हा प्रसंग घडला वारणानगरला – (पूर्वाश्रमीचे आमचे वालचंदचे सर) डॉ संतपूर वारणानगरला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य असताना! मी त्यावेळी एका ओरलसाठी वारणानगरला गेलो होतो. ओरल झाल्यावर बाहेर पोर्चमध्ये सरांशी गप्पा मारत उभा होतो. एवढयात एका बुलेटवर दोन स्थानिक तरुण आले. (त्यावेळी “गुंठामंत्री” ही फ्रेज कॉइन झालेली नव्हती.)
त्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात उगाचच हॉर्न वाजवत गाडी फिरवायला सुरुवात केली. संतपूर सरांना हे पटले नाही. त्यांनी गाडीजवळ जाऊन त्यांना ठाम शब्दात समज दिली की “हा महाविद्यालयाचा परिसर आहे आणि सध्या परीक्षा सुरु आहेत. तुम्ही आमच्या आवारात येऊन गोंधळ घालू नका”.
ते प्राचार्य आहेत हे माहीत नसलेल्या त्या दोन तरुणांनी माझ्यादेखत सरांना अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला.
त्याप्रसंगी केलेली ही कविता –
तथास्तू
ते आले …
उन्मत्त, बेमुर्वत ,सुसाट गाडयांचा चाकांनी !
आमच्या आदर्शांनी त्यांना जाब विचारला –
त्यांनी आदर्शांना पायाखाली तुडवले.
आम्ही त्यावेळी हात बांधून मख्ख !
ते गेल्यावर एवढंच करू शकलो –
मातीमोल आदर्शांना कपाळी टेकवले
आणि शक्य तितक्या तारस्वरात ओरडलो –
” अशीच माती होण्याचे भाग्य आमच्या
नशिबी असेल तर ते मान्य आहे ”
कपाळावरच्या मातीत एक स्मित फुलले
आणि म्हणाले – ” तथास्तू !”
दूरवर एक बुलेट धूर सुस्कारत राहिली …..
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply