नवीन लेखन...

स्वार्थ..

कोणी कितीही काही म्हटलं तरी कोणत्याही नात्यात स्वार्थ हा असतोच. स्वार्थाशिवाय नातं अशक्य आहे. नाती जुळण्याची सुरुवातच मुळी स्वार्थातून होते व अशा एकदा जुळलेल्या नात्यांवर पुढे वेगवेगळे रंग चढत जातात आणि मग पुढं कधीतरी निरपेक्ष नातं तयार होण्याची शक्यता निर्माण होते. त्यातल्या त्यात एका नात्याला स्वार्थ स्पर्श करत नाही असं म्हणता येईल आणि ते म्हणजे आई आणि मुलातलं नातं. सर्वात नैसर्गीक आणि निरपेक्ष म्हणावं असं हे एकमेंव नातं. बाकी सर्व नाती ‘कुछ रिश्ते मुनाफ़ा नहीं देते, मगर ज़िन्दगी को अमीर बना देते हैं..!’ असं म्हणून फक्त ‘मुनाफा’ हाच हेतू ठेवून झालेली असतात. मुल आणि आई यातलं नातंही स्वार्थी असतोच.।!

मातृत्वाची भावना वैगेरे सर्व सत्य असलं तरी मनुष्याच्या जन्माला त्याच्या आईचा (आणि वडीलांचाही) स्वार्थ कारणीभूत झालेला असतो. (मुलाच्या जन्मापूर्वीचा वडीलांचा स्वार्थ स्पष्ट असल्याने वडील-मुल या नात्यावर मी इथं लिहीलेलं नाही. परंतू ‘आई’ हा विषयच वेगळा असल्याने त्यावर थोडंसं लिहीलय.). एकदा का मुलाचा जन्म झाला की मग आईच्या मनी ‘माझं मुल’ ही निस्वार्थी भावना जन्म घेते आणि मग ती तिच्या शेवटापर्यंत टिकते. पण तो पर्यंत ‘मला आई व्हायचंय’ हा स्वार्थ असतोच. माणसाचा जन्मच असा स्वार्थातून झालेला असल्याने स्वार्थीपणा त्याचा जन्मापासूनचा साथीदार आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही असं मला वाटतं. माकडीन आणि तिने स्वत: बुडत असताना स्वत:चा जीव वाचावा म्हणून पायाखाली घेतलेल्या तिच्याच पिलाची गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. स्वत:चा जीव वाचावा म्हणून आपल्याच पोराला पायाखाली घेणाऱ्या माकडीनीचेच आपण ‘वंश’ज, आपण तसेच असायचे. बाकी माणूस हा देवाचा ‘अंश’ वैगेरे सब झुठ है..!!

स्वार्थ नसता तर आता आपण जी काही प्रगती पाहातोय, ती झाली नसती. स्वार्थापोटी गती असते आणि म्हणून प्रगती होते. जे माझं नाही त्याचा विचारही मी करणार नाही ही भावना सर्वच सामान्य मनुष्यमात्रांच्या ठायी असते. तशी भावना, तसा विचार साम्यवादी राजवटींमधे करायला मनाई असते आणि म्हणून तर एके काळी बरोबरीची राष्ट्र आणि त्या राष्ट्रातील जनता प्रगतीची नवनविन शिखरं पादाक्रांत करत असताना, रशीयासारखं साम्यवादी राष्ट्र जरी पुढे जाताना दिसत होतं असलं, तरी त्या राष्ट्रातील जनता मात्र अधोगतीकडे जाताना दिसत होती. रशीयन महासत्तेचं ‘महासत्ता’ म्हणून पतन होण्यामागे जी काही अनेक कारणं आहेत, त्यामधे ‘हे तुमचं नसून सरकारचं आहे’ ही त्या देशातील कायद्याने जनतेची करून दिलेली सक्तीची भावना हे ही एक कारण आहे. जे सरकारी असतं ते कोणाचंच नसतं हा आपलाही अनुभव आहे आणि म्हणून मुंबईच्या लोकल गाड्यांमधे घोषणा करावी लागते, की ‘रेल आपकी संपत्ती है, कृपया इसे नुकसान न पहुंचाये’ ती म्हणूणच. रशीयन संघराज्यातील (युनीयन ऑफ सोव्हीएट सोशालिस्ट रिपब्लीक-USSR) जनतेला स्वार्थ अलाऊड नसल्याने त्याची संघराज्य त्याच्यापासून विलग होऊन त्या महासत्तेच पतन झालेलं अलिकडचं सर्वात मोठं आणि ठळक उदाहरण.

स्वार्थ मुळीच वाईट नसतो. वाईट असते ती स्वार्थाची मात्रा. ती जेवढी जास्त, तेवढी वाईट. स्वार्थाची भावना जपताना आपल्यासोबत दुसऱ्याचही भलं कसं होईल ही भावनाही जपली, तर तो स्वार्थ वाईट कसा म्हणता येईल..? माझ्यासहीत दुसऱ्याचंही भलं होवो इतपत मात्रेचा स्वार्थ केंव्हाही चांगलाच. आपल्या देशात तर ‘स्वार्थ मे परमार्थ’ ही म्हणच आहे. पण माझं आणि माझंच भलं होवो ही भावना जेंव्हा बळावू लागते तेंव्हा मात्र ती त्या माणसासाठी आणि तो ज्या समाजाचा घटक असतो, त्या समाजासाठीही धोक्याची घंटी असते. माझं आणि माझंच याचा अर्थ क्रमाने मी, माझं कुटुंब, माझ्या पुढच्या दहा-पंधरा पिढ्या आणि काही नातेवाईक एवढाच घ्याया. मग त्यासाठी दुसरे, त्यांची कुटुंब व त्याच्या पिढ्याही व प्रसंगी देशही बरबाद झाला तरी हरकत नाही असं वाटायला लावेल येवढी ही मात्रा अशा लोकांच्यात मोठ्या प्रमाणात असते. फक्त मलाच किंवा माझ्या मुला-पत्नींला निवडणूकीचं टिकीट मिळावं असं नाटणारे नेते, लाच खाऊन कोणतीही बेकायदेशीर कामं बिनधास्तपणे आणि तत्परतेनेही करणारे सरकारी कर्मचारी-अधिकारी, भेसळ करणारे व्यापारी, विश्वास ठेवणाऱ्याचा गळा बिनदिक्कत कापणारे मित्र, दुसऱ्याच घर विस्कटून स्वतःच घर बांधणारे स्वकीय अशी अनेक माणसं आपल्या आजुबाजूला दिलतात. अशी माणसं वेळ पडल्यास स्वार्थासाठी कोणाचाही आणि कशाचाही सौदा करताना दिसतात.

हे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे हल्ली यत्र तत्र सर्वत्र बोकाळलेला अतिस्वार्थवाद..! दुसऱ्याचं घर विस्र्कटून स्वत:चं घर बांधणारांची संख्या वाढताना दिसत आहे. अतिस्वार्थाचं हे प्रॉडक्ट..! स्वार्थ मनुष्याला कळायला लागलं तेंव्हापासून त्याच्यात आहेच. पण तो साधताना दुसऱ्याचं नुकसान होऊ नये याची काळजी पूर्वी घेतली जायची. स्वार्थापोटीच अनेक कामं केली गेली व पुढे ती सर्वांच्याच उपयोगास आली अशी अनेक उदाहरण पूर्वीच्या काळात घडलेली मुंबई शहराच्या जडणघडणीचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आली. ब्रिटीशांनी आपल्या देशात रेल्वे व पोस्टासारख्या ज्या अत्यावश्यक सोयी केल्या त्यामागे त्यांच्या सैन्याची जलद हालचाल व वेगाने संपर्क व्हावा याच हेतून. त्याद्वारे या देशावर प्रभावीपणे राज्य करता यावं हा त्यांचा स्वार्थी हेतू त्यात होता. परंतू त्याचे फायदेही त्यांना आपल्या देशातील स्थानिक लोकांना उपलब्ध करून दिले व त्याची फळं आपण आजतागायत चाखतो आहोत.

ब्रिटीशांचंच कशाला, एक देशी उदाहरणही देतो. उदाहरण अर्थातच ब्रिटीश काळातलंच आहे कारण स्वार्थातून परमार्थ साधणे तेंव्हा काही विशेष नव्हते. ‘माहीमचा कॉजवे’ सर्वच मुंबईकरांना माहीत आहे. साधारणत: आठ-दहा वर्षांपूर्वी वांद्रे-वरळी सी लिंक होण्यापूर्वीची जवळपास १६५ वर्ष पश्चिम उपनगरांना मुंबई शहराशी जोडणारा हा एकमेंव रस्ता होता. मुंबई शहराला माहिम येथे उपनगरातील वांद्र्याशी जोडणारा, वांद्र्याच्या खाडीवरील हा पूल, माहिम कॉजवे, श्रीमान जमशेटजी जिजीभॉय यांनी स्वत:चे १.५५ लाख रुपये खर्चून बांधला तर माहिम पासून पुढे दादरच्या शिवसेना भवनपर्यंतचा रस्ता जमशेटजींच्या पत्नींने, लेडी जमशेटजीने, तीचे स्वत:चे २२ हजार रुपये खर्चून बांधला. माहिम ते दादरच्या सेना भवनापर्यंतचा हा सबंध रस्ता तेंव्हापासून आजतागायत ‘लेडी जमशेटजी मार्ग’ या नांवानेच प्रसिद्ध आहे. सन १८४३ मधे जमशेटजी पती-पत्नीने पदरमोड करून हा जो काही उपद्व्याप केला त्यामागे प्रथमत: त्यांचा स्वार्थ होता. लेडी जमशेटजी राहायच्या मुंबई शहरात मात्र त्यांची श्रद्धा होती ती वांद्रे तलावासमोर स्वामी विवेकानंद मार्गावरील जरीमरी मातेवर. या जरीमरी मातेचं देऊळ आजही वांद्र्याला तिथंच उभं आहे. ह्या देवळात त्यांना मुंबई शहरातून दर आठवड्याला यावं लागायचं ते वांद्र्याची खाडी लहानशा बोटीने पार करून. तेंव्हा मार्गच नव्हता. नेहेमीची ही कटकट दूर व्हावी म्हणून त्यांनी माहिमपर्यंतचा रस्ता व त्यांचे पती जमशेटजीनी पत्नीच्या सोयीसाठी पूल बांधला. केवळ स्वत:ची सोय व्हावी या हेतून केलेलं हे बांधकाम आज सातत्याने पावणे दोनशे वर्ष समस्त मुंबईकरांच्या कामाला येत आहे. जमशेटजी पती-पत्नीने साधलेला ‘स्वार्थ मे परमार्थ’ तो हाच..!

पारतंत्र्यात जे काही करायचं ते देशासाठी हीच भावना होती. होती म्हणजे नैसर्गिकरित्याचं होती. स्वातंत्र्यानंतर स्व-देश निर्माण होताच, कुठंतरी पक्षाप्रती निष्ठा ठेवली जाऊ लागली. पुढं हळुहळु ही निष्ठा व्यक्ती केंद्रीत झाली आणि आता तर ती ‘मी’ आणि ‘माझं’पुरती मर्यादीत झालेली दिसते. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हा बदल झालेला दिसतो. ‘सर्वे भवन्तु सुखिन:, सर्वे सन्तु निरामय:’ पासून ‘अहं भवानी सुखी, अहमसानी निरामय:’ पर्यंतच अलिकडच्या काळातील हा बदल चिंताजनक आहे. ‘मला काय करायचंय’, ‘मै भला-मेरा काम भला बाकी दुनिया गेली खड्ड्यात’ ही वृत्ती बळावू लागलीय. ‘माझंच नव्हे तर संपूर्ण विश्वाच भल होवो’ असं पसायदान मागणाऱ्या ज्ञानोबा माऊलींची परंपरा मोठ्या अभिमानाने सांगणारे आपण, एवढे कसे बदललो? ग्लोबलायझेशनमुळे संपूर्ण जग जवळ येत असताना माणूस माणसापासून दूर जाऊन जर स्वार्थी आणि आत्मकेंद्रित होत असेल तर ते ग्लोबलायझेशन निरर्थक आहे..!!

-नितीन साळुंखे
9321811091
(संस्कृत संदर्भ-डाॅ. सुनिता पाटील)

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..