स्वतःच्या कर्तृत्वाचा,रोज करीत असलेल्या (भलेही ते किरकोळ का असेना) कामाचा सार्थ अभिमान बाळगणारे सदैव नमस्काराचे धनी असतात.जी मंडळी स्वतःच्या कौशल्याला ( ते कोणत्याही क्षेत्रातील असो) सतत धार लावून ते तीक्ष्ण करीत असतात त्यांनाही सलाम करण्यात काही गैर नसते.
मात्र काही मंडळी त्यांच्याबरोबरच्या संभाषणात या कौतुकाच्या आधारे येन केन प्रकारेण स्वतःची टिमकी वाजवण्यात धन्यता मानत असतात. आणि काहीजणांना बोलताना ते बोलण्यात सूक्ष्मपणे समाविष्ट करण्याची, व्यक्त करण्याची सवयही असते. याआधारे मग आपण सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असल्याचा भास होतो आणि इतरांना उपदेश करण्याचा, सल्ला देण्याचा, मार्गदर्शन करण्याचा जन्मसिद्ध की कर्तृत्वसिद्ध अधिकार आपोआप प्राप्त होतो.बरेचदा हे अनाहूत असते.ही बढाई अतिशय नम्र शब्दांमध्ये कधीकधी सादर होते-विशेषतः समाजमाध्यमांवर !
ही बढाई कधीतरी संदर्भहीन असते,कधी अकारण स्वतःवर उगाच केलेली टीका असते, किंवा अगदीच वरवरचे विधान असू शकते पण त्यामधून सदर व्यक्तीच्या कर्तृत्वावर प्रकाश पडत असतो, ते लक्ष वेधून घेण्याचे कारस्थान(?)ही असू शकते.ही बढाई सकृतदर्शनी निरुपद्रवी दिसू शकते पण तीच वारंवार, त्याच व्यक्तीकडून कानी पडत असेल तर कर्कश्य वाटू शकते आणि अशा व्यक्तींना टाळण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. स्वतःची टिमकी वाजविण्यात धन्यता मानणारी मंडळी स्वतःच्या प्रेमात पडलेली असतात आणि त्यांच्याबद्दल समोरच्या व्यक्तीच्या मनात नकारात्मकता पसरू शकते.
मोठ्या खुबीने आणि हुशारीने अशी मंडळी स्वतःचा गवगवा करीत असतात. उदाहरणार्थ समाजमाध्यमांवर एखादी व्यक्ती लिहिते- ” मी एकाच दिवसात तीन देशांमध्ये हिंडलो, तेथील अन्नपदार्थांची चव बघितली. अजूनही विश्वास बसत नाहीए. धन्य रे ते तंत्रज्ञान आणि वेग !” असे हे छुपे स्व-प्रमोशन असते.
किंवा ” ५ लाखांची वस्तू विकत घ्यायला मी बरोबर फक्त ५०,००० रू आणले.सगळ्यांना कल्पना आहे- किमतींबाबत मी किती अनभिज्ञ असतो ते !”
” जर्नल ऑफ पर्सनॅलिटी आणि सोशल सायकॉलॉजि” अशा टिमकीबहाद्दरांपासून दूर राहण्याचा सल्ला देते कारण त्यांचा बडेजाव बरेचदा फुसका, पोकळ असू शकतो.
तसेही नम्रपणा आणि स्वतःचा उदोउदो या गोष्टींचे हाडवैर असते. त्यामुळे समाजमाध्यमांवर तरी (तेथे खातरजमा होईलच असे दुरान्वयाने शक्य नसते) व्यक्त होताना या दोहोंमध्ये एक फट ठेवण्याचा जरूर प्रयत्न करावा. स्वतःचे कर्तृत्व अधोरेखित करावयाचे तर ते उघड उघड करावे, नम्रतेच्या बुरख्याआडून नव्हे ! नाहीतर ती नम्रता खोटी,भ्रामक वाटायला लागते.
सांगण्यापेक्षा आपले कर्तृत्व “दिसले”तर ते अधिक स्वीकारार्ह ठरते. नंतरच्या खातरजमेचा पर्याय/अधिकार आपण राखून ठेवलेला असतोच की ! नम्र बढाई बरेचदा हाजी हाजी करण्यासारखे असते किंवा ‘अहो रूपं, अहो ध्वनी “टाईप !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply