‘अंधारातून मला प्रकाशाकडे ने’ असा याचा अर्थ. ‘अंधार म्हणजे अज्ञान, कारण अंधारात आपल्याला काही उमगत नाही; पण एक छोटी काडी पेटवली तरी सगळं लख्ख समजतं – ज्ञान होतं’ असाही या वरील ओळीचा गर्भितार्थ !
आज खरोखरच कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अंधार दाटला आहे. आपले पुढे काय होईल आणि कधी व केव्हा सर्व पूर्ववत होईल अशाच अंधिकारमय विचारात सगळेच जण आहेत. दिवाळी अजून लांब आहे पण आता जर दिवाळी असती तरी या अवस्थेत आणि असेल त्या परिस्थितीत प्रत्येकाने घरासमोर दारासमोर किंवा देव्हाऱ्यात दिवा लावला नसता का?? आपली संस्कृती आणि परंपरा ही दिवे लावण्याची, दिव्यांनी ओवाळून स्वतःचे व कुटुंबाचे आयुष्य उजळवून घेण्याची आहे. कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी दिवस असला तरी दिवा किंवा समई पेटवली जाते. दिव्यातून आणि समईतून निघणारी दिव्यज्योत तिच्याकडे बघणाऱ्याला प्रसन्न करते. दिव्यातून तेवणारी दिव्यज्योत म्हणजे अग्नीचे असे एकमेव रूप आहे जे शांत आणि सगळ्यांना हवेहवेसे असते.
ज्ञानेश्वर माउलींनी सांगितल्या प्रमाणे,
दुरिताचें तिमिर जावो |
विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ||
जो जे वांछील तो ते लाहो |
प्राणिजात ||३||
म्हणजेच मानवाचा माणुसकीचा धर्म आपण मानला आणि त्याचा प्रत्यय प्रयेकाच्या जीवनात आला तर त्या धर्मरूपी सूर्याच्या प्रकाशाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन उजळून निघेल. ह्याचा परिणाम असा होईल की, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळेल, कारण जर एका व्यक्तीची मागणी ही जर धार्मिक असेल तर, ती दुसऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल आणि येथे तर “माउलींनी” ‘प्राणिजात’ असे बोलून जगातील यच्चयावत प्राणिमात्रांच्या धर्माची ग्वाही दिली आहे !
आज आपल्या मानवाला गरज आहे याच धर्मरुपी प्रकाशाची ज्यामुळे अंधारातून बाहेर पडण्याची सकारात्मकता मिळेल, ऊर्जा मिळेल, प्रेरणा मिळेल आणि त्याहीपेक्षा आपण सर्व एक आणि एकमेकांसोबत आहोत ही भावना मिळेल.
दीप हे अग्नीचे आणि तेजाचे रूप तर दीपज्योत ही ज्ञानाचे व बुद्धीचे प्रतीक आहे. प्रकाशाचे साधन या दृष्टीने दिव्याला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवसा प्रखर तेजाचा सूर्य हवा, तसाच रात्री छोटासा दिवाही हवाच. ‘दीपज्योति नमोऽस्तु ते’ असं म्हणतच काही घराघरांत रोजची सांजवात प्रज्वलित केली जाते तशाच प्रकारे आज केवळ काही घरात सांजवात न लागता सर्वच घराघरात दिव्याची, मेणबत्तीची, समईची वात पेटवून त्या दिव्यज्योतीने संकटाशी लढण्याची सकारात्मकता उजळून टाका.
आजची दिव्यज्योत माझ्या कुटुंबासाठी, आजची दिव्यज्योत माझ्या घरासाठी, आजची दिव्यज्योत माझ्या माणसांसाठी, आजची दिव्यज्योत माझ्या देशासाठी. जय हिंद.
प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E.(mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply