समस्त शिवप्रेमींसाठी महापर्वणी
‘स्वराज्य @ 350’ व्याख्यानमालेचा शुभारंभ
ऐतिहासिक लढायांचे अभ्यासक आणि व्याख्याते विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या रोमहर्षक व्याख्यानाने सुरूवात… 23 जुलै 2023
6 जून 1674 (शके 1596). या अमृतमय दिवसाचे महत्व हिंदुस्तानाच्या इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षराने लिहिले जावे इतके महत्वाचे. तीन शतके उभ्या महाराष्ट्राला भरडून काढणार्या महाभयंकर सुलतानशाही मोडीत काढून हिंदवी स्वराजाचे स्वप्न साकार करणारे प्रभो शिवाजीराजा याच दिवशी सिंहासनावर बसले. आणि त्याच क्षणी देवगिरी, चितोड आणि विजयनगर येथील कटुस्मृतींच्या जखमा बुजल्या गेल्या. अवघ्या भारभूमीच्या क्षितिजावर स्वातंत्र्याचा उष:काल झाला. जिजाऊसाहेबांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या लाडक्या शिवबाने पूर्णत्वास नेले. याचे सारे श्रेय शिवबाला प्राणपणाने साथ करणार्या अनेक शिलेदारांना देखील जाते. शिवराज्याभिषेकाचा तो अविस्मरणीय क्षण, तो पवित्र दिवस.
आज त्या घटनेला तब्बल साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्या घटनेचं स्मरण इथल्या भारतभूमीवर जन्मलेल्या प्रत्येकानं करणं ही आज काळाची गरज बनली आहे. कारण शत्रू अनेक आहेत. त्यांचे मनसुबे आपल्याला धुळीला मिळवायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांना मोलाची साथ करणार्या काही शिलेदारांचे स्मरण आपण पुढे वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करणार आहोत. समस्त शिवप्रेमींना ही महापर्वणी असेल.
‘स्वराज्य @ 350’ या शीर्षकाने सजलेल्या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ आपण येत्या 23 जुलै 2023 रोजी, संध्याकाळी ठीक 5 वाजता, सहयोग मंदिर सभागृह, दुसरा मजला, नौपाडा, ठाणे (प.) येथे करीत आहोत. व्यास क्रिएशन्स्, मराठी सृष्टी डॉट कॉम आणि वन आईड ऑक्टॉपस स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव व्याख्यानमालेस प्रारंभ होणार आहे.
या कार्यक्रमाला राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन आणि फॅमिली कट्टा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
व्याख्यानाचा विषय आहे ‘नरवीर तानाजी यांची शौर्यगाथा’ आणि व्याख्याते आहेत ऐतिहासिक लढायांचे अभ्यासक आणि व्याख्याते विंग कमांडर शशिकांत ओक.
तसेच या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून प्रशांत ठोसर (सुप्रसिद्ध व्याख्याते – शिवकालिन इतिहासाचे अभ्यासक) आणि शंतनू खेडकर (कोषाध्यक्ष – राज्याभिषेक समारोह संस्था, ठाणे) लाभणार आहेत.
या महत्त्वाच्या कार्यक्रमास समस्त वाचक रसिकांनी, शिवप्रेमींनी, साहित्यिकांनी, विद्यार्थ्यांनी जरूर जरूर यावे, अशी विनंती नीलेश वसंत गायकवाड (संस्थापक – व्यास क्रिएशन्स् ग्रुप ऑफ कंपनीज्), सप्तेश चौबळ (संस्थापक – वन आइड ऑक्टोपस स्टुडिओ) आणि निनाद प्रधान (संस्थापक – मराठी सृष्टी डॉट कॉम) यांनी केली आहे.
नमस्कार, कालच्या कार्यक्रमात मला ठाणेकरांनी दिलेला प्रतिसाद जोरदार होता. रंगमंचावर किल्ल्याच्या तटाचे नेपथ्य भावले. भाषण करताना नवी उर्जा मिळाली.