स्वातंत्र्य संग्रामातील विरांगना – मातंगिनी हाजरा – ‘माझी आवडती लोकनायिका’
स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक महिला होत्या . त्यातील एक म्हणजे ‘मातंगिनी हाजरा’ . १९ ऑक्टोबर १८७० रोजी पूर्व बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात” होगला” या गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरची अत्यंत गरिबी असल्यामुळे त्या शिक्षण घेऊ शकल्या नाहीत आणि त्यात वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह ६२ वर्षांच्या त्रिलोचन हाजरा ह्या विधुराशी झाला . असेच दिवस त्या कंठत होत्या . त्यातच केवळ सहा वर्षांनीच त्यांना वैधव्य आले. त्रिलोचन हाजरा ह्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा त्यांना खूपच त्रास देत असे आणि त्यांचा तिरस्कार करत असे. त्यामुळे मातंगिनी वेगळ्या झोपडीत राहून मोलमजुरी करीत असत. गावकऱ्यांच्या सुखदुःखात त्या नेहमीच सहभागी होत असत म्हणूनच सर्व लोकांना यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि आदर वाटत असे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या त्या सदस्य बनल्या . १९३२ साली देशभरात स्वातंत्र्य चळवळ उभारली गेली . एक दिवस त्यांच्या वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांच्या घरासमोरून ‘वंदे मातरम’ चा जयघोष करीत मिरवणूक जात असताना त्या अगदी भारावून गेल्या आणि मिरवणुकीत सहभागी झाल्या . पुढे पुढे चालत राहिल्या .त्यावेळी देशकार्यासाठी तन-मन-धन झोकून लढा द्यायचा त्यांनी निश्चय केला
१७ जानेवारी 1933 रोजी “कर निर्मुलन आंदोलनाचे’ नेतृत्व करीत असताना गव्हर्नर अँडरसन यांना त्यांनी काळे झेंडे दाखविले यासाठी पोलिसांनी त्यांना अटक केली आणि मुर्शिदाबाद कारागृहात सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा दिली. त्यामुळे त्यांना सश्रम कारावासही भोगावा लागला . तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी खादीचे कपडे वापरण्यास तसेच चरख्यावर सूत काढण्यास सुरवात केली. १९३५ मध्ये तामलुक प्रदेशाला भीषण कॉलराचा फटका बसला होता. जीवाची पर्वा न करता त्यांनी असंख्य लोकांना मदत केली.
त्यानंतर , ८ सप्टेंबर १९४२ रोजी ‘तामलुक येथे निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन स्वातंत्र्य सैनिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे जनतेने प्रखर लढा देण्यासाठी २९ सप्टेंबर १९४२ रोजी मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. देशप्रेमाने त्या इतक्या झपाटल्या गेल्या होत्या की ‘भारत छोडो आंदोलन’ रॅली साठी त्यांनी आसपासचा परिसर पिंजून काढला . घरोघरी जाऊन पाच हजार लोकांना रॅलीसाठी त्यांनी तयार केले . त्यात प्रकर्षाने महिलांची संख्याच अधिक होती . आणि अखेर……..
२९ सप्टेंबर १९४२ चा तो दिवस उजाडला. हातात तिरंगा घेऊन पाच हजार लोकांच्या रॅलीचे नेतृत्व करीत मातंगिनी , तामलुक,पोलीस ठाण्यासमोर पोहोचल्या . पोलिसांनी त्यांना मागे फिरण्याची विनंती केली पण जराही न डगमगता त्या तशाच पुढे पुढे गेल्या. मग मात्र इंग्रज सरकारने गोळीबार सुरू केला . काही क्षणातच पहिली गोळी त्यांच्या डाव्या हाताला लागली . त्यामुळे क्षणार्धात, ध्वजाचा अपमान होऊ नये म्हणून हातातील तिरंगा उजव्या हातात घेतला . दुसरी गोळी त्यांच्या उजव्या हातावर सरसर करीत घुसली आणि काही कळायच्या आतच, तिसरी कपाळावर! गोळ्या झेलत असताना सुद्धा ‘वंदेमातरम’ म्हणत मातृभूमीचा त्या जयजयकार करीत होत्या . तिथेच वीरांगना मातंगिनी चा मृत्यू झाला . तिच्या या बलिदानाने परिसरातील लोकांना अतिशय हळहळ वाटली आणि त्याचबरोबर प्रचंड अभिमान वाटला .त्यांच्यात उत्साह संचारला आणि त्यामुळेच लोकांनी दहा दिवसात इंग्रजांना तेथून हुसकावून लावले . स्वतंत्र सरकार स्थापन करून सतत एकवीस महिने त्यांनी काम केले .मातंगिनी सारख्या शेकडो स्त्रिया त्याकाळात हे करू शकल्या हे पाहून आश्चर्यच वाटते. स्वातंत्र्यासाठी केवढा हा त्याग आणि बलिदान!
डिसेंबर १९७४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘तामलुक’ येथे उभारलेल्या त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले व श्रद्धांजली वाहिली. त्या गांधी बुरी (ओल्ड लेडी गांधी) म्हणून ओळखल्या जात असत. भारत छोडो आंदोलनाच्या साठ वर्षाच्या स्मरणार्थ भारताच्या टपाल खात्याने सुद्धा ‘मातंगिनी हाजरा’ यांच्या प्रतिमेचे ५ रुपयाचे पोस्टल स्टॅम्पचे तिकिट २००२ मध्ये जारी केले आहे
त्यांची धडाडी मला भावली. माझ्या कलकत्याच्या वास्तव्यात ‘ हाजरा स्ट्रीट’ वरून चालताना मला गहिवरून येत असे. बंगालमध्ये ‘मातंगिनी हाजरा’ नावाने अनेक शाळा, हॉस्पिटल्स, रस्ते आणि पुतळे उभारले गेले आहेत. त्यागमूर्ती आणि स्वातंत्र्यप्रेमी ‘ शहीद मातंगिनीला’ माझे त्रिवार वंदन! .
— वासंती गोखले,
२६ जानेवारी २०२२
Leave a Reply