नवीन लेखन...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या, तसेच धर्मनिरपेक्षता : एक टिपण

(०१.०४.२०१६)

मार्च २७, २०१६ च्या लोकसत्तामधील श्री. शेषराव मोरे यांच्या, धर्मनिरपेक्षतेबद्दलच्या भाषणाची बातमी; तसेच ३० मार्चच्या ‘लोकमानस’मधील श्री. राजीव जोशी यांचें त्यावरील मत, व १ एप्रिलच्या ‘लोकमानस’मधील श्री. भालचंद्र कवळीकर यांची त्या मतावरील प्रतिक्रिया, हे सर्व वाचलें. त्यांत बरेच मुद्दे चर्चिलेले आहेत. सर्वांचा परामर्ष घेण्याचा माझा हेतू नाहीं. पण, त्यातील फक्त, १) स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या ; व २) धर्मनिरपेक्षता ; या, एकमेकांशी संल्लग्न असलेल्या दोन गोष्टीबद्दल मी इथे कांही माहिती पुढे ठेवीत आहे.

  • रत्नागिरीला नजरकैदेत असतांना सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा त्यांचा ग्रंथ लिहिला. तो १९२०च्या दशकात लिहिला गेलेला आहे, एवढे सांगितलें म्हणजे, देशातील राजकीय व सामाजिक परिस्थितीची कल्पना येते, तिचे वेगळे वर्णन करायची आवश्यकता रहात नाही. हा मूळ ग्रंथ सावरकरांनी टोपण नांवानें इंग्रजीत लिहिला , व त्याचे मराठी भाषांतर नंतर झालेले आहे, हे ध्यानीं घ्यावे. इंग्रजीत कां , तर इंग्रजी ही संपर्क-भाषा (लिंक-लँग्वेज) असल्यामुळे, कुठलीही मातृभाषा असलेल्या शिक्षित माणसाला तें लेखन सहज वाचता व समजता यावे ; तसेंच, पाश्चिमात्यांपर्यंतही (त्यात नवमतवादी ब्रिटिश आले, व अमेरिकनही आले), ते विचार पोचावेत.
  • ‘हिंदुइझम’ (Hinduism) हा शब्द त्याआधी बर्‍याच काळापासून प्रचलित होता. पण, तो न वापरता सावरकांनी हेतुत: ‘हिंदुत्व’ हा शब्द निर्माण केला (कॉइन केला) . याचे कारण असे की, ‘हिंदुइझम’ म्हटल्यावर त्या शब्दाचा अर्थ हिंदू धर्माशी जोडला जात असे, अजूनही जोडला जातो. पण , सावरकरांना तो अर्थ अभिप्रेत नव्हता. जसें ममत्व, स्वत्व, मातृत्व, दातृत्व, उत्तरदायित्व, वगैरे ; तसेंच, त्यांना अभिप्रेत असलेलें ‘हिंदुत्व’. अर्थात्, हिंदुत्व म्हणजे ‘हिंदुपण’ .
  • सावरकारांची हिंदुत्वची व्याख्या कुठल्याही प्रकारे धार्मिक नाहीं. याउलट ती, भाषा, जाती, ‘मतें’ (जसें, बुद्धिझम, जैनिझम इ. ) वगैरे सर्वांच्या पलिकडे आहे. ती व्याख्या त्यांनी संस्कृतमध्ये केलेली आहे. याचे पहिले कारण म्हणजे, वेगवेगळ्या मातृभाषा असलेले भारतीय लोक तिचा अर्थ समजू शकतील. अर्थातच, ही व्याख्या भारतीय जनांसाठी असल्यामुळे, (आणि, संस्कृत ही शतकानुशतकें भरतखंडातील संपर्क-भाषा असल्यामुळे), सावरकारांना ही व्याख्या इंग्रजीपेक्षा संस्कृतमध्ये करणें अधिक योग्य वाटले. दुसरें, आणि अधिक महत्वाचें, कारण म्हणजे, संस्कृतमध्ये अगदी थोड्या शब्दांत अतिशय चपखल, सुस्पष्ट, अॅप्ट् अशी वाक्यरचना करता येते. (कुणीही हीच सावरकर-रचित परिभाषा, इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा अन्य भाषेत, पूर्ण अर्थ सुस्पष्ट होईल अशाप्रकारें करून पहावी, म्हणजे याचा प्रत्यय येईल).
  • काय आहे ही परिभाषा :
    आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका
    पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिन्दुर् इतिस्मृत: ।।

थोडक्यात सांगायचे म्हणजे, सिन्धुसागरापासून ते सिन्धु नदीपर्यंत पसरलेल्या भूभागाला जे लोक भारतभूमी समजतात, आणि या भूमीला पितृभूमी व पुण्यभूमी मानतात, ते सर्व लोक हिंदू आहेत.

  • सावरकरांनी या व्याख्येत ‘मातृभू’ असा शब्द कां वापरला नाहीँ ? ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या काव्यात त्यांनी भारताचा उल्लेख ‘मातृभूमी’ असा केलेलाच आहे. पण , इथें आपण एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, संस्कृतमध्ये ‘पितरौ’ असा उल्लेख केल्यावर माता-पिता (parents) असा अर्थ होतो ; ‘पितर:’ अशा उल्लेख केल्यावर पूर्वज (ancestors) असा अर्थ होतो. म्हणजेच, ‘पितृभू’ असा उल्लेख केल्यावर, दोन्हीकडील सर्व पूर्वजांचा संबंध आपोआपच जोडला जातो. ( आतां मी जें उदाहरण देत आहे, त्याचा धार्मिक संदर्भ हा, संस्कृतृ-भाषिक अर्थामधून निर्माण झालेला आहे, हें ध्यानीं घ्यावें. भाद्रपदाचा वद्यपक्ष हा ‘पितृपक्ष’ मानला जातो ; येथें संदर्भ सर्व पूर्वजांचा आहे, ही गोष्ट जवळजवळ सगळ्यांनाच माहीत असेल). त्यामुळे, पितृभू असा शब्द योजल्यावर, ‘ज्यांचे पूर्वज पिढ्यान् पिढ्या या भूभागातले रहिवासी आहेत ’ , असा अर्थ साहजिकच ध्वनित होतो.
  • ‘पुण्यभू’ हा शब्द सावरकरांनी निर्माण केलेला आहे. तो पाश्चिमात्यांच्या ‘होली लँड’ (Holy Land) या कल्पनेवरून घेतलेला आहे, हे उघड आहे. म्हणजे, ‘जे लोक या भूभागाला पुण्यभूमी मानतात, महान मानतात ’, असा अर्थ येथे स्पष्ट आहे. मात्र, सावरकांच्या व्याख्येतील ‘पुण्यभू’ वाटणें , हें धार्मिक संदर्भातील नाहीं, तर तिचा महत्तेशी, थोरवीशी संबंध आहे.
    (उदाहरण द्यायचें झालें तर, ‘आई’ हें नातेंच पवित्र आहे, असा शब्दप्रयोग अनेकदा केला जातो; तेव्हां त्या ‘पवित्रते’चा अर्थ धार्मिक नसून, थोरवीशी जोडलेला आहे. त्याचप्रमाणें, ‘पुण्य’ असें म्हटल्यावर त्याचा अर्थ धार्मिकच असतो असे अजिबात नाहीं. ‘दुष्काळात दामाजीपंतांनी गरिबांना धान्य वाटून टाकले, हें पुण्यकृत्य केलें’ ; इथें धार्मिक कृत्य केलें असा अर्थ मुळीच होत नसून, सत्कृत्य केलें, महत्-कृत्य केलें, असाच अर्थ होतो. ‘पुण्यश्लोक’ असा शब्दप्रयोग केल्यावर त्याचा अर्थ ‘धार्मिक’ असा होत नाही, तर सद्वर्तनी, सद्प्रवृत्त असा होतो. संभाजीपुत्र शाहू यांस ‘पुण्यश्लोक’ म्हणतात, तें या अर्थानें ).
    म्हणजेच, सावरकरांच्या या व्याख्येत, ‘जे लोक या देशाला थोर समजतात, ज्यांची महत्तापूर्ण स्थळे या भारत-भूभागात आहेत ’ , असा अर्थ अभिप्रेत आहे. (काशी-प्रयाग वगैरे स्थानें आपल्याला महत्तापूर्ण वाटतात, तितकीच , शिवाजी महाराजांची राजधानी रायगड , परकीयांपासून या भूमीला वाचविण्यासाठी प्राण देणार्‍या मराठ्यांची युद्धभूमी पानिपत , जिथे शिवपुत्र संभाजी औरंगझेबाच्या कैदेत ताठ मानेने मृत्यूला सामोरा गेला तें वढू गाव , अशी स्थळेंसुद्धा आपल्याला महत्तापूर्ण वाटतातच ना ! ).
  • याहून अधिक खोलात जाऊन चर्चा करण्याचें ही जागा नव्हे. पण, यावरून हा मुद्दा स्पष्ट आहे, की, ही सावरकरीय व्याख्या, जातपात, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, वेदप्रामाण्य मानणारे-न मानणारे, अस्तिक (ईश्वराचे अस्तित्व मानणारे, या अर्थाने), एकेश्वरवादी-अद्वैतवादी-द्वैतवादी, इहवादी (जसे की चार्वाकपंथीय) , निरीश्वरवादी, जैन-बौद्ध-शीख-लिंगायत इत्यादी भिन्नभिन्न ‘मतें’ असलेले पंथ, चातुर्वर्णवादी, दलित, आदिवासी, वगैरे वगैरे सर्वांच्या पल्याड गेलेली आहे, सर्वसमावेशक आहे. इतकी विस्तृत व सुस्पष्ट व्याख्या दुसरी कुठली असेल असे वाटत नाहीं.
  • एका अर्थी, भारतीय संविधानानें, (तसें स्पष्ट न म्हणताही), ही व्याख्या स्वीकारलेली आहे, असें म्हणतां येईल. संविधानातील ‘ हिंदू लॉ ’ कुणाकुणाला लागू होतो, ते पहावे, म्हणजे हा मुद्दा स्पष्ट होईल.

 

धोडेसे धर्मनिरपेक्षतेबाबत.

पाश्चिमात्यांनी १९ व्या शतकात, ‘धर्म’ म्हणजे ‘रिलिजन’ (Religion) असा अर्थ गृहीत धरला. भारतीयांच्या ‘धर्म’ या संकल्पनेचच्या विस्तृततेची त्यांना कल्पनाच नव्हती. परंतु, धर्म या शब्दाचा अर्थ खरें तर ‘रिलिजन’हून फार व्यापक आहे. शरीरधर्म, शेजारधर्म, पुत्रधर्म, कुलधर्म, युगधर्म, मानवधर्म, कर्मधर्मसंयोग, अशा अनेक शब्दांतून ही गोष्ट स्पष्ट होते. ‘धर्म’ या संकल्पनेचे महत्वपूर्ण विश्लेषण कुणाला समजून घ्यायचें असेल तर त्यांनी, ख्यातकीर्त विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा, ‘शिवराज्याभिषेक त्रिशतकमहोत्सवा’च्या समयींच्या ग्रंथात लिहिलेला लेख वाचावा. ‘धर्मा’चे विविध अर्थ कोणते हें कुरुंदकरांनी विशद केलें आहे, आणि, शिवाजी महाराज कुठल्या अर्थाने धार्मिक होते व कुठल्या अर्थाने धर्मनिरपेक्ष होते, याचा ऊहापोह कुरुंदकरांनी तेथे केलेला आहे.

  • महात्मा गांधीजीबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून, नंतर हें सांगावेसें वाटतें की, ते व्यक्तिगत जीवनात ‘धार्मिक’ होते, व त्यांनी स्वत: तसा निर्वाळाही दिलेला आहे. पण, सामाजिक व राजकीय पटलावर ते ‘सेक्युलर’ मानले गेले आहेत (त्या बाबीच्या योग्यायोग्यतेची चर्चा तूर्तास करायची नाहींये, फक्त, तसे वास्तव आहे, एवढीच नोंद इथें करायची आहे ). सावरकर हे व्यक्तिगत जीवनात निरीश्वरवादी, जातिभेद न मानणारे, विज्ञानाची कास धरणारे असे होते. पण, त्यांची हिंदुत्वाची मूलभूत व्याख्या नीट न समजून घेतांच, किंवा पूर्वगृहदूषित (biased) वृत्तीने, त्यांना नॉन्-सेक्युलर ठरवलें गेले ! (सावरकरांचा राजकीय स्टॅन्स् — stance — काय होता व कां होता, हा वेगळा मुद्दा आहे. ती चर्चा तूर्तास अभिप्रेत नाहीं ).
  • कांहीं दशकांपूर्वी श्री. विठ्ठलराव गाडगीळ यांनी ‘सेक्युलरिझम’ या विषयावरील एक पुस्तिका प्रकाशित करून ती पार्लमेंटच्या सभासदांना वाटली होती (सर्क्युलेट केली होती). तिच्यात, त्यांनी, ‘सेक्युलर’ या शब्दाच्या संदर्भात, ‘निधर्मी/धर्मनिरपेक्ष आणि ‘सर्वधर्मसमभाव’ या बाबींची चर्चा केली होती. भारत हा देश सेक्युलर आहे, म्हणजे काय, तर इथें त्याचा, ‘निधर्मी’, ‘धर्मनिरपेक्ष’ असा अर्थ नसून, ‘सर्वधर्मसमभाव मानणारा’, असा अर्थ आहे, अशी त्यांनी मीमांसा केली होती.
    या सर्व विवेचनातून हाच अर्थ निघतो की, सावरकरांची ‘हिंदू’ या शब्दाची व्याख्या पूर्णपणें नॉनरिलिजियस (non-religious) आहे. लखनऊच्या शियांनी सावरकरांना अॅप्रोच् केलें असतां, तुमच्याशी आम्ही सहकार्य करू, अशीच भूमिका सावरकरांनी घेतली होती, याचा अर्थ उघड आहे. सिंधमध्ये तर कांहीं काळ हिंदुमहासभा पार्टी व मुस्लिमांचे संयुक्त सरकार होते, याच्या मागील खरा अर्थ आपण खोलात जाऊन समजून घ्यायला हवा.
  • समारोप : कुठल्याही कारणांनी का होईना पण, स्वातंत्र्यावीर सावरकरांबद्दल अनेक अपसमज आहेत ; आणि ते अपसमज, अपुर्‍या महितीमुळे, किंवा पूर्वग्रहांमुळे, बायस् मुळे (bias) झालेले आहेत. पण सावरकारांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वच उचललें होतें. (‘की घेतलें व्रत न हें अम्ही अंधतेनें …… बुद्ध्याच वाण धरिलें करिं हें सतीचें’ असें त्यांनी म्हटलेलेंच आहे). पण त्या गैरसमजांमुळे होणारे नुकसान आपल्या सर्वांचे आहे. सावरकरांची मतें आपल्याला मान्य असोत वा नसोत, पण आपण निष्पक्षपणें त्यांचा संदर्भ आणि पूर्ण सुस्पष्ट अर्थ नीट समजून घ्यायला हवा, यात शंका नाहीं.
    सेक्युलरिझमचेंही तसेंच आहे. त्यासाठी व्यर्थचें ‘शंख फुंकणें’ व शड्डू ठोकणें नको ; त्यासाठी योग्य तो ‘वैचारिक चश्मा’ लावणें गरजेचें आहे. विचारी जन आज ना उद्या तसें करतील, अशी आशा आपण बाळगूं या.

– सुभाष स. नाईक.
सांताक्रुझ (प.), मुंबई.
M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in.
website : www.subhashsnaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..