हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ साली केला गेला. १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव दिसत असताना पाकिस्तानने इतर देशांच्या मध्यस्थीने हा करार करण्याचा प्रस्ताव मांडला.
सोव्हिएत युनियनचे प्रमुख अलेक्सी कोसिजीन यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारावर भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी, तर पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी सह्या केल्या. १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणीनंतर या दोन देशांमध्ये चिघळलेल्या सीमावादाने १९६५ मध्ये परत एकदा डोके वर काढले.
ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन जिब्राल्टर या नावाने मोहीम काढून जम्मू आणि काश्मीरच्या भारतीय प्रदेशात सैन्य घुसवले. प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारनेही पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढवला. ऑगस्ट आणि सप्टेंबर १९६५ मध्ये सतरा दिवस चाललेले हे युद्ध संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, अमेरिका आणि सोव्हियेत युनियन यांच्या प्रयत्नांनी २२ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदी करार होऊन थंडावले. दोन्ही बाजूंचे हजारो सैनिक या युद्धात मारले गेले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने रणगाडे आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर झालेले हे युद्ध होते असे म्हटले जाते.
सतरा दिवस चाललेले हे युद्ध अनिर्णित अवस्थेतच थांबले. या युद्धानंतर भारत आणि सोव्हिएत युनियनचे राजनैतिक संबंध अधिक जवळचे झाले, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि चीनमध्ये अधिक जवळीक झाली. ४ ते १० जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या बैठकीत संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी शामिल होते. करारात ठरल्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तानने या युद्धात परस्परांच्या घेतलेल्या प्रदेशांवरील हक्कसोडून १९४९ साली नक्की केलेल्या युद्धबंदी रेषेपर्यंत माघार घेतली. भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.
ताश्कंदच्या या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ११ जानेवारी १९६६ साली पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींचा ताश्कंदमध्ये संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराचे दोन झटके आल्यानं झाल्याचा पहिल्यांदा सांगितलं गेलं.
Leave a Reply