नवीन लेखन...

तरुण येतील पण घराणेशाहीचे काय ?

काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच महाराष्ट्रातील काही शहरांना भेटी देऊन तरुणांशी संवाद साधला. यावेळी तरुणांनी अधिक संख्येने राजकारणात यावे असे सांगण्यास ते विसरले नाहीत. वास्तविक अलीकडे प्रत्येक राजकीय पक्षात तरुणांची अधिक भरती होत आहे. पण घराणेशाहीमुळे या तरुणांना मोठी संधी प्राप्त होत नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी स्वत:च्या वक्तव्यावर आत्मपरिक्षण करायला हवे आहे.


काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन अकोला, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद या शहरांमध्ये तरुणांशी संवाद साधला. आपल्या देशातील लोकसंख्येमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तरुणांची मने जिंकू शकतो तो राजकीय लढाई जिंकू शकतो, असे म्हटले जाते. याच कारणामुळे असेल कदाचित गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक पक्ष तरुणांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत आला आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या पक्षांनी या निमित्ताने वेगवेगळे प्रयोगसुद्धा केले आहेत. भाजपा नेते लालकृष्ण अडवानी यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरताना स्वत:चे पोर्टल सुरू केले आणि देशातील तरुणशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. भाजपाने विद्यमान अध्यक्ष म्हणून नितीन गडकरी यांची निवड याच हेतूने केली आहे. खरे तर गडकरी यांना त्या अर्थाने तरुण म्हणता येणार नाही. आता त्यांचे वय 52 वर्षे आहे. मात्र त्यांची निवड करण्यामागे तरुणांना आकृष्ट करणे हा हेतू नक्कीच आहे.

डाव्या आघाडीचे नेते बरेच वृद्ध झाले आहेत. त्याशिवाय या पक्षाची विचारसरणीही आता तरुणांना आकृष्ट करेनाशी झाली आहे. त्यामुळे डाव्या आघाडीतील पक्षाकडे तरुणांचा ओढा कमी आहे. काँग्रेसने मात्र राहुल गांधी यांना पुढे करून तरुणांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. वास्तविक ही काँग्रेसची जुनी नीती आहे. पंडित जवाहरलाल नेहरु केवळ तरुण वयातच नव्हे तर अगदी वृद्ध झाल्यानंतरसुद्धा तरुणांचे लाडके नेते म्हणवले जात होते. त्यांच्यानंतर इंदिरा गांधी राजकीय व्यासपीठावर आल्या. परंतु त्यांना हा प्रवेश सोपा गेला नाही. नंतर मात्र त्यांनी पक्षातल्या वृद्ध नेत्यांशी संघर्ष सुरू केला. देशातील बरेच लोक काँग्रेसच्या वृद्ध नेत्यांना कंटाळले होतेच. त्यामुळे या वृद्धांशी टक्कर देणार्‍या नेत्या म्हणून इंदिरा गांधी तरुणांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या. इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व सळसळते म्हणावे असे होते आणि त्यांनी वृद्ध नेत्यांशी टक्कर देताना बँकांचे राष्ट्रीयकरण करणे, संस्थानिकांचे तनखे बंद करणे, गरिबी हटावची घोषणा अशा बर्‍याच गोष्टी केल्या. त्यामुळे त्या काळात इंदिरा गांधींच्या नेतृत्वामुळे आपल्याला जगण्याचे बळ मिळाले, असे अनेक तरुणांनी कबूल केले होते. ते बळ किती वेळ टिकले आणि इंदिरा गांधी यांनी तरुणांसाठी खरेच काय केले हा वादाचा विषय होऊ शकेल. परंतु त्यांनी तरुणांना अपील होईल असे सुरूवातीला बरेच काही केले होते. नंतर काँग्रेसचे ते धोरणच झाले.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी राजकारणाच्या आखाड्यात उतरले. त्यावेळी ते स्वत: तर तरुण होतेच, परंतु त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या काळात देशातील मतदारांमध्ये तरुणांची संख्या वाढली होती. त्यामुळे राजीव गांधींच्या सल्लागारांनी त्यांना अधिक तरुण दिसण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांचा वेश आणि अन्य सर्व मेकअप तरुणांना अपील होईल असा करण्यात आला आणि त्याचा त्यांना उपयोग झाला. इंदिरा गांधींनी सुरूवातीच्या काळात तरुणांना आकृष्ट केले असले तरी त्यांनी देशात भ्रष्टाचाराचे युग सुरू केले. त्यामुळे तरुण वर्ग त्यांच्यावर नाराज झाला आणि तो काँग्रेसपासून दूर गेला होता. त्या वर्गाला काँग्रेसच्या जवळ आणण्यात राजीव गांधी यांच्या तरुण राजकारणाची बरीच मदत झाली. मात्र नंतर खुद्द राजीव गांधीसुद्धा त्यातलेच निघाले. त्यामुळे पुन्हा एकदा तरुणवर्ग दूर गेला आणि नंतर काँग्रेसला सत्ता सुद्धा गमवावी लागली.

काँग्रेसच्या या धोरणामुळे त्या पक्षाकडे तरुण वर्ग सुरूवातीला आकृष्ट होतो. मात्र, तरुणांना आकर्षित करणे हा काँग्रेसचा मुख्य कार्यक्रम नसून तो डावपेचाचा भाग आहे असे नंतर लक्षात येते. राहुल गांधींबाबत पुन्हा एकदा याच डावपेचाला सुरूवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांचे तरुणांशी संवाद, विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा आदी प्रयत्न सुरू झाले आहेत. राहुल गांधी यांनी स्वत:सुद्धा तरुणांनी राजकारणात आले पाहिजे, असे आवाहन करायला सुरुवात केली आहे. वास्तविक पाहता राजकारणात तरुण वर्ग येतच असतो. मात्र, वर्चस्व असते ते वृद्धांचे. त्यामुळे प्रत्येक पक्षात तशी तरुणांची संख्या मोठी दिसते. तसे नसते तर एके दिवशी राजकारणातील सगळे वृद्ध निवृत्त झाले असते आणि तेथे कोणीच शिल्लक राहिले नसते. प्रत्येक पक्षात तरुण नेते आहेत आणि असणार आहेत. त्यासाठी राहुल गांधी यांनी वेगळे आवाहन करण्याची गरज नाही. त्यांच्या आवाहनावरुन कोणी राजकारणात येणारही नाही आणि तसे कोणी आलेच तर राहुल गांधी त्याच्यासाठी आपली जागा खाली करणार नाहीत, हेही खरे आहे.

सध्याच्या राजकारणातील तरुणांवर नजर टाकली तर असे लक्षात येते की, वृद्ध नेत्यांचे पुढचे वारसच तरुण म्हणून राजकारणात येत आहेत. राहुल गांधी यांनी स्वत:पुरती तरी गांधी असल्यामुळे राजकारणात येऊ शकलो, अशी स्पष्ट कबुली दिली आहे. त्यांनी स्वत: ही कबुली देण्याने भागणार नाही. ते राजकारणात पुढे आणत असणार्‍यातील बरेच तरुण नेते त्यांच्या पक्षातील वृद्ध नेत्यांची मुलेच आहेत. यासाठी उदाहरण म्हणून वेगळी नावे सांगण्याचीसुद्धा गरज नाही. मग राहुल गांधी राजकारणात येण्याचे आवाहन नेमके कोणत्या तरुणांना करत आहेत? वृद्ध नेत्यांच्या तरुण मुलांना की सामान्य कुटुंबातील आजपर्यंत राजकारणापासून दूर असलेल्या तरुणांना ? या प्रश्नाबाबत विचार करावा लागणार आहे. कारण नेत्यांची मुले तर पुढे येत आहेतच.

या पार्श्वभूमीवर तरुण वर्ग राजकारणात आल्यास मोठा बदल घडेल असे राहुल गांधी म्हणत आहेत, परंतु वृद्ध नेत्यांच्या राजकारणात येणार्‍या तरुण मुलांकडून तरी अशा मोठ्या बदलाचे कसलेच संकेत मिळत नाहीत. कारण ती वडिलांच्या भ्रष्ट, नीतीहीन राजकारणाचेच फलित आहेत. मात्र सामान्य कुटुंबातील तरुण मुले पुढे आली तर राजकारणात काही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण….. हा पण मोठा आहे. आज राजकारण एवढे खर्चिक, भपकेदार आणि विकाऊ झाले आहे की, सामान्य कुटुंबातील माणूस राजकारणात येण्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही आणि केलीच तर भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून त्यातून मिळालेल्या पैशातूनच तो राजकारणात काही तरी करू शकेल. अशी संधी मिळणार नसलेले तरुण राहुल गांधींचा सल्ला मानून खरोखर राजकारणात आलेच तर ते केवळ सतरंज्या अंथरण्याच्या आणि गुंडाळण्याच्या कामात गुंततील. सत्तेची पदे आणि लाल दिव्याच्या गाड्या राहुल गांधींसारख्या आडनावाचा फायदा घेऊन राजकारणात आलेल्या आयत्या बिळावरच्या नागोबांनाच प्राप्त होतील यात शंका नाही.

— अरविंद जोशी
अद्वैत फिचर्स 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..