स्वीडनमध्ये २२ एप्रिल २०१३ रोजी घडलेली एक गंमतीदार घटना सांगायला हवी.
यादिवशी, सकाळी साडेदहाच्या सुमारास स्कँडिनव्हिस्का एन्सकील्डा बँकेच्या स्टॉकहोम परिसरातल्या एका शाखेत एक दरोडेखोर शिरला. त्याने हातातले पिस्तूलवजा हत्यार उंचावले आणि बँक कर्मचाऱ्यांना रक्कम देण्यासाठी धमकावले, पण स्वीडनमधील ती बँक शाखा पूर्णपणे कॅशलेस असल्याने तिथे लुटायला एक छदामही नव्हता.
हे जेव्हा त्या दरोडेखोराला बँक अधिकाऱ्यांनी सांगितले, तेव्हा तो गांगरला आणि त्याने अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की कॅश असलेली बँक कुठे आहे?
या प्रसंगाचे वर्णन तंत्रज्ञानविषयक सुप्रसिद्ध नियतकालिक ‘वायर्ड’ने रंगवून दिले आहे. ‘वायर्ड’ शेवटी म्हणतो की, त्या दरोडेखोराला कॅश मिळेल, अशी फारशी संधी जवळपास कुठेही नव्हती. कारण स्वीडनमधील १ हजार ६०० बँक शाखांपैकी ९०० शाखांमध्ये एक दमडीही कॅश नसते. त्या शाखांमध्ये रोख रक्कम स्वीकारलीही जात नाही.
आपल्याकडे जशी रिझर्व्ह बँक आहे, तशी स्वीडनमध्ये रिक्स बँक (रिस्क नव्हे) आहे. ती स्वीडिश संसदेच्या कायद्यानुसार चालते. तिने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार स्वीडनमध्ये गेल्या वर्षी जेवढी पेमेंटस केली गेली, त्यापैकी फक्त २ टक्के पेमेंटस रोखीने (क्रोना हे त्यांचे चलन आहे) झाली. ९८ टक्के पेमेंटस जिथे कॅशलेस पद्धतीने होतात, त्या देशात पाकीटमार, रोख रक्कम लुटणारे दरोडेखोर कसे असतील? खोटे चलन वापरून दहशतवादी कृत्ये तिथे कशी होऊ शकतील? प्रत्येक व्यवहाराचा माग प्रगत तंत्रज्ञानामुळे काही क्षणात काढता येत असल्याने, बेकायदेशीर शस्त्रांचा व्यवहार सहजासहजी कसा होऊ शकेल?
कॅशलेस संस्कृती स्वीकारलेल्या समाजात दहशतवाद, दरोडे, चोरी, खोट्या नोटांचे व्यवहार, आर्थिक गुन्हे यावर आपोआप नियंत्रण येत असल्याने, कॅशलेस संस्कृती ही देशातील सामाजिक स्वास्थ्यासाठीही एक वरदान ठरत जाते, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे.
Leave a Reply