सत्तरच्या दशकात ठाणे शहरातली पॉईंट-टू-पॉईंट वाहतूक टांग्यानेच होत असे. रिक्षा फारच नंतर आल्या. टांगे एक घोड्याने ओढण्याचे असायचे तसेच दोन घोड्यांनी ओढायचे देखील असायचे.
टॉक-टॉक..टॉक-टॉक.. असा लयदार आवाज काढत हे टांगे गावातून फिरायचे.
माझ्या घरासमोरून जाणाऱ्या दोन घोड्यांच्या टांग्याचा आवाज माझ्या कानात अजूनही ताजा आहे. ठाणे आणि टांगा यांचं नातं कदाचित अतूट असावं कारण शहरातल्या वाहतूकीसाठीचा टांग्याचा वापर बंद झाल्यावरही अनेक वर्षे टांगे एका वेगळ्या सजवलेल्या रुपात तलावपाळीची फेरी करण्यासाठी सुसज्ज आहेत. वाहतुकीच्या कारणांमुळे अनेकदा विरोध होऊनही अजूनही कोणी टांगा बंद करु शकलेले नाही.
आता आपण तलावपाळीवरचे सजवलेले टांगे बघतो. मात्र त्याकाळी टांग्याचे पासिंग नावाचा एक प्रकार असायचा. वर्षातला एक दिवस सगळे टांगे सेंट्रल मैदानाजवळ जमा व्हायचे. सजवलेले हे टांगे बघण्यासाठी तमाम ठाणेकर हजर असायचे. जसा टांगा सजवला जायचा तसेच घोडेही सजवले जायचे. मग म्युनिसिपालटीचे अधिकारी त्या टाग्यांची तपासणी करुन त्यांना नंबर देत असत. मला आठवतंय, माझ्या घराच्या मागच्या गल्लीतल्या टांगेवाल्याचा टांगा जवळपास ६-७ वर्ष नित्यनेमाने पहिला नंबर घ्यायचा. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तो टांगेवाला जवळपास रहाणार्या आम्हा बच्चेमंडळींना कधी बर्फाचा गोळा तर कोल्ड-ड्रिंक देत असे.
हे टांगे स्टेशन ते जांभळी नाका आणि स्टेशन ते टेंबी नाका असाच प्रवास करत. प्रवासाचं भाडं सीटवर असायचं. माझ्या आठवणीत मी २५ पैशात स्टेशन ते टेंबी नाका असा प्रवास केलाय. मात्र टेंबी नाक्याच्या पुढे जायचं असेल तर “स्पेशल टांगा” करायला लागायचा. मात्र मनोरपाड्याचे काही टांगेवाले आम्हाला संध्याकाळी ऊशीरा “डिस्काऊंट”मध्ये घरपोच सोडत असत. सकाळीही लवकर कुठे जायचं असेल तर टांगेवाल्याला निरोप जायचा आणि मग तो अगदी सकाळी पाच वाजतासुद्धा टांगा घेऊन दरवाजात हजर व्हायचा.
या टांग्यांच्या घोड्यांच्या डोळ्याना झापडं लावलेली असायची. कारण असं कळलं की त्यांनी टांगा ओढताना इकडे-तिकडे बघून लक्ष विचलित होऊ नये म्हणून अशी झापडं बांधतात. त्या झापडांचा उपयोग व्हायचाच. मात्र जर एखाद्या प्रवाशाला हा स्टेशन ते टेंबी नाका या मार्गाव्यतिरिक्त कुठे वळायची वेळ आली तर मात्र एक स्पेशल सिन व्हायचा. अशा वळणावर त्या टांगेवाल्याची कसोटी असायची. बिचार्याला खाली उतरुन त्या घोड्याला हव्या त्या बाजूला खेचून-खेचून वळवावे लागे. घोडा मूडमध्ये असला तर वळायचा नाहीतर इतके नखरे करायचा आणि कधीतरी मस्तपैकी रस्त्यातच बसकण मारायचा.
राममारुती रोडवरील काही सुखवस्तू कुटुंबांकडे त्यांचे स्वतःचे टांगे असायचे. त्यांच्याही आठवणी वाचूया पुन्हा केव्हातरी.
वाहतूकीची कितीही आधुनिक साधने आली तरी ठाण्याच्या टांग्याचा तो प्रवास कायमचा आठवणीत राहील.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply