व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली मंदाकिनी पाटील यांची हि कविता
मुलांना ठाऊकही नसतो
जेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ
तेव्हाच खरेतर ती स्वतंत्र असतात
वरवर आज्ञाधारक वाटली तरी
ती त्यांच्या आतल्या हाकांना
ओ देत असतात
आपण शिकवत रहातो यांना
धुरकटलेले अर्थ निरअर्थ
मुले तेव्हा असतात
त्यांच्या गुहेतल्या वाटा खोदण्यात मग्न
आपण गिरवून घेत असतो
धुळभरल्या पाटीवरली मोडलेली लिपी
तेव्हा घडवत असतात
त्यांची मने नवनवीन शब्दावली
मुले होत नाहीत मोठी, एका रात्रीत !
भिजत घातलेल्या कडधान्याला
मोड आल्यासारखी वाढत नाही बुद्धी
मुले सावकाश मोडत जातात…
एक एक जुनाट फांदी पक्की.
आपण उगाच काळजी करीत रहातो,
त्यांची कुऱ्हाड विहिरीत पडली तर ?
मुलांना शाश्वती असते!
त्यांच्या नविन कुऱ्हाड घडविण्याच्या क्षमतेची
गरज असते फक्त आपण त्यांचे झाड होण्याची
ज्यावर ते ठेवू शकतील आपले हात सुरक्षित
आणि घेऊ शकतील लागेल तेव्हा काढून
बस्स एवढे फक्त स्वातंत्र्य… टाकते त्यांचे विश्व बदलून
त्यांच्या विश्वासाचा श्वास होऊ द्यावा बुलंद
मिटवू नयेत कुतूहलाचे कोवळे अंकूर
पाजू नये सडक्या रीतीभातींचा काढा
हाकायला लावू नये निरर्थकाचा गाडा
जावू देवू नये त्यांच्या आत्म्याला तडा
मुले असतात आपलेच न्यू व्हर्जन
चांगली मुले घडण्यासाठी आपणही असावे सज्जन
लावावी त्यांच्या भाळी उटी देशभक्तीची
सोपवावी त्यांच्या खांद्यावर पालखी चांगुलपणाची
दरवळेलच मग त्यांच्या जीवनाचा प्राजक्त
आणि होईल पुन्ह्यांदा सृष्टी सशक्त !
– मंदाकिनी पाटील
Leave a Reply