नवीन लेखन...

टक्कल- केवळ फायदेच, तोटे नाहीतच..

‘पिकलेले केस व उरलेलं टक्कल’ या विषयावर काल लिहीलेल्या लेखात टकलाचे फायदे-तोटे या विषयावर लेखाच्या विस्तारभयास्तव लिहीण्याचं मुद्दामहून टाळलं होतं. ते आता लिहीतो. फायदा दिसल्याशिवाय कोणी कुठेही पुढे जात नाही म्हणून माझ्या दृष्टीनं टकलाचे फायदे काय, ते पहिलं सांगतो.

टकलावर तेल लावायची आवश्यकता नसते. लावून उपयेगच नसतो. त्यामुळे तेलाचा व केस नसल्यामुळे केसाला लावायच्या कलपाचाही खर्च वाचतो. तेल नसलं तरी कलप ही सध्याची जीवनावश्यक गोष्ट आहे आणि टक्कलवान हे ‘जीवनावश्यक औषध’ लावण्यापासून वाचलेले नशिबवान असतात. हा टकलाचा सहज लक्षात येणारा फायदा..

दुसरा फायदा म्हणजे, टकलावर केसच नसल्याने केस विंचरणं आणि त्यासाठी दर आठ दिवसांनी हरवणारा कंगवा ठेवण्याची कटकट नसते. तरी काहीजणांना टकलावर पुढच्या बाजूस सुशीलकुमार शिंदे टाईप बेटासारखा एवढादा केसांचा पुंजका असतो, तो उगवतानाही काहीजण दिसतात. हे खरे रसिक. यांचा शुक्र अतिशय स्ट्राॅन्ग असतो असं ज्योतिषशास्त्र साॅगतं. आता अतिशय कमी केस बाजुच्या गुळगुळीत टॅन्ड टकलावर विस्कटलेले जास्त उठून दिसतात हे खरं, पण त्यासाठी कंगवा बाळगणं म्हणजे जरा अतिच वाटतं हो..!

टकलात कोंडा होत नसल्याने शाम्पू, कंडीशनर, जेल आदीचा मोठा खर्च वाचतो. तोटा मात्र मला तरी एकच दिसतो, तो म्हणजे भालप्रदेश नेमका कुठून सुरू होऊन कुठं संपतो हे लक्षात न आल्याने, चेहेरा धुताना पार मागच्या बाजूस मानेपर्यत धुवावा लागतो व फेसवाॅशचा खर्च वाढतो. परंतू फायद्याच्या तुलनेत खर्चाची बाजू अगदीच किरकोळ सल्याने तिकडे फार लक्ष देऊ नये. आणखी एक तोटा आहे तो म्हणजे मच्छरला चावे घ्यायला एक मोकळी जागा मिळते आणि ज्याच्या माथ्यावर बसायचंय त्याच्या डोळ्यास न पडता निवात मेंदूपर्यंत पोचलेलं शुद्ध रक्त शोषता येतं. पण ओडोमाॅस किंवा गुड नाईट लावून हा प्रश्नही निकाली काढता येतो. हा तोटाही तसा किरकोळच आहे.

आता टकलाचा सर्वात मोठा फायदा. हा फायदा वाचल्यावर टक्कल असलेले स्वत:ला भाग्यवान समजू लागतील. आणि ज्यांना टक्कल पडायला सुरूवात झाली आहे त्यांच्या मनात स्वत:बद्दल उगाच न्युनगंड निर्माण होणार नाही. टक्कल नसलेले आपल्याला टक्कल कधी पडेल याची वाट पाहातील यावर मी पैज लावायलाही तयार आहे.

हा फायदा असा, की टक्कल असलेल्या पुरूषांच्या बायका (पक्षी-पत्न्या) अतिशय सुंदर असतात. किंवा सुंदर स्त्रीयांना टक्कलवान नवरे मिळतात असं म्हटलं तरी चालेल. हे माझं निरिक्षण आहे. अर्थात इतर सर्व नियमांप्रमाणे हा नियमही अपवादाने सिद्ध होतो. एकूण दहा टकलांत आठ टकलांमधे हा नियम दिसून येतो. वाटलं तर रस्त्याने येता-जाता निरिक्षण करा. रस्त्याने टेहेळताना जोडीतील टकला’चं निरिक्षण करा, त्यांच्या बायकांचं नव्हे, नाहीतर भलतीच आफत ओढवायची. टक्कलवाल्याना मारामारीची फार खुमखुमी असते हे ही विसरू नका. टकलाचं क्षेत्रफळ जस जसं वाढतं, तस तसं वामांगाच्या सौंदर्याला भरतं आलेलं दिसेतं. हे ही निरिक्षणच..! कदाचित ग्लाॅसी कॅनव्हासवर साधारणसं चित्रही उठून दिसतं तसंही होत असेल, माहित नाही, पण टक्कलाता संबंधं कलत्राच्या सौंदर्याशी आहे हे नक्की..! म्हणूनही कदाचित टक्कलवानाना भाग्यवान म्हणत असावेत. नाहीतरी पत्नी म्हणजे लक्ष्मीच असते, पैसे नसले तरी सौंदर्यखणी लक्ष्मी असते हेच भाग्य असावं.

शेवटचा फायदा वाचून नसलेलं टक्कल पाडून घ्यायचा प्रयत्न करू नका पण नैसर्गिकरित्या टक्कल पडत असेल तर उगाच काहीतरी महागडे उपचार करुन त्याला अडवू नका हा सल्ला देईन. कारण महागडी औषधं आणि विणकाम करून जर केस येणार असतील तर अनुपम खेर, राकेश रोशन किंवा अक्षय खन्ना या लक्ष्मीपुत्रांनी ते कधीच करून घेतलं असतं. त्यांनी तसं केलं नाही यात काय ते ओळखा. तुम्ही आपल्या टकलाचे फायदे बघा आणि स्वत:ला भाग्यवान समजा..!!

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..