नवीन लेखन...

स्वीचबोर्ड

जेव्हा मी माझ्या पहिल्या जहाजावर ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जॉईन झालो तेव्हा तिथल्या इंजिन कंट्रोल रूम मध्ये असलेला स्वीचबोर्ड पहिल्यांदा बघितल्याक्षणी शॉक्ड झालो, मनात आले, आयला हे कुठं येऊन फसलो आपण.

तसे प्री सी ट्रेनिंग कोर्स करताना इंजिन रूम सिम्युलेटर कोर्स आणि इंडियन नेव्हल डॉकयार्ड मध्ये भारतीय नौदलाच्या जहाजांवरील कंट्रोल रूम मधील स्वीचबोर्ड बघितले होते. इंजिन रूम सिम्युलेटर कोर्स हा असा कोर्स होता ज्यामध्ये जहाजावरील इंजिन आणि ईतर मशिनरी कशाप्रकारे सुरु करायची किंवा कोणत्या सिक्वेंस मध्ये काय सूरू करायचे हे एका बंद खोलीत सिम्युलेट किंवा थोडक्यात जहाजाची बनावट इमॅजिन करून प्रत्यक्ष जहाज सुरु करण्याचे एखाद्या डेमो ड्रिल प्रमाणे अनुकरण करणे असते.

परंतु एखाद्या कोर्सच्या डेमो ड्रिल मध्ये अनुकरण करणे आणि प्रत्यक्ष जहाजावर काम करणे म्हणजे जिच्याशी कधीही बोलायची हिंमत होत नाही अशा प्रेयसीला स्वप्नांत प्रपोज करणे आणि प्रत्यक्षात समोर आल्यावर प्रपोज करण्यासारखे असते.

अनेक प्रकारचे स्विच, लाल, हिरवे आणि काळ्या रंगांची बटणे आणि व्होल्टेज तसेच करंटची रीडिंग दाखवणारे इंडिकेटर्स, त्यापैकी काही गोल काटे असणारे तर काही डिजीटल.

आमचे जहाज ब्राझीलच्या अमेझॉन नदीतून चालले होते मी ज्युनिअर इंजिनिअर असल्याने संध्याकाळी चार ते आठ असा वॉच होता. संध्याकाळी साडे सात वाजले होते, सेकंड इंजिनिअर कंट्रोल रुममध्ये कॉम्पुटर मध्ये दिवसभरात केलेल्या कामाची एंट्री करत होता. मला जहाज जॉईन करून दोन महिने झाले होते. सेकंड इंजिनिअर माझा प्री सी ट्रेनिंग कोर्सच्या बॅच मध्ये असलेल्या एका सरदाराचा मामा होता. सेकंड इंजिनिअरचे नांव जतींदर पाल सिंघ होते, त्याने कॉम्पुटर मध्ये काम करता करता मला एक पंप बंद करायला सांगितला. मी स्वीच बोर्ड वर चे एक लाल बटण दाबून सेकंड इंजिनिअर ला बोललो, सेकंड साब पंप बंद कर दिया. त्याने मागे वळुन न बघता फक्त मान डोलावली. पाच मिनिटे सुद्धा झाली नव्हती की एक अलार्म वाजला. अलार्म म्यूट करून मी इंजिन कंट्रोल पॅनल च्या स्क्रीन वर अलार्म बघितला, सेकंड इंजिनअर माझ्याकडे प्रशानार्थक नजरेने बघतच होता. त्याला सांगितले एक्झॉस्ट गॅस बॉयलर फ्लू गॅस टेंप्रेचर हाय चा अलार्म आलाय. हे ऐकल्याबरोबर तो जागेवरून ताडकन उठला आणि माझ्यासमोर असलेल्या स्क्रीन कडे डोळे फाडून बघू लागला.

मी मनातून एकदम घाबरून गेलो की हे काय होतंय, सेकंड इंजिनिअर विचारत पडला पण क्षणभरात सावरला आणि स्वीचबोर्ड कडे बघू लागला, त्याची नजर जे शोधत होत ते त्याला दिसलं आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने एका पंप च्या स्वीच कडे धाव घेऊन हिरव बटण दाबून पंप सुरू केला.

लगेचच नेवीगेशनल ब्रिजवर कॉल करून चीफ ऑफिसरला जहाजाच्या मेन इंजिनचा स्पीड कमी करायला सांगितला.

जहाजाचा स्पीड कमी झाल्यावर चीफ इंजिनिअरला त्याच्या केबिन मध्ये जाणवले असावे आणि त्याचा लगेच इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन वाजला सेकंड इंजिनिअर त्याच्याशी मिनिटभर बोलला आणि माझ्याकडे रागाने बघायला लागला.

मी अगोदरच मनातून घाबरलो होतो त्यात समोर घडलेल्या प्रसंगांनी आणि सरदारजीचा तो अवतार बघून अजूनच बावरलो , वाटलं आता आपलं काही खरं नाही.

सेकंड इंजिनिअरने विचारले मी तुला कोणता पंप बंद करायला सांगितला, मी म्हणालो हॉट वॉटर सर्क्युलेटिंग पंप. त्यावर तो म्हणाला मग तू कोणता बंद केला मी म्हणालो तोच बंद केला.

तो म्हणाला दाखव , मी म्हणालो तुम्ही आता जो सूरू केला तोच मी बंद केला. यापूर्वी कधीही न चिडणारा , इंजिन आणि कामाबद्दल समजावून माहीती देणारा , सेकंड इंजिनीअर माझ्या त्या उत्तराने चिडला आणि मला म्हणाला जा आता आठ वाजायला आले उद्या सकाळी वॉच मध्ये बोलू आपण. फोर्थ इंजिनिअर तेवढ्यात वॉच साठी कंट्रोल रूम मध्ये आला, मी कंट्रोल रूम च्या बाहेर पडू की नको अशा द्विधा मनःस्थितीत होतो, सेकंड इंजिनिअर अजूनही रागात होता, पण बहुधा चिफ इंजनिअर ने फोर्थ इंजिनिअर ला फोनवर कल्पना दिली असावी त्यामुळे फोर्थ इंजिनिअर ने वातावरणातील तणाव बघून मला कंट्रोल रूम बाहेर पडायला लावले. मी केबिन मध्ये गेल्यावर अर्ध्या तासाने फोर्थ इंजिनिअर चा फोन आला, त्याने मला कंट्रोल रूम मध्ये बोलावून घेतले. मी खाली गेलो तेव्हा इंजिन पुन्हा पूर्ववत फुल स्पीड मध्ये आले होते. सेकंड इंजिनिअर केबिन मध्ये गेलेला होता, ड्यूटी मोटरमन आणि फोर्थ इंजिनिअर दोघे आणि तिसरा मी.

फोर्थ इंजिनिअरने मला तू आज हे काय करून बसलास, आणखीन काही मिनिट उशीर झाला असता तर जहाजाचे आणि आपल्या सगळ्यांचे काही खरं नव्हतं. सगळ्यांना बॅगा भरून घरी जावे लागले असते. तुला सेकंड इंजिनिअर ने कुठला पंप बंद करायला सांगितला आणि तू कुठला केला.

केबिन मध्ये गरम पाणी जाते तो पंप उद्या एक लिकेज दुरुस्त करायचे आहे त्यासाठी बंद करायला सांगितले आणि तू त्याच्याऐवजी एक्झॉस्ट गॅस बॉयलर मध्ये पाणी फिरवतो तो पंप बंद केला. जो पंप आपण इंजिन बंद केल्यानंतरही दीड दोन तासाने बंद करतो तो पंप तू इंजिन सूरू असताना बंद केला. त्याचा स्टँड बाय पंप सुद्धा बंद आहे त्यामुळे ऑटो मध्ये सुरू होऊ शकतं नव्हता याबद्दल मी तुला कल्पना दिली होती ना कालच.

जर हाय टेम्प्रेचर चा अलार्म आला नसता तर एक्झॉस्ट बॉयलर च्या ट्युब मध्ये पाणी नसल्याने त्या वितळून तिथं आग लागण्याची शक्यता होती, पण नशिबाने ती वेळ टळली गेली . आता सकाळी सेकंड आणि चिफ इंजिनीअरच्या शिव्या खा अजून.

पहाटे चार वाजताच्या वॉच साठी दहा मिनिटे लवकरच गेलो. थर्ड इंजिनिअरने , क्यों भई कल बहोत बडा कांड कर दिया था, लेकीन कोई बात नही होता रहता है ऐसे , टेंशन मत ले. तरीपण मी टेंशन घेऊन सेकंड इंजिनिअर ची वाट बघत होतो. बरोबर चार वाजता तो कंट्रोल रुम मध्ये आला , रोज पहाटे साडे तीन वाजता उठायला लागत असल्याने नेहमीच डोळ्यावर झोप असायची पण आज झोप उडाली होती. सेकंड इंजिनिअर ला गुड मॉर्निंग केले पण त्याने बघितलं सुद्धा नाही, नेहमी सकाळी आल्या आल्या हसून पाठीवर हात ठेवणारा सेकंड इंजिनिअर आज खूपच गंभीर होता.

थर्ड इंजिनिअर पाच मिनिट सेकंड इंजिनिअर शी बोलला आणि झोपायला निघून गेला. मला काय करावं ते सुचत नव्हतं. पण शेवटी हिंमत गोळा केली आणि सेकंड इंजिनिअर समोर जाऊन सॉरी सर , मुझे पता है मै क्या गलती कर गया. दोबारा ऐसे गलती नही करूंगा, आय एम रिअली सॉरी.

सेकंड इंजिनिअर दहा मिनिट काहीच बोलला नाही पण नंतर त्याने समोरच्या खुर्चीत बसायला सांगितले आणि मग माझ्या चुकीसह त्याची सुद्धा चुकी आहे असं बोलू लागला.

मला म्हणाला तुला दोन महिने झालेत तरीही तू अजून नवीन आहेस तू अजूनही शिकतोय, मी तुला काम सांगितले पण ते तू बरोबर केले की नाही याची मी खात्री केली नसल्याने तुझ्यापेक्षा मीच जास्त चुकलो आहे.

आता यापुढे लक्षात ठेव स्वीचबोर्ड वर प्रत्येक मशिनरी किंवा पंप चे त्या त्या पॅनल वर नावं असते, आपल्याला कोणीही काही चालू बंद करायला सांगितले की आपण तीच मशिनरी किंवा पंप चालू किंवा बंद करतोय की नाही याची पक्की खात्री करूनच बटण दाबायचे. कोणी काहीही काम सांगताना जराही शंका आली किंवा ऐकण्यात गफलत झालीय असं वाटलं की पुन्हा विचारायचे. आणखीन एक कोणतेही बटण दाबताना ते दाबल्याने काय होणार आहे किंवा होऊ शकेल याचा विचार करूनच बटण दाबायचे.

सेकंड इंजिनिअर चे रात्रीचे आणि आता पहाटेचे बदलेले रूप बघून आश्चर्य वाटले पण त्या प्रसंगातून जे शिकायला आणि अनुभवायला मिळाले ते प्रत्यक्षात स्वतः सेकंड इंजिनिअर आणि चीफ इंजिनिअरची झाल्यावर त्याचे महत्व रँकची जवाबदारी पार पाडताना जास्त कळायला लागले.

स्वीचबोर्ड माझ्या प्रमाणे अनेकांनी चुका केल्याचे अनुभव त्यानंतर ऐकायला मिळत गेले, कोणी कोणी जहाजाचा ल्युब ऑईल पंप इंजिन सुरू असताना बंद केला, कोणी कोणी चुकीच्या सूचना ऐकून पंप सुरु केल्याने अपघात झाले, ऑईल स्पील होउन प्रदूषण झाले आणि जेल मध्ये जाऊन अडकले सुध्दा.

जहाजाचे जनरेटर स्वीचबोर्ड वरील एक छोटेसे पुश बटण दाबून कंट्रोल रुम मधूनच सूरू होतात, ऑटोमॅटिकली लोड वर येतात, काही प्रॉब्लेम झाल्यास काही मशिनरी किंवा पंप जे चालू मध्ये बंद पडल्याने कोणताही परिणाम होत नाहीत असे आपोआप बंद होतात ज्याला प्रेफरेंशियल ट्रीप म्हणतात.

कंट्रोल रूम मध्ये थंडगार एसी असतो पण तो आम्हा इंजिनिअर किंवा कर्मचाऱ्यांसाठी नसून स्वीचबोर्ड चे तापमान वाढू नये यासाठी असतो. अनेक इलेक्ट्रॉनिक आणि अत्याधुनिक उपकरणानी स्वीचबोर्ड बनलेला असतो.

स्वीचबोर्ड म्हणजे एक प्रकारे जहाजावरील सगळ्या मशिनरी आणि सिस्टीम साठी ची पॉवर सप्लाय सिस्टीम असते आणि त्याचे नियंत्रण व देखभाल करणे हे अत्यंत महत्वाचे आणि तेवढेच जबाबदारीचे असते.

— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनिअर,
B.E. ( mech), DME, DIM.
कोन, भिवंडी , ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..