मानेखाली आणि कमरेखाली हात अशा अवस्थेत तो त्या तरुणीला घेऊन झपाट्याने किनार्याकडे येऊ लागला. तरुणीच्या देहाचा स्पर्श त्याच्या देहाला होत होता; पण ती आणि तो निरागसपणे अलीकडच्या किनार्याला पोहोचले. त्यानं तिला वाळूत विसावलं, गुरूचं स्मरण केलं आणि आपल्या सोबत्याबरोबर चालू लागला. तिनं धन्यवाद दिले; पण त्याकडेही त्याचं लक्ष नव्हतं. आता या दोन्ही शिष्यांचा प्रवास सुरू झाला. शांतपणे आणि अबोल. मैलभर चालून आल्यावर त्यातला एक म्हणाला, ‘‘मित्रा, एक सांगू, तू जे काही केलंस ते चांगलं नाही केलंस. तू त्या तरुण मुलीला उचलून घेतलंस, तिला स्पर्श केलास. आपण आत्मज्ञानाच्या शोधात आहोत आणि तशात तू विकाराला चालना देणारं वर्तन केलंस, हे काही मला पटलं नाही.’’ दुसरा संन्यासी म्हणाला, ‘‘मित्रा, मानवी मदतीच्या हेतूनं जे ओझं मी उचललं ते मी केव्हाच किनार्याला ठेवून रिकामा झालोय आणि तू मात्र इतका वेळ ते ओझं इथपर्यंत वागवत होतास?’’ भगवान म्हणतात, ‘‘वर्तमान जगा. भविष्यात किवा भूतकाळात जगू नका; अन्यथा काळ तुमच्यासाठी थांबणार नाही. वर्तमान भूतकाळात रूपांतरित होत जाईल. त्या शिष्यानं कृती केली; पण त्या घटनेचे कोणतेही संदर्भ मनावर राहू दिले नाहीत. तर दुसरा ते अपराधीपणाचं ओझं घेऊनच चालत राहिला. माणसाचं जगणं पाहिलं तर बहुतेकांना आपल्या वागण्या-बोलण्यात असं ओझं वाहण्याचा अनुभव येऊ शकेल. उद्या काय होईल? काल काय चुकलं? यापेक्षा आता आपण काय करतो आहोत, काय आनंद-अनुभूती घेतो आहोत ते महत्त्वाचं. आनंदी जीवन जगणं म्हणजे वर्तमानात जगणं. वर्षापूर्वी कोणी तरी काही तरी बोललेलं आपण मनात जपतो आणि अस्वस्थ होत जातो. अशा वेळी ती व्यक्ती भेटली तर भेटीच्या आनंदापेक्षा अस्वस्थताच अधिक असते. त्यात आनंद कसा सापडेल?’’
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply