आकाश दर्शन हा सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांचाच एक कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय असतो. फलज्योतिषावर आपला विश्वास असला नसला तरी आकाशातील तारकांचे आणि ग्रहांचे नियमित आणि अनियमित भ्रमण आपल्याला अचंबित करून टाकत असते. आकाश दर्शनाचे संस्कार जर शालेय वयात झाले तर या कुतुहलाचे रुपांतर जिज्ञासात होऊ शकते. तसे झाले तर खगोल शास्त्राचा अभ्यास करण्याचा ध्यास त्या विद्यार्थांना शालेय वर्षातच लागतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सरस्वती सेकंडरी स्कूलचा माजी विद्यार्थी डॉ. गुरुराज वागळे.
गुरुराजची आई शीला वागळेबाई नौपाड्यात गेली पंचवीस वर्ष बालवाडी चालवत आहेत. तसेच त्या अत्रे कट्ट्याच्या क्रियाशील कार्यकर्त्या आहेत. शालेय वयात आईकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे गुरुराजला विज्ञान आणि गणिताची गोडी लागली. या विषयातील बाहय्य परीक्षेत गुरुराजने नेहमीच चांगले यश मिळवले. बाल वैज्ञानिक परिक्षेत गुरुराज सहावीत सुवर्ण पदकाचा मानकरी होता आणि नववीत त्याला रजतपदक मिळाले होते. याच दिवसात गुरुराज आकाश दर्शनाच्या पहिल्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. शाळेच्या ग्रंथालयातील खगोलशास्त्राची पुस्तके वाचून त्याला या विषयाची गोडी लागली व याच विषयात अधिक काही करावयाचे अशी इर्षा पण मनात निर्माण झाली. अकरावीत गुरुराजने मुंबई विद्यापीठचा बही:शाळा विभागाचा खगोलशास्त्राचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतरचा प्रगत अभ्याक्रम महाविद्यालयात असताना पूर्ण केला.
मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून २००५ साली भौतिकशास्त्रातील पदवी ऑनर्स सहित मिळवून त्याने मुंबई विद्यापिठाच्या कलिना येथील भौतिकशास्त्र विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २००४ साली शुक्र ग्रहाचे सूर्यावर अधिक्रमण होण्याचा योग आला होता. जिज्ञासा ट्रस्टचा प्रतिनिधी म्हणून गुरुराज नेहरू तारांगण येथील अभ्यास शिबिरात सहभागी झाला होता. त्यानंतर प्रत्यक्ष अधिक्रमणाच्या दिवशी त्याने जिज्ञासा ट्रस्टच्या विशेष कर्यक्रमात दुर्बिणीच्या सहाय्याने शालेय विद्यार्थाना हा विषय अगदी सोप्या रीतीने समजावून सांगितला होता.
२००६ च्या उन्हाळी सुट्टीत त्याला टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील बाहेरील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या संशोधन अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. प्राध्यापक मयांक वाह्या यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गुरु ग्रहावर वास्तव्याची शक्यता’ या विषयावर त्याने प्रकल्प केला होता.
अमेरिकेतील, केंटकी लेकझिगटन [Kentucky, Lexington] विद्यापीठातून, गुरुराजने पी.एचडी. पूर्ण केली. गुरुराजचा पी.एचडी. प्रबंधाचा ‘आंतर तारका माध्यम’ [Interstellar medium] इंटरस्टेलेर मिडीयम] हा विषय भौतिकी खगोलशास्त्राशी [Astrophysics] संबधित आहे.
या विषया संदर्भात समजून घेण्याअगोदर भौतिक खगोलशास्त्राची धावती ओळख करून घेणे आवश्यक आहे. आकाशदर्शन ते भौतिकी खगोलशास्त्र हा अतिशय प्रचंड मोठा आवाका आहे. मानवाच्या नैसर्गिक जिज्ञासूवृत्तीमुळे रात्रीच्या वेळी अथांग आणि अनंत आकाशाचा वेध घेण्याचा छंद मानवाला लागला. या छंदाला निरीक्षणाची आणि नोंदींची जोड देत मानवाने त्याचे शास्त्र निर्माण केले. या शास्त्रालाच खगोलशास्त्र नाव दिले गेले. ग्रह तारे यांचा अभ्यास करताना गॅलेलिओने लावलेल्या दुर्बिणीच्या शोधामुळे आणि नंतर न्यूटनने लावलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधामुळे भौतिकशास्त्राची जोड खगोलशास्त्राला मिळाली. इथूनच खगोल संशोधनाला जोमाने सुरवात झाली. भौतिक शास्त्रातील विविध शोधांचा आणि नियमांचा आधार घेत मानवाने विश्वाला जाणून घेण्याचा शोध चालू ठेवला. आपली सूर्य ग्रह मालिका एका दीर्घिकेचा [galaxy] भाग आहे हे जाणून घेतल्यावर या दीर्घिके पलीकडे देवयानी [ Andromeda] नावाची दुसरी दीर्घिका आहे हे विसाव्या शतकाच्या सुरवातीस शास्त्रज्ञाना समजले. रेडीओ आणि इतर आधुनिक दुर्बिणीच्या सहायाने त्याही पलीकडे आणखीन असंख्य तारकाविश्वे आहेत हे मागील शतकात कळले आहे. या अनंताचा शोध घेताना मुळात विश्वाची उत्पत्ती कशी झाली आणि तारकांचा जन्म आणि मृत्यु कसा होतो याचे कोडे सोडवण्याचा प्रयज्ञ शास्त्रज्ञ करीत आहेतच.
आकाश दर्शन करताना मृग नक्षत्रामध्ये अभ्रिका [ओरीओन Orion Nebula ] दाखवली जाते.. पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ही अभ्रिका अंधाऱ्या रात्री चांगल्या दुर्बिणीने स्पष्ट दिसू शकते. ही अभ्रिका तारकांचे जन्म स्थान आहे हे मागील शतकात सिद्ध झाले आहे. या तेजोमेघातील वायुंचा अभ्यास हा गुरुराजचा पी.एचडी.चा संशोधनाचा विषय होता.. नेब्युला बरोबरच ‘गुरुराजने ‘पोलेरीस फ्लेअर’ [Polaris Flare] नावाच्या परमाणुमेघाचा [molecular cloud] चा अभ्यास पण पी.एचडी. करताना केला. या मेघामध्ये अजून तारका निर्मिती सुरु झाली नाही आहे.
‘आंतर तारका माध्यम’ [इंटरस्टेलेर मिडीयम] याला डॉ. जयंत नारळीकर यांनी ‘तारकादरम्यान’ हा शब्द वापरला आहे. ही अवकाशातील पोकळी नसून तिथे प्रामुख्याने म्हणजे ९९% वायू आणि १ % विविध धातूंच्या अतिसूक्ष्म कणाची धूळ असते. वायूच्या वस्तुमानातील [मास] हायड्रोजन हा ७५% असतो आणि उरलेला २५% हेलीयम वायू असतो. इथेच तारकांची निर्मिती होते. या वायूत अणू परमाणु बरोबर कार्बन आयर्न आणि सिलिकॉनचे कण असतात. या वायूची घनता अतिशय कमी असते. उदारणार्थ आपण आपल्या प्रयोगशाळेत निर्माण करू शकत असलेल्या निर्वात पोकळीतील वायूच्या घनतेपेक्षा या वायूची घनता हजार पटीने कमी असते.
तारकांचा जन्म – मृत्यु प्रक्रिया अनेक अब्जावधी वर्षांची असते.खगोल शास्त्रातील संशोधन हे विज्ञानातील इतर शास्त्राप्रमाणे प्रयोगशाळेत बंदिस्त परिस्थितीत्त [control situation] अथवा फिल्डवर प्रत्यक्ष करता येत नाही. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी आपल्या ‘खगोलशास्त्राचे विश्व’ या पुस्तकात खगोलीय संशोधनाचे सूत्र पुढील प्रमाणे सांगितले आहे. …. निरीक्षण …- परीक्षण —- कारणमीमांसा— निरीक्षण…..
निरीक्षणातून मिळालेल्या कच्या माहितीचा साठा फार प्रचंड आणि गुंतागुंतीचा असू शकतो. त्याचे शास्त्रोक्त विष्लेषण आणि परीक्षण करणे आवश्यक असते. आज भौतिक खगोलीय संशोधनात परीक्षण आणि कारणमीमांसासाठी आधुनिक विज्ञानातील भौतिक, विद्युतचुंबकीय, रासायनिक, इलेक्ट्रोनिक, रेडीओ लहरी, संख्याशास्त्र आणि अद्यावत संगणक प्रणाली अशा विविध शास्त्र शाखांची सैद्धांतिक मदत आणि सहाय्य मिळत आहे. परीक्षण आणि कारणमीमांसा याचा ताळमेळ, सुसंगता आणि समन्वय साधून खगोलीय भौतिकशास्त्र प्रगती करीत आहे. या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन प्रश्न निर्माण होत असतात. या प्रश्नांना सुसंगत उत्तर शोधण्यासाठी परत निरीक्षण ……….> . खगोलीय संशोधनातील ही साखळी अखंडित चालू राहणार आहे.
गुरूराज अमेरिकेहून परत येऊन सध्या डॉ. जयंत नारळीकर यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील आयूका [IUCAA] संस्थेत एका प्रकल्पावर संशोधक म्हणून कार्यरत आहे खगोलीय संशोधन का आणि कशा करता करायचे असे प्रश्न विचारणे वेडेपणाचे आहे. जोपर्यंत मानवाच्या मनात जिज्ञासूवृत्ती आहे तोपर्यंत माणूस अशा प्रकारे अनंताचा वेध घेत राहणारच. गुरुराजचे विशेष कौतुक करावयाचे कारण, ब्रेन ड्रेनच्या कोरड्या आक्रोशात तो आपल्या देशात परत आला आहे. अशा तरुण शास्त्रज्ञांची सर्व अर्थाने आशा आकांक्षा आणि अपेक्षा यांची परीपूर्ती करू शकणारी व्यवस्था निर्माण होणे ही आज काळाची गरज आहे.
सुरेन्द्र दिघे
surendradighe@gmail.com
Leave a Reply