22 जून 2004 (मंगळवार)
मी ‘रेव्ह टेक्नॉलॉजी’ या नवीन सॉफ्टवेअर फर्म मध्ये प्रवेश केला. ‘ U.S.V.’ मधील वेल सेट जॉब सोडून या कंपनीत प्रवेश करताना धाक-धुक होती. पण एक चान्स घेऊन पाहिला. सर्वांचा विचार विनिमय घेऊन ‘रेव्ह टेक्नॉलॉजी’ जॉईन केली. ‘रेव्ह टेक्नॉलॉजी’ एकदम प्रोफेशनल कंपनी आहे. पहिल्याच दिवशी मला तिथल्या वातावरणावरून कळले. सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून मला असाइन केलेल्या डेस्कवर जाऊन बसले. पहिल्याच दिवशी तुम्हाला एक मेंटर असाइन होतो. थोडक्यात तुम्हाला वर्क फ्रंट आणि प्रोफेशनल फ्रंट किंवा पर्सनल फ्रंट वर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकता. कंपनीच्या प्रोसेसेस् ची माहिती देणे,आठवड्यातून एकदा त्याच्या टीम बरोबर मीटिंग घेऊन संवाद साधणे, अशी कामे त्याला असतात. कामाचा खुप ताण असला की अशा मिटींग्स आणि त्यातून होणाऱ्या संवादरुपी गप्पा मनाला खूप रिलीफ देतात हे या मिटींगचे मुळ उद्देश मूळ उद्दिष्ट.( स्ट्रेस बस्टर ).त्याच दिवशी अमरेश (एच आर) ने मला माझा बायोडेटा कंपनीच्या फॉरमॅटमध्ये भरून द्यायला सांगितला. जाता जाता त्याने असेही नमूद केले की आजच क्लायंटला पाठवायचा आहे. मला माझ्या ‘ U.S.V.’ मधील कलिग्ज् जे आता UK मध्ये होते, त्यांच्याकडून कळले होते की क्लाइंट युके मधला आहे. अमरेशच्या त्या वाक्याने मनात खूप आशा निर्माण झाल्या की आपल्याला पण मौका मिळेल का UK ला जायला ? मनात एक आशेचा किरण निर्माण करून तो दिवस संपला.
23 जून 2004 (बुधवार)
सकाळी आठ वाजता लवकर आवरून शैलेश बरोबर निघाले.त्याने मला कोपरी ला सोडले. तिथून मी दादर एस.टी (पुलंच्या ‘म्हैस’ मधल्या एश.टी.सारखी एश.टी.) पकडून परेलला उतरणार आणि मग तिथून शेअर टॅक्सीने कंपनीत जाणार असा रोजचा दिनक्रम ठरला गेला. क्लायंट साइटवर जाऊन ट्युब ट्रेनने प्रवास करण्याची स्वप्ने बघणाऱ्या मला सध्या तरी लाल डब्याचे धक्के खायचे होते. किती दिवस कोणास ठाऊक? पण म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय….. तसं माझ्या मनाला मी समजावले, लाल डब्याचे धक्के खाल्ल्याशिवाय ट्युब ट्रेन दिसत नाही. तर असा प्रवास करून मी साधारण साडे-नऊ ते दहाच्या दरम्यान ऑफिसमध्ये पोहोचले. सकाळी अकरा-साडेअकरा वाजता अमरेश बरोबर मीटिंग झाली. त्याने सांगितले की तुला ऑनसाईट जावे लागेल. मनात फुटणार्या फुटणार्या आनंदाच्या ऊकळ्यांना दाबुन आणि चेहरा जमेल तेवढा स्थितप्रज्ञासारखा ठेवून मी मान डोलावली. विसा काढण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची तयारी करायला लाग, असे त्याने सांगितले आणि त्यासाठी झेराला भेट असे ही सांगितले. ट्रॅव्हल रिलेटेड सगळ्या गोष्टी ती बघते असे कळले. मी झेराला फोन केला तर ती लंचला गेली आहे असे कळले. एक दिड तासाच्या अस्वस्थ प्रतीक्षेनंतर तिची भेट झाली. तिने मला काय कागदपत्रे लागतील याची यादी पाठवली. दिवसातून दहा वेळा मी यादी उगीचच वाचून पाहिली. काल एक आशेचा किरण घेऊन घरी परतले होते. आता आशेची पालवी फुटली होती!!
तरीही जाणार का नाही ते काही हे काही तरीही जाणार का नाही हे नक्की ठरले नव्हते, त्यामुळे आशा-निराशेच्या अस्वस्थ हिंदोळ्यावर स्वार होऊन घरी आले. शैलेशला सर्व वृत्तान्त सांगितला मी हवेत चालते. पण त्याने मला धीर धरायला सांगितले. माझा स्वप्न भंग झाला असता तर त्याचे दुःख माझ्यापेक्षा शैलेशला अधिक झाले असते. देवाची प्रार्थना करत आणि आशा निराशेच्या संमिश्र भावनेच्या भरात झोपले.
24 जून 2004 (गुरुवार)
सकाळी ऑफिसमध्ये गेल्याबरोबर झेराला फोन लावला तर कळले, ती उशिरा म्हणजे बारा-साडेबाराला येणार आहे. परत अस्वस्थ प्रतीक्षा!! माझं काम तसही सुरू झालं नव्हतं आणि माझे जुने मित्रही इथे नव्हते. मग कॉफी काऊंटरवर आणि कॅन्टीनमध्ये हळूहळू ओळखी आणि गप्पा सुरू झाल्या. अखेर शेवटी झेरा उगवली . तिला माझं विसा प्रोसेसिंग काय झालं असं विचारल्यावर ती म्हणाली, अमरेश कडून मेल आल्याशिवाय मी फॉर्म भरू शकत नाही. चला!! गाडी परत अमरेश कडे वळली. तिथे कळलं, अमरेश आज आलाच नाही. झालं !!म्हणजे आजचा दिवस फुकट गेला. कुठलही काम कधी पटकन सरळ होतच नाही आपलं… सगळ्या गोष्टींसाठी लॉंग वेटिंग पिरेड असतो….. असे थोडेसे नैराश्यपूर्वक विचार घेऊन घरी आले.
25 जून 2004 (शुक्रवार)
परत नव्या आशेने ऑफिसमध्ये आले. पण आजही अमरेश आला नव्हता. आता उत्सुकता/ अधीरता याची जागा टेन्शनने घेतली .कारण इतर कोणी काही सांगू शकत नव्हते. मी कोणाला रिपोर्ट करणार? मी काय काम करणार? कोणाला काहीही माहीत नव्हते. हातात ऑफर लेटर होते पण अपॉइंटमेंट लेटरचा पत्ता नव्हता. मनात अनेक शंका यायला लागल्या. अशा वेळी नेमके नको ते किस्से आठवायला लागतात. ‘याला बेंचवर बसवलं ,त्याला ऑफर लेटर दिलं पण अपॉइंटमेंट लेटर दिलं नाही.. का तर प्रोजेक्ट हातातून गेलं’ अशा एक ना दोन अनेक वाईट गोष्टी आठवत राहिल्या. गंमत म्हणजे या सगळ्या वाईट गोष्टी आपल्या ओळखीच्यांच्या बाबतीत घडलेल्या असतात. तीच वेळ आपल्यावर तर नाही येणार ना?? अशा निराशेच्या दाट गर्तेत शुक्रवारचा दिवस ही संपला.
शनिवार-रविवार असेच प्रचंड अस्वस्थ ते मध्ये गेले.आता ‘ऑनसाईट जाणार का’ या विचारांची जागा ‘काहीतरी काम द्या’ या विचारांनी घेतली.
28 जून 2004 (सोमवार)
आताही मी ऑफिसमध्ये पोहोचले, पण फारश्या उत्सुकतेने नाही. अमरेशला उशिरा म्हणजे बारा-साडेबाराला फोन लावला. तोपर्यंत उमेश सुद्धा युके होऊन परत आला होता. त्याच्या बरोबरच गप्पांमध्ये वेळ घालवला. त्यालाही माझ्या बायोडेटाची काही कल्पना नव्हती. म्हणजे तो क्लायंट पर्यंत पोहोचला आहे का नाही हे त्याला माहिती नव्हते. पण आता माझी उत्सुकता जरा कमी झाली होती आणि मनात विचार आला जायचं असेल तर जाशीलच, कशाला काळजी करतेस? थोड्यावेळाने स्वतः अमरेश विचारत आला, तुझ्या विसाचे काय झाले ग? मी म्हणाले, तुमच्याकडून मेल गेल्याशिवाय काम सुरु होणार नाही. त्याने सांगितले, मी लगेच मेल पाठवतो. संध्याकाळपर्यंत मला काही खबरबात नव्हती, की मेल गेली आहे का नाही? निघताना संध्याकाळी झेराला फोन केला, काही मेल आली आहे का अमरेश ची? ती म्हणाली,नाही!! परत मी अमरेशला फोन केला. त्याचा रिप्लाय-‘ मी आज लवकर घरी गेलो’.
ओ माय गॉड!! मला खरच वेड लागायची पाळी आली होती. तशाच तळ्यात-मळ्यात असलेल्या अवस्थेत मी घरी आले!!!
— यशश्री पाटील.
Leave a Reply