मंडळी सप्रे म नमस्कार !
रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिला. आज हा लेख लिहिण्याचा उद्देश या सिनेमाची समिक्षा करणे हा नसून , ३ तासांत सावरकर नावाचे विद्वान ज्वालामुखी पडद्यावर साकारणार्या रणदीप हुडाची वारेमाप स्तुती करणे , या सिनेमात येणारी पात्रं ही सावरकर या व्यक्तिमत्वाची व्यापक प्रतिमा उंचावणार्या पद्धतीने दिग्दर्शित करणार्या रणदीपचं कौतुक करणं — हा आहे!
सिनेमात येणार्या मदनलाल धिंग्रा या रगेल आणि रंगेल व्यक्तिमत्वामधे क्रांतिकारी देशभक्त म्हणून घडून आलेला बदल , भारतातील राजकारणातील इंग्रजांना खूश ठेवण्याच्या दृष्टीने राजकारण्यांनी केलेले लांगूलचालन , जिना , नेहेरु , गांधी यांचे बोटचेपे राजकारण , सेल्यूलर जेलचा जेलर डेव्हिड बॅरी व तिथला मुसलमान हवालदार यांची पात्र निवड व त्यांचा अभिनिवेष , दोन मिनिटांसाठी शृंखला दूर केल्यावर मोकळ्या अवयवांसह आकाशाला कवेत घेण्यासाठी स्वातंत्र्यवीरांचा आवेश व अभिनय ,लोकमान्य टिळक , सुभाषचंद्र बोस , बाबाराव व नारायण सावरकर ही पात्रे , अभिनव भारत या संस्थेच्या स्थापनेपासून ते सिनेमा संपेतोवर दाखवलेल्या कार्यपद्धतीतून अखंड भारत ही स्वातंत्र्यवीरांची पक्की मानसिक बैठक , भारत स्वतंत्र झाल्यानंतरही स्वातंत्र्यवीरांचा आपल्याच सरकारने केलेला मानसिक छळ व अटकसत्रे ( कुठेतरी मनाला जाणवून गेलं की अरे आता बास करा रे त्या पुण्यात्माचा हा छळ! निदान हा सिनेमा तरी लवकर संपवा म्हणजे या त्यांच्या यातना आम्हाला बघायला नकोत ! ) , सेल्यूलर जेलमधील स्वातंत्र्यवीरांची खोली — किडे पडलेलं अन्न , नंतर त्यांना झालेली उलटी व नंतरचा अतिसार….. कल्पनेपेक्षाही भयानक सत्य अतिशय वास्तववादी चित्रणातून दाखवलं गेलंय ! सहा फूट धिप्पाड रणदीपने सेल्यूलर जेलनंतरचे स्वातंत्र्यवीर वास्तववादी वाटावेत म्हणून कसोशीने केलेले शारीरीक बदल ….. रणदीप , तुला सलाम दोस्ता !
एक आमचे बाबूजी होते — कै.सुधीर फडके—ज्यांनी सावरकर सिनेमा काढण्यासाठी जिवाचं रान केलं आणि ते स्वप्न पूर्ण केलं आणि दुसरा तू , आपलं घरदार विकून सिनेमा पूर्ण करणारा रणदीप !
सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे मूळ सिनेमा हिंदी व वेगळा सिनेमा रुपांतर मराठीत आहे.यामुळे अखिल भारतात हा सिनेमा पोचणार हे नक्की !
गांधी व सावरकर यांचे राजकीय विचार परस्परविरोधी होते पण मैं गांधीका विरोधक नहीं हूँ , अहिंसाका विरोधक हूँ! असं म्हणणारे सावरकर प्रसंगानुरूप गांधींविषयी जे संवाद बोलतात ते खरोखरच त्या त्या प्रसंगी आतडं पिळवटून टाकतात !
सिनेमा निघाल्या निघाल्या रणदीपच्या विरोधातील पण काही व्हिडिओ पाहिले , काही कौतुक करणारे लेख वाचले , या देशात सावरकरांनी रत्नागिरीत बांधलेले पतित पावन मंदिर ( जे इतर कुठल्याही राजकारणी नेत्यांना कल्पनेतही जमलं नाही ! ) , जीवनभर पाहिलेलं अखंड भारत हे स्वप्न….. तात्याराव , तुम्ही चुकीच्या देशात जन्माला आलात हो! भारतरत्न ची योग्यता असलेले तुम्ही — एक थोर क्रांतिकारी , कुशाग्र बुद्धिमत्तेचे साहित्यिक , थोर व्यक्तिमत्व : कुणीही सोम्या गोम्या उठतो आणि तुमच्याविरोधात बोलतो? आम्हां भारतीयांची खरंच योग्यता नाही हो तुमच्यासारखा थोर क्रांतिकारी आमच्या देशात जन्माला येण्याची !
वर्षानुवर्षे वाट बघणार्या करोडो भारतीयांचं विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न मिळण्याचं स्वप्न साकार करण्याचं पुण्य कधी पूर्ण होणार रे ईश्वरा ?
तुम्ही गांधीवादी असा वा सावरकरवादी , सावरकर कळण्यासाठी आणि ज्याला आपल्यापेक्षा बरेच जास्त सावरकर कळलेत — त्या रणदीपचं काम आणि दिग्दर्शन बघण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा थिएटरला जाऊन नक्की बघा ! आपलं घरदार विकणार्या कलाकाराचा एवढा हक्क नक्कीच आहे , हो ना ?
कळावे,
© उदय गंगाधर सप्रे म—ठाणे
शनिवार २३ मार्च २०२४ ( हुतात्मा दिन भगतसिंग—राजगुरु—सुखदेव—सुखदेव यांना २३ मार्च १९३१ ला फाशी दिलं गेलं ! )
Leave a Reply