ताण-तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण-तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण-तणावांना काही देणे-घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे.
पेचप्रसंगात, आणीबाणीत शरीराने दिलेला हा जैविक प्रतिसाद असतो, त्यामुळे ताण-तणाव अनैसर्गिक नसतात. एखाद्यावर टाकलेल्या अपेक्षांचे ओझे किंवा केल्या गेलेल्या अवास्तव मागण्यांमुळे शरीर ताण अनुभवते आणि मग ती प्रतिक्रिया कालौघात शरीराला सवयीची होते आणि त्रासदायकही! ही प्रतिक्रिया एखाद्या खर्या अथवा काल्पनिक परिस्थितीमुळे निर्माण होते.
ताण-तणाव दोन्ही प्रकारच्या परिस्थितीमुळे जन्मास येतात-
१) अंतर्गत कारणे – वृत्ती, स्वभाव, विचार, भावना इ. २) बाह्य कारणे – एखादी दुःखद घटना, नुकसान (हानी), बदल इ.
ताण-तणावांकडे कायम नकारार्थी नजरेने पाहिले जाते. पण ताण सकारात्मकही असतात. त्यांचा व्यक्तीलाही आणि संस्थांनाही फायदाच होतो. वेळेत एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला असे ताण प्रवृत्त करतात, उदयुक्त करतात. मात्र शरीराचे आणि मनाचे प्रतिसाद जर क्षीण व्हायला लागले तर मात्र त्रास सुरु होतात. नकारार्थी ताण घातक असतात. पण त्यांच्याही पायर्या असतात –
अ)प्राथमिक अवस्था – सुरुवात शारीर आणि मानसिक पातळीवर होते. नैसर्गिक समतोल हलतो आणि शरीर लढायला सज्ज होते. मग हृदयाचे ठोके वाढणे, शरीराचे तापमान घटणे, संप्रेरके (अंतःस्राव) निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होणे अशी लक्षणे सुरु होतात. पण ही धोक्याची घंटा नक्कीच दुर्लक्षून चालत नाही.
ब)प्रतिकार अवस्था – अनुत्साह, निद्रानाश, खाण्यातील अनिमियतता, अनावर क्रोध, थकवा(शीण) ही लक्षणे इथे दिसायला लागतात. या पातळीवर शरीर दुरुस्तीच्या कार्याला सुरुवात करते. नुकसानभरपाई हाती घेते. अशावेळी मित्र, कुटुंबीय, सहकारी यांची अवश्य मदत घ्यावी म्हणजे अतिरिक्त ताण येण्यापासून सुटका होऊ शकते. पुढचा टप्पा टाळता येतो.
क)अंतिम अवस्था – एका मर्यादेपलीकडे ताण पोहोचले की ते असह्य होतात आणि एका क्षणी शरीर आणि मनही शेवटी हात टेकते. अशावेळी तीव्र विकृती, पराकोटीची बेचैनी, अनाकलनीय क्रोध असे बदल वागण्यात होताना आढळतात. हतबलतेपोटी आयुष्यावरील नियंत्रण ढासळल्यासारखे वाटते.
ताण-तणाव कुटुंबातील वातावरण, कार्यस्थळावरील वातावरण आणि सामाजिक वातावरण यामुळे निर्माण होतात.
त्यामुळे ताण -तणावांबाबत आपोआप काही समज सगळीकडे सामान्यतः आढळतात.
१) ताण-तणाव सगळ्यांसाठी सारखेच असतात – हे चुकीचे आहे. प्रत्येकाची परिस्थिती, मनोवृत्ती, आणि प्रतिसाद देण्याची पद्धत पूर्णतया वेगळी असते.
२) ताण -तणाव कायम वाईट असतात – हे जर खरं असतं तर शून्य ताण -तणाव अवस्था अतिशय आदर्श आणि आनंदाची बाब बनली असती. व्हायोलिनच्या तारेसारखीच मानवी आयुष्यात तणावाची गरज असतं. त्या तारेला कमी-अधिक ताण दिला तर संगीताची रया जाईल. त्यामुळे तो आणि तसाच अपरिहार्य असतो. मुद्दा आहे की आपण ताणाचे व्यवस्थापन कसे करतो ते! व्यवस्थित केले तर आपण अधिक उत्पादक आणि आनंदी नक्कीच बनू आणि तणावांचे व्यवस्थापन जर चुकले तर फक्त जखमा उरतात आणि त्याचे कदाचित मृत्यू मध्येही पर्यावसान होऊ शकते.
३) ताण-तणाव सर्वदूर असतो आणि त्याबाबत काही करता येत नाही- दिवसाचे /आयुष्याचे नियोजन व्यवस्थित केले तर ताण-तणाव आपल्याला दडपून टाकू शकत नाही. समस्या सारख्याच वाटत असतात आणि त्यांच्यापासून निर्माण होऊ शकणारे ताण सारखेच वाटू शकतात. प्रत्यक्षात नियोजन आणि अग्रक्रम चांगले असतील तर समस्या फार त्रास देऊ शकत नाहीत.
४) ताण -तणाव दूर करण्याची प्रसिद्ध तंत्रे सर्वोत्तम असतातच. – तणाव दूर करण्यासाठी कोणतेही एखादे आणि एखादेच वैश्विक तंत्र नसते. माणसे भिन्न असतात, त्यांच्या समस्या भिन्न असतात, परिस्थितीही एकसारखी नसते आणि मुख्य म्हणजे प्रतिक्रिया /प्रतिसाद वेगळे असतात मग एकाचे औषध दुसर्याला कसे गुणकारी ठरेल?
५) लक्षणं नसतील तर ताण -तणावही नसतात – काही ताण दृश्य असतात .उदा. आरोग्याचे/आर्थिक पण बरेचसे ताण अदृश्य असतात . उदा. नात्यांचे/जीवनाचे. त्यामुळे ताण कमी-अधिक प्रमाणात असतातच फक्त लक्षणांच्या मार्गाने ते दिसतीलच असे नसते. मानस शास्त्रीय किंवा शरीर विज्ञानाच्या पातळीवरील ताण दडून असतात आणि ते पृष्ठभागावर येत नाहीत.
६) फक्त मोठ्या लक्षणांवरच इलाज/उपचार करावेत – थोडक्यात कायतर डोकेदुखी किंवा पोटदुखी सारखी किरकोळ लक्षणे सहज दुर्लक्षिण्याजोगी असतात. प्रत्यक्षात किरकोळ ताण भविष्यातील प्रमुख समस्या बनू शकतात. तेंव्हा अशा निर्देशांकडे अधिक गांभीर्याने बघायला हवे.
ताण-तणावांचे शरीरावरील हल्ले –
अ) आपल्यावर नक्की कशामुळे ताण येतो? सहज एक यादी करू या, सगळ्या शक्यता विचारात घेऊन –
१) आपल्याला हवे तसे घडले नाही की.
२) बर्याचदा घटनांवर नियंत्रण नसल्यामुळे.
३) अनपेक्षित/नावडती परिस्थिती.
४) इतरांना प्रयत्नपूर्वकही म्हणणे समजत नाही तेव्हा.
५) निर्णय चुकले की.
६) कुटुंबीयांची (आरोग्य आणि सुरक्षा बाबतीतील) काळजी.
७) इतरांची मते/टीका.
८) फसवणूक (काही चूक नसताना) झाली की.
९) इतरांची चलता है वृत्ती.
१०) दैनंदिनीत अनियोजित बदल.
११) वेळेचे बंधन.
१२) कामाचे ओझे (आणि त्याबरोबर) भूमिकेबद्दल संदिग्धता.
१३) इतरांची दंडेली /दडपशाही.
ब) ताण जाणविल्यावर कसे वाटते?
१) अस्वस्थता
२) राग/ चीडचीड
३) अपराधीपण
४) नैराश्य/वैफल्य
५) गोंधळलेपण
६) दुःख
७) डोके दुखणे
८) आम्लपित्त
९) परिस्थितीपासून पळ काढावा
१०) इतरांना पटेलसे समर्थन करणे
११) एकाग्रता भंगणे, चित्त विचलित होणे
१२) घाम येणे, हृदयाचे ठोके वाढणे.
क) ताण जाणविल्यावर तुम्ही काय करता?
१) थोडा विराम/विश्राम
२) परिस्थितीशी जुळवून घेणे
३) विचार थांबवून सैलावणे
४) चक्कर मारून येणे
५) इतरांशी गप्पा मारणे
६) अधिक श्रम करणे
७) व्यायाम करणे/तालात श्वास घेणे
८) अंतर्मुख होणे/ध्यानधारणा करणे
९) घटनांकडे/माणसांकडे चक्क दुर्लक्ष करणे
१०) समस्येची अर्थपूर्ण उकल करणे
११) प्रार्थना करणे
१२) सकारात्मक विचार करणे
१३) संगीत ऐकणे
१४) पाणी पिणे
तणाव आणि मानवी शरीरातील प्रक्रिया –
तणावाबाबत सूचना प्रथम मेंदूला पोहोचते. हायपोथॅलॅमस (शरीराचे तापमान नियंत्रित करते आणि अंतःस्रावांचे नियोजन करते) आणि पिट्युटरी ग्रंथींद्वारे (एड्रेनल मार्गे) कॉर्टिसॉल हे संप्रेरक रक्तात मिसळते. कॉर्टिसॉल ला स्ट्रेस हार्मोन मानले जाते. शरीरातील तणाव वाढला की शरीरातील कॉर्टिसॉलचे प्रमाण वाढते. या संप्रेरकांमुळे प्रोटिन्स आणि फॅटी एसिड्समधून ग्लुकोज तयार होते. यामुळे ग्लुकोज मेंदूसाठी राखीव ठेवून शरीरातील संचित फॅट्सचा वापर सुरु होतो. इतरवेळी कॉर्टिसॉल आपल्याला शारीरिक आणि मानसिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सिद्ध करीत असते, चयापचय क्रियेला साथ देते. आघाताच्या वेळी तर कॉर्टिसॉलमुळे शरीरातील ऊर्जेचे प्रवाह वेगवान होतात. संसर्गजन्य आजारांच्यावेळी कॉर्टिसॉलमुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. मात्र प्रदीर्घ तणावांमुळे शरीर सतत कॉर्टिसॉल निर्माण करीत असते. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांच्यावेळी शरीर क्षीण बनते.
मानवी संप्रेरके आणि रोगप्रतिकारशक्ती या दोन भिन्न यंत्रणा नाहीत. त्या आतून जोडलेल्या असतात पण ही जोड क्लिष्ट आणि गुंतागुंतीची असते. या दोघांबरोबर मज्जासंस्था आणि मेंदूतील भावना केंद्र असे सगळे मिळून एक संयुक्त यंत्रणा तयार होते. या सगळ्यांना एक रासायनिक भाषा कळते. त्यामुळे एखाद्याही भागाला तणावांमुळे धक्का पोहोचला तर, अत्यंत गुंतागुंतीच्या घटना शरीरात घडतात आणि परिणामस्वरूप आजार जन्म घेतात- अगदी कॅन्सर सारखेही! उदा. तणावग्रस्त व्यक्ती धूम्रपान करीत असेल आणि ती भावनांचे दमन करीत असेल (क्रोध व्यक्त न करणे वगैरे) तर त्याला फुप्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता बळावते.
या प्रक्रियांना चार गटात विभागता येते –
१) वागणुकीची पातळी – खाण्याची विकृती, मद्यप्राशन, ड्रग, मेदवृद्धी २) शरीर विज्ञान पातळी – रक्तदाब , हृदयाचे अनियमित ठोके, श्वसनास त्रास, डोकेदुखी, मधुमेह ३) भावनिक पातळी – क्रोध, चिंता, खिन्नता, उदासीनता ४) मानसिक पातळी – एकाग्रता, स्मरणशक्तीत खंड, समस्या निवारण. वरील
चारही गटांचा परिणाम उत्पादकता कमी होणे, कामातील/आयुष्यातील आनंद घटणे, नात्यांमधील सख्य/जवळीक उतरणीला लागणे यांवर होतो.
ताण -तणावांचे दुष्परिणाम
रोजचे वृत्तपत्र अथवा वाहिनीचे कोठलेही चॅनल डोळ्यांसमोर आले की विषण्ण करणार्या असंख्य बातम्या आसपास त्रास द्यायला लागतात. राजधानी दिल्लीतील २०१२ साली एका महिन्यातील किशोरावस्थेतील मुलांच्या आत्महत्येची आकडेवारी सहज मांडतो – १०- १५ वयोगट = ५, १५-२० वयोगट = १४, २०-२५ वयोगट = १७ घटना.
आमच्या आर्मीतील जवानसुद्धा याला अपवाद नाहीत. त्यांच्याही आत्महत्येच्या घटना बरेचदा वाचनात येतात आणि त्याबद्दल लोकसभेतही वेळोवेळी चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. वैवाहिक जीवनात अपयश आल्याने वर्षा भोसले (आशा भोसले यांच्या घटस्फोटित कन्या) यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी आत्महत्या केली आहे. कार्टून बघू दिलं नाही म्हणून १३व्या वर्षी एखादा लहान मुलगा फाशी लावून घेतो असंही वाचनात येतं. बंगरुळु विद्यापीठाच्या आवारात कायदा शाखेच्या विद्यार्थिनीवर अत्याचार होतो, पाच वर्षांच्या लहानगीवर सावत्र पिता अत्याचार करतो अशा बातम्यांच्या वाचनाने नकळत ताण येतो. निराश व्हायला होतं. दरवर्षी १०वी आणि १२वी च्या परीक्षांच्या आधी (साधारण जानेवारी -फेब्रुवारी महिन्यांमध्ये) डॉक्टरांच्या कडील विद्यार्थ्यांची/विद्यार्थिनींची गर्दी वाढते. अभ्यासाचा ताण, कुटुंबियांच्या अवास्तव अपेक्षा, अंतर्गत स्पर्धा, गुण/अभ्यासक्रम आणि आसपासचे वातावरण (टी व्ही न बघणे, वृत्तपत्र वाचन नाही, सतत अभ्यासाचे दडपण) यामुळे भूक मंदावणे (न लागणे), झोप न येणे, वाचलेले/पाठ केलेले लक्षात न राहणे अशा सामाईक तक्रारी असतात. काहीवेळी त्या वयात रक्तदाबाचा त्रास सुरु झाला अशा घटना वैद्यकीय क्षेत्रातून झिरपत असतात.
गेली काही वर्षे या काळात समुपदेशनाच्या हेल्प लाईन्स सुरु झालेल्या आहेत. आणि दिवसाला असंख्य विद्यार्थी सदर सेवेचा लाभ(?) घेताना आढळतात. हा शारीरिक पातळीवरील आढावा झाला. मानसिक, बौद्धिक, मनोकायिक आघाड्यांवर ताण-तणावांचे होणारे ज्ञात-अज्ञात परिणाम वेगळे अभ्यासाचे विषय आहेत.
सध्या कोरोना विषाणूच्या वैश्विक घाल्याने आपण सगळे बेजार झालो आहोत, हतबल झालो आहोत. या न भूतो न भविष्यती परिस्थितीचा प्रत्येकालाच वेगवेगळ्या पातळ्यांवर सामना करावा लागतोय आणि तोही बहुतांशी पूर्वतयारीविना! सर्वच आघाड्यांवर गोंधळाची परिस्थिती आहे, शस्त्रसज्जता नाही आणि समोरच्या शत्रूचा अदमासही लागत नाही. रात्रंदिवस अंगावर येणारी आकडेवारी भयावह आहे.
त्यासाठी एक नवा शब्द तयार करण्यात आला आहे – ” कोरोनंगझायटी!”
सतत आजारी पडू, करोनामुळे मृत्युमुखी पडू, संसर्गाची भिती वाटणे, उपजीविकेचे साधन (नोकरी/व्यवसाय) गमावणे, एकट्याने काम करण्याचे भय वाटणे आणि करोनाचा प्रादुर्भाव झालाच तर नोकरीवरून काढून टाकण्याची भिती या सार्या भावना यांत समाविष्ट आहेत.
फक्त हे लक्षात घ्यायला हवे – कोरोना हा विषाणू अलीकडचा, त्यामानाने ताण -तणाव नामक विषाणू दीर्घायू आहे, त्याचे परिणाम अधिक दूरगामी आहेत.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply