नवीन लेखन...

तार.. तार…!

तुमच्या माझ्या आयुष्यात येणारा आणि सतत पाहिला जाणारा घटक म्हणजे तार.

आपल्या सर्वांच्या आयुष्यात तसं म्हणायला गेलं तर तारेचा कितीसा उपयोग आहे, असं विचारलं तर काहीच नाही, असंच काहीस उत्तर पटकन येतं. पण जेव्हा आपण थोडसं डोळसपणे हे जाणून घ्यायला लागलो की डोळ्यांनी न दिसणाऱ्या तारेच महत्व आपल्याला पटु लागतं.

जसं घरात सर्वत्र पसरलेली तार आपल्याला दिसत नाही. पण ती असते भिंतीत दडलेली.. बटणं दाबताच दिवा लावणारी. बटण दाबताच गरम पाणी सोडणारी, बटण दाबताच पंखा सुरू करणारी, बटन दाबताच टीव्ही सुरू करणारी आणखी बऱ्याच गोष्टी ही तार करत असते. घराच्या समोरून गेलेल्या तारेवर कोणता तरी पक्षी येऊन बसलेला असतो. तेव्हा आपलं लक्ष त्या पक्ष्याकडे जातं, तारेकडे जात नाही. तारेचं कुंपण असतं, तारेची भिंत असते, तारेची सीमा देखील असते. दोन घरांच्या मध्ये तार टाकली गेली की विभाजन होतं, दोन देशांच्या सीमेवर तार टाकली की देश अलग होतात… वेगळे होतात.. सीमेवरच्या तारेच कुंपण.. पलिकडे अलिकडे दोन्हीकडे सैनिक तैनात कशासाठी तर शत्रुने तार ओलांडुन आपल्या देशात येऊ नये म्हणून.. तारेच महत्व सीमा राखण्यासाठी..! तारेच महत्व घराला सावरण्यासाठी.. तारेच महत्व.. आपलं अंग झाकण्यासाठी… आपण जी वस्त्र नेसतो.. ती देखील कापसाच्या तार-धाग्यांतूनच तयार झालेली. धागा हा देखील तारेचाच प्रकार म्हणावा लागेल ना.. सोन्याचा तार असतो.. त्यापासुन अनेक अलंकार तयार होतात.. अनेक आभुषणे तयार केली जातात. एक ना अनेक प्रकार.. हातातील बांगड्या देखील काचेच्या तारेनेच तयार केल्या जातात.. काच गरम करून मग त्याला आकार दिला जातो…

मनाचीही तार छेडली जातेच ना काही प्रसंगात. जसे एखाद्या छान गाण्याच्या मैफलित बसलो असताना सुर जसजसे छेडले जातात तसतशी मनाची तार छेडली जाते. मन रंगून जातं.

आपण मोबाईलचा वापर करतो. मोबाईलला तार जोडलेली नसतें पण त्याच्या टॉवरला मात्र ती जोडलेली असते. टॉवरला जोडण्यासाठी टाकलेली तार जमिनीतून गेलेली असते. जमिनीतून गेलेली ही तार केबल म्हणून सर्वांना परिचीत आहे. आपल्या जमिनीत आता इतकी केबल टाकली गेली आहे, की तिच्यापासुन पृथ्वीला प्रदक्षिणा सहज घातली जाऊ शकेल. वीज वाहिनीच्या तारा आपल्याला डोळ्यांनी दिसतात. या सर्व तारा अनेक लहान लहान तारांनी एकत्र येऊन बनलेल्या असतात. अनेक बारक्या तारांचा हा समूह असतो. शक्तीशाली वीज वाहून नेण्याची शक्ती या बारक्या तारकेत समावलेली असते. याच वीज वाहिनी तारेमुळे रेल्वे चालते. रात्रीचा गडद अंधार दूर सारणारे दिवे या वीजतारेमुळेच प्रकाशतात.

पूर्वी टपाल विभाग देखील तार पाठवायचं. खुप महत्वाचा निरोप असेल तर तो देण्यासाठी जलद सेवा म्हणून तार पाठवली जायची. अशी तार ज्यांच्या घरी आली की त्या घरात पहिल्यांदा शोकमग्न वातावरण व्हायचे. कारण तार आलीय म्हटल्यावर काहीतरी वाईट घटना घडली असणार अशीच मानसिकता तेव्हा होती. अनेक वेळा टपाल खात्याची ही तार शुभ संदेश देखील घेऊन यायची म्हणा.. पण काळाच्या ओघात ही तारसेवा बंद झालीय, त्यातली गंमत गेली…
तार मात्र तशीच राहिलीय.. वेटोळे घातलेली.. वेडेवाकडी.. झोपडी शाकारणारी.. झोपडीचे बांबू घट्ट धरून गरीबाच्या डोक्यावर सावली करणारी… पाऊस पाण्यापासुन वाचवणारी… तार..

— दिनेश दीक्षित
(१० जुलै २०१८)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..