एकदा एका लावणीच्या कार्यक्रमाला पु. ल. देशपांडे यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्या नंतर सभागृहात लावणी कलावंताने पुलंना म्हटलं…
‘‘तुम्ही बी तमासगीर हायसा नव्हं!’’
तेव्हा पुलं उत्तरले, ‘एखाद्या कलाकाराने छानसं गायन केलं किंवा अभिनेत्याने नाटक सादर केलं किंवा नतर्कीने नृत्य साकारले, वादकाने सुमधुर वाद्य झंकारले तर त्याला परफॉर्मन्स आर्टिस्ट म्हटल जात, तर त्याच ताकदीने लावणी सादर करणाऱ्या कलावंताना तमासगीर म्हटल जातं.’
खरोखरच आपल्या प्रतिभासंपन्न शब्दसंचाराने गदिमांच्या लेखणीतून प्रत्यक्षात शारदेचं वरदान उमटलं, तर बाबुजींच्या स्वरझंकारातून सरस्वतीच्या सुरेल सुरांचे सप्तक झळाळले आणि पुलंच्या लेखणीतून श्रीविष्णूंचं संगीतमय शब्दलालित्य दृगोचर झालं. या गदिमा, बाबुजी आणि पुलंच्या प्रतिभात्रिवेणीतून जन्माला आलेलं मराठी कलासाहित्य अभिजात आहे आणि कलाकार तमासगीरच आहेत. कारण तमाशा म्हणजे काय…
‘तमापासून आशेपर्यंत रंगत जाणारा खेळ म्हणजे तमाशा!’’
तम म्हणजे अंधारापासून आशेच्या प्रकाशापर्यंत जाण्याचा मार्ग तो तमाशा. हा खेळ मग कोणी निखळ आनंद देणाऱ्या गीतलेखणाद्वारे तर कुणी सकस अभिनयाद्वारे तर आणखी कुणी मनोहारी नृत्याद्वारे साकार करताना स्वत:सह जनसागराला असीम आनंदात डुंबवतो, तो कलावंत तमापासून आशा-अपेक्षांपर्यंत रंगत जाणारा खेळ सादर करतो, तो ख़ऱ्या अर्थाने तमासगीरच म्हणावयास हवा आणि त्या सादरीकरणास तमाशा म्हणावयास हवं.
निवेदिका अनघा मोडक बोलत होत्या. कोमल मृदु वाणीने चोखंदळ रसिक प्रेक्षक तल्लीन होत होते. त्यांनी अभ्यासू प्रतिभेतून निवेदनाची अलितीय पण समयोचित मांडणी करीत, नवनवीन गोष्टींनी अवघ्या सभागृहाच्या मनावर राज्य केल. याच तल्लीनतेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला तो स्वरभास्कर नचिकेत देसाई यांनी प्रस्तुत केलेला ‘कानडा राजा पंढरीचा’ हा गदिमा, बाबुजींचा अभंग. विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिरसात चिंब न्हालेल्या श्रोत्यांनी मग ताल धरला तो नचिकेतच्या सुरेल गळ्यातील पल्लेदार तानेवर आणि नजाकतीने गायलेल्या हरकतीवर.
हा होता क्लायमॅक्स !
सुरेल गळ्याच्या गायिका सोनाली कर्णिक, दीप्ती रेगे, सानिया पंडित यांनी स्वरसाज चढविला तर संगीत संयोजक प्रशांत लळीत, व्यवस्थापक आणि तबला स्वप्निल पंडित, तसेच प्रसन्न पंडित आॅक्टोपॅडवर मोहिते तर तालवाद्यांवर माळी यांनी उत्तम साथ दिल्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. या स्वरांजलीची तरल स्पंदने आसमंत व्यापून गेली.
खरंतर, हाऊसफुल्ल श्रोतृगण आणि मी सलग सव्वातीन तास एकदा खुर्चीवर जे बसलो तो कार्यक्रम संपेपर्यंत… या अप्रतिम मंत्रमुग्ध करणाऱ्या अदाकारीने
एवढा प्रभावित झालो की अगदी ब्रह्मानंद मिळाला… ब्रह्मानंद मिळाला… दुसरे शब्दच नाहीत!
यशवंतराव प्रतिष्ठान नवी मुंबई आणि साहित्य मंदिराच्या संयुक्त विद्यमाने साहित्य मंदिर, वाशी, नवी मुंबई येथे साकारलेला स्वरतीर्थ हा संगीतमय नजराना म्हणजे लाखमोलाची संधी आम्हाला विनामूल्य प्राप्त झाली त्याबद्दल आयोजकांचे मन:पूर्वक धन्यवाद!
लेखक : घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/
Leave a Reply