आपण सारे एकच आहोत; एकाच निसर्गाचे, परमेश्वराचे घटक आहोत, हे सारे ऐकले, वाचलेले गळून पडते. मी, माझे … हे शब्द प्रभावी होतात. दुःख, वेदना, संकटे ही किमान आतातरी माझी नाहीत, ही भावना प्रबळ होते. वृत्तपत्रांतील छायाचित्रेही नकोशी वाटू लागतात … मग नकोच वृत्तपत्र वाचणे, नकोच दूरचित्रवाणी पाहणे हा विचार प्रभावी होतो. ते सारे माझ्यासाठी नाहीच, असे म्हणून माणूस अन्य विषय शोधू लागतो. विषयांतर महत्त्वाचे ठरते. वास्तव न स्वीकारता, न पाहताच त्यापासून दूर जाण्याचा प्रवास सुरू होतो. आपण आपल्या विश्वात रमायला लागतो. कोणी मानवतेची आठवण दिलीच किंवा आवाहन केलेच, तर आपल्या कर्तव्यपूर्तीचा एक तुकडा तोडून त्यापासून मुक्त होऊ पाहतो. निसर्गत मी जसा आहे, त्याचा अनैसर्गिक प्रवास त्याला कारणीभूत आहे का? कोठून सुरू होतो हा प्रवास? काय कारणीभूत असावे या प्रवासाला? नैसर्गिक आणि अनैसर्गिक या निव्वळ मनाच्या तर कल्पना नव्हेत? की ती ही मायाच? प्रश्नांची मालिका हवी तेवढी लांबविता येईल. आपणच आपल्यात डोकावून पाहिलं तर? मला वाटतं, स्वतशी होणारा प्रामाणिक संवाद जेथे थांबतो, तेथेच अनैसर्गिकतेचा प्रवास सुरू होत असावा अन्यथा जे वास्तव आहे त्यापासून दूर जाण्याचा, ते नाकारण्याचा प्रयत्न हेच नैसर्गिक आहे, असे वाटू लागलेच नसते. आपण आपल्याला तरी आहे तसे स्वीकारतो का? की, स्वतची फसवणूक करण्यातच आपल्याला आनंद लाभतो? दुःख नाकारणे किंवा त्या दुःखापासून दूर जाणे, ते आठवणीच्या एखाद्या बंदिस्त कप्प्यात बंद करणे, हा आनंद आहे का? तसे असेल तर मग हा आनंद शाश्वत का नाही? कदाचित, स्वतला स्वतपासून सातत्याने दूर नेणे, हे तर दुःखाचे खरे कारण नसेल? स्वत आहोत तसे स्वतला स्वीकारले, वास्तव आहे तसे स्वीकारले तर दुःख कोठे असेल? दुःखाचे अस्तित्वच नसेल तर आनंदाशिवाय काय असेल? मग आपल्या दुःखाचे मूळ नैसर्गिकतेमध्ये आहे की अनैसर्गिकतेमध्ये? आज मला होणार्या यातना किंवा घडलेल्या विदारकतेच्या वेदना जाणवतात, हे नैसर्गिक असायला हवेच; पण त्यापासून दूर जाण्यातच मला नैसर्गिकता वाटते. स्वतला संवेदनहीन करण्यातच आपण जीवनसंघर्षाशी सक्षम आहोत, असे वाटायला लागते. खरे तर संघर्षापेक्षाही वास्तव स्वीकारण्यात, त्याला सामोरे जाण्यात खरे धैर्य आहे. तुमच्या माझ्यात जर एकाच परमेश्वराचा वास असेल, तुम्ही अन् मी जर या सर्वशक्तिमान निसर्गाचाच एक घटक असू; तर त्यापासून कसे पळता येईल? त्याला किती टाळता येईल? माणसामाणसातील नैसर्गिकतेला, नैसर्गिक मानवतेला या दुर्दैवी घटनेमध्येही धुमारे फुटलेले दिसतात. मानवी हातांच्या रूपाने दुःखावर फुंकर घालणारे ते हात दिसू शकतात, अनुभवता येतात. अशा अनुभवासाठी परमेश्वर तुम्हाला सज्ज करो, ही प्रार्थना.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply