स्वार्थ जगण्या सृष्टी निर्मिली
तत्व नेमण्या आतुर देहबोली
तरी परस्थिती कैसी बोलली
बदलुनी जाती सारे!!
अर्थ–
मला हे जगायचे आहे, मला हे करायचे आहे म्हणून त्यासाठी मला काय काय करावे लागेल? ह्याचा विचार करून तसे वागणे म्हणजे स्वार्थ होतो का? आणि एखाद्या गोष्टीला जुगारून त्यापलिकडे काही करणे याला स्वार्थ म्हणतात का? या सगळ्याची उत्तरं ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असलेल्या परिस्थिती वर अवलंबून असतात.
देवाने ही सृष्टी निर्मिली ती स्वार्थीपणानेच पण त्यातून त्याचा हेतू चांगला होता. आपणही स्वार्थ टिकवण्यासाठी अनेक गोष्टी करतो. शिक्षण, लग्न, नोकरी, व्यवसाय, मुलं-बाळं, छंद जोपासणे अगदी सगळं यात येतं. पण त्यातला हेतू चांगला असतो. इथे कोणाचे वाईट घडत नाही. एखाद्या मुलाचं शिक्षण झालंय म्हणून तो चोर झाला असं होतं नाही. अर्थात आत्ताच्या देशातल्या बेरोजगारी बद्दल व्यक्त न झालेलंच बरं. पण त्यातही चूक केवळ सत्ताधारी किंवा अधिकारी यांचीच असते का? एक नागरिक म्हणून आपली चूक किती? मुळात भरलेल्या ताटातले सगळे अन्न केवळ माझ्यासाठीच आहे हे मानून ते अधाशा सारखे खाणे हाही एक स्वार्थच आहे. दुसऱ्याच्या वाट्याचे आपण घेणे एक स्वार्थचं. पण जर दुसऱ्याच्या वाट्याचे दुःख आपण घेतले तर? तिथे गणितं बदलतात आणि स्वार्थ या शब्दाला अध्यात्म प्राप्त होते कारण दुसऱ्याचे दुःख घेणे आणि आपले सुख वाटणे याच्या सारखा मार्ग नाही भगवंताच्या जवळ जाण्याचा.
स्वार्थीपणा असावा पण तो इतरांच्या भल्यासाठी असेल तर चांगलंच अथवा या स्वार्थी लोकांच्या समुद्रात अजून एक दगड कुठे पडून राहीला तरी त्याला कोण विचारताय.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply