“अरे किशोरभाई एकटेच काय बसलाय?“
प्रश्नकर्त्याकडे किशोरभाईनी आश्चर्यानं पाहिलं. त्यांना काही त्याची ओळख पटेना. गृहस्थ, गृहस्थ कसला, तो चांगला पोरगेलासा दिसत होता. तरणाबांड, गोरापान. टी शर्ट, जीन पॅन्टमध्ये रुबाबदार दिसत होता. गळ्यात मोबाइल लटकत होता. त्यांच्याकडे हसून पाहत होता. जवळ येताच उंची सेंटचा मादक सुगंध दरवळला.
“कोण तुम्ही? मी नाही ओळखलं तुम्हाला!”
“अरे किशोरभाई, गेल्या आठवड्यातच नव्हतो का तुमच्या घरी आलो? प्राणसुखलाल बरोबर? नवीन दागिन्यांची ऑर्डर द्यायला?”
प्राणसुखलालचं नाव येताच किशोरभाईला ओळख पटली. तेव्हा हा गृहस्थ पांढराशुभ्र लेंगा-झब्बा घालून आला होता. कपड्यामुळे माणसात एवढा फरक पडतो? त्याला आठवलं, तेव्हा पण तो घरात आला त्यावेळी असाच सुगंध पसरला होता. स्वारी सेंटची शौकीन दिसत होती.
”हां, हा. आता आठवलं. अरे बसा ना, सांगा काय घेणार? ”
किशोरभाईनी खरंतर औपचारिकच आमंत्रण दिलं होतं. त्यांना वाटलं होतं तो नको “थॅंक यु” म्हणून कटेल पण तो त्यांच्याच शेजारी बसला सुद्धा. तसं त्यांना मनातून थोडं बरंही वाटलं. काही पिणाऱ्या लोकांना एकट्याने पीत बसायला आवडत नाही. त्यांना कंपनी लागते. किशोरभाई पण त्यातलाच होता. आणि हा नवा पाहुणा दिलदार दिसत होता. मैत्री करायला काहीच हरकत दिसत नव्हती. शिवाय तो त्याच्या गिऱ्हाईकाच्या म्हणजे प्राणसुखच्या ओळखीचा होता. किशोरभाईच कळव्याला जवाहिऱ्याचं दुकान होते. पण धंदा नीट होत नव्हता. म्हणून दुकान बंद करून त्यांनी ठाण्याला आपल्या घरीच धंदा सुरु केला होता.
अजून फारशा ओळखी झाल्या नव्हत्या. म्हणजे पिण्याच्या कार्यक्रमात या सहभागी होईल अशा. त्याने दोन पेग मागवले. मग खाण्याचे पदार्थही मागवले आणि या नव्या पाहुण्याला त्याचं नाव विचारलं.
”मी मगनलाल, मगनलाल व्होरा. इथेच गोखले रोडवर आमचे मोठे दुकान आणि शोरूम आहे. ड्रेस मटेरियलचे सम्राट. ऐकलं असेल तुम्ही. ”
“हो हो ऐकलंय ना. मोठा धंदा आहे तुमचा.”
“आहे आपला पोटापुरता”
“वा! म्हणजे तुमचे पोट फारच मोठं असलं पाहिजे.”
दोघेही हसायला लागले. मगन म्हणाला, ‘ ‘प्राणसुख आमचे सगेवाला आहे. परवा सहजच आलो होतो त्याच्याबरोबर.
मगनलाल खूपच बोलघेवडा होता. त्याच्याबरोबर गप्पा मारण्यात दोन तास कसे गेले याचा किशोरभाईला पत्ताच लागला नाही. शेवटी उठता उठता मगनलालने किशोरभाई नको म्हणत असता चपळाईने दोघांचं बिल दिलं.
“अरे अरे मगनभाई हे काय केलं तुम्ही? तुम्ही माझे गेस्ट होता, तुम्ही बिल दिलं ते मला नाही आवडलं. ”
“अरे किशोरभाई, मान ना मान मै तेरा मेहमान, म्हणून मी जबरदस्तीने घुसलो तुमच्या पार्टीत. तुमची ओळख झाली, खूप आनंद झाला. आता पुढच्या खेपेस द्या तुम्ही बिल.”
मग त्यांची ओळख वाढत गेली. आठवड्यातून दोन-चार वेळा त्यांचा अड्डा संध्या-किरण मध्ये जमू लागला. मगनने आपला दोस्त मनोज शहा याला पण आणलं. मग त्या तिघांचा छान गुप जमला. मनोज शहा ठाण्यातला एक मोठा बिल्डर – अरिहंत गुप च्या मालकाचा मुलगा होता. दोघेही श्रीमंत बापाचे बेटे होते. किशोरभाई पण तसा वयाने फार मोठा नव्हता. शिवाय त्यांची दोस्ती धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर होईल असं वाटलं किशोरभाईला. ठाण्यात नवीन दुकानासाठी मनोजसारख्या मोठ्या बिल्डरची दोस्ती बरी होती.
किशोरभाईचा धंदा सकाळी आणि संध्याकाळी चालायचा. दुपारी ते मोकळा असे. रात्री उशिरा घराजवळच संध्या-किरण मध्ये बसायला तो उत्सुक असे. धंद्याच्या निमित्ताने त्याच्या घरी चार पाच लाखांचा माल नेहमीच असे. सगळा माल घरातल्याच सेफमध्ये ठेवून तो किल्या हॉलमध्ये ठेवायचा. घराची मुख्य चावी आणि सेफच्या चाव्या एकाच जुडग्यात होत्या. अधून मधून मगन आणि मनोज दुपारी पण किशोरभाईच्या घरी पार्टी करीत. त्याचे छानछौकीचं राहणे, पैशाची उधळपट्टी किशोरभाईला जरा जास्तच वाटायची. पण बडे बापके बेटे, त्यानी नाही ऐष करायची तर कोणी’ त्याचे पैसे ते उडवतात आपल्याला कशाला चिंता? शिवाय पिणाऱ्या लोकांना मुख्य मतलब एकमेकांना कंपनी देण्यापलीकडे फारसा नसतो.
अशातच किशोरभाईची बायको दोन मुलाना घेऊन माहेरी तिच्या भावाच्या लग्नाला गेली. ती महिनाभर तरी येणार नव्हती. मग तर काय पार्ट्यांना ऊतच आला. मुलुंडला जाऊन आरमॉल मध्ये पिक्चर पाहणं, घोडबंदर रोडला सिनेवंडर मध्ये पिक्चर पाहणं, तिकडेच खाणं-पिणं असा त्यांनी कार्यक्रमाचा दणकाच उडवला. याच दिवसांत किशोरभाईकडे एक मोठी ऑर्डर आली. त्या कामात तो खूप बिझी होता म्हणून चार -पाच दिवस पार्टीत खंड पडला. तेव्हा मगन म्हणाला, ‘ ‘यार किशोर, तू धंद्यात फारच गुंतलास, थोडा आमच्यासाठी पण वेळ काढ ना दोस्त. ‘
“मगन, हे हातातलं काम उद्या संपेल. मग आपण उद्या रात्री घरीच बसू मी सगळी तयारी करतो. एवढी जोखीम घरी ठेवून मला बाहेर येणं जमणार नाही.”
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रात्री ते त्रिकुट जमलं. केबलवर मनोजने पैदा केलेला अश्लील चित्रपट पाहत खाण्या-पिण्यावर ताव मारला. रात्री दोन वाजता दोघे परत गेले. किशोरभाईने त्यांना निरोप दिला. घराचा मुख्य दरवाजा बंद केला आणि तीन-चार दिवसांचा कामाचा शीण आणि आत्ताची संगीत पार्टीची धुंदी यामुळे जडावलेलं शरीर त्याने बिछान्यावर झोकून दिलं आणि तो घोरू लागला.
सकाळी उठल्यावर सगळं आवरून प्राणसुखची ऑर्डर त्याच्याकडे पोहोचती करायची म्हणून त्याने कपाट उघडून सेफ उघडला आणि त्याचे डोळेच पांढरे झाले त्याची धुंदी खाडकन उतरली. सगळा सेफ साफ! दहा लाखांचा माल एका रात्रीत गायब! अरे मारा बाप ! म्हणून तो मटकन खालीच बसला. त्याला काही सुचेना. भानावर यायला त्याला थोडा वेळ लागला. त्याने सेफ बंद करून कपाटाला चावी लावली. दारं-खिडक्या बंद केल्या आणि धूम ठोकली ती थेट जवळच्याच बी-केबिन पोलीस चौकीकडे!
बी-केबिनचे सब इन्स्पेक्टर चंद्रशेखर वाघ आपले सहकारी नाईक हवालदार श्री मोरे, हवालदार श्री. भोसले आणि श्री. कांबळे यांच्याकडून कामाचा आढावा घेत होते तोच अतिशय घाबरलेल्या किशोरभाईने आत प्रवेश केला.
साहेब ! साहेब ! सत्यानाश झाला साहेब ! मी साफ बुडालो साहेब ! एका रात्रीत माझा दहा लाखाचा माल गेला साहेब! माजा माल शोधून द्या साहेब! मला वाचवा! एवढं बोलायलासुद्धा त्याला धाप लागली होती.
वाघसाहेबांनी प्रथम त्याला शांत व्हायला सांगितलं. “बसा” म्हणाले आणि हवालदार कांबळेलापाणी आणायलापिटाळलं. तो बसल्यावर ते म्हणाले,
“हं सांगा आता कोण तुम्ही? काय नाव तुमच? काय झालं? काय मदत करू? काही घाबरू नका”
‘साहेब सगळं घर बंद असताना माझ्या घरातून दहा लाखांचे दागिने चोरीला गेले साहेब’
“ हे पाहा अस अर्धवट सांगू नका. शांत व्हा. तुमच नाव कुठं राहता, कधी चोरी झाली सगळा तपशील सांगा म्हणजे आम्हाला तपास करता येईल.”
‘साहेब माझ नाव किशोरभाई ओसवाल. मी इथे जवळच ओसवाल पार्कमध्ये राहतो माझा जवाहिऱ्याचा धंदा आहे. एका गिऱ्हाईकाची दहा लाखाची ऑर्डर पुरी करून मी माल काल रात्री माझ्या हाताने घरातल्या कपाटात ठेवला. सकाळी पाहतो तर माल गायब!
“काय? बंद घरातून चोरी? तुम्ही कुठे बाहेर गेला होता का? दरवाजे – खिडक्या नीट बंद केल्या होत्या का?”
“साहेब काल रात्री मी स्वत: माल ठेवला आणि त्यानंतर मी घरीच होतो. कुठेही गेलो- आलो नाही. एवढी मोठी जोखीम घरात ठेवून मी कसा बाहेर जाईन साहेब?”
“ठिक आहे” वाघसाहेबांनी हवालदार कांबळेंना सगळी तक्रार सविस्तर लिहून घ्यायची सूचना दिली. वरिष्ठांना गुन्ह्याची माहिती कळवली आणि किशोरभाईची लेखी तक्रार दर्ज झाल्यावर त्याला घेऊन ते निघाले. बरोबर नाईक हवालदार मानेंना घेतलं. ओसवाल पार्क त्यांना माहीत होता. तिथे बहुतेक गुजराती व्यापारीच राहत होते. सगळ्या फ्लॅटची दारं -खिडक्या मजबूत जाळ्यांनी बंद केलेली होती. बाहेरून चोरी होण्याची शक्यता नव्हती. इमारतीत गुरखा पण होता.
त्यांनी फ्लॅटची बारकाईने तपासणी केली. सर्व दार – खिडक्या काळजीपूर्वक तपासल्या. किशोरभाईच्या म्हणण्याप्रमाणे घरफोडीचा प्रकार दिसत नव्हता. रीतसर पंचनामा केला. कपाटावरचे, सेफवरचे हाताचे ठसे घेतले. हे चालू असतानाच त्यांनी किशोरभाईची तपासणी केली.
”किशोरभाई, तुमचा कुणावर संशय?”
”नाही साहेब. ”
”दागिने घडविणारे कामगार, घरातले नोकर -चाकर?”
”नाही साहेब. दागिने घडविणारी माझी जुनी माणसं आहेत. विश्वासू आहेत. धुणी- भांडी करायला येणारी मोलकरीण दुपारीच येते. स्वयंपाकाला एक आचारी महाराज येतो पण तो काल रात्री आला नव्हता. म्हणजे मीच त्याला रजा दिली होती. ”
”सुट्टी? मग रात्रीच्या जेवणाचं काय केलं? का जेवलाच नाहीत? ”
”जेवलो ना साहेब. पण काल रात्री माझे दोन मित्र आले होते. काल आमची ड्रिंक पाटीं होती. ड्रिंकबरोबर खाणं पण होतं, ते मी आधीच येताना आणलं होते. त्यामुळे आचाऱ्याला सुट्टी दिली होती. ”
”कोण मित्र आले होते? ”
”मगनलाल व्होरा आणि मनोज शहा. ”
”असं, त्यांच्यावर काही संशय? ”
”छे, छे साहेब, ती बडी माणसं आहेत. मगनलालचा गोखले रोडवर मोठा शोरूम आहे – सम्राट. ठाण्यात फार प्रसिद्ध आहे. मनोज शहा अरिहंत बिल्डर्स या बड्या बिल्डर मालकाचा मुलगा आहे. ते कशाला अशा चोऱ्या करतील? शिवाय पार्टी संपल्यावर मी स्वत : त्यांना निरोप देऊन घर बंद करून झोपलो. छे छे साहेब, त्यांच्यावर माझा काही संशय नाही. ”
”किशोरभाई, तुमच्या म्हणण्याप्रमाणे दागिने तुम्ही स्वतःच्या हाताने ठेवल्यानंतर सकाळी पुन्हा ते काढून घेईपर्यंत कोणीही त्या दागिन्यांना हात लावला नव्हता, खरं?”
”होय साहेब. ”
”मग एक तर तुम्ही खोटं बोलता आहात किंवा तुम्ही स्वतः किंवा तुमच्या दोस्तांच्या मदतीने ते दागिने हडप करण्याचा तुमचा डाव असावा.”
”छे, छे’ काय बोलताय साहेब आपण? अहो मी माझेच दागिने चोरीन? नाही नाही साहेब. मी तसं काही केलेलं नाही आणि माझ्या मित्रांनीही असं काही केलं असेल असं मला वाटत नाही. मी खरं सांगतोय साहेब.”
”ठीक आहे. आम्ही आमच्या पद्धतीने तपास करतो, पण तुम्हाला पुन्हा सांगतो, माझ्यापासून काहीही लपवू नका. ”
”नाही साहेब. मी खरं तेच सांगतोय. पण चोरी झाली हे सत्य आहे साहेब. ”
वाघसाहेबांनी चौकीवर परतल्यावर ताबडतोब मगन आणि मनोजच्या घरी फोन करून त्या दोघांना ताबडतोब बोलावलं.
दोघेही निरोप पोहचताच लगोलग आले. वाघसाहेबांसमोर बसले. त्यांची ही पोलीस स्टेशनवर यायची पहिलीच वेळ असावी. पोलीस स्टेशनवर बोलावल्यावर भल्याभल्यांची गाळण उडते. गुन्हा केला नसतानाही येणाऱ्याच्या मनावर दडपण येतं. त्यामुळे एखादी व्यक्ती घाबरली आहे म्हणजे ती गुन्हेगारच आहे असं नसतं हे वाघसाहेबाना समजत होतं. पण त्यांच्या आजवरच्या अनुभवावरून त्यांना अपराधी आणि निरपराधी यांची पारख करता येत होती. आणि ती क्वचितच चुकत असे. मनोज आणि मगन वरवर जरी साळसूदपणाचा आव आणत होते तरी आतून धास्तावले आहेत, हे वाघसाहेबांनी ओळखलं.
”हा मनोजभाई, मगनभाई तुम्हाला कशाला बोलावल ठाऊक आहे का? ”
”नाही साहेब, घरी निरोप मिळाला तसं आम्ही लगेचच आलो. आमची काही मदत हवी का आपल्याला?”
”छे, छे. मदतबिदत काही नको. तुम्ही किशोरभाई ओसवालला ओळखता का?”
“हो साहेब. चांगलं ओळखतो. ते आमचे जवळचे मित्र आहेत. त्याना काय झालं आहे का साहेब? ते ठीक आहेत ना?”
“हो, ते ठीक आहेत. पण काल रात्री त्यांच्या घरातून दहा लाखाची चोरी झाली.” हे सांगत असताना वाघसाहेबांनी आपली भेदक नजर दोघांवर रोखली. एक क्षणभरच त्या दोघांची चलबिचल झाली, पण उघडपणे ते म्हणाले,
“काय चोरी? काय सांगताय काय साहेब? आम्हाला तर काहीच पत्ता नाही. किशोरभाईना आमचा संशयबिंशय तर नाही? त्यांनी आमच्या विरूद्ध काही तक्रार तर नाही ना केली साहेब?”
“छे, त्यांनी तशी काही तक्रार केलेली नाही. उलट त्यांचा तुमच्यावर बिलकुल संशय नाही.”
हे ऐकताच दोघांच्या चेहऱ्यावर ‘सुटलो बुवा’ असा भाव दिसला.
“हो, पण तुम्ही दोघं रात्री बराच वेळ त्यांच्या घरी होता पार्टी होती म्हणून सांगितलं त्यांनी”
‘ ‘हो साहेब, तसं तर आम्ही बरेचवेळा भेटतो. त्यात विशेष काही नाही. ”
वाघसाहेबांनी दोघांच्या शारीरिक हालचालींवरून, बॉडी लॅग्वेज, काही आडाखे बांधले होते.
”ठीक आहे. तुम्हाला बोलावलं ते तुमच्या हाताचे ठसे हवेत म्हणून आणि तुमचे फोटोही हवेत मला ”
”हो हो साहेब, घ्या ना, फोटो पण देतो पाठवून. ”
ते गेल्यावर वाघसाहेबांनी नाईक हवालदार माने आणि हवालदार भोसले आणि कांबळेंना बोलावलं.
“माने, माझी खात्री आहे ही पोरंच गुन्हेगार असणार याची! आता त्यांना आत घेतलं असतं तर पोपटासारखे बोलले असते. पण प्रथम मी माझे तर्क तपासून पाहणार आहे.”
“माने, त्यांचे फोटो आले म्हणजे तुम्ही या भागात जेवढे चावीवाले आहेत त्यांना ते दाखवा, पाहू कोणी ओळखतोय का. आणि भोसले, कांबळे तुम्ही या मजनूंची माहिती काढा. धंद्यात किती लक्ष आहे, स्वतःचा धंदा सोडून त्यांचे इतर काही धंदे आहेत का, पैसा कसा आणि कुठे उडवतात तेही बघा. ही सगळी माहिती मला आजच संध्याकाळपर्यंत मिळाली पाहिजे. जा लागा कामाला.”
वाघसाहेबांना कडक सेल्यूट करून ते बाहेर पडले.
मनोज आणि मगनने आपले फोटो लगेचच पाठवून दिले होते. माने फोटो घेऊन बाहेर पडले आणि जॅकपॉट लागावा तसं त्यांचं नशीब खुललं. ओसवाल पार्कच्याच पुढे गोखले रोडवर त्यांना बाबू सुतार चावीवाला भेटला. त्याने मनोजचा फोटो तत्काळ ओळखला.
“साहेब, चार-पाच दिवसांपूर्वी याच माणसानं माझ्याकडून डुप्लिकेट चाव्या बनवून घेतल्या होत्या.”
“पुन्हा पाहिलं तर ओळखशील?”
”हो, नक्की साहेब आणि साहेब आणखी एक, त्याच्या कपड्यांना मस्त वास येत होता. श्रीमंत पार्टी वाटत होती साहेब. ”
मानेंनी ताबडतोब ही माहिती वाघांना दिली. एक मजबूत धागा सापडला. आता भोसले आणि कांबळे काय सांगतात ते ऐकायचं होतं. त्याची कल्पना वाघसाहेबांनी मनात केला होतीच. संध्याकाळी भोसले आणि कांबळेंनी आणलेली माहिती वाघसाहेबांच्या तर्काशी सुसंगत होती.
दोघेही बडे घरके बेटे होते हे खरं. पण त्यांचं धंद्याकडे लक्ष नव्हतं. वडील, मोठे भाऊ, चुलते धंदा सांभाळत होते. ही पोरं कॉलेजच्या नावाखाली मौजमजा करत होती. पैसा उधळत होती. आणखी एक माहिती मिळाली. ती फारच महत्त्वाची होती. मुलुंड चेक नाक्यावरच्या अप्सरा डिस्को बारमध्ये ही पोरं पोरींवर पैसा फेकत होती बाई-बाटलीची चटक लागली होती.
शिकार जाळ्यात अडकली होती. आता वाघसाहेबांनी त्यांना रिंगणात घ्यायचं ठरवलं. ते पट्टीचे रिंग मास्टर होते. फक्त नजरेच्या एका फटकाऱ्याने त्यांनी भल्या भल्यांना लोळवलं होतं. तिथे या पोरांची काय कथा? त्यांनी दोघांनाही बोलावलं. दोघे त्यांच्या समोर बसले. वाघसाहेब थोडा वेळ त्यांच्याकडे नजर रोखून पाहत बसले. दोघांचीही बसल्या जागी चुळबुळ चालू होती. थोड्या वेळाने ते म्हणाले,
“काय पाणीबिणी घेणार का?” हवालदार कांबळेंनी आणलेलं पाणी दोघेही घटाघटा प्याले.
“हे पहा मगन, मनोज, तुम्ही चांगल्या घरची माणसं. म्हणून जरा सबुरीने घेतलं. आता जास्त लपवालपवी करू नका. जे काय घडलं ते सांगा पटापट.”
“साहेब, आपण आमच्यावर विश्वास ठेवा साहेब, आम्हाला काहीच माहिती नाही या चोरीची”
“ठीक आहे. तुमची आम्हाला सहकार्य करण्याची इच्छा दिसत नाही. माने, जरा त्या बाबू सुतार चावीवाल्याला बोलवा पाहू”
‘चावीवाला’ हे शब्द कानी पडताच मनोज चपापला वाघसाहेबांनी डोळ्यांच्या कोपऱ्यातून ते पाहिलं. चावी सापडली आता कुलूप उघडायचं.
बाबू सुतारला माने घेऊन आले. आत आल्या आल्या तो ओरडला `साहेब, हेच, हेच ते साहेब, यांनी माझ्याकडून डुप्लिकेट चाव्या बनवून घेतल्या होत्या. त्यांच्या कापडांना आता येतो तसाच वास येत होता.’
मनोजचा चेहरा पांढराफटक पडला होता. तो काही सराईत गुन्हेगार नव्हता. वाघ साहेबांनी मग त्यांचं सौजन्य मूर्तीचे रूप टाकलं आणि त्यांचा ठेवणीतला आवाज काढला. . तसा मनोज गयावया करू लागला. काय झालं ते त्याने भडाभडा सांगून टाकलं .
किशोरभाईशी दोस्ती झाली ते सांगून ती कशी वाढत गेली आणि त्याचा फायदा घेऊन आपल्या दोस्ताचाच कसा विश्वासघात केला ते सांगितलं.
ते दोघे आणि किशोरभाई संध्या-किरणमध्ये वरचेवर भेटत तसंच कधी कधी दुपारीही किशोरच्या घरी त्यांचा अडा जमे. अशाच एका दिवशी किशोरभाई घराच्या आणि कपाटाच्या किल्या एकाच जुडग्यात ठेवतो हे त्यांना कळलं. तसंच चाव्या कुठे असतात ती जागाही त्यांना समजली. तो नेहमी चार-पाच लाखांचा माल घरात ठेवतो हे त्यांना माहीत झालं. घरातली पार्टी किशोरभाईच्या गेस्ट बेडरुममध्ये होत असे. त्याच्या बायकोला त्यांनी हॉलमध्ये बसलेले आवडत नसे.
एकदा घरी पार्टी चालू असता मनोज मध्येच काही काम निघालं, अर्ध्या तासातच येतो असं सांगून बाहेर पडला. जाताना त्याने चाव्या घेतल्या आणि कोपऱ्यावरच्याच चावीवाल्याकडून डुप्लिकेट चाव्या बनवून घेतल्या. परत आल्यावर चाव्या जागेवर ठेवून तो पार्टीत परत सामील झाला. डिस्को बारमध्ये ते नेहमी पैसे उडवायचे. तिथल्या मालकाकडून दोघं पैसे उधारीने घेत. त्यांची उधारी खूप झाली तसा बार मालकाने तगादा सुरु केला. लवकर पैसे द्या नाहीतर दुकानावर येतो, अशी धमकीही दिली. त्याची कटकट मिटवायची म्हणून त्यांनी हा प्लॅन रचला.
रात्री पार्टी रंगात आल्यावर मनोज मध्येच उठून टॉयलेटला जाऊन येतो म्हणून हॉलमध्ये गेला. जवळच्या डुप्लिकेट चावीने सेफ उघडून त्याने दागिन्यांचा डबा हॉलमध्ये ठेवलेल्या आपल्या कॅरीबॅगमध्ये ठेवला आणि परत जाताना ती घेऊन गेला. सेफ उघडताना त्याने हातमोजे वापरण्याची काळजी घेतली होती. हात मारायला हातमोजे वापरले खरे पण अशा हातचलाखीत तो नवखा होता आणि गाठ वाघोबाशी आहे हे त्याला कुठून ठाऊक असणार?
दागिने त्याने अंधेरीला आपल्या सासऱ्याकडे नेऊन ठेवले होते. ते त्याने परत जसेच्या तसे आणून दिले. फक्त चार दिवसात गायब झालेले दागिने परत मिळाले म्हणून किशोरभाईचा आनंद गगनात मावेनासा झाला पण मनोज आणि मगनच्या गगनात मात्र ऐन तारुण्यात अंधार पसरला.
सज्जड पुराव्यासह दोघांवर रीतसर गुन्हा दाखल करून वाघसाहेबांनी त्या वाघाचं कातडे पांघरलेल्या कोल्ह्यांना पिंजऱ्यात बंद केलं.
गुन्ह्याचं वाढत चाललेलं प्रमाण आणि त्यात सापडणारे गुन्हेगार पाहिलं तर त्यात तरुणांचं प्रमाण लक्षणीय दिसतं. बाई, बाटली, मौजमजा, व्यसनं, पैसा आणि चंगळवादाने घेरलेली तरुण मंडळी पाहून वाटतं “साठी बुद्धी नाठी” हे खरं नाही, तर “तरणीताठी बुद्धी नाठी” हेच खरं !
— विनायक रा अत्रे
Leave a Reply