मला जे प्रिय ते देवाला अर्पण होऊ लागले. माणूस स्वार्थी झाला आणि आपल्याला सर्वाधिक प्रिय आपणच आहोत ही भावनाही लोप पावली. आनंदाचा धनी मी आणि दुःखाचे प्राक्तन दुसऱयाचे यात अस्वाभाविक काही आहे, असे वाटेनासे झाले. माझ्याऐवजी कोंबडा, बोकड एवढेच काय दुसर्या माणसाचा बळी देण्याएवढा माणूस स्वतला सक्षम मानू लागला, स्वतच्या अंतरात्म्याला गाडून टाकले, की इतरांची काय पत्रास? हा निसर्ग, ही वृक्षवल्ली, हे प्राणी-पक्षी माझाच अंश आहेत, ही भावना लोपली आणि मग परमेश्वर हा धाक दाखविण्याचाही एक मार्ग होऊन गेला. शनिच्या डोक्यावर थोडे तेल ओतले, की आपली इतिकर्तव्यता संपली, असे मानण्यात धन्य होता येते, हा अनुभव माणसाला येऊ लागला. कुठे तेलाच्या नद्या, तर कुठे कोंबड्यांचा पिसांचा उकिरडा, कुठे बोकड, तर कुठे मनुष्यबळी-माणसाच्या विद्वेशाच्या अभिव्यक्ती सर्वत्र साकारू लागल्या. त्याला संस्कृती म्हटले जाऊ लागले. त्याला धार्मिक आधार मिळू लागला. काहीवेळा भीतीने, तर काहीवेळा धर्माच्या धाकाने माणूस आपल्यातल्या परमेश्वराला जिवंतपणी ठार करू लागला. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट, खरेतर खूप भीषण, माणसाच्या मनाचा थरकाप उडविणारी; पण वास्तव मांढरदेवीच्या नवसपूर्ती यात्रेत शेकडोंचा बळी गेला. बोकड, कोंबड्या नव्हेत, तर बाया-बापड्यांचा, लहान पोरांचा, थोर-वृद्धांचा आणि कमावत्या शरीराच्या तरुणांचाही. माणसाने माणसाला तुडवले. ठार मारले. त्यात माझे, आपले कोणाला दिसले नाही. प्रत्येकाला स्वतच्या पलीकडे काही पाहता आले नाही. पाहिले ते देव होते, स्वत जिवंत राहण्यासाठीचे आधार होते, त्यात मुले होती, बायका होत्या; पण मला मी जगणे आवश्यक वाटले. त्यांना तुडवत माझ्यातल्या `मी’ने जिवंत राहण्याचा आनंदसोहळा साजरा केला. एवढ्यावरच भागले तर तो माणूस कसला? त्याने मृतदेहावरच्या चीजवस्तू लुबाडल्या. आपल्याच आया-बहिणींच्या अंगावरच्या साड्या ओढताना त्याने आपल्यातल्या दुःशासनाला तृप्त केले. तिथे कृष्ण कोणी अवतरला नाही. कारण तशी आर्त हाकच त्याच्यापर्यंत पोहोचली नाही. मांढरदेवीचे रूपच असे होते, की तिला आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकायची होती. त्यांना कौल द्यायचा होता. भक्तांची मागणी हीच होती, “माझ्या शत्रूचा नायनाट कर”, “त्याचे तळपट होऊ देत” एक भक्त दुसऱयाबद्दल हीच कामना करीत असेल, तर त्याच्या देवाने काय करावे. त्यालाही कंटाळा आला असावा, या मत्सराचा, द्वेषाचा, त्यालाही खऱया प्रेमाची तहान लागली असावी. देवाने मग माझा-तुझा न पाहता सर्वांना `तथास्तू’ म्हटले. मांढरदेवीचे पठार लाल होऊन गेले.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply