नवीन लेखन...

स्वरातून साकारते ईश्वरभक्ती

लेखिका : आरती अंकलीकर- अद्वैत फिचर्स कडून मराठीसृष्टीसाठी आलेल्या लेखांमधून पुनर्प्रकाशित 

मूर्तीपूजा आणि कर्मकांडावर माझा विश्वास नाही. स्वरांची आराधना करत राहण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. ही सुद्धा एक साधनाच आहे आणि त्यातून ईश्वरभक्तीचे समाधान प्राप्त होत असते. ही साधकवृत्ती अखेरपर्यंत कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. या साधनेतून शांतता आणि समाधान दोन्हीही प्राप्त होते. शिवाय सुरांशी असलेले हे नाते अतूट राहिल्याने आजवर समाधानी वृत्ती जपता आली आहे.


प्रत्येकाचे कोणत्या ना कोणत्या बाबीवर श्रद्धास्थान म्हणून अपार प्रेम असते. तसे माझे सुरांवर प्रेम आहे. सुरांचेही माझ्यावर तितकेच प्रेम आहे. आमच्यात सुरांचे नाते निर्माण झाले आहे, असे म्हणता येईल. मी मूर्तीपूजा, कर्मकांड मानत नाही. तरीही गणपती ही देवता मला विशेष आवडते. माझे पती गणेशभक्त आहेत. मला मूर्तीपूजा मान्य नसली तरी त्यांना गणपतीची भक्‍ती करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. एखाद्या बाबीवर आपली श्रद्धा नसली तरी इतरांची श्रद्धा तोडू नये, या मताची मी आहे. माझा कर्मावर विश्‍वास आहे. कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यानंतर मिळणारे समाधान सर्वात मोठे असते. याच समाधानी वृत्तीने राहण्याचा माझा प्रयत्न असतो. आजवरच्या वाटचालीत गुरूवर्य किशोरी आमोणकरांचे पाठबळ मिळाले. शिवाय आमच्या घराण्यात गुरूदेव रानडेंची भक्‍ती मोठ्या श्रद्धेने केली जात असे. ते आमचे अध्यात्मिक गुरू. याखेरीज माझा नामस्मरणावर अधिक भर देण्याचा प्रयत्न असतो.

स्वरसाधना ही सुद्धा एक प्रकारची इशवरी साधनाच असते. ती उपासना असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इशवरभक्तीमुळे अंधारातून प्रकाशाची वाट दिसते अशी अनेकांची श्रद्धा आहे. तद्वत गुरू आपल्याला अंधकारातून प्रकाशवाट दाखवतात, यावर माझा दृढ विश्‍वास आहे. स्वत:ला ओळखण्यासाठी, स्वसामर्थ्याची जाणीव होण्यासाठीही गुरूचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. विशेषतः: मानसिक ताणतणाव किंवा समस्यांच्या गर्तेत सापडल्यानंतर अवघे आयुष्य अंध:कारमय झाल्यासारखे वाटते. अशा वेळी तुमची जीवननौका प्रकाशाच्या वाटेवर नेण्याचे सामर्थ्य गुरूंमध्ये असते. म्हणूनच गुरूभक्ती थोर ठरते.

प्रत्येकाची आपापली श्रद्धास्थाने असतात. त्याचबरोबर विशिष्ट ठिकाणी गेल्यावर आपल्याला अपार मानसिक शांतीची अनुभूती मिळते. या अनुषंगाने मला जे. कृष्णमूर्ती यांनी निर्माण केलेल्या शाळांमध्ये जायला अधिक आवडते. त्यांच्या बहुतांश शाळा निसर्गरम्य, शांत आणि सुंदर परिसरात आहेत. आजूबाजूला काँक्रिटची जंगले नसलेल्या भागातील विद्यादानाचे हे कार्य अलौकिक ठरेल. अशा ठिकाणी दोन घटका बसल्यावर देवळात किंवा अन्य धार्मिक स्थळी मिळणारी शांतता अनुभवायला मिळते.

खरे तर परमेश्‍वराच्या सानिध्यात शांतता आणि समाधान मिळते. म्हणूनच त्याच्या भक्तीला अधिक महत्व दिले जाते. माणसाला मानसिकदृष्ट्या तंदुरूस्त ठेवण्यासाठी शांतता आणि समाधान या दोन्ही गोष्टी गरजेच्या ठरतात. कोणाला एखाद्या मंदिरातली शांती लाभते तर कोणाला निसर्गाच्या सानिध्यात अशा शांतीची अनुभूती मिळते. अर्थात दोन्हीत मिळणारे समाधान सारखेच असते. प्रश्‍न असतो तो तुम्ही अंत:करणापासून त्या शांततेचा कसा आणि किती आनंद घेता याचा !

शांतता ही दोन प्रकारची असते. एक आतली तर दुसरी बाहेरची. या दोन्हीची जाणीव झालेला माणूस मानसिक विकारावर लवकर मात करू शकतो. बाहेरच्या जगातला कोलाहल मिटवणे किंवा कमी करणे आपल्या हातात नसले तरी त्यापासून दूर जाऊन शांतता मिळवता येते. आतील कोलाहालापासून सुटका करणे मात्र वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी साधनेची आणि सकारात्मक विचारांची आवश्यकता असते. अंत:करण शांततेने भरून जाणे आणि त्यात आपण डुबणे या दोन्ही गोष्टी कठिण आहेत. मात्र एकदा ती अनुभूती आली की त्यासारखे अन्य सुख नाही. विपरित परिस्थितीत तसेच विविध आव्हानांचा सामना करत हसतमुखाने जगणारेही आहेतच. त्याबरोबर लहानशा संकटाचे किंवा दु:खाचे भांडवल करणारेही आहे. शेवटी कसे जगायचे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. पण स्वत: समाधानी राहता आले तर इतरांनाही समाधान देता येते. इतरांना समाधान देण्यातून मिळणारा आनंद मोठा असतो. मीसुद्धा सतत आनंदी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करते. आनंदी राहण्याचे आणखीही फायदे आहेत. मुख्य म्हणजे तुम्ही बऱ्याच काळपर्यंत चिरतरुण राहू शकता. वार्धक्य, नैराश्य आदी बाबी जवळही फिरकत नाहीत. मुख्य म्हणजे आनंदाला वय नसते. त्यामुळे कोणत्याही वयात आणि केव्हाही आनंदी राहता येते. मात्र तशी मानसिकता किंवा तयारी असायला हवी. ही कुवत एखाद्याला ईश्वरभकतीतून तर एखाद्याला साधनेतून प्राप्त होते. मला मात्र यासाठी संगीताची साधना नेहमीच कामी आली आहे.

आयुष्यात कोणत्याही वळणावर संस्कार कामी येतात. किंबहुना, संस्कारावरच सर्व काही अवलंबून असते. हे सार समजलेल्या व्यक्‍ती कायम समाधानी राहू शकतात. ईश्‍वरभक्तीत तल्लीन झाल्यानंतर आपण स्वत:ला विसरून जातो. त्याचप्रमाणे आपल्याला जगाचाही विसर पडतो असे अनेकांचे मत आहे. आपल्या दैनंदिन कार्यातही अशी तल्लीनता आणता येते. कामालाच परमेश्‍वर मानणाऱ्यांची संख्या कमी नाही. ही मंडळी आपल्या कर्तव्यावर ईश्‍वराइतकेच प्रेम करतात. कामातील तठ्ठीनतेतून त्यांना ईशश्‍वरभकतीचा आनंद प्राप्त होत असतो. हीच अनुभूती मला गाण्यांच्या मैफिलीतून मिळते. सुरांनी एकतानता साधली की मैफिल अविस्मरणीय ठरते. अशा मैफिलीचा आनंद नक्कीच ईश्‍वरभक्तीच्या आनंदाइतका श्रेष्ठ असू शकते. सूर हा ईश्‍वर मानल्याने माझे त्याच्याशी जवळचे नाते निर्माण झाले आहे. संगीताची आवड असणारा प्रत्येकजण सुरांवर असेच प्रेम करू शकतो.

संगीत ही अविरत सुरू राहणारी साधना असल्याने माझा कायम साधकाच्या भूमिकेत राहण्याचा प्रयत्न असतो. साधक म्हणून राहिल्यावर नवीन गोष्टी शिकण्याची उर्मी कायम राहते. ती आत्मसात करण्याची इच्छा तीव्र होते. त्याचबरोबर साधक वृत्तीने बऱ्याच चांगल्या गोष्टी टिपता येतात. म्हणून अशी वृत्ती गरजेची ठरते. या क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांनी हो साधक वृत्ती अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा असे सांगावेसे वाटते. कारण या क्षेत्रात थोडेसे यश मिळाले की हुरळून जाणारेही अनेकजण आहेत. मात्र अशा तात्कालीक यशापेक्षा अविरत संगीतसाधना मोलाची ठरते. ही साधना म्हणजे एक प्रकारची ईश्‍वरभक्तीच. मी याच ईशवरभकतीत सतत लीन राहण्याचा प्रयत्न करते. त्यातून मिळणारे समाधान आणि आनंद या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी अमूल्य आहेत.

आरती अंकलीकर

अद्वैत फिचर्स (SV10)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..