दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा
झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा….१,
वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे
स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे…..२,
पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा
घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा….३,
खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी
खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी….४,
आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना
टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना….५,
येत असता घरि परत, दुकानी एका शिरलो
बराच खावू आणि खेळणी, घेवूनी मी परतलो….६,
उत्सुकतेने बघत असता, कुणीतरी हालविले
हाय वेड्या ! हे तर स्वप्न, तिनेच जे तोडले…..७,
क्षणभर आवक् झालो मनी, स्वप्न भंग पावतां
खंत वाटली उगाच एक, अपूरी इच्छा राहतां….८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०