सुटलो. एक प्रचंड मोठं टेन्शन गेलं. सॉलिड वांधे झाले होते. डोक्याचा भुगा झाला होता आणि रिकाम्या मनाला भुंगा कुरतडू लागला होता. कोळ्याने दोन्ही डोळ्यांना कोळीष्टकं बांधायला सुरुवात केली होती .
झालं होतं काय की आमच्यावरच्या अलोट प्रेमानं , वीस पंचवीस इतक्या विपुल संख्येनं समस्त रत्नागिरीतील वानरदळ आमच्या आवारात सुखेनैव बागडण्यासाठी आलं होतं. आम्ही ( मी आणि माझी सौभाग्यवती ) नेहमीप्रमाणे त्यांचा मुक्त संचार अनिमिष नेत्रांनी पाहत होतो. झाडांवरून घरावर , घरावरून पुन्हा झाडांवर , लांब आणि उंच उड्यांचे स्टंट पाहत होतो. मुलांसाठी राखून ठेवलेले चिकू , भाजीसाठी लावलेल्या नीरफणसाची लहान लहान फळं , देवाला आवडतात म्हणून मुद्दाम जोपासलेल्या लाल जास्वंदीचे कळे या सगळ्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन झाल्यावर उर्वरित चिकू , फळं , फुलं कुस्करून रांगोळी घालण्यासाठी त्यांनी पसरून ठेवली. दरम्यान वीस बावीस कुत्र्यांची तगडी फौज जमिनीवरून त्यांच्याशी युद्ध करायला बघत होती. त्यानादात कुंड्या , बागेत जोपासलेली विविध झाडं यांची मोडतोड करून सगळ्या परिसराला युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं. कुत्र्यांच्या भुंकण्याला साथ देण्यासाठी , बंगल्याच्या गच्चीवर घातलेल्या पत्र्यावर उड्या मारून वानरदळ युद्धाचे पडघम , रणभेरी वाजवित होते आणि चेकाळताना दिसत होते. दरम्यान मुसळधार पाऊस पडत होता. पण कुत्री आणि वानर यांना भान नव्हते.
इतक्यात जोरदार आवाज झाला आणि डिश अँटिनावरून जोरदार उड्या मारल्यानं डिशनं मान टाकली आणि आमचा टीव्ही , ‘ नॉट रिसीव्हिंग सिग्नल ‘ असं बोंबलून सांगू लागला आणि तब्बल बावन्न तास टीव्ही हेच बोंबलत होता. मेकॅनिक येईपर्यंत!
बावन्न तासांनी टीव्ही नीट बोलू लागला .
तोपर्यंत .. दीपिकाचं काय झालं असेल , रियाला जेवण कसलं मिळालं असेल , सलमान , करण , शाहरुख आणि इतर नट नट्या यांचं आर्थिक नुकसान किती झालं असेल , ड्रग पेडलर बिच्चारे काय करत असतील , मुंबईचं व्हेनिस झाल्यावर पर्यटनाला संधी कशी असेल, तुरुंगातील कैद्यांना कोरोना झाल्यामुळं बिचाऱ्या कैद्यांना काय वाटत असेल , पळत रिपोर्टिंग करणारे कसं रिपोर्टिंग करीत असतील , नवीन जाहिराती किती आल्या असतील , कोण कुणाला उखडून टाकत असेल , अशा असंख्य प्रश्नांनी डोक्याला भुंगा लागला होता. कारण टीव्ही दिसत नव्हता ना. पण बावन्न तासांनी टीव्ही सुरू झाला एकदाचा आणि सुटलो.
त्या बावन्न तासात न पाहिलेली आणि तुंबलेली मुंबई बघू शकत होतो. चर्चांचा निरर्थक काथ्याकूट बघू शकत होतो.
बबड्या आता काय करील याची शक्यता व्यक्त करू शकत होतो. राधिकेच्या पहिल्या नवऱ्याच्या चारपाच बायका आता काय करणार याची चिंता करू शकत होतो आणि काय काय …
जाऊ दे. आता टीव्ही लागलाय , तर तोच पाहतो ना. ते बावन्न तास कसे घालवले असतील माझं मलाच ठाऊक. आता पुन्हा वानरसेना येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत , तोपर्यंत टिव्हीकडे बघत राहतो.
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
हे काल्पनिक नाही .
Leave a Reply