माझे शिक्षण गिरगावातील आर्यन शाळेत झाले. आमच्या चाळीतील काही मित्र गिरगाव अन्ग्रेवाडीतील हिंद विद्यालय शाळेत शिकत होते. मित्राच्या घरच्यांचे आणि त्या शाळेतील आपटेबाईंचे घरघुती संबंध होते. त्यावेळेस शिक्षक पालकांना निरोप देऊन पालकांना शाळेत भेटण्यासाठी बोलावून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा चालला आहे याबद्दल खरी माहिती देत असतं. कधीमधी जमल्यास पालकांची घरीही भेटत असतं. ते दिवसच वेगळे होते. शिक्षकांनी आम्हांला वर्गात मारलं तरी आम्हीं कधी घरी कम्प्लेंट करीत नव्हतो. आपटेबाई नेहमी आमच्या मित्राकडे येत असतं. त्या खूप कडक होत्या असं मित्र म्हणायचा. नंतर कळले की त्या बाई श्री विनय आपटेंच्या आई. त्यांनी विनयवर खूप चांगले संस्कार केले होते हे त्यांच्या मुलांच्या स्वभाव, आदब, वागण्या, बोलण्यावरून पुढे दिसून आलं व तेच त्यांच्या पुढील आयुष्यात उपयोगी पडलं.
एकदा गजरा कार्यक्रमानिमित्त श्री विनायक चासकरांनी भेटायला बोलावले होते म्हणून वरळी दूरदर्शन केंद्रात त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी एका झाडाखाली श्री विनय आपटे, धीरगंभीर चेहरा, रांगडा आवाज, हातात चहाचा ग्लास, दुसऱ्या हातात सिगारेट आणि त्यांच्या कंपू बरोबर मजामस्ती चालू होती. त्यांच्या भारदस्त आवाजात ते त्यांना कुठल्याश्या स्क्रिप्ट बद्दल हातवारे करून काही सांगत होते. गजरा निमित्त बऱ्याचवेळा दूरदर्शनवर जाण्याचा योग आला आणि कधीमधी त्यांच्याशी बोलणे होत असे. त्यांना बघून मनात भीतीयुक्त आदर असे. पण मनाने ते एकदम साधे आणि दिलखुलास वृत्तीची होते.
श्री विनय आपटे यांनी रंगभूमीबरोबरच व्यावसायिक रंगभूमी, हिंदी आणि मराठी चित्रपट; तसेच मालिकांमध्ये काम केले. अभिनयाबरोबरच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्यांची कामगिरी मोठी होती. राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांमधून ते पुढे आले. “मेन विदाऊट शॅडोज‘, “द वॉल‘ अशी काही त्यांची स्पर्धेतील नाटके प्रचंड गाजली. १९७२ मध्ये त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रावर काम करण्यास सुरवात केली. तेथे पंचवीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केले. “गजरा‘ हा त्यांचा कार्यक्रम लोकप्रिय ठरला. त्या काळात दूरदर्शनवर सादर होणाऱ्या नाटकांचा फार्स कसा असतो, हे माहीत नव्हते. त्या काळात त्यांनी नाटक हा विषय मुंबई दूरदर्शन केंद्रावर समर्थपणे विनायक चासकर यांच्याबरोबरीने सादर केला. पण त्याहीपेक्षा गाजल्या त्या त्यांच्या लघुनाटिका.
भारदस्त आवाज, थेट भिडणारी नजर, सहज अभिनय ही विनय आपटे यांची ओळख. रंगभूमी, मालिका, चित्रपटांत वावरणाऱ्यांच्या ‘आपटे स्कूल’चे प्रणेते म्हणजे विनय आपटे.
सुरुवातीला ‘भूमिका’ आणि कालांतराने ‘गणरंग’ या नाट्यसंस्था त्यांनी उभ्या केल्या. नाट्यकर्मी हे बिरुद खऱ्या अर्थाने सार्थ केलं. मित्राची गोष्ट, घनदाट, सवाल अंधाराचा, कुसुम मनोहर लेले, मी नथुराम गोडसे बोलतोय.. अशी एकापेक्षा एक नाटके त्यांनी केली. पार्ल्यातील त्यांच्या ‘गॉसिप ग्रुप’ने अनेक प्रायोगिक नाटके केली.
आभाळमाया या मालिकेने मराठीत महामालिकांचा सिलसिला सुरू झाला. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत जाणवायचा तो स्पेशल आपटे टच. कलाकाराने कोणतीही भूमिका अत्यंत समरसून कशी करायला हवी, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे त्यांनी केलेल्या भूमिका. स्वतः दिग्दर्शनामध्ये आत्यंतिक रस असूनही अरुण नलावडे या सहकारी मित्राने दिग्दर्शित केलेल्या ‘रानभूल’ नाटकात त्यांनी अप्रतिम अभिनय साकारला. एकांकिका, प्रायोगिक, हौशी, व्यावसायिक अशा सर्वच रंगभूमीवर काम केलेल्या आपटे यांनी मालिका आणि चित्रपटांमध्येही वेगळेपणा कायम राखला.
मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमातही त्यांनी केलेल्या भूमिकांमध्ये त्यांच्या अभिनयाचे एक वेगळेपण होते. उदा. सत्याग्रह, एक चालीस की लास्ट लोकल, आरक्षण, इट्स ब्रेकिंग न्यूज, प्रणाली इत्यादी. नाटक व सिनेमामधील दिग्दर्शनाइतकाच त्यांच्या कामाचा आवाका मर्यादित नव्हता. ‘अॅडिक्ट’ जाहिरात संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नावाजलेल्या जाहिरातींचे दिग्दर्शन केले. मच्छिंद्र कांबळी यांच्यासाठी केलेल्या अफलातून या नाटकाद्वारे त्यांनी महेश मांजरेकर, अतुल परचुरे, सचिन खेडेकर, सुनील बर्वे यांना रंगभूमीवर आणले असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. तंत्रज्ञानामध्ये वेगाने होत असणारे बदल रंगकर्मींना कळायला हवेत, यासाठी ते कायम आग्रही राहत असतं. अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या कार्यवाहपदाचा कारभारही त्यांनी दीर्घकाळ पाहिला.
नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या कलाकारांना उमेद आणि प्रोत्साहन देण्यात ते तप्तर असतं. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांचा पहाडी आवाज हे वैशिष्ट्य. दृकश्राव्य माध्यमांमध्ये स्वतःची जागा तयार करीत असताना त्यांनी आवाजाच्या या गुणवैशिष्ट्यांचाही नेमका वापर केला. आपल्या तत्त्वांसाठी आग्रही असणाऱ्या आपटेंना गुरुस्थानी मानणारे त्यांचे अनेक शिष्य केवळ चित्रसृष्टीतच नव्हे तर निरनिराळ्या क्षेत्रात विखुरलेले आहेत.
श्री विनय आपटेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी वैजयंती आपटे आणि दिग्दर्शक मंगेश कदम यांनी आयोजित केलेला ‘विनय – एक वादळ’ हा विशेष कार्यक्रम झी मराठीवर बघण्याचा योग आला. या कार्यक्रमात रंगभूमीवरील बऱ्याच कलाकारांनी विनय आपटे यांच्या अनेक आठवणींना उजाळा देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काही महिन्यांपूर्वीच विनय आपटे यांचे निधन झाले. तरीही ते आज आमच्या सोबत आहेत, अशी भावना येथील उपस्थित कलाकारांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात विनय आपटे यांच्या आवाजातील ध्वनिफिती, दृकश्राव्यफिती आदींद्वारे त्यांचा एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, हिंदी चित्रपट, मालिका आदी क्षेत्रातील प्रवास उलगडून दाखविण्यात आला. यावेळी मराठी चित्रपट, रंगभूमी आणि मालिका या क्षेत्रातील कलाकार उपस्थित होते. शरद पोंक्षे यांनी ‘मी नथुराम गोडसे’ बोलतोय यातील एक प्रवेश सादर केला. ‘आणि नथुराम गोडसेच्या भूमिकेत शरद पोंक्षे’ हा बालगंधर्व नाटय़गृहातील किस्सा त्यांनी विनय यांची आठवण म्हणून सांगितला. या नाटकातील प्रवेश सादर करताना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
वादळात अनेकांचे संसार उद्धवस्त होतात पण विनय नावाच्या वादळाने अनेकांचे संसार उभे केले आहे. त्यांनी नवीन कलाकारांना घडवले, अशी भावना दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी व्यक्त केली. विनय यांची दूरदर्शवरील आठवण सांगताना सुधीर गाडगीळ म्हणाले, आम्ही दोघे दूरदर्शनवर एकत्र काम करायचो. विनयने मला काहीही पूर्वतयारी नसताना आपल्याकडे असलेल्या गुणांवर आणि आत्मविश्वासावर उत्तररित्या कार्यक्रम सादर करण्याचा धडा दिला.
या कार्यक्रमात ‘एक लफडं कधी न विसरता येणारं’, ‘कबड्डी’, ‘मी कुसुम मनोहर लेले’ आदी नाटकातील प्रयोग चिन्मय मांडलेकर, आदिती सारंगधर, गिरीश ओक, सुकन्या मोने, मुक्ता बर्वे आदी कलाकारांनी सादर केले.
खरोकारच स्वत:च्या तोऱ्यात जगणारा असा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आपल्याला त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकातून, त्यांनी साकारलेल्या भूमिकांतून, मालिकांतून पुन:प्रत्ययाचा आनंद अनुभवण्यासाठी त्या काळात डोकावावयास लागेल.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply