भगवान म्हणतात, ‘लाइफ इज रिलेशनशिप’ माणूस, माणसाचं जीवन म्हणजे केवळ नातेसंबंधांचा गोतावळा आहे. नातं… मग ते आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी असं असू देत किंवा मित्र, सहकारी, स्पर्धक, टीकाकार, अगदी शत्रूसुद्धा! ही सारी नातीच. नात्यांचा असा विचार केला तर आयुष्य म्हणजे केवळ नातीच, हे पटू लागतं. भगवान म्हणतात, ‘‘नातेसंबंधात सुरळीतपणा येणं, त्यातले अडसर दूर होणं यातूनच यशाचा, आनंदाचा आणि जीवनमुक्त अवस्थेचा मार्ग सापडू शकतो. अगदी साधा, सरळ विचार केला तरी वर वर्णन केलेल्या संबंधांमध्ये सगळंच काही सुरळीत नसतं. एकमेकांचे स्वभाव, त्यांचे अनुभव, केलेली मदत किवा विरोध यातून अडथळ्यांची मालिका सुरू होते. एखाद्याबद्दल असूया तर एखाद्याबद्दल ममत्व अशा भावना प्रकटू लागतात. तो त्या वेळी माझ्याशी असं वागला, असं म्हणत आपलं वागणंही मग त्याच दिशेनं होऊ लागतं. भगवान म्हणतात, ‘‘माणूस विज्ञानाच्या तत्त्वासारखाच आहे. क्रिया आणि प्रतिक्रिया ही एकमेकांसारखीच असते. त्यामुळंच एखाद्या माणसाचं वागणंही आपल्याच वर्तणुकीचा आरसा असू शकतो. तो वाईट आहे; कारण मी चांगला नाही अन् तो खूप दयाळू आहे म्हणजेच मीही सहिष्णू आहे. इतकं साधं सोपं असं हे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळंच जीवन सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल तर आपण सुखी-आनंदी व्हायला हवं. आनंदी माणूस कोणालाच दुःख, वेदना कधी देऊ शकेल? अनेक वेळा होतं काय, की आपण इतरांनी बदलायला हवं असा आग्रह धरून बसतो. मग त्यानं कसं वागावं हेही आपणच ठरवून टाकतो अन् तसं झालं नाही की आपण दुःखी होतो. त्यातून दिलं जातं ते केवळ दुःखच! आणि मग सुरू होते ती दुःख, तणावाची मालिका. हे वर्तुळ कसं भेदायचं? संबंध सुरळीत कसे करायचे? भगवान म्हणतात, ‘‘जो जसा आहे, तसाच त्याचा स्वीकार करा. एकदा त्याचं तसं असणं हे वास्तव आहे.
याची स्वीकृती झाली की त्याला बदलण्याचा आग्रह लोप पावतो. इतरांना बदलण्यापेक्षा स्वतः बदलण्याची प्रक्रिया सुरू होते. सख्ख्या आईचं वागणंही अनेक वेळा विपरीत वाटतं.’’ त्यासाठी भगवान म्हणतात, ‘‘त्याच्या भूमिकेत जा. स्वतःला आईच्या जागा पहा आणि मग ठरवा कोणाचं खरंच काही चुकलं आहे का? दुसर्याची चप्पल घाला आणि त्यासह मैलभर चाला. मग तुम्हाला कळेल की चप्पल कुठे बोचते आहे? मित्र किवा मैत्रीण जेव्हा प्रेयसी किवा प्रियकर बनतो, त्यानंतर पती किवा पत्नी असं नातं तयार होतं तेव्हा या अतिशय हव्या हव्याशा नात्यामध्येही काही काटे बोचू लागतात. याचं मूळ स्वतः न बदलण्यात आहे. माणसाचा तो जसा आहे, तसं त्याला न स्वीकारण्यात आहे. माझा एक जवळचा मित्र आहे. त्याच्याशी कधीही बोलायचं म्हटलं की खास पुणेरी थाटाचं काहीतरी कुचकट ऐकावं लागायचं. पण भगवान भेटीनंतर मी त्याला तो आहे, तसंच स्वीकारलं. अन् अक्षरशः जादू झाली. त्याच्या बोलण्यातला विखार कमी झाला. माझ्याही प्रतिक्रिया थांबल्या.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply