स्वतःला अलीकडच्या काळात निवांत कधी भेटला आहात ? आणि स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं इतक्यात कधी निरखून पाहिलंय? जन्मल्यापासून आपण फक्त आणि सदैव स्वतःच्याच सान्निध्यात असतो. स्वतःला इतर कोणाहीपेक्षा आपणच अधिक ओळखत असतो. पण हे “ओळखपत्र ” बाह्य असतं की अंतर्गत? वपु म्हणतात- ” ओळखपत्रासारखं विनोदी दुसरं काही नाही. आपण कसे आहोत हे दाखविण्यापेक्षा आपण कसे दिसतो हे ओळखपत्र दाखवतं.” असं तर आपल्याबाबतीत घडत नाही नं, हा प्रश्न एकदातरी स्वतःला विचारायलाच हवा.
आयुष्यात आपणाला नकळत सवय लागलेली असते-स्वतःच्या दुबळ्या किंवा सुधारणेला वाव असणाऱ्या घटकांकडे कायम अंगुलीनिर्देश करायचा आणि त्यांवर काम करण्याचा संकल्प करीत नव्या वर्षाचे स्वागत करायचे. स्वतःची बलस्थाने ओळखणे आणि त्यांचा सकारात्मक वापर करून विकास घडवून आणणे हे जगण्याचा मार्ग अधिक प्रशस्त करणारे ठरते. आपल्या खऱ्या क्षमता ओळखता येतात आणि आपल्यासाठी काय महत्वाचे ठरू शकते याची जाणीव होते. ही पहिली पायरी असते -स्वतःशी असलेले नाते तपासण्याची, स्वतःचे व्यावसायिक आणि व्यक्तिगत उत्कर्षाचे रस्ते जोखण्याचे ! “आपण या पृथ्वीतलावर कशासाठी आहोत?” याचे उत्तर शोधण्याची गरज वाटली तर स्वतःशी असलेले नाते मदतीला येऊ शकते.
व्यवस्थापन क्षेत्रात एक संकल्पना आहे – “स्वॉट अनॅलिसिस “! स्वॉट म्हणजे – स्ट्रेंग्थस (बल, शक्ती स्थाने ), वीकनेसेस ( कमकुवत, दुबळी स्थाने ) , ऑपॉर्च्युनिटीज ( सुसंधी), थ्रेटस (धोके)
व्यवसायाने तसेच प्रत्येकाने आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांवर अशा प्रकारे स्वतःला सामोरे जाणे आवश्यक असते. आपल्यातील गुण, क्षमता, ज्ञान , अनुभव ही सारी आपली बलस्थाने असतात. त्यांचा संबंध आयुष्याने पुढे वाढून ठेवलेल्या संधींशी येतो. आपल्यातील भीती, व्यसने, वाईट सवयी, अवगुण (अहंकार, इतरांना फसविण्याची प्रवृत्ती इ ) ही दुबळी स्थाने असतात आणि ती भावी आयुष्यातील धोक्यांशी जोडलेली असतात.
कितीवेळा आपण स्वतःला प्रामाणिकपणे विचारतो- ” मी कोण आहे? (कोहम) ” स्वतःच्या “स्व “रूपाची जाण आपल्याला असते कां ? आपल्यातील सुप्त क्षमतांना आपण कधी आव्हान दिले असते का? आपली कुवत, सामर्थ्य कधीतरी तपासून बघितले असते का? स्वतःच्या सीमारेषांना कधीतरी चाचपून पाहिले असते का? मे सार्टोन म्हणतो- ” आपण फक्त आणि फक्त आपण असण्याचं धाडस करावं. भलेही आपले ते रूप कितीही अघटित आणि भयावह असो.”
सार्त्र या अस्तिस्त्ववादी तत्त्वज्ञाने असे खूप प्रश्न स्वतःला विचारत शेवटी एक सोपा निष्कर्ष काढला होता- ” आपले कर्म म्हणजे आपण (आपली ओळख ) ” ! पण मानव संसाधनातील व्याख्या अशी आहे ” मनुष्य प्राणी हा संभावनांचा, शक्यतांचा आणि सुप्त शक्तींचा एक जुडगा (गाठोडे) असतो.” याचाच अर्थ असा की आपण आपल्या क्षमता ओळखण्यात कमी पडतो आणि माहित असलेल्या क्षमतांचा वापरही पूर्णार्थाने करत नाहीत.
मज्जासंस्थांचे वैद्यकीय शाखेतील तज्ञ असं मानतात की मानवी मेंदूचा आणि क्षमतांचा आपल्या हयातीत आपण फारतर वीस टक्के वापर करतो. एक कुस्तीगीर जेव्हा डॉक्टरकडे जाऊन म्हणाला होता- ” मला कुस्तीमधील जागतिक पदक मिळवायचे आहे.” डॉक्टर म्हणाले – ” आता तुम्ही राज्यपातळीवरील विजेते आहात. थोडे अजून प्रयत्न केलेत तर तुम्ही सहज रुस्तम-ए -हिंद बनू शकाल. मग जागतिक पदक कितीसे अवघड ?”
आपण सर्वसामान्य माणसांची दोन उदाहरणे घेऊ या-
आपल्या घरी कोणी गंभीर आजारी असेल आणि त्यांना आय सी यू त दाखल केले असेल तर आपण तहान-भूक आणि झोप विसरून चोवीस तास शुश्रूषा करतो. त्यावेळी आपल्या दैनंदिन आहाराच्या, निद्रेच्या वेळा आणि कालावधी आपण विसरून जातो आणि दिवसाचे कितीही तास जागरण करू शकतो.
दुसरे मंगल उदाहरण घेऊ या- घरात मंगलकार्य असेल तर सगळेजण रात्रंदिवस धावपळ करून, अगदी रात्रीचा दिवस करतो. त्यावेळी थकवा जाणवत नाही. पोटभर भोजन करीत नाही.
थोडक्यात आपल्या क्षमता अशा निर्णायक क्षणी कामी येतात आणि त्यावेळी आपण स्वतःच्या सीमारेषा सहज ओलांडून जातो.
आपल्या व्यक्तिमत्वात दोन घटक असतात- आपण स्वतःकडे कसे पाहतो आणि इतरेजन आपणाकडे कसे पाहतात?
त्यात नैतिक घटक असतात, सकारात्मक गुणविशेष असतात आणि या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे गुणवत्तापूर्ण जीवन ! मात्र आपली शक्तिस्थाने आपल्या सहजी नजरेस पडत नाहीत किंवा आपण त्यांना सामान्य समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्यात स्व-ओळख नसते, सजगता नसते आणि त्याचे महत्वही काहीवेळा आपण जाणत नसतो. हे फक्त स्वतःपुरते मर्यादित नसून कित्येकदा आपल्या परिवारातील किंवा संस्थेतील जवळच्या व्यक्तींच्या बलस्थानांबद्दल आपण अनभिज्ञ असतो. मात्र २०११ चे संशोधन म्हणते – “एकदा स्वतःची ओळख पटली की सजगता आणि प्रयत्नांच्या जोरावर आपण यशाच्या शिखरावर सहज पोहोचू शकतो.”
२००९ च्या एका प्रारूपानुसार कर्तृत्व आणि यश यांच्या भिंगातून पाहिले तर मानवातील शक्तिस्थानांकडे ३४ प्रकारे बघता येते आणि त्यांचे खालीलप्रकारे चार गट करता येतात-
१) (निर्णयांच्या) अंमलबजावणीत निपुण
२) (इतरांवर) प्रभाव टाकण्यात निपुण
३) नातेबंध जपण्यात निपुण
४) डावपेच रचण्यात निपुण
मानवी जीवनात आनंद आणि अर्थ समाविष्ट करण्यासाठी जी २४ वैश्विक आणि सर्वसंमत गुणसूत्रे मानली जातात त्यांना २०१९ मध्ये सहा गटांमध्ये मांडण्यात आले-
१) ज्ञान आणि विद्वत्ता
२) धडाडी (धैर्य)
३) मानवता
४) न्यायबुद्धी
५) संयम
६) श्रेष्ठता
अशा तपासण्यातून स्वतःची ओळख पटते आणि विकासाला चालना मिळाल्याने स्वतःशी नाते घट्ट होते. मग आनंदाचे क्षण वेगळे आठवावे लागत नाहीत आणि कर्तृत्व सतत नजरेसमोर राहते. कारण अशा प्रत्येक वेळी कोणते बलस्थान पाठीशी असते हेही समजते.
आपल्या देहबोलीतून आपली शक्तिस्थाने (किंवा दुबळी स्थाने) सहज इतरांना जाणवतात, हे कधी तुमच्या लक्षात आलं आहे का? आपल्या बोलण्यात आणि वागण्यात होणारे बदल बाकीच्यांना कळत – नकळत दिसतात- उगाचच हसणे, डोळे विस्फारणे, भरभर बोलणे, भावमुद्रा, उभे राहण्याची ढब इ. त्याचबरोबर बोलताना केलेल्या शब्दांची निवड हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
या मुळे आपला विकास होतो, शरीर स्वास्थ्य ठीक राहते आणि कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करता येतो. मात्र यावर भर देण्यापेक्षा आपण कायमच स्वतःच्या दुखऱ्या नसांवर बोट ठेवण्यात धन्यता मानतो. मात्र एकदा का आपल्या गुणांची जाणीव झाली की आणि त्यांचा वापर केला की खूप फायदे होऊ शकतात-
– सकारात्मक भावना
– आयुष्याचा अर्थ सापडणे
– प्रेरणा मिळणे
– तणाव कमी होणे
– कार्यमग्नता वाढणे, कामात रस
मात्र या प्रत्येक बीजाची निगराणी घेणे आवश्यक असते- ओली माती, निर्मळ प्रकाश, आणि पाण्याचे ओहोळ यांचा यथायोग्य पुरवठा होणे आवश्यक असते.
विचार, वर्तन आणि भावनांच्या प्रक्षेपणातून सामर्थ्याचे रंग प्रतीत होतात-
१) विचार- ” अरे, हे मजेशीर आहे; ” किंवा “हे मला सहज जमेल”; किंवा ” हे काम माझं आवडतं आहे “.
२) भावना- उत्तेजित होणे, आत्मविश्वास प्रकट होणे, कामात गुंगून जाणे, झपाटलेपण
३) वर्तन- सरस कामगिरी, शिकण्याची गती, एकतानता, चिकाटी
स्वतःच्या मूल्यांकनाबरोबरच इतरांची आपल्याबद्दलची मते (विशेषतः विश्वासू व्यक्तींची) आपल्या झोळीत बरंच काही टाकून जातात – भलेही ती आपल्यासमोर प्रकट झालेली असोत वा अपरोक्ष व्यक्त झालेली असोत. मित्र, सहकारी, कुटुंबीय यांना आपल्याबद्दलची खरीखुरी मते विचारावीत, त्यातून काही सामाईक हाती लागतंय का ते बघावं आणि मनातल्या मनात ते तुकडे जोडून स्वतःचे (इतरांच्या नजरेतून दिसणारे) चित्र तयार करावे. आपल्या व्यक्तिमत्वातील सद्गुणांचे बाकीच्यांना कौतुक वाटत असते, आदर वाटत असतो आणि ते गुण आवडतही असतात.
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply