नवीन लेखन...

तंत्र आणि मंत्र (माझी लंडनवारी – 24)

विम्बल्डनहून परत येवून Paddington स्टेशनवरच थांबलो. इतकं चालून पायांचे तुकडे पडले होते. परत घरी जावून प्रियाला आणायला येण्याइतक उत्साह नव्हता आणि त्राण ही नव्हते. बरं स्टेशन पण इतकं स्वच्छ होत. आम्ही एका मोकळ्या जागेत चक्क फतकल मारून जमिनीवर बसलो. मांडी घालून पायांना जरा बरे वाटले. एका हातात पॉप कॉर्न, बाजूला कॉफीचा मग आणि तोंडाने बडबड असा एकंदरीत आमचा अवतार होता. त्यातून केस विस्कटलेले, चेहरा दमलेला, कपड्यांचा अवतार. नशीब कोणी भिकारी समजून पैसे नाही टाकले. आमच्याशिवाय कोणीच अस खाली बसलेलं नव्हत. पण ते लंडन होतं, त्यामुळे कोणाला आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता आणि आम्हाला पण काही फरक पडत नव्हता. मी आणि उमेश असे जवळ जवळ एक ते दीड तास बसलो होतो. आता घड्याळात 8.45 झाले होते. पण प्रियाचा पत्ता नव्हता. शेवटी आम्ही घरी आलो.आणि तिथे निलेशच्या रूममध्ये गेलो.तिथे कळले की,प्रिया कधीच हॉटेलवर आलीय. तिला सेकंड फ्लोअरला रूम मिळालीय. मग आम्हाला कशी नाही दिसली? आम्ही तर हिथ्रो एक्स्प्रेस आणि ट्युब ट्रेनच्या जंक्शनलाच बसलो होतो. आमचा अवतार बघून आम्हाला तिने निग्लेक्ट केलं की काय?

त्यात निलेशची विशेष टिपण्णी, एकदम गोरी-चिट्टी मुलगी आहे बरं का.. तुझ्यापेक्षा सहापट!! हा ही पुलंकित होता तर! आधी कधी विषय नव्हता झाला. पण अचानक तारा कशा जुळल्या त्याच रहस्य आत्ता उलगडलं. एकदम मनापासून माझ्याकडून आणि ऊमेशकडून दाद गेली.

आत्तापर्यंत गोरी आहे,माल आहे असं ऐकलं होतं. गोरी-चिट्टी पहिल्यांदाच ऐकलं. मस्त वाटला तो शब्द प्रयोग! थोडा सभ्यतेला धरुन वाटला. लगेच मी ताईगिरी दाखवली.फ्लर्टिंग नको सुरु करुस बर का! She is under my responsibility. आणि मी तुमच्याबरोबर रहाते म्हणून माझं नाव पण खराब होईल.अशी थोडीशी दटावणी करुन लंडनमध्ये मिळालेल्या उपाधीचा हक्क बजावला.

असो. खूप दमलो असल्यामुळे तिला उद्याच भेटू असे ठरवून मस्त मोठ्या मगभर दूध पिवून मी माझ्या रूम मध्ये झोपायला गेले. जेवायची पण ईच्छा नव्हतीच. दमल्यामुळे पटकन डोळा लागला आणि रात्री 11.00-11.30 चा सुमार. दारावर टक टक झाली. मी दचकून उठले आणि दार उघडले तर बाहेर प्रिया.. ‘यश, मैं प्रिया, रंगप्रिया, मुझे अकेले बहोत डर लग रहा है, मैं तुम्हारे साथ सो सकती हुँ क्या? ‘

इतकी इनोसंट आणि बालिश, अल्लड होती ती! तिचं रंगप्रिया नाव, यश हाक मारून तिने साधलेली जवळीक आणि गोरं-चिट्टं रूप. सगळच impressive होतं.  त्या 2 मिनिटात आम्ही दोघी छान मैत्रिणी झालो. मग झोप कुठच्या कुठे पळाली. मस्त गप्पा मारत बसलो.

तरी ती तशी दमलेली होती आणि मी पण, म्हणून नाईलाजाने 12.30-1ला झोपलो. ती बंगलोरची होती आणि पहिल्यांदाच एकटं राहायची वेळ होती तिची. ती भुता-खेतांवर विश्वास ठेवणारी होती.मला फारच हसायला आलं हे ऐकून.आणि झालं अस की, इथे wooden flooring असल्यामुळे आणि थंड वातावरणामुळे ते कर् कर् अस वाजत असायचं. किंवा कोणी वरच्या मजल्यावरून चालत गेले की flooring वाजयच. त्या आवाजाला ती घाबरली. आधीच भुताखेतांवर विश्वास, त्यातून हा आवाज आणि तशात तिने इंग्लिश हॉरर मूव्हीज बरेच पाहिलेले असल्याने तिची भीतीने गाळण उडाली आणि तिला झोपच आली नाही. हे सगळं ऐकून मला हसावं का रडाव कळेना. तिला समजावून सांगितले अग, भूत वगैरे काही नसतं. तू झोप शांतपणे. आणि मनात म्हटलं मला पण झोपू दे शांत!

तर अशी ही आमची इंटरेस्टिंग पहिली भेट! सकाळी 9-9.30 ला उठलो आणि फ्रेश होवून ब्रेक फास्टला निलेशच्या रूममध्ये.तिथे तिची आधीच ओळख झाली होती. कारण ती आली तेंव्हा ही लोक रिसेप्शन मध्येच होती. त्यामुळे ओळख करून द्यायचा प्रश्नच नव्हता. कालचा प्रसंग तिने सगळ्यांना सांगितला. त्यावर संतोषची reaction, अग! लंडन मधली सगळी घर वास्तुशास्त्रानुसार बांधलेली आहेत.इथे ती काळजी खूप घेतात.त्यामुळे इथे haunting चा त्रास नाही होणार. एक Windsor Castle आणि एक कुठलं तरी underground स्टेशन आहे लंडनला जिथे एका बाईचं भूत बघितल्याचे लोकांनी पहिले आहे. मी कपाळावर हात मारला. त्याला म्हणाले, डरे हुवे को औंर क्यों डरा रहे हो? तर, तो माझ्याशीच वाद घालत बसला. जशी चांगली प्रवृत्ती असते तशी वाईट प्रवृत्ती सुद्धा असते. नाण्याला दोन बाजू असतात. मी म्हणाले, तू देव कधी पहिला आहेस का? मग भूत तरी कस असेल?

तर त्याचं उत्तर,’पण! देव असल्याची जाणीव झाली आहे ना तुला? अनुभव तरी आला ना जिथे तू मान्य केल असशील देवच पाठीराखा! तसच हे पण आहे. भुतप्रेत पाहिलं नाही तरी त्यांचा अनुभव येवू शकतो!’  इथे माझी बोलती बंद झाली. त्याचा प्रतिवाद बरोबर होता.पण मुळातच भित्यापोटी ब्रह्मराक्षस ह्या मताची मी असल्यामुळे मी त्या गोष्टींवर विश्वास ठेवणे शक्य नव्हते.मग गाडी इंग्लिश लोकांच्या अंधश्रद्धेकडे वळली.त्याच्याकडे ह्या गोष्टींचं अगाध ज्ञान होतं. इथे सुद्धा लोक इतकी अंध श्रद्धाळू आणि haunting वर विश्वास ठेवणारी आहेत, हे ऐकून खूपच आश्चर्य वाटलं. विषय खूपच इंटरेस्टिंग होता, पण तो तिथेच थांबवून पुढचे प्लॅनिंग गरजेचं होतं. आपण अशा एखाद्या haunted place ला visit करूया का? असं मी विचारल्याबरोबर निलेश आणि कार्तिक सोडून सगळे माझ्यावर तुटून पडले. उगीच कशाला विषाची परीक्षा वगैरे सुरू झालं. शेवटी भूत प्रेत नको, पुतळे बघायला जावू, न जाणो त्यातला एखादा हलायला किंवा बोलायला लागेल… अशी थोडीशी मजा करून प्रियाच्या घाबरण्यात मी अजून भर टाकली. ती आधी यायलाच तयार नाही.शेवटी तिला कसं बसं तयार केलं.

अरे! आज 15 ऑगस्ट आहे. हाईड पार्कच्या स्पीकर्स कॉर्नरला उभ राहून ज्यांनी आपल्यावर राज्य केले आणि लुटण्यासारख काही उरलं नाही म्हंटल्यावर स्वातंत्र्य बरोबर फाळणीसारखे कटू सत्य झोळीत टाकून चालते झाले, त्यांच्याच देशात, त्यांच्या भूमीवर राष्ट्रगीत म्हणावे, असा एक क्रांतिकारी विचार माझ्या मनात आला आणि तो अमलात आणण्यासाठी आम्ही आमचा मोर्चा लगेच हाईड पार्ककडे वळवला. तिथे स्पीकर्स कॉर्नरला उभे राहून तुम्ही राणीला पण शिव्या घालू शकता. तुम्हाला अटक होत नाही.असा आम्ही ऐकलं होतं. मग तिथे उभे राहून आम्ही हळू आवाजात राष्ट्रगीत म्हंटले. इतकी शांतता होती तिथे की ती भंग करायची हिंमत नाही झाली. आणि ना जाणो पटकन कुठून बॉबी उगवला आणि बोलला तर? तरीही त्यांच्या देशात त्यांच्या भूमीवर आपलं राष्ट्रगीत म्हणून आम्ही आमची राष्ट्रभक्ती जागवली.

आता आम्ही मोर्चा ‘मादाम तुसॉद म्युझिअमकडे वळवला. तिथे पोहचलो आणि कळलं की आज तो ‘टॉवर ब्रीज’ ओपन होणार आहे. तिथून एक मोठी शिप पास होणार आहे.

त्या पुतळ्यांना तसच तिष्ठत ठेवून परत आमची गाडी टॉवर ऑफ लंडन कडे वळली.पूर्ण झोनचा पास असल्यामुळे इकडे तिकडे जाण सोप्प होतं.

टॉवर ऑफ लंडनपाशी मोक्याची जागा पकडून आम्ही ब्रीज ओपन होण्याची वाट बघत बसलो. बराच वेळ झाला तरी काहीच हालचाल नव्हती. अरे! हे काय! कॅन्सल झाली की काय शिप! अशी शंका मनात आली. पण आमच्यासारखे अजूनही बरेच टुरिस्ट आजूबाजूला कॅमेरा सरसावून उभे होते. त्यामुळे अजून आशा होती.आणि थोड्याच वेळात पोलिसांच्या गाड्या, शिट्या, Siren ऐकू यायला लागले. ब्रिजच्या दोन्ही बाजूचे रस्ते बंद झाले. हळू हळू ब्रीज मधोमध दुभंगून वरती जायला लागला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अद्भुत चमत्कार आमच्या डोळ्यासमोर घडत होता. थोड्याच वेळात ब्रीज पूर्ण ओपन झाला आणि लांबवरुन एक शिप झपाट्याने येताना दिसली. जसं काही त्या शिपला welcome करण्यासाठी ब्रीजने आपले बाहू उंचावले होते. शिप पास झाल्यावर हळू हळू ब्रीज परत खाली येवून पूर्ववत रस्ता झाला आणि गाड्यांची ये – जा सुरू झाली. हा अद्भुत चमत्कार बघून आम्ही मादाम तुसॉदच्या पुतळ्यांसारखे स्तंभित झालो.

मगाशी भेटलेला अंधश्रद्धाळू, हॉन्टेड गोष्टींवर विश्वास ठेवणारा इंग्रज खरा का आपल्या देशावर, राणीवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास ठेवून जगावर राज्य करणारा इंग्रज खरा?

अशा विचारात त्या उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा नमुना असणार्‍या त्या कलाकृतीला मनोमन नमस्कार करुन म्युझिअमकडे निघालो.

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..