नमस्कार! आणि नव्या वर्षाचे नवे गुड मॉर्निंग!!
आता तुम्ही म्हणाला, सकाळ तर रोजच उगवते आणि चांगले शिष्टाचार असलेले लोक परस्परांना भेटल्यावर रोजच गुड मॉर्निंग म्हणतात. मग हे नवे ‘गुड मॉर्निंग’ काय प्रकरण आहे? तर त्याचं असं आहे की, सहाव्या शतकात होऊन गेलेला हेरॅक्टलिटस् (HERACTLITUS) नावाचा तत्त्वज्ञ या नवीन प्रकरणाचा गुरू आहे. तो म्हणतो की, ‘तुम्ही कोणत्याही नदीत दोनदा पाय ठेवू शकत नाही. कारण प्रत्येक वेळी ताजे आणि नवीन पाणी तुमच्या पायांवरून जात असते.’ आता कळले का, आम्ही ‘नवे गुड मॉर्निंग’ असे का म्हटले! मित्रहो, काळ प्रवाही असतो आणि सकाळही. ती रोजच उगवते. पण कधी ती प्रसन्न असते गुलाबांच्या बागेसारखी, कधी ताजी टवटवीत चौदा वर्षांच्या मुलीसारखी, कधी असते ती ढगाळ मनात दाटलेल्या संभ्रमासारखी, कधी रात्री झालेल्या दंगलीनंतर खचलेल्या भकास वस्तीसारखी. सकाळ तीच असते; पण रोज नवी. रोजचं सुख किंवा दु:खही नवीनच असतं. मनानं म्हातारे झालेले लोक मात्र ‘हॅट! त्यात काय नवीन… हे तर, ते तर रूटीन आहे…’ असं म्हणतात.
हे जे रोजचं (कंटाळवाणं?) रूटीन आहे, तेही रोज नवं करता येतं. टूथपेस्ट तीच, रोजचीच. पण डाव्या हातावर कधी मधूनच तुम्ही दंतमंजन घेऊन दात घासा आणि खळखळून चुळा मारा. एकदम नवीनच फ्रेश झाल्यासारखं वाटेल. रोजचीच बस. पण रोज नवे प्रवासी. त्यांचं निरीक्षण करा. अरे काय काय धमाल असते! मला एकदा बसमध्ये एक साठीची तरुण म्हातारी आपल्या म्हाताऱ्याला डोळा मारताना दिसली. तो असा काय लाजला की यव रे यांव! त्या क्षणी ती रोजचीच बस म्हणजे जणू काय इंद्राचा रथ आहे, असा भास मला झाला. आमचे एक साहेब होते. त्यांना मेमो द्यायचा छंद होता. पण त्यांच्या मेमोची भाषा दर वेळी नवी असायची. म्हणजे कधी ते विचारायचे की ‘मावशीच्या मयताला गेल्यामुळे काल आपण दांडी मारली यावर या कार्यालयाचा विश्वास आहे. तथापि, आपणास या 15 व्या मावशीनंतर आणखी काही शिल्लक आहेत का, याबाबत ३ दिवसांच्या आत स्पष्टीकरण द्यावे.’ तर कधी तेच साहेब त्याच कर्मचाऱ्याला नवा मेमो देताना म्हणायचे की, ‘महात्मा गांधींनंतर ‘दांडीयात्रा’ करणारा महान कर्मचारी लाभला, हे या कार्यालयाचे भाग्यच होय.’ या मेमोनंतर त्या गेंडोबा कर्मचाऱ्याची अकारण गैरहजर राहण्याची कधी हिंमतच झाली नाही.
असो! माझा सांगायचा मुद्दा असा की, गुड मॉर्निंग म्हणताना आणि त्या शुभेच्छा स्वीकारणाऱ्याला तो रूटीन शिष्टाचाराचा भाग आहे, असं वाटता कामा नये. गुड मॉर्निंग म्हणताना तुमचा स्वर कधी उबदार असेल तर कधी ओलावलेला. ऐकणाऱ्याला तुमच्या भावना बरोबर कळत असतात. भाषा चकवा देऊ शकते; पण स्वर नाही.
हॅपी न्यू ईअर, असं आपण वर्षानुवर्षे म्हणत आलोत. मीही तुम्हा सर्वांना नव्या शुभेच्छा देतोय आणि माझ्या शुभेच्छा खरोखरंच नवीन आहेत.
प्रत्येक दिवस हा नव्या वर्षाची सुरुवात आहे, असं समजा. आणि मग बघा जगण्यातली नवी गंमत – नवी जंमत!
— डॉ. महेश केळुसकर
(अनघा प्रकाशनच्या खिरमट या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च 2017 मध्ये प्रकाशित झाले.)
Leave a Reply