भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान….!!
गानकोकिळा लता मंगेशकर यांचा आज ८८ वा वाढदिवस. लता मंगशेकर या भारतातील लोकप्रिय आणि आदरणीय गायिका आहेत. भारताची गाणं कोकिळा म्हणून ओळखल्या जाणा-या या गायिकेने १९४२ साली आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली.
लतादीदींनी हिंदी,मराठी भाषेत तर गाणी गायलीच आहेत पण ३६ हुन अधिक प्रादेशिक व विदेशी भाषेत सुद्दा गाण्याचे रेकॉर्डिंग केले. १९८६ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा हिंदी सिनेमातील सर्वोच्च सन्मान होता. दिदीच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग २७ जानेवारी १९६३ रोजी त्यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गीत गाऊन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित-जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू आणले. लता दिदीना आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि मीना मंगेशकर हे भाऊ बहिण..
लता मंगेशकर यांचा जन्म हा २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदौरमधील महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. दीनानाथ मंगेशकर असे त्यांच्या वडिलांचे नाव. त्यांचे वडिल रंगमंचावर कलाकार आणि गायकाची भूमिका साकारत असतं. आणिच हाच संगीताचा वारसा लता दिदींना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला. लता मंगेशकर यांचं पहिलं नाव हेमा असं होतं. जन्माच्या ५ वर्षानंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचं नाव लता ठेवलं.लता दिदींच्या वडिलांना त्यांना वयाच्या ५ व्या वर्षी संगीताचे ज्ञान देण्यास सुरूवात केली. त्यांच्यासोबत त्यांच्या बहिणी आशा , उषा आणि मीना या देखील संगीत शिकत होत्या. लतादिदी अमान अली खान साहेब आणि त्यानंतर अमानत खान यांच्याकडे देखील संगीताचे शिक्षण घेतले.लता दिदींनी ५ व्या वर्षी पहिल्यांदाच एका नाटकात अभिनय केला. लता दिदींची सुरूवात जरी अभिनयापासून झाली असली तरी सुरूवातीपासून त्यांची ओढ ही संगीताकडेच होती. त्यानंतर वयाच्या १४ व्या वर्षी लता दिदींनी सिनेमात हिरो हिरोईनच्या बहिणीची भूमिका देखील साकाली आणि त्यासोबतच संगीताचं ज्ञान देखील घेतलं.
आज दिदींचा वाढदिवस, त्यानिमित्त आपल्या समोर लता “दिदी” बद्दच्या काही रंजक व माहिती नसलेल्या गोष्टी.. वयाच्या १३ व्या वर्षी लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि या किशोरवयीन मुलीच्या खांद्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्याचा मोठा भार आला. परंतु कलेनी त्यांना या प्रसंगातुन तारले..१९४२ ते ९८ च्या दरम्यान सुमारे ८ चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. वसंत जोगळेकर यांनी १९४२ साली त्यांना “किती हसाल” या चित्रपटात पहिल्यांदा गायन करायची संधी दिली. मात्र, “नाचू या गडे, खेलु सारी मणी हौस भारी” हे गाणे नंतर चित्रपटातून वगळण्यात आले होते. आणि शेवटी नवयुग चित्रपट निर्मित “पहिली मंगळागौर” या चित्रपटात त्यांना छोटासा रोल मिळाला, त्यांनी “नटली चैत्राची नवलाई” हे गाणे या चित्रपटात गायले.
पटियाला घराण्याचे उस्ताद अमानत अली खान यांनी भारतीय शास्त्रीय गायानाचे त्यांना प्रशिक्षण दिले. पण ते फाळणी नंतर पाकिस्तानात गेले आणि लताजींनी अमानत खान देवसवळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे प्रशिक्षण चालू ठेवले. याव्यतिरिक्त त्यांचे शिक्षक उस्ताद बडे गुलाम अली खानचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मा हे सुद्दा होते. त्यांचे खरे नाव हेमा हार्डीकर होते. त्यांच्या वडिलांनी आडनाव बदलून मंगेशकरला केले,तर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना लताचे नाव बदलण्यात आले होते.“लतीका” हे त्यांच्या वडिलांचे नाटक ‘भाऊ बंधन’ मधील एक लोकप्रिय चरित्र आहे. यावरूनच त्यांचं नाव “लता” ठेवण्यात आलं. बॉलिवूडच्या संगीतकारांनी लताजींच्या आवाज खूप बारीक आहे या कारणावरून सुरुवातीला त्यांना नाकारण्यात आले होते.
लताजींनी लहानपणीच शाळा सोडली कारण काय तर वर्गशिक्षिकेने त्यांना त्यांच्यासोबत १० महिन्याची बहीण आशा (भोसले) यांना सोबत आणण्यास नकार दिला होता. बॉलिवूडमध्ये त्यांनी “दिल मेरा तोडा” या गाण्याने “१९४८” मजबूर या चित्रपटातून पदार्पण केले. त्यांना प्रसिध्दी मिळाली ती १९४९ मध्ये महल या चित्रपटात “आयेगा आणेवाला” या गाण्याने, हे गाणे त्यांनी प्रसिध्द अभिनेत्री मधुबालासाठी गायले होते.परंतु ग्रामफोन कंपनी ऑफ इंडियाने तिला त्या गाण्याचे श्रेय दिले नाही कारण त्या त्यावेळी लोकप्रिय नव्हत्या. पण, मधुबाला त्यांच्या आवाजाने प्रभावित झाल्या होत्या त्यांनी त्यांच्या सर्व चित्रपटात गाणे गायनाकरीता करार करून घेतला.
अनुभवी अभिनेता दिलीप कुमार यांनी त्यांना स्थानिक भाषेतील उच्चार जमत नसल्या कारणाने सहमती दिली नाही पण लतादीदी नी बरीच मेहनत घेऊन शफी या शिक्षकाकडून उर्दू अवगत केली.बालपणापासून त्या गायक-अभिनेते के. एल. सैगल यांच्या प्रशंसक आहेत. त्या १८ वर्षांच्या असताना रेडिओ खरेदी केली. परंतु त्यांनी यावर पहिली बातमी ऐकली ती सैगलच्या मृत्यूची. लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये गायणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. त्यांना अज्ञात व्यक्तीकडून विष (Slow Poison) दिल गेल, ज्यासाठी त्या जवळजवळ ३ महिन्यांपर्यंत आजारी होत्या परंतु ह्या प्रसंगातुन त्या सुखरूप बचाविल्या. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या दोन अपूर्ण इच्छा प्रकट केल्या, त्या म्हणजे दिलीप कुमार आणि के. एल. सैगल यांच्यासाठी गायन करण्याच्या इच्छा अपूर्णच आहे.त्यांनी जवळपास ५०,००० गाणी गायली आहेत आणि ते सुद्धा १४ पेक्षा अधिक भाषांमध्ये आहेत. लता दिदी या यशाच्या शिखरावर असल्या तरीही त्यांच जीवन हे अतिशय खडतर असून सहज नव्हते. लता दिदींना देखील या पदवीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा अनेक संकटांनी सामावलेला होता.
लतादीदींच्या स्वर्गीय स्वरांना कळीकाळाची, प्रांतांची, देशांच्या सीमांची मर्यादा नाही. या स्वरांना कोंदण आहे ते केवळ उत्कटतेचे, भव्यतेचे….! लता मंगेशकर हा भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग हा भारतीय आपल्याच मायदेशात राहत असो वा विदेशात स्थायिक झालेला असो. जगाच्या पाठीवर जिथे जिथे भारतीय माणूस वसलेला आहे, तिथे तिथे तो लता मंगेशकर यांचा स्वर सोबत घेऊन गेला आहे. लतादीदींच्या आयुष्यातील सात दशके ही त्यांच्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीने व्यापलेली आहेत. सलग सहा दशकांपेक्षा जास्त काळ गात राहणं हाच एक चमत्कार आहे. तो लता मंगेशकर यांनी केला आहे.
काळ बदलला, श्रोत्यांच्या तर कित्येक पिढय़ा बदलल्या,आता YouTube, Google, Gaana dot com आणि Mobile Apps , Facebook, WhatsApp .. मोबाईल `ऍप्स’च्या युगातल्या तरुणांवरही त्यांच्या आवाजाचं गारुड कायम आहे. कारण त्यांचा स्वर कालातीत आहे. आजच्या पीढीला `कृष्ण धवल’ म्हणजेच `ब्लॅक ऍण्ड व्हाईट’ चित्रपट कसा असतो हे जवळपास माहितही नाही. मग त्या काळातल्या कलावंतांविषयी- अभिनेते, अभिनेत्री, संगीतकारांबद्दल त्यांना काही माहिती असण्याचं कारणच नाही. तरी त्यांना एक नाव नीट ठाऊक असत. ते म्हणजे लता मंगेशकर. भारतीय चित्रपट १९३२ मध्ये बोलू लागला आणि लगेचच गाऊही लागला. बोलपटांच्या प्रारंभीच्या काळात अभिनेत्यांना स्वतःची गाणी स्वतःच म्हणावी लागत. बोलपट स्थिरावून जेमतेम १५ वर्षं होत होती. त्या सुमारास चित्रपटसृष्टीत एका चमत्काराचा उदय झाला. लता मंगेशकर हे त्या चमत्काराचं नाव.
अभिनेत्री, संगीतकार यांच्या पिढय़ा बदलल्या, पण लता मंगेशकर हे नाव ध्रुवतार्याप्रमाणे अढळ आहे. अर्थात हे यश सहजसाध्य नव्हतं. लतादीदींनी त्यासाठी अपरंपार कष्ट घेतले. पोरवयात पडलेली कुटुंबाची जबाबदारी सांभाळत लतादीदींनी स्वरांचं एक अफाट विश्व उभं केलं आहे. हिंदी-उर्दू शब्दांचे उच्चार असोत किंवा लाहोर घराण्याची, पंजाबी-पतियाळा शैली असो, ठुमरीची बनारस शैली असो, बंगालमधून आलेली बाऊल शैली असो, आधीच्या सर्व गायिका बघता बघता विस्मरणात जातील असे गायकीचे रंगलतादीदींनी रसिकांसमोर पेश केले. या आवाजाला नादसृष्टीतील काहीही अशक्य नाही हे लक्षात आल्यानं संगीतकारदेखील लतादीदींसाठी अवघड स्वररचना बांधीत गेले आणि दीदींनी ते सारे स्वराकार अधिक सुंदर करून मांडले.
काळ बदलला, संगीतकार बदलले, श्रोत्यांच्या पिढय़ा बदलल्या, त्यांची आवड बदलली तरी लतादिदी गातच राहिल्या, त्यांची गाणी सर्वांना आवडतच राहिली. ते का? स्वतः लतादिदी देखील या काळात बदलत राहिल्या. पडद्यावर दिसणारा प्रसंग, ते गाणं सादर करणारी अभिनेत्री केवळ यांचाच नव्हे, तर त्या अभिनेत्रीच्या बोलण्याच्या, उच्चाराच्या लकबींचा अभ्यास करून लतादीदी गात राहिल्या. त्यामुळेच अनेकदा त्यांचे गाणे अभिनय अभिनेत्रीच्या अभिनयापेक्षा सरस ठरतो.
” हे लता, स्वरदेवता…” ही कवी उपेंद्र चिंचोरे काव्यरचना पुणे आकाशवाणी केंद्रावरून, ४ जानेवारी २००८ रोजी, “काव्यदर्पण” या मालिकेच्या पहिल्या भागात प्रसिद्ध झाली होती :
हे लता, स्वरदेवता, तुज नमन गे स्वरयोगिनी |
चरा चराचराँना, तव सुरांची, पडली भूल मोहिनी, ||१||
माय पित्यांचा, आशिष तुजसी, असे सदा सर्वदा |
कृपा तयांची, पाठी असता, मिळे सौख्यसंपदा ||२||
बृहस्पतीला जो आवडतो, सोन फुलांचा वास |
तोच परिमळ, स्वरात तुझिया, तोच तुझा गे श्वास ||३||
कंठी तुझिया, नित्य विराजे, अमृतमय ठेवा |
अक्षय स्वरांना, तमा कशाची, निर्मिले जया देवा ||४||
ज्यास भजावे, ज्यात भिजावे, ऐशी ही पुष्कर्णी |
ह्याच सुरांनी, पावन झाली, विश्वाची ही धरणी ||५||
देवांनाही भूल पडावी, ऐशी मंजूळ वाणी |
स्वर्ग सोडुनी, येई भूवरी, श्री हरी चक्रपाणी ||६||
भगवंताची तूचि बासरी, शारदेची तू वीणा |
स्वरामृत हे, प्राशन करण्या, जन्मही माझा पड़े उणा ||७||
अनंत बिरूदे, तुजसी लाभली, तूचि स्वर जननी |
अवघ्या विश्वा, तुझ्या स्वरांनी, मिळते संजीवनी ||८||
स्वरवैभव हे, तुझ्या स्वरांचे, असेच विलसत रहो |
स्वर ब्रम्हाची, स्वरसरिता ही, दूर दिगंतरी वाहो ||९||
स्वरमंदिरी, अखंड तेवो, नंदादीप तेजस्वी |
जगत् नियंत्या श्री मंगेशा, ही प्रार्थना सर्वस्वी ||१०||
© कवी : उपेंद्र चिंचोरे
तीर्थस्वरूप स्वरसम्राज्ञी भारतरत्न लतादिदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
— गणेश उर्फ अभिजीत कदम,
कुडाळ, सिंधूदुर्ग
कुडाळ, सिंधूदुर्ग
Leave a Reply