हा गायक -संगीतकार ओरिजिनल होता, जी एक विलक्षण आणि अविश्वसनीय बाब आहे या चित्रसृष्टीत ! भलेही इतरांनी त्याचे अनुकरण केले असो. पण हा मात्र एकांडा शिलेदार ! त्याची काही वैशिष्ट्ये !
१) त्याची धून , त्याची लय , त्याच्या रचना स्वर-मधुर आहेत. संगीताच्या मूळ रूपाशी त्याने कधी बेईमानी नाही केली. सगळं ओतलं आपल्या ओंजळीत ते -अस्सल, डाग रहीत ! त्यामुळे ते सुगंध कानांना आणि हृदयाला कायमचे चिकटले. १९७५ साली अकाली निधन ( वय ५१ फक्त ) झालेल्या या संगीतकाराच्या अभेद्य रचना त्याच्या जाण्यानंतर ४५ वर्षे आपले मनोरंजन करताहेत. ज्या दुनियेत एक चित्रपट पडला की बरोबरीचे ओळख दाखविणे नाकारतात (उगवत्या सूर्याला नमन करणारी ही संस्कृती ) त्या संगीतकाराबद्दल आजही सगळे गीत-संगीतकार भरभरून बोलतात, हे त्याच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे. अन्यथा आपल्याकडे फक्त तोंडदेखलं बोलण्याची , वाहवा करण्याची रीत आहे. मात्र या अवलियाच्या रचना २००४ सालच्या “वीर -जारा ” मध्ये वापरल्या गेल्या आणि त्याला मरणोपरांत पारितोषिक मिळाले. हे कर्तृत्व युनिक !
२) त्याची ही सवयच होती -चाली बांधून मुरवत ठेवायची आणि योग्य स्थळी विदाई करण्याची. त्याच्या मुलाने (संजीव कोहली) या अनाहत चालींना न्याय दिला , चोप्रांच्या आग्रहाकरीता आणि लताही आपल्या भैय्यासाठी पुढे सरसावली. त्याची अनेक गीते चाली बांधून त्याच्या फडताळात १५-२० वर्षे पडलेली असत ( ” नैना बरसे , रिमझिम रिमझिम ” ही रचना अशीच १८ वर्षांनी त्याने बासनातून बाहेर काढली.) हे काळाच्या पुढे जाणारे त्याचे सांगीतिक कार्य आहे. (त्याला समांतर म्हणजे ” रोशन ” ! त्यानेही आपल्या संगीतकार पुत्रासाठी- राजेश रोशन साठी सुमारे ५०० तयार चाली जाण्यापूर्वी मागे ठेवल्या. याला म्हणतात पैतृक वारसा !) मदन -मोहन ” दिल धुंडता हैं ” साठी अठरा चाली स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करणारा जगावेगळा संगीतकार ! पण चित्रपटातील चाल मात्र वेगळीच आणि खूप सुश्राव्य !
३) “गझल ” ला राजदरबारी आणणारा हा माणूस ! त्याच्या गझलांच्या चाली केवळ आणि वेड लावणाऱ्या ! त्यापूर्वी गझल खानदानी उंबऱ्यात अडकलेली – त्याने तिच्या पायींच्या बेड्या तोडल्या आणि स्वरमधुर लताच्या कंठातून गल्लीबोळात पसरविल्या. तरीही त्या “आम ” झाल्या नाहीत. त्याची निजखूण मिरवणारी गझल आजही गर्दीत उठून दिसते. त्याच्या प्रत्येक गझलीवर एक लेख होऊ शकेल असा ऐवज त्यांत आहे.
४) रांगड्या दिसणाऱ्या मिलिटरी मॅन मध्ये असलेला ओलावा आणि मार्दव ऐकायचे असेल तर त्याने गायलेले प्रत्येक गाणे डोळे मिटूनच ऐकायला हवे. वारंवार हा मूळ गायकाला, विशेषतः गायिकेला चीत करताना दिसतो. आतील अखंड “दर्द ” चा झरा त्याच्या गळ्यातून बाहेर पडायचा. खरंच या माणसाने “गायक ” हे करियर करायला हवे होते. त्याच्यातील आणि बहीण लता मधील हा विरोधाभास ! तिने “आनंदघन “हे संगीतकाराचे क्षेत्र सोडून गायकी विलोभनीय केली आणि या गृहस्थाने गायकी सोडून संगीत -दिग्दर्शनात स्वतःला झोकून दिले. पण दोघेही आपापल्या जागीचे अढळ ध्रुवतारे !
” पाकर भी नहीं , उनको मैं पाती ” हेच शेवटी आपल्या हाती उरतं !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply