आपल्याकडे गेली अनेक वर्षे विकास या शब्दाची चर्चा आहे. हल्ली तर विकास सुसाट सुटलाय ते विकास वेडा झालाय इथपर्यंत चर्चा आहे. देशातील इतर शहरांचं माहित नाही, परंतू मुंबई गेली काही वर्ष ‘विकास’ चाललेला ‘दिसतो’ आहे. विकास हा शब्द नेत्यांपासून ते एखाद्या कंगाल माणसापर्यंत सर्वच लोकांच्या मुखात असतो. परंतू प्रत्येकाच्या विकासाची व्याख्या मात्र वेगवेगळी आहे असं वाटतं. हे म्हणजे विकासाच्या रथाला चहूबाजूने घोडे, ते ही शहरातलं धष्टपुष्ट अरबी ते गांवाकडचं एखादं मरतुकडं घोडं, अशा वेगवेगळ्या ताकदीचे जोडले आणि त्यांना त्यावरील, पोट भरलेला नेता ते पोटभरू कामगार अशा, स्वारांनी एकाचवेळी वेगवेगळ्या दिशेने जोरात पळण्यासाठी टांच मारली, तर त्या विकासाच्या रथाचं जे काही होईल, तसं आपल्या विकासाचं झालंय असं मला वाटतं..हे असं होण्याचं एकमेंव कारण म्हणजे विकासाची नेमकी व्याख्या काय आणि तो कोणासाठी करायचा हे ठरलेलं नसणं. […]