नवीन लेखन...

स्वप्नपंखांना आकाश थिटे – मनोगत

मी बालवर्गात असताना माझ्या लाडक्या शिक्षिका ज्यू होत्या. नुरिनताई बेंजामिन ! काळाच्या ओघात कितीतरी गोष्टी विस्मरणात गेल्या असल्या तरी त्या आमच्या ताईंचा चेहरा आजही माझ्या मनात ताजा आहे. तेव्हापासूनच इस्रायली लोकांबद्दल माझ्या मनात एक आपुलकीची भावना आहे. नोकरी-निमित्ताने जॉर्डनमध्ये आमचं वास्तव्य होतं; तेव्हा इस्राएलला जाण्याची इच्छाही पूर्ण झाली. तिथे भारतीयांचं आत्मीयतेनं होणारं स्वागत पाहून तर ऊर भरून आला. त्या काळातच इस्राएलमधील राजकारणाच्या बातम्या कानावर पडू लागल्या आणि शिमॉन पेरेस या नावाची ओळख झाली. नुरिनताईच्या नावासारखं त्यांचं हे शिमॉन नाव पण मला खूप आवडत असे. जॉर्डन सोडून दहा वर्षं सरल्यानंतर या नावाशी घट्ट नातं जुळेल असं मात्र कधी वाटलं नव्हतं.

हो! नातंच जुळलंय. शिमॉन पेरेस यांच्या ‘नो रूम फॉर स्मॉल ड्रीम्स’ या बोलक्या शीर्षकाच्या पुस्तकाचा अनुवाद पूर्ण केला त्या दिवशी वाटलं, आपलं त्यांचं एक नातं निर्माण झालंय. त्यांच्या तिन्ही मुलांना सांगावंसं वाटतं की तुम्हाला आता एक भारतीय बहीण मिळाली आहे.

त्यांची चित्रमय लेखनशैली वाचकाला त्यांच्यासोबत घेऊन जाते. पोलंडमधील श्टेटलमधला बोचरा वारा, किब्बुट्झमधील अंधाऱ्या रात्री, इस्राएलचा स्वातंत्र्यलढा, पॅरिसमधील राजनैतिक वाऱ्या, एंटेबीची चित्तथरारक सुटका, ‘स्टार्टअप’ देशाची उभारणी आणि सरतेशेवटी शांती प्रस्थापित करण्यासाठी घेतलेले प्रामाणिक कष्ट. त्यातली सच्चाई मनाला भिडते. निर्णय घेतानाचा त्यांचा विचार पटतो. त्या विश्लेषणात्मक तल्लख मेंदूचं कौतुक वाटतं. त्यांच्या दूरदृष्टीने आपण भारावून जातो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवून टाकणारी काही काही वाक्य तर मनात घर करून राहिली आहेत. चौकटीबाहेरचा विचार म्हणजे नक्की काय हे कळण्यासाठी शिमॉन पेरेस यांचं हे चरित्र जरूर वाचावं. त्यांच्या शब्दकोशात ‘नाही’ शब्द नव्हता अशी वाचून गुळगुळीत झालेली वाक्य मात्र त्यांच्या आत्मचरित्रातून त्रिमितीत आपल्यासमोर उभी ठाकतात, आपल्याशी संवाद साधतात. ‘एकदा वाचायला हाती घेतल्यावर खाली ठेववत नाही’ हे चांगल्या पुस्तकाचं लक्षण हा अनुवाद करतानासुद्धा लागू पडत होतं. सलग सहा-तास तास मी या कामात गुंतून राहत होते. सुंदर, ओघवती, म्हणी-वाक्प्रचारांनी भरलेली, उच्च प्रतीची इंग्रजी भाषा आणि प्रसंग खुलवून सांगायची हातोटी या सगळ्याला मराठीचा बाज चढवणं हे एक आव्हान असलं तरी निश्चितच आनंददायी होतं. मोजून मापून आणि अगदी समर्पक शब्द वापरणाऱ्या पेरेस यांच्या मनातील भाव प्रकट करणारा एकही शब्द अनुवाद करताना सुटू नये याची काळजी मी परोपरी घेतली.

मला वाटतं चरित्रलेखनात आपण परकाया प्रवेश करत असतो. मी एकेक प्रकरण हातावेगळं करायचे तेव्हा त्यांच्या भूमिकेतून बाहेर यायला मला वेळच लागायचा. राजकारण, प्रशासन, परराष्ट्र धोरण याची जुजबी माहिती असलेल्या मला, या विषयांची गुंतागुंत, त्याचे पदर समोर उलगडताना पाहून आश्चर्य वाटे. राष्ट्राकरता कठोर निर्णय घेणाऱ्या लोहपुरुषांची जातकुळी कशी असते त्याचं दर्शन हे चरित्र अनुवादित करत असताना पदोपदी होत होतं. ‘कुसुमाहुनही कोमल’ असणारं संवेदनशील संतमन आणि ‘वज्रादपी कठोर’ असलेला पोलादी कणा यांचं मिश्रण शिमॉन पेरेस यांना एक महान व्यक्ती बनवतं. ‘शिकारी बहिरी ससाणा ते शांतीदूत कबुतर’ हा त्यांचा हेतुपुरस्सर केलेला प्रवास आपल्याला हतबुद्ध करून सोडतो.

स्वप्नांचे पंख लेऊन, सूर्यमंडळाला भेदू इच्छिणारी त्यांची गरुड झेप, आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. मराठी शब्दांशी होणारी झटापट सुलभ करणाऱ्या मिलिंद सरवटे या माझ्या मित्रास आणि माझ्या कोणत्याही लेखनाला पॉलिश करण्याचं काम तत्परतेने आणि आवडीने करणारे डिमेलोसर यांच्या मी ऋणातच राहू इच्छिते. इंग्रजी भावार्थ समजून घेण्यात मदत करणाऱ्या आणि लिखाणात व्यग्र राहण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या माझ्या पतिराजांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा. कॉपीराइट्सचे हक्क उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत मदत करणाऱ्या ‘पेरेस अॅण्ड असोशिएट्स ग्लोबल ॲडवायझरी लिमिटेड’ या संस्थेचे आणि हे पुस्तक मराठी बांधवांसाठी उपलब्ध करून देणाऱ्या ‘ग्रंथाली’ प्रकाशनाचे शतशः आभार !

– मेधा आलकरी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..