नवीन लेखन...

स्वर यात्री

पहाट….कसली मध्यरात्रच ती… तीन सव्वा तीन वाजले होते, ब्रेक चां कर्ण कर्कश आवाज करून बस एका ढाब्यावर थांबली, महत्प्रयासाने सुमारे तासा भरा पूर्वी लागलेली झोप मोडल्या मुळे चरफडत ‘ मानसी ‘ उठली आणि डोळे किलकिले करून तिने खिडकी बाहेर पाहिले, कुठला तरी ‘ दिलखुश इन’ नावाचा पंजाबी ढाबा ‘ दिसत होता. ” गाडी यहापें पंधरा मिनट रुकेगा ! चाय नाष्टे के लिये ” असं भसाड्या आवाजात प्रत्येक सिट जवळ जाऊन ओरडून बस च्या क्लिनर ने जवळ जवळ सगळ्यांनाच साखरझोपेतून उठवलं ! हे कमी की काय म्हणून बाहेर त्या ढाब्याच्या लाऊड स्पीकर वर तो ‘ अल्ताफ राजा ‘ तार स्वरात ” तुम तो ठहरे परदेसी …साथ क्या निभाओगे? ” हे रेकत होता ! आता मात्र मानसी ची उरली सुरली झोप ही उडाली ! पण नाईलाज होता . नाशिक हुन पुण्याला एकटीने कार ड्राईव्ह करून जाणं तिला जीवावर आलं होतं पण सकाळी काही ही करून पुण्याला पोहोचणं आवश्यक होतं मग ऐन वेळी या खाजगी लग्झरी बस चे तिकीट घेऊन ती निघाली होती, झोपेचं खोबरं झालंच होतं पण या लाऊड स्पीकर चां त्रास असह्य होऊ लागला होता …

तिला पु ल देशपांडेंच्या कथाकथनातलं वाक्य आठवलं ” शेजाऱ्यांनी जर जोरजोरात लावलेल्या रेडिओ चा आपल्याला त्रास होऊ लागला तर तो रेडिओ आपल्या साठीच लावलेला आहे असं मानून ऐकावा … मनस्ताप कमी होतो ” आणि ती त्या अल्ताफ राजा च गाणं ऐकू लागली …

पण दोन एक मिनिटात तिला ते ही असह्य होऊ लागलं आणि वैतागून तिने तिचा आयपॉड काढला .. इयर फोन कानात घातले आणि डोळे मिटून गाणी ऐकू लागली …तिच्या कानावर ” याद नही क्या क्या देखा था, सारे मंजर भूल गये उसकी गलीयों से जब गुजरे, अपना ही घर भूल गये ” ही गझल पडली आणि मग आता मात्र तिला झोप येणं शक्यच नव्हतं ! हे गाणं ऐकून ती एकदम डिस्टर्ब झाली,  या गीताचं …तिच्या मनात एक आगळं स्थान होतं.

संपूर्ण आठवणींचा भूतकाळ या आणि अश्या खूपश्या गझल सोबत बांधला गेला होता .. आज ही डोळे मिटल्यावर हे गीत ‘ सुयोग ‘ च्या आवाजात ती ऐकू शकत होती .

तेरा चौदा वर्षांपूर्वी चा तो काळ मानसी साठी खरोखरच ‘ सुरेल ‘ आणि अविस्मरणीय असाच होता, ते कॉलेज, सी ए इंटरनशिप ची गडबड आणि ऐन तारुण्यातले मखमली दिवस, विधात्याने जणू सुखाचा कोरा कॅनव्हास समोर ठेवून आपल्या हातात कुंचला आणि रंग देऊन हवं ते रेखाटण्याची मुभा आपल्याला द्यावी इतपत सगळं मनासारखं होत होतं.

मानसी मुळातच खूप हुशार आणि शिस्तप्रिय !  केवळ अभ्यास आणि करीयर यावरच लक्ष्य केंद्रित असायचं तिचं .. अर्थात पुण्यातल्या ‘ पाठक असोशिएट्स ‘ या नामवंत आणि प्रतिष्ठित अश्या चार्टर्ड अकांऊटिंग फर्म च्या चालक मालक असलेल्या कमलाकर पाठक यांची एकुलती एक कन्या असलेल्या मानसी चं वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मार्गक्रमण करणं यात काही नवल नव्हतं . बाप लेकीची ही जोडी जरा ‘ हटके ‘ अशीच होती . जेवणाच्या टेबला पासून ते अगदी मॉर्निंग वॉक च्या पार्क मध्ये ही दोघं ” प्रॉफिट, लॉस, कॅपिटल आणि असेट – लाईबिलिटी ” सारख्या रुक्ष आणि किचकट विषयावरच चर्चा करायचे.. इतर मैत्रिणीं प्रमाणे मानसी ला, चित्रपट, नाटकं, संगीत आदी विषयात रस नसायचा , अकाउंट ची आकडेमोड आणि हिशेब हेच तिचे आवडीचे विषय ! मग पाठक साहेबांची मुलगी म्हटल्यावर इंटर्नशिप साठी ” मेहता अँड काबरा ” या सी ए फर्म ने मानसी ला आनंदाने परवानगी दिली होती …

त्या संध्याकाळी साडे सहा वाजता ती तिचं काम संपवून बिल्डिंग च्या पार्किंग मध्ये आली तर समोरच ‘ श्रृती ‘ तिची वाट पाहत उभी असलेली दिसली ” मॅडम ! काय? ? कुठे गायब आहात? ” पर्स मधून गाडीची किल्ली काढत काढत मानसी ने तिला विचारलं …

” अगं ते सांगते नंतर !! आधी चल पटकन साडे सहा वाजता बालगंधर्व ला पोहोचायचय आपल्याला ” तिचा हात धरुन जवळ जवळ तिला ओढतच श्रृती आग्रह करू लागली ” अगं पण कशाला? ? काय आहे आज? ” मानसी ने तिला विचारता विचारता कार चे दार उघडले ..

” अगं ! असं काय करतेस …? तुला गुरुवारी बोलले होते ना मी ते युथ फेस्टिवल च? आज शेवटचा दिवस आहे ” शाम ए गझल ” आहा हा !!! ” झटकन गाडीत बसत श्रृती ने स्पष्टीकरण दिलं …आणि मग एकदम मानसी ची ट्यूब पेटली, गुरुवारी श्रृती चां फोन आला होता… या युथ फेस्टिवल साठी आणि आपण तिला एक तरी कार्यक्रम अटेंड करण्या च वचन दिलं होतं..

” ओह ! सो सॉरी श्रुते ….आय कंप्लीटली फरगॉट !! पण आज पण जमणार नाही ग, डॅडी येणार आहेत दिल्लीहून, मला आठ वाजता त्यांना पीक अप करायला जायचयं एअरपोर्ट वर ! हवं तर मी तुला बालगंधर्व ला ड्रॉप करते आणि मग जाते … ओके? ?” जीभ चावत अपराधी भावनेने मानसी म्हणाली आणि श्रृती कडे पाहू लागली…..” नॉट फेअर हं !!! ” थोडंसं खट्टू होत श्रृती म्हणाली .. ” ओके आपण एक काम करू ..तुला आठ वाजता एअरपोर्ट वर पोहोचायचे आहे ना? ? मग आपण युथ फेस्टिवल ला जाऊ, एक तास भर तू थांब माझ्या सोबत, आणि सव्वा सात – साडे सातला तू जा हवं तर ” ….श्रृती ने सुवर्णमध्य साधला . ” फाइन… चालेल तसं ही ” जरा विचार करून मनातल्या मनात वेळेचं गणित मांडत मानसी ने मान डोलवत होकार दिला आणि श्रृती ची कळी लगेचच खुलली .. आणि दोघी बालगंधर्व ला जायला निघाल्या . श्रृती स्वतः विद्यापीठातील ललित कला केंद्रात संगीताचे धडे गिरवत होती….

गप्पांच्या नादात बालगंधर्व कधी आलं ते दोघींनाही कळलं नाही ..दोघी थिएटर मध्ये आल्या तेव्हा कार्यक्रम आधीच सुरू झाला होता.. पण प्रेक्षकांच्या भूमिकेत सगळे दंगेखोर कॉलेज कुमार असल्याने थिएटर मध्ये नुसता शिट्ट्या आणि घोषणांचा गोंगाट होता , एका ही गायकाचा या हुल्लडबाजी समोर टिकाव लागत नव्हता, प्रत्येक गाणं उधळून लावण्याच्याच उद्देशानेच जणू तमाम तरुणाई पेटली होती..

” श्रृती …. काही खरं नाही हं कार्यक्रमाचं !!अगं ही सगळी कॉलेज ची मुलं..त्यांना नुसतं धांगडधिंगा, डान्स वगैरे चे कार्यक्रम आवडतात, गझल किंवा शायरी या असल्या सॉफ्ट प्रकारात त्यांना काहीच इंटरेस्ट नसतो…. ते दंगाच करणार ” श्रुती ला समजावत मानसी सांगू लागली …पण श्रृती मात्र त्या गदारोळात दोघींसाठी खुर्च्या शोधण्यात मग्न होती….

” साडे सात वाजता मी जाणार हं ” खुर्चीवर बसत बसत मानसी ने तिला एकदा आठवण करून दिली….पण श्रृती च सगळं लक्ष स्टेज कडेच होतं. प्रेक्षकांची हुल्लडबाजी अजूनही सुरुच होती . निवेदन करणाऱ्या मुलीने तर प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन करून करून अखेर ह्या सगळ्या गोंधळा समोर हार मानली आणि माईक तिथेच टाकून पलायन केले. इकडे मानसी आपली सतत घड्याळाच्या काट्यांकडे पाहून उगीचच अस्वस्थ होत होती ! आणि तेव्हढ्यात त्या हॉल मध्ये अतिशय भारदस्त पण संयमी अश्या आवाजात काही सुर नादले ” प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता हैं नये परिंदोंको उडने में वक्त तो लगता है ” ही सुप्रसिध्द गजल ऐकू आली …आणि त्या आवाजाने थिएटर मधला गोंगाट जरा कमी झाल्यासारखा वाटला …

नंतर गिटार वर एक मंजुळ ट्यून वाजली …दुसरं कडवं सुरू झालं ” जिस्म की बात नहीं है उनके दिलं तक जाना था..

लंबी दुरी तय करने में वक्त तो    लगता  हैं ” आणि मग हळू हळू त्या गजल च्या धून सोबत चुटक्या आणि टाळ्या वाजवून तमाम प्रेक्षक त्या सुराला साथ देऊ लागले …

श्रृती आणि मानसी देखील आता मान उंचावून स्टेज कडे पाहू लागल्या …पण अजून ही त्या गोड आवाजात गाणाऱ्या गझल गायकाचा चेहरा दिसत नव्हता !  मग पाच दहा सेकंदात पुढील कडव्याच्या आधीची ट्यून गिटार वर वाजवत ‘ तो ‘ सर्वांसमोर स्टेज वर आला …गोरा पान चेहरा, मानेवर रुळणारे केस उंची सहा फुटाच्या आसपास असावी, जीन्स टी शर्ट च्या वातावरणात त्यानं मात्र सुंदर मोरपंखी रंगाचा सलवार कुर्ता परिधान केला होता … अगदी लांबूनही दृष्टीस पडणारं त्याच्या चेहऱ्यावर असलेलं ‘ ट्रेड मार्क ‘ स्मित हास्य त्याच्या गाण्यात देखील जाणवत होतं … अत्यंत सफाईदार पणे त्याची बोटं गिटार वर फिरत होती .तेव्हढ्याच शांत, गंभीर पण भारदस्त आवाजात तो बोलू लागला ” मिञांनो गझल आणि शायरी हा कदाचित तुम्हा सर्वांना बोअरिंग वाटणारा गायन प्रकार असेल, बहुधा तुम्हाला अपेक्षित मनोरंजन यात नसेल ही पण माझी फक्त एकच विनंती …. या नंतर मी माझी स्वतः लिहिलेली एक गझल तुमच्या समोर सादर करणार आहे … त्यातील अर्थ समजून त्याचा आनंद घ्या, जर तुम्हाला ती आवडली नाही तर हा कार्यक्रम इथेच संपवण्यात येईल आणि पुढच्या जिल्हास्तरीय महोत्सवात मी गाणार नाही…माय प्रॉमिस ” ..

काय हा आत्मविश्वास? जबरदस्त प्रभुत्व ! आणि अगदी हिप्नोटाईज केल्याप्रमाणे प्रमाणे सगळा हॉल चिडीचूप झाला होता ..

त्याने मग स्वरचित ” दो दिन हैं जूनून के भी ” ही गझल गात स्वतःचे शब्द खरे करून दाखवले आणि काही वेळापूर्वी हुल्लडबाजी करून कार्यक्रम हाणून पडणारे प्रेक्षक आता चक्क त्याच्या सोबत मंत्रमुग्ध होऊन, टाळ्या, चुटक्या वाजवून त्याला साथ दे देत होते… त्यानंतर मग एका पाठोपाठ एक सुंदर गझल, गाणी ” पेश करून ” त्याने ” माहोल ” बांधला, एका हाती सगळा कार्यक्रम तारला… मानसी साठी हा सगळा अनुभव पहिल्यांदाच होता… ही जादू ..हे भारावलेले सुरेल वातावरण ती पहिल्यांदाच अनुभवत होती … ” कोण आहे ग हा श्रुती? ” मानसी ने हळूच श्रुतीला विचारलं ” सुयोग … सुयोग भार्गव ! लास्ट इयर पी जी ला आहे आमच्याच ललित कला केंद्रात ” डोळे आणि ध्यान स्टेजवर च ठेवत श्रृती ने उत्तर दिलं …. केवळ श्रृती – मानसी च नव्हे तर संपूर्ण थिएटर आता त्या आवाजाच्या आणि सुरावटीच्या आहारी गेलं होतं … असाच काही काळ गेला आणि केवळ श्रृती च नव्हे तर आजू बाजूच्या दहा रांगा दचकतील एव्हढ्या जोरात मानसी किंचाळली ” ओह् माय गॉड … श्रुते अगं नालायक…. घड्याळ बघ जरा ” श्रुतीने दचकून हातातलं घड्याळ पाहिलं आणि घाबरून तोंडावर हात दाबला ‘ साडे आठ वाजले होते ‘ …. ” मेले आता …. डॅडी काही सोडत नाहीत मला ” असं म्हणत मानसी अक्षरशः पळत सुटली … धावपळ करून गाडी काढून मेन रोड वर येई पर्यंत पावणे नऊ वाजले होते ..आता एअरपोर्ट वर जाण्यात काही अर्थ नव्हता … ती तडक घरी पोहोचली . तिचे डॅडी आधीच घरी पोहोचले होते.. घाबरत, दबकत ती त्यांना सामोरी गेली .

” काय प्रिन्सेस? किती वाजले? तुझी वाट पाहून शेवटी मला पायलटनेच डायरेक्ट घरी आणून सोडलं बघ ” सात मजली हसत डॅडी म्हणाले आणि मानसी ला मेल्याहून मेल्यासारखे झाले ..

” सो सॉरी डॅडी … आज ती श्रृती युथ फेस्टिवल च्या गझल प्रोग्राम ला घेऊन गेली आणि कसा वेळ गेला समजलच नाही ” तिने माफी मागत प्रांजळ कबुली देऊन टाकली …आणि वेळेच्या बाबतीत शिस्तप्रिय आणि हिशेबी असलेल्या आणि संगीताचं वावड असलेल्या मानसी च हे स्पष्टीकरण ऐकुन त्यांना आश्चर्य वाटलं ” ओह !! अशी कुठल्या गझल नी आणि गायकानी तुझ्यावर जादू केली? की तू डॅडी ला विसरली? ” डॅडी अजून हि चेष्टेच्या मुड मध्ये होते .. पण मानसी कडे उत्तर नव्हतं..मग तिला अजून अवघडून न टाकता त्यांनी विषय बदलला आणि मग दिल्ली च्या क्लाईंट सोबत झालेल्या मीटिंग मध्ये काय काय झालं ते तिला सांगू लागले .

अर्थात या ‘ शाम ए गझल ‘ ने आणि मुख्य म्हणजे सुयोगच्या गाण्याने… बोलण्याने किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वाने मानसी च्या मनावर कधीच गारूड केले होते ! रात्री ही झोपल्यावर तिच्या डोळ्यासमोर आजची संध्याकाळ आणि त्या गझला तरळत होत्या…

‘ गीत – संगीताच्या बाबतीत औरंगजेब ‘ असलेल्या मानसी च्या ‘ ललित कला केंद्रावर ‘ अचानक चकरा का वाढू लागल्या हे न समजण्या इतपत श्रृती ही काही भोळसट नव्हती ! अखेर इथे ही मानसी ने प्रांजळ पणा दाखवत श्रृती ला ‘ सुयोग ‘ ची ओळख करून देण्याबाबत विनवले.. … यथावकाश दोघांची ओळख ही झाली आणि मानसी ‘ दुसऱ्यांदा ‘ सुयोग च्या प्रेमात पडली, त्याचा तो विनयशील पण आत्मविश्वास पूर्ण स्वभाव, चेहऱ्यावर चोवीस तास विलासणारं ते प्रसन्न हास्य आणि या व्यक्तिमत्त्वाला साजेसा मधुर आवाज ! त्याच्या डोळ्यांप्रमाणे त्याचं बोलणं ही स्वप्नील होतं,  हळू हळू त्यांच्या भेटी गाठी वाढू लागल्या, मग आपसूकच श्रृती आणि ललित कला केंद्र दोघांच्या मधून बाजूला पडलं आणि एकमेकांच्या सवयीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे दोघांना ही समजलच नाही ! दोघांच्या स्वभावात कमालीची भिन्नता होती, मानसी तशी व्यावसायिक, हिशेबी आणि शिस्तबध्द आयुष्य जगणारी तर सुयोग मात्र अस्सल कलाकार, गायन, काव्य आणि संगीत अश्या अमर्यादित कला विश्वात रमणारा एक स्वच्छंदी जीव, त्याच्या शाळकरी वयात त्याचे वडील हे जग सोडून गेले होते मग थकलेल्या आणि कष्टाळू आई सोबत तो एका फ्लॅट मध्ये राहत होता, आईची एका पतसंस्थे मध्ये सुरू असलेली लीपिकेची नोकरी आणि सुयोगला ललित कला केंद्रा च्या काही कार्यक्रमातून मिळणारं मानधन ..यावर घर चालत होतं .

शिक्षण संपवून एखादी नोकरी पत्करून सुयोग ने घराची जबाबदारी उचलावी अशी त्या मातेची माफक अपेक्षा होती ! पण सुयोग ची स्वप्न मात्र वेगळीच होती .. त्याला अपेक्षेप्रमाणे गायन आणि संगीत यातच करीयर करायचं होतं … आणि त्यात ही गायनातला ” ऑस्कर ” समजला जाणारा प्रतिष्ठेचा असा ” म्युझिकल ग्लोब ” हा पुरस्कार जिंकायचा होता. दर चार वर्षांनी होणाऱ्या या पुरस्काराच्या स्पर्धेसाठी देशभरातून अनेक उत्तमोत्तम गायक प्रयत्नाची शर्थ करायचे, पण एव्हढ्या कलाकारांमधून अंतिम वीस जणांमध्ये निवड होणे ही देखील स्वप्नवत वाटणारी आणि अशक्यकोटीतील गोष्ट होती… स्पर्धा विजेत्या साठी लाखोंची बक्षिसे आणि गायन क्षेत्रात एक सुनिश्चित करीयर हे हमखास होतच……

सुयोग च हे स्वप्न आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वात असणारी केवळ कलासक्त अशी वृत्ती ..मानसी ला पुरेपूर ठाऊक होती , पण एरवी हिशेबी आणि व्यावसायिक असलेल्या मानसी ला केवळ सुयोग चा सहवास, त्याचे प्रेम आणि आयुष्यभरासाठी त्याची साथ हवी होती, म्हणूनच दोघांनी सहजीवना च्या आणा भाका घेत लग्न करायचा निर्णय घेतला आणि इथे ही पुढाकार घेउन सरळ मार्गी आणि तेव्हढीच बिनधास्त असलेल्या मानसी ने स्वतः च्या डॅडी ना सुयोग बद्दल सांगून आपल्या प्रेमप्रकरणाची प्रांजळ कबुली देऊन टाकली होती .. अर्थात अपेक्षे प्रमाणे त्यांनी स्पष्ट नकार देत तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता, केवळ शिक्षण, करीयर हेच जोपासणारी मानसी कधी कोणाच्या प्रेमा बिमात पडेल ह्याची त्यांना अपेक्षाच नव्हती, आणि आयुष्याकडे केवळ ” प्रॉफिट अँड लॉस ” वाल्या बॅलन्स शीट म्हणून पाहणाऱ्या पाठक साहेबांसाठी ..प्रेम वगैरे एका ‘ लायबिलिटी ‘ प्रमाणे होतं त्यामुळे मानसी ने केवळ करीयर हेच ध्येय मानून आता पुणे, नाशिक असा विस्तार होऊ पाहणारी ” पाठक असोशिएटस ” सांभाळावी …पुढे न्यावी हीच त्यांची इच्छा होती … अर्थात मानसी देखील मनस्वी होती, सुयोग च्या प्रेमात आकंठ बुडाल्यावर तिला माघार घेणे शक्य नव्हते आणि मग सुयोग ला एकदा तरी भेटा …या तिच्या विनंतीला धुडकवणाऱ्या डॅडीं च्या प्रखर विरोधास न जुमानून तिने मग पळून जाऊन सुयोग शी लग्न करायचा निर्णय घेतला ! अर्थात पाठक साहेबांसाठी हा धक्का पचवणं अतिशय अवघड होतं, मानसीच्या या निर्णयामुळे ते देखील खचून गेले, पण त्यांच्यातील करडा आणि व्यावसायिक बाप मात्र प्रेमळ पित्याच्या वरचढ ठरला आणि मग त्यांनी ही मानसी साठी घराची दारं बंद करून टाकली…

सुयोग – मानसी ने या आव्हानात्मक परिस्थितीत नव्या नात्याची, संसाराची मुहूर्तमेढ रोवली आणि एक नवीन आयुष्य सुरु केले. ” मेहता अँड काबरा फर्म ” मध्ये आता इंटर्नशिप संपवून मानसी ला नोकरी मिळाली आणि या नव्या संसाराला जरासं स्थैर्य आलं, इकडे सुयोग देखील त्याचं ” म्युझिकल ग्लोब ” च स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत करू लागला …अर्थात यासाठी त्याला मानसी ची सार्थ साथ होतीच . त्याच्या पुढ्यात बसून त्याच्या मधुर आवाजात त्या गझल, गाणी ऐकताना ती हरवून जायची .. तिलाच नव्हे तर ललित कला केंद्रातील प्रत्येकाला खात्री होती की सुयोग चा आवाज आणि त्याचं संगीत प्रेम यामुळे तो ” म्युझिकल ग्लोब” नक्कीच जिंकणार !! यथावकाश या दोघांच्या संसार वेलीवर एक गोड आणि छानसं  फूल …अर्थात कळी उमलली … ” आराध्या ” …सुखाच्या संसाराला एक सुंदर बहर आला होता.. आराध्याच्या जन्मानंतर मात्र मानसी च्या ‘ डॅडी ‘ चा ताठरपणा जरासा निवळला . पण त्यांनी पुरती माघार घेतली नव्हती ..मानसी ने आणि सुयोग ने त्यांचा तो छोट्याश्या फ्लॅट मधला संसार सोडून त्यांच्या प्रशस्त बंगल्यात राहायला यावे आणि मानसी ने त्यांचा व्यवसाय सांभाळावा असं ” प्रोफेशनल प्रपोजल ” त्यांनी मानसी समोर मांडलं …अर्थातच स्वाभिमानी मानसी ने यास नकार देत त्यांची माफी मागितली/

आराध्या आता दोन वर्षाची झाली …आणि तिच्या दुसऱ्या वाढदिवशी च ” म्युझिकल ग्लोब” स्पर्धेत सुयोग ची अंतिम वीस जणांमध्ये निवड झाल्याची गोड बातमी आली, आनंदाला आणि उत्साहाला आता पारावार उरला नव्हता… आता अंतिम ध्येय गाठण्यासाठी सुयोग पूर्ण मेहनत करू लागला … त्याचे गुरु, सहकारी, मित्र मंडळी आणि मानसी ची भक्कम साथ या पाठिंब्यावर ” विजेता ” होण्याची त्याला खात्री होती !

आणि त्याच्या कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर आता या देशव्यापी स्पर्धेच्या अंतिम पाच स्पर्धकांत येऊन ठेपला … स्पर्धेच्या महा अंतिम फेरीची तयारी जोरावर सुरू होती, आयोजकांनी आता अंतिम फेरीचा सोहळा, स्टेडियमवर हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने आयोजित केला होता. …स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती, या स्पर्धेच्या निमित्ताने ” सुयोग ” ला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती आणि मानसी ला याचा सार्थ अभिमान वाटत होता… आणि अखेर तो महाअंतिम फेरी चां दिवस उजाडला, नियोजित वेळेपेक्षा स्पर्धकांना दोन तास आधी पोहोचायच होतं … ” मी तुला ललित कला केंद्रात पीक अप करायला येते चार वाजता … तयार रहा ” मानसी ने ऑफिस मधून सुयोग ला फोन केला ..

” अग वेडी आहेस का तू? ? तुझ्या ऑफिस जवळ तर आहे स्टेडियम, तू उलट दिशेने इकडे ड्राईव्ह करून येण्या पेक्षा मीच रिक्षा करून तिथे पोहोचतो ! इन फॅक्ट तू थोडी उशिरा आलीस तरी चालेल ” तिला नकार देत सुयोग ने समजावले.

आराध्या घरीच …तिच्या आजी जवळ थांबणार असल्याने ती चिंता नव्हती.. मानसी काम संपवून पाच वाजता स्टेडियम ला पोहोचली…आणि त्या गर्दीत तिची नजर सुयोग ला शोधू लागली… पण सुयोग काही तिला दिसेना…. मोबाईल वर केला तर तो स्वीच ऑफ ! मग तिच्या लक्षात आलं की स्पर्धकांना मोबाईल बंद करून ठेवण्याची सक्ती होती, मग नाईलाजाने ती तिचा पास घेऊन पहिल्या रांगेतील निमंत्रितांच्या राखीव जागेकडे गेली…

थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू झाला …या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने जोरदार तयारी सुरू होती, आणि तेव्हढ्यात संयोजकांनी सुयोग च्या नावाचा पुकारा सुरू केला …आणि मानसी चकित झाली, ती हेच समजत होती की सुयोग आत, बॅकस्टेज ला आहे … आता तिची चलबिचल वाढू लागली, ती स्वतः बॅक स्टेज कडे गेली तिथे बाकीचे सगळे स्पर्धक अंतिम तयारीत होते, फक्त सुयोगच कुठे नव्हता… तिने झटकन त्याच्या मोबाईल वर फोन केला तर अजूनही स्विच ऑफ होता …आता मात्र मानसी धास्तावली …तिने ललित कला केंद्रात सुयोग च्या सहकाऱ्यांना फोन केला तर तो पावणे चार लाच तिथून निघाल्याचे तिला समजलं …आता तिच्या मनात काळजी चे ढग दाटू लागले ती आता अस्वस्थ पणे त्याचा शोध घेऊ लागली..संयोजकांनी अखेर दहा मिनिटांच्या आत सुयोग हजर न झाल्यास या स्पर्धेतून त्याला बाद ठरवण्यात येईल असं जाहीर केलं आणि मुख्य जजेस आणि प्रेक्षकांना ही धक्का बसला कारण या स्पर्धेत विजेतेपदाचा सुयोग हा प्रबळ दावेदार मानला जात होता. मानसीचा धीर आता हळूहळू सुटू लागला होता, अश्यातच तिला एका अनोळखी नंबर वरून फोन आला … थोडंसं घाबरत तिने फोन उचलला …

पौड रोड पोलीस स्टेशन मधून फोन होता, आणि पलीकडून बोलणाऱ्या कॉन्स्टेबल च बोलणं ऐकून मानसी चक्कर येऊन जागीच कोसळली ! स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रिक्षेने जाणाऱ्या सुयोग चां एका भरधाव ट्रक ने धडक दिल्याने अपघात झाला होता ..आणि  तिचा सुयोग तिला सोडून कायमचा निघून गेला होता .

बस च्या ब्रेक चा पुन्हा एकदा कर्कश्य आवाज झाला आणि ” चला शिवाजीनगर…..उतरून घ्या….” अशी हाळी त्या क्लिनर ने दिली अन् मानसी एकदम दचकून भानावर आली…. पण अजून ही त्या आठवणी जाग्या झाल्यामुळे की ती  शहारुन गेली होती. बस मधून उतरून तिने बॅग घेतली , डॅडींचा ड्रायव्हर तिला घ्यायला आला होताच . गाडीत बसते तोच  ” आराध्याचा ” फोन आला, तिची मम्मा पोहोचली हे ऐकून स्वारी एकदम खुश झाली…. आता आराध्या बारा वर्षांची झाली होती .सुयोग च्या अकाली जाण्याचा धक्का सहन न झाल्याने सुयोग च्या आईने ही सहाच महिन्यात जगाचा निरोप घेतला होता, त्या घरात ..त्या वातावरणात दिवस काढणं मानसी साठी कठीण झालं होतं …

त्यामुळे थकलेल्या डॅडींची विनंती मान्य करून तिने आता पाठक असोशिएट्स ची जबाबदारी उचलली होती आणि आराध्याची जबाबदारी तिच्या आई आणि डॅडींवर सोपवून नाशिक च्या ऑफिस च्या कामात स्वतःला झोकून दिलं होतं…..

सुयोग जाता जाता जणू स्वतः चा आवाज आराध्याच्या गळ्यात ठेवून गेला होता . अगदी वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षा पासून ती अतिशय आत्मविश्वासाने गात होती, प्रत्येक शालेय स्पर्धेत बक्षीसं मिळवत होती, तिच्या गाण्यात, सुरात सुयोग ची पुरेपूर छाप होती …आणि आज नाशिक हुन पुण्याला येण्याचं खास कारण एकच होतं… जे सुयोग च स्वप्न अपूर्ण राहिलं होतं ” म्युझिकल ग्लोब ” पुरस्कार जिंकण्याचं, त्याच ” म्युझिकल ग्लोब – ज्युनिअर ” स्पर्धेची आज महा अंतिम फेरी होती आणि बापाच्या पावलावर पाऊल टाकत आज ” सुयोग – मानसी ची आराध्या ” अंतिम पाचांत पोहोचली होती …आणि तिच्यातला आत्मविश्वास आणि तयारी पाहता ती नक्कीच हा पुरस्कार जिंकेल याची सगळ्यांनाच खात्री होती …..आणि ह्या स्वप्नपूर्तीच्या सोहळ्यासाठी आराध्याला तिची ” मम्मा ” समोर हवी होती…

पुन्हा एकदा त्याच स्टेडियम मध्ये हा महाअंतिम सोहळा रंगला होता .. सर्व जजेस सज्ज होते .. पाचही अंतिम स्पर्धक पूर्ण तयारीनिशी आपापला ” परफॉर्मन्स ” सादर करीत होते … जजेस चे पॉइंट्स, उपस्थित प्रेक्षकांची मते आणि देशभरात टी वी वर हा कार्यक्रम पाहणाऱ्या लाखो प्रेक्षकांचे ” व्होटिंग ” याचा एकत्रित हिशेब करण्यात आला आणि सूत्र संचालकांनी विजेत्यांची नावे … घोषित करण्यास सुरुवात केली ..सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती … आणि अखेर भरघोस पॉइंट्स ची आघाडी घेऊन ही स्पर्धा जिंकणाऱ्या गायिकेचे नाव जाहीर करण्यात आलं आणि प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत अभिनंदन केले आणि पहिल्या रांगेतील मानसी डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रु पुसण्याचं विसरून उभी राहत जोरजोरात टाळ्या वाजवू लागली होती..

विजेती होती ” आराध्या सुयोग भार्गव ” पुरस्कारार्थ मिळालेला चषक तिने हातात घेऊन प्रेक्षकांना अभिवादन केले .. तो चषक एकदा मानसी च्या दिशेने दाखवून तिने तो आकाशाकडे उंचावून वर पाहिले आणि जणू तिच्या कडे पाहणाऱ्या तिच्या ” स्वर यात्री ” ला स्वप्नपूर्ती चं सुख दिलं होतं.

Avatar
About सागर जोशी 11 Articles
सागर जोशी हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक असून ते आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपचे सभासद आहेत. त्याच्या कथा अतिशय लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..