गुरुस्वरुपात पूजला जाणारा श्रेष्ठ देव म्हणजे श्री दत्तात्रेय होय. म्हणूनच “श्री गुरुदेव दत्त” असा दत्तात्रेयांचा जयघाष केला जाते. श्री दत्तात्रेय हे गुरुतत्त्वाचे आदर्श स्वरुप आणि योग साधनेचे उपास्यदैवत आहे. शैव, वैष्णव आणि शाक्त या निन्ही संप्रदायायत दत्तात्रेयांची उपासना श्रध्देने केली जाते. दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांची तत्त्वे एकवटलेली आहेत. यामागील रहस्य जाणून घेण्याकरता दत्तात्रेयांची जन्मकथा माहीत असणे आवश्यक आहे. अत्री ऋषी आणि अनसूया यांचे पुत्र दत्तात्रेय होय. अत्री ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र चित्रकूट पर्वतावर पयस्विनी नदीच्या काठी त्यांचा आश्रम होता. अत्री ऋषी उग्र तपश्चर्या करत असत. अत्यंत औचित्त्य पूर्ण अशा त्यांच्या या तपोबलाच्या तोजाने कर्दम प्रजापती संतुष्ट झाले आणि आपल्या अनसूया नावाच्या कन्येचा अत्रींशी विवाह लावून दिला. अनसूया ही नावाप्रमाणे असूया रहित होती. तिने तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले होते. अनुसूया ही पतिव्रता स्त्री होती. तिच्यातपश्चर्येच्या तेजाने आणि पतिव्रत्याच्या बळाने ब्रह्मा, विष्णु, महेश हे तिन्ही देव प्रभावित झाले होते. प्रत्यक्ष इंद्राला देखील आपले स्थान डळमळीत झाल्याची भीती वाटू लागली, आणि त्याने ब्रह्मा, विष्णू, महेश यांना विनवणी केली. तिन्ही देवांनी अनसूयेचे सत्वहरण करण्याचे ठरविले त्याप्रमाणे अत्री ऋषी स्नानासाठी गंगेवर गेले असता अत्री ऋषींच्या आश्रमात तिघेही अतिथी रूपात प्रगट झाले. तिघांनी अनसूयेकडे इच्छाभोजनाची मागणी केली. अनसूयेने अतिथींचे स्वागत करून सर्व स्वयंपाक केला आणि वाढावयास आली असता निघांनी तिला नग्न होऊन वाढ अशी आज्ञा केली. अतिथीच्या इच्छेचा मान राखणे आपले कर्तव्यच आहे, असे मानून त्यांचा अतस्थ हेतूही जाणला. क्षणभर विचार करून अनसूयेने आपल्या पतीचे स्मरण केले आणि अतिथींवर तीर्थाचे सिंचन केले. तत्क्षणीच त्या तिघांचे तीन बालकात रुपांतर झाले. अत्री ऋषी गंगेवरून परत येताच अनसूयेने ती तीन बालके त्यांच्यासमोर ठेवून नम्रमणे म्हटले “स्वामिन् देवेन् दत्तम. ”अत्री ऋषींनी त्यांना “दत्त” असे नाव दिले.
ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या भार्या आपल्या पतीच्या शोधात अत्री ऋषींच्या आश्रमात आल्या. अनसुयेने आपल्या पतीचे रुपांतर बालकात केल्याचे पाहून तिघीही दुःखी झाल्या. त्यांनी अनसूयेला विनवणी केली आणि अनसूयेने तिन्ही बालकांचे पुन्हा त्रिदेवात रुपांतर केले. त्रिदेवांनी आपला पराभव मान्य केला. ब्रह्मा व महेश तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेले. कालांतराने ब्रह्मा चद्र (सोम) झाले आणि महेश दुर्वास झाले. परंतु विष्णु मात्र दत्त रूपात अत्री आणि अनसूयेच्या इच्छेनुसार त्यांच्याजवळच त्यांचे पुत्र म्हणून राहू लागले. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचे प्रतीक म्हणून दत्ताने ब्रह्माचा कमंडलू आणि महेशाचा शूल हातात धारण केला. सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या या देवता मानल्या जातात.
दत्तात्रेयांनी अत्री ऋषींच्या आदेशानुसार गौतमी नदीच्या काठी शिवोपासना करून योगसिध्दी आणि ब्रह्मज्ञान प्राप्त केले. दत्तात्रेय हे स्वेच्छाविहारी आहेत. माहूर हे दत्तात्रेयांचे शयनस्थान समजले जाते. पांचळेश्वरी ते स्नान करतात आणि कोल्हापुरी भिक्षाटन करतात. दत्तात्रेयांचा निवस सतत औदुंबर वृक्षाखाली असतो. म्हणून दत्तभक्त तेथे बसून गुरुचरित्राचे पारायण करताता. तीन मुखे ही ब्रह्मा, विष्णू महेश या त्रिदवांचे समन्वय दाखविणारी आहेत. या त्रिदेवांचे प्रत्येकी दोन प्रमाणे सहा हात आहेत बह्माच्या हातातील जपमाला व कमंडलू हे सत्तां चे, तपस्व्याचे प्रतीक आहे. विष्णूच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे रज तत्त्वाचे प्रतीक तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू तम तत्त्वाचे म्हणजेच संहाराचे प्रतीक आहे. दत्तात्रेयांचा वेष हा मस्तकावर जटाभार, पायात खडावा, अंगाला विभूती लावलेली, काखेत झोळी लटकविलेली, व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती म्हाणजे दत्तात्रेय अवधूत दिगंबर योगी असल्याचे प्रतीक आहे. दत्तात्रेयांच्या मागे उभी असलेली कामधेनू हे पृथ्वी चे प्रतीक आहे, तर त्यांच्या आजूबाजूला असलेले चार श्वान हे चार वेदांचे प्रतीक आहेत. दत्तात्रेयांची उपासना गुरु स्वरूपाता केली जाते म्हणून ते गुरुदेव आहेत. परमार्थमार्गात गुरुसंस्थेला अतिशय महत्त्व आहे. दत्तात्रेय हे परमगुरु असल्यामुळे सर्व संप्रदायात ते श्रेष्ठ मानले जातात. दत्तसंप्रदाय हा सर्वात महान संप्रदाय मानला जातो. योगशास्त्र मंत्रशास्त्र आणि उपासनाशास्त्र यांचे संवर्धन करण्याचे महान कार्य दत्तसंप्रदायाने केले आहे. उपनिषदकारांनी प्रभू दत्तात्रेयांना विश्वगुरू म्हणून यथार्थपणे गौरविले आहे. दत्तभक्तीचा प्रसार हा जातीभेदातीत, संप्रदायातीत किंबहुना धर्मातीत आहे म्हणूचन महानुभाव, नाथ, वारकरी आणि सतर्थ संप्रदायात दत्तात्रेयांविषयी अत्यंत आदर आणि श्रध्दा आहे. दत्तात्रेय हे विष्णूचे अंश असून अत्री आणि अनसूयेचे पुत्र असले तरी त्यांचा जन्म अयोनिसंभव आहे. भुतप्रेत, पिशाच्यादींचे दत्तात्रेय हे कर्दनकाळ आहेत.
भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रत: ।
दूरादेव पलायंते दत्तात्रेय नमामि तम् ।।
स्मरण करताच प्रगट होणारी द त्त ही देवता आहे. त्यांच्या स्मरणाने वाईट शक्तींचा तात्काळ विनाश होतो असे दत्तावतारी श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी वरील श्लोकातून सांगितले आहे. दत्त म्हणजे देणे. ज्यांनी आपल्या परमभक्ताला सर्व काही दिले आहे. दत्तात्रेयांचे दुसरे नाव अवधूत. म्हणजे, सर्व प्रकृतीविकारांना धुऊन टाकणारा आणि भक्ताला निर्गुणाची अनुभूती देणारा. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” दत्तात्रेयांचा साधनमंत्र. दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असा, म्हणजेच सर्वव्यापी श्री म्हणजे लक्ष्मी ज्याच्या पायाशी आहे तो म्हणजे श्रीपदा वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा स्वामी अर्थात साक्षात श्री विष्णू.
अशी ही सर्वव्यापी सर्वत्र संचारी स्मर्तृगामी, युगानयुगे, शतकानुशतके अखिल मानव जातीचा उददार करणारी आणि परमभक्तांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारी जागृत, श्रेष्ठ गुरुदेवता म्हणजे श्री दत्तात्रेय !
-–प्रज्ञा कुलकर्णी, (डोंबिवली)
मो. ९९२०५१३८६६
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ४ था, (अंक २८)
Leave a Reply