता दोघांनाही आई बाबा होण्याची इच्छा होती. दोघांच्या तब्ब्येती उत्तम. यासाठी कुठलेही कृत्रिम उपाय, तपासण्या इ च्या मागे लागायचं नाही हे दोघांचं अगदी पक्क ठरलेलं होतं. सुदैवाने स्नेहाला सासर किंवा माहेरकडून या बाबतीत काहीही ताण नव्हता. कुठले टोमणे , सल्ले , उपाय हे असं कधीच तिला घरातून ऐकून घ्यावं लागत नव्हतं. पण का कुणास ठाऊक तिलाच या गोष्टीचा एक नकळत ताण जाणवत असे. आपण अजून आई बाबा झालो नाही हे कुठेतरी तिला त्रास देत होतं . विशेष करून जेव्हा मैत्रिणींच्या बातम्या कळायच्या तेव्हा. तिच्या पेक्षा वयाने लहान किंवा तिच्या बरोबरीच्या मैत्रिणी किंवा नात्यातल्या इतर बहिणी , सगळ्यांकडे बाळं तरी होती नाहीतर बातम्या तरी . हे ऐकून तिला आनंद होत असे पण सगळ्याचा संबंध ती स्वत:शी उगाचंच जुळवून घेत होती. तिला पडणाऱ्या स्वप्नाचा संबंध याच भावनेशी होता. धीरजही त्याच्या व्यवसायामुळे तसा व्यस्तच असायचा. बऱ्याचदा शहराबाहेर जावं लागायचं .पण स्नेहाच्या संपार्कात तो सतत असायचाच. तसा त्या दोघांना एकत्र वेळ कमीच मिळत असे पण virtually का होईना, ही कसर तो भरू काढ़ायचा प्रयत्न करत असे.. त्यामुळे स्नेहाच्या या परिस्थितीची त्याला कल्पना होती. धीरज च्या सांणगण्यावरूनच स्नेहाने समुपदेशन घ्यायला सुरुवात केली. तिची मैत्रीण अनुराधाच ते करत असल्यामुळे तशी अबोल असलेली स्नेहा इथे मात्र मोकळेपणाने व्यक्त होत होती . गेल्या काही दिवसांच्या सेशन्स नंतर स्नेहाला खूप बरं वाटत होतं हे खरं. स्वप्न पडून गेल्यानंतरची तिची अस्वस्थता आता पुष्कळ कमी झालेली. शिवाय आता हे स्वप्न तिला अगदी दररोज पडत नसे. असं असताना सुद्धा आपल्याकडून काहीतरी राहून जातंय हे तिला सतत वाटत होतं . नेमकी कुठली गोष्ट तिला खाते आहे हेच समजत नव्हतं.
एकदा अनुराधाने तिला सविस्तर समजावलं होतं . “स्नेहा शांत हो …अगं आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण सगळेच कधीतरी अडकून बसतो. उत्तरं आपल्या आजूबाजूलाच असतात खरं पण आपण काळजीचं आणि शंकांचं असं काही जाळं तयार करतो की आपण इच्छा नसतानाही , अगदी आपल्या नकळत त्यात गुंतत जातो. खरं सांगू , तुझं ना असच काहीसं झालंय.. स्वतःकडे त्रयस्थपणे बघ स्नेहा, मला माहिती आहे हे सोपं नाही पण खूप अवघडही नाही गं”. हे सगळं ऐकून स्नेहा म्हणत असे ,’ अगं अनु कळतंय गं पण वळायला सुद्धा हवं…तू लिहून दिलेले प्रश्न रोज वाचते मी ” असं म्हणत स्नेहाने तिची फाईल पुढे सरकवली.’
प्र .१ – मला कुठल्या काळज्या वाटतात?
प्र. २- त्यापैकी सर्वात महत्वाच्या काळज्या माझ्या दृष्टीने कुठल्या?
प्र. ३ -त्यापैकी निर्थक कुठल्या वाटतात?
प्र . ४-यापैकी दोन्ही गटात कुठल्या काळज्या येतात?
प्र . ५-यापैकी कुठल्या काळजीवर उपाय आहे /नाही?
प्र . ६-मी कुठले उपाय करायला तयार आहे / नाही ?
प्र . ७- मला इच्छा असलेल्या गोष्टींपैकी किती आज माझ्या आयुष्यात घडल्या आहेत/नाहीत ?
प्र. .८-ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात नाहीत त्याची संख्या किती?
प्र .९- ज्या गोष्टी नाहीत त्यामुळे माझ्या आयुष्यात माझ्या मते काय फरक पडतो आहे/नाही ?
प्र. १०- आज आयुष्याच्या या टप्प्यावर मी आनंदात आहे का/नाही ?
तिला थांबवत अनुराधा म्हणाली,”पुरे पुरे , अगं तुझ्या या वेळच्या उत्तरांपैकी ९०% उत्तरं तू सकारात्मक दिली आहेस स्नेहा. याचा अर्थ किती गोष्टी तू विनाकारण तयार केल्या आहेस कल्पनेत. आणि relax ..हे खूप स्वाभाविक आहे गं . आता तुला याची उत्तरं सापडतायत ना …chill … यातून तुला पूर्ण बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही .”
अनुच्या या relax chill शब्दानं स्नेहाला खूप धीर येत असे. पण अजूनही पाणी कुठेतरी मुरत होतं .त्या एका कोड्याचं उत्तर तेवढं शोधणं बाकी होतं.. या विषयांवर तिच्या आई वडिलांशी सुद्धा तिने मुद्दाम बोलणं टाळलेलं . स्नेहा एकुलती एक त्यामुळे कुटुंबातही बोलावं असं कुणी नव्हतं . ती व्यक्त व्हायची ती फक्त धीरज पुढे . धीरज अनुराधाच्याही संपर्कात होता. अनुराधा स्नेहाला ओळखत असल्यामुळे हे सगळं जितकं साधं सोपं करून तिला सांगता येईल तेवढं ती करत होती . या सगळ्याबद्दल धीरज ने स्नेहाशी बोलताना कोणता सूर ठेवला पाहिजे, काय विचारायचं टाळलं पाहिजे हे सगळं अनुने त्याला समजावलं होतं.
धीरज स्वतःच सॉफ्ट स्किल्स ट्रेनर असल्याने त्याला तसे खूप प्रयत्न करावे लागतही नसत. स्नेहाला तरी धीरज सोडल्यास जवळचं अजून कोण होतं ?
अनुच्या सांगण्यावरून धीरजने स्नेहा सोबत एक छोटी सुट्टी ठरवली. एका ब्रेकची गरज दोघांनाही होती .रोजचा फोनवरचा संपर्क वेगळा आणि प्रत्यक्ष सहवास वेगळा. निसर्गाच्या सान्निध्यात दोघेही रमले होते. आणि विशेष म्हणजे या दरम्यान “ते ” अस्वस्थ करणारं स्वप्न स्नेहाला पडलं नव्हतं . ही सुट्टी ठरल्यापासून खरं तर स्नेहाने खूष असायला हवं होतं पण होत विरुद्धच होतं . नेमकं आत्ताच हे स्वप्न पडणं बंद कसं झालं हे तिला समजेना.. तिची अस्वस्थता लक्षात येत धीरजने तिला विचारलं ,”काय गं काय झालं ?
स्नेहा: अरे किती दिवसात ते स्वप्न पडलंच नाही मला!!
धीरज : अच्छा , आता अनुला आपण सांगूया, की बाई ते स्वप्न पुन्हा दिसेल असं काहीतरी कर.
धीरज तसा गमत्या होता.. हे असे विनोद त्याला वरचेवर सुचत असत.
स्नेहा : गंमत कसली रे करतोयस. तुझ्या लक्षात आलंय का? जेव्हापासून आपण ही ट्रिप प्लॅन केली तेव्हापासून …अगदी तेव्हापासून हा फरक पडलाय.
धीरज: ग्रेट! फरक पडलाय ना? हेच तर हवं होतं आपल्याला …बघ जरा स्वतःकडे..किती शांत वाटते आहेस आज ! तेही इतक्या दिवसांनी !
स्नेहा: धीरज…थांब ! या सगळ्याचा अर्थ लागला का तुला? जे एवढ्या दिवसात घडलं नाही. ज्याची उत्तरं एवढ्या दिवसात सापडली नाहीत ती आज सापडतायत .. काहीशी भावुक होऊन पण तरीही खंबीरपणे स्नेहा म्हणाली ,” धीरज …तू …तू आहेस माझं सर्वस्व…आज एवढ्या दिवसांनंतर आपल्याला वेळ मिळणार या एका विचाराने माझा ताण हलका झाला. एवढ्या दिवसात मी तुला कधीही हा प्रश्न विचारला नाही पण आवाज विचारते..
अजून आपण आई बाबा झालो नाही . पुढे होऊ न होऊ …ते आपल्या हातात नाही. पण आज तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी आहे धीरज. आणि मी यात प्रचंड समाधानी आहे रे. पण धीरज आज तू बोल …तू खूष आहेस का?
तुझ्या कामाच्या व्यापात तुला माझ्यापाशी मन मोकळं करता येत नाही हे एवढ्या दिवसात माझ्या लक्षातच येऊ नये? भावना काय फक्त आम्हा बायकांनाच असतात? तुम्हा पुरुषांना नसेल व्यक्त व्हावंसं वाटत? धीरज आज तू बोल..तूच म्हणतोस ना मी तुझी बायको नंतर …सर्वात चांगली मैत्रीण आधी ..मग एका मित्रासारखा व्यक्त हो.. तुला या सगळ्याबद्दल,माझ्याबद्दल, बाबा होण्याबद्दल काय वाटतं ? माझा ताण हलका झाला धीरज कारण माझं सुख समाधान तू आहेस हे मला समजलंय . पण तुला काय वाटतंय मला आज जाणून घ्यायचंय .
हे सगळं ऐकूनही धीरज शांत होता .त्याचं नेहमीचं स्मित त्याच्या ओठांवर होतं . स्नेहा गमतीने बऱ्याचदा म्हणत असे की धीरज इतका हसतमुख आहे की माणूस वारला असल्या ठिकाणी तो गेला तरी तिथली लोकं दु:ख विसरून हसू लागतील . प्रसन्न चेहऱ्याचा धीरज स्नेहापाशी आला. तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याने तिला खाली बसवलं.थोडं पाणी पाजलं .. आणि धीरज बोलू लागला.
धीरज: स्नेहा, गेली १२ वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय . या सगळ्या वर्षातली सर्वात चांगली गोष्ट ही की आपण कायम एकमेकांचे होऊन राहिलो. आपण नवरा बायको या नात्यात असलो तरी मी ठामपणे हे सांगू शकतो की स्नेहा माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि मी तिचा सर्वात चांगला मित्र. आणि आपलं हेच नातं माझ्यासाठी पुरेसा आहे गं . मला सांग स्नेहा या एवढ्या वर्षात आपण एकमेकांजवळ सहवासापलीकडे काही मागितलय का गं ? आपण लग्न करण्याचं ठरवलं तेव्हा कोण होतो आपण ? कामाचा श्रीगणेशा केलेले तरुण- तरुणी … आणि एकमेकांवर प्रचंड प्रेम आणि विश्वास असलेले मित्र-मैत्रीण. बास…स्नेहा आपल्या नात्याचा पाया हाच आहे आणि तो कायम राहणार आहे. आपल्याला हवी होती ती एकमेकांची साथ . आयुष्याच्या प्रेत्येक टप्प्यावर. तेव्हा तू किंवा मी हा विचार कधीही केला नाही की आपण आई बाबा होऊ का ? झालो तर काय किंवा नाही झालो तर काय? मग हे प्रश्न आत्ता तरी का बरं पडावे ?
खरं सांगू स्नेहा या विषयाचा मी विचारंच केला नव्हता.. कारण मला आपलं नातं इतकं परिपूर्ण वाटतं की अजून कशाची गरजच भासली नाही. पण तुला अस्वस्थ बघितलं आणि या विषयाचा मी विचार करायला लागलो. आज मात्र मी निश्चिन्त झालो. कारण आपल्या एकमेकांप्रतिच्या भावना सारख्या आहेत हे मला जाणवलं . एवढे दिवस तुला स्वप्न पडत होतं कारण तू बाकी सगळं विसरून केवळ आणि केवळ आईपण शोधत होतीस. पण आज तू आपणहून ती धूळ बाजूला सारलीस आणि तुला तुझं उत्तर मिळालं. स्नेहा मी खूप खूष आहे गं तुझ्यासोबत . पुढे काय होणार हे आपल्या हातात नाही मग त्याचा विचार का करायचा? उद्या जरी आईबाबा झालो तरी ते आपल्याकरता बोनस असणार आहे . पण आज तू सोबत असताना मला आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही हे शंभर टक्के खरं .
स्नेहा स्पष्टच सांगतो …मला तू महत्वाची आहेस. मी तुझ्याशी लग्न केलं ते तू हवीस म्हणून..बाप होण्याकरता नव्हे. आपण आई बाबा होऊ न होऊ …माझं तुझ्यावरचं प्रेम अबाधित राहील.
स्नेहाने आज स्वत:लाच नाही, धीरजला सुद्धा खूप मोठ्या ओझातून मोकळं केलं होतं. धीरजचं बोलणं ऐकून स्नेहा खूप भावुक झाली होती . हे लक्षात येताच त्याने वातावरण हलकं करत म्हटलं ,” हॅलो …एक्स्क्यूझ मी … इथे पाण्याची टंचाई नाहीये बरं का? आपण दुसरीकडे जाऊन मदत करूया.” स्नेहाला खुद्कन हसू आलं .
स्नेहा आणि धीरज आज खरं तर पुन्हा एकदा नव्याने एकमेकांचे मित्र बनले होते. या करता त्यांनी केलं काय? स्वतःला रिबूट केलं .तेही एकमेकांशी फक्त मोकळेपणाने बोलून. आज त्या ‘स्वप्नबंधातून’ नव्हे …’स्वप्नपाशातून’ स्नेहा कायमची मोकळी झाली होती.
चहा ऑर्डर करायला म्हणून धीरज आत आला. त्याने बाहेर बसलेल्या स्नेहाला स्वत:शीच हसताना बघितलं तसा तोही सुखावला. धीरजने अनुराधाला ताबडतोब फोन लावत म्हटलं ,”मॅडम , तुमचा एक client cut बरं का!”.
— गौरी
(gauripawgi@gmail.com)
इमेज सौजन्य : गूगल
Leave a Reply