नवीन लेखन...

ते त्रिकोणी कुटुंब (एक सत्यकथा)

देवयानी – चंद्रकांत आणि निमेश असं त्रिकोणी दळवी कुटुंब. देवयानी – चंद्रकांत असा एकेरी उल्लेख करावा इतके ते आम्हाला समवयस्कर नाहीत. उलट दोघंही तसे आम्हाला ज्येष्ठच . परंतु उत्साह , जोश आणि धमाल करण्यात आमच्यापेक्षा काकणभर सरसच. देवयानी आजी दिसायला गोऱ्यापान , तेजस्वी घारे डोळे आणि वावरण्यात चपळता. पण त्यांच्या कडे पाहिल्यावर एखाद्या गोड आज्जीचा भास होतो म्हणून आपण देवयानी आजी म्हणुया. दळवी कुटुंबाच्या घरात त्या दोघांचा कोट टोपी आणि नऊवारी साडी अशा वेशातला एक सुंदर फोटो लावलेला आहे. मला खूप आवडतो तो फोटो. प्रेम , समाधान आणि सुख या तिन्ही गोष्टींचं मिश्रण त्या फोटोत पाहायला मिळतं.
तर सांगत काय होतो , या कुटुंबाशी आमचा परिचय झाला तो आमच्या धाकट्या मुलामुळे . आमचा विभास आणि निमेष एकच वर्गात होते. दळवी दाम्पत्याच्या गोड संसारात नियतीने आपत्य सुखाचा आनंद भरला नव्हता. निमेष हा देवयानीच्या भाच्याचा मुलगा. लहानपणापासून तो त्यांच्याकडेच वाढला. आपत्यसुखाची इच्छा दोघांनीही निमेषच्या कोडकौतुकानी मनसोक्त भागवून घेतली. अर्थात चंदू आजोबा तसे शिस्तप्रिय होते. म्हणजे बोलायला , वागायला एकदम जॉली माणूस , पण शिस्त , प्रामाणिकपणा , थोरांचा आदर याबाबतीत जराही तडजोड नाही. बाकी धम्माल व्यक्तिमत्त्व. एके काळचे मुष्टियुद्ध खेळाचे चॅम्पियन. ते ही अगदी राज्य स्तरावरचे. त्यांचा मजबूत पंजा हातात घेतल्यावर ते लगेच जाणवायचं. मुलांची शाळा सकाळी सातची असायची. निमेषला शाळेत सोडायला गाडी घेऊन तेच यायचे. आमचा चार पाच पालकांचा छानसा ग्रुप जमला होता. मुलं वर्गात गेली की आम्ही थोडा वेळ गप्पा मारत उभे असायचो किंवा शाळेच्या कॅन्टीन मधला चविष्ट बटाटावडा आणि चहाचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी परतायचो. चंदू आजोबांना मधुमेहाचा त्रास असल्यामुळे ते वडा चहा शक्यतो टाळायचे.
मुलांच्या निमित्ताने कधीमधी एकमेकांच्या घरी जाणं व्हायचं. चंदू आजोबा आणि देवयानी आज्जी म्हणजे खरंच एक गोड जोडपं . आजोबा चेहऱ्यावरून थोडेसे कठोर वाटले , तरी मनाने खूप भावनाप्रधान होते. कोणत्याही चांगल्या गोष्टीने आनंदित होणारा आणि कुणाच्याही दुःखाने आतून हलणारा गृहस्थ होता. त्यांच्या घरी बरं का , त्या उभयतांची संवाद साधण्याची एक गोड पद्धत होती. म्हणजे त्यांनी काही सांगायला सुरवात केली की आजोबा हळूच विचारायचे , ” देवू ! (आज्जींच लाडाचं नाव) तू सांगतेयस की मी सांगू ” ? मग त्यांचं एकमेकात ठरायचं कोणी सांगायचं ते आणि ती व्यक्ती सांगायला सूरवात करायची. आम्हाला खूपच छान वाटायचं ते.
चंदू आजोबा देवयानी आज्जींचा प्रेमविवाह होता. म्हणजे बघा , आमची त्यांच्याशी ओळख झाली तेव्हा ते साठीच्या दशकात होते. पण मनाने , वागण्याने आणि वृत्तीने एकदम फ्रेश , तरतरीत आणि तरुण.
चंदू आजोबांचं लहानपण फार हलाखीत गेलं होतं. उपासमार त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली होती. शालेय शिक्षणाबरोबरच अर्थार्जन करणं गरजेचं होतं. मूळचा पिंड बिनधास्त आणि अरेला का रे करण्याचा. उगीच कुणाचीही दादागिरी खपवून घेणं त्यांच्या रक्तातच नव्हतं. कित्येकदा काम करताना पोटात भुकेची आग भडकलेली असायची. पण त्यावर इलाज काहीच नसायचा. बुद्धी होती परंतु तिचा वापर करायला वाव मिळत नव्हता. आज्जी आणि जवळच्या अनेक मंडळींचा आसरा घेत म्याट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पण या काळात त्यांची थोरली बहीण आणि मेहुणे यांनी त्यांच्यासाठी जे केलं ते सांगताना आजही चंदू आजोबांना भरून येतं. दिवसा नोकरी त्यामुळे रात्रशाळेतच जाणं शक्य होतं. याच काळात त्यांना मुष्टियुद्ध खेळचं प्रचंड आकर्षण होतं. सिद्धार्थ कॉलेज मध्ये शिकत असताना त्यांच्या व्यायाम शाळेतील एक शिक्षक मधू नाईक यांनी चंदू आजोबांना बॉक्सिंग चे धडे दिले.
असाच काही काळ लोटला आणि अचानक त्यांच्या आयुष्यात देवयानी आजी अर्थात चंदू आजोबांची देवू आली. ती नियतीची योजनाच होती म्हणा ना !. कारण दोघांच्या राहणीमान , संस्कृती मध्ये प्रचंड अंतर होतं. परंतु त्यांनी मनोमन ठरवलं होतं की लग्नं करीन तर हीच्याशीच. नाहीतर हा इथे पर्यायच नव्हता. आपल्याला सिद्ध करण्यासाठी लागणारं स्थैर्य मात्र त्यावेळी चंदू आजोबांकडे काहीच नव्हतं. होती ती जिद्द , आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाची धरलेली कास , साथीला देवयानी आजींवर मनापासून असलेलं प्रेम. आजीनिही त्यांच्यात तेव्हा काय पाहिलं ते नाही सांगता येणार , परंतु नकळत ती ही त्यांच्या आयुष्यात ओढली गेली. देवयानीनेही आपल्या प्रियकराला आपल्या निरातीशय प्रेमाने अक्षरशः घडवलं. आणि त्यातून एक जिद्दी , सुशिक्षित , सुसंस्कृत मानवी शिल्प घडलं , ‘ चंद्रकांत दळवी ‘.
पुढे कायद्याचं शिक्षण पूर्ण करून चंदू आजोबांनी मोठमोठ्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये कामगार कायदेविषयक तज्ञ म्हणून काम पाहिलं. हे करताना कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी ते सदैव जागरूक राहिले. आपल्या लाडक्या देवूला जीवनातली सारी सुखं त्यांनी भरभरून दिली. आणि त्यांच्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगी देवयानी आजी नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. शिरडीच्या साईबाबांवर नितांत श्रद्धा असलेले चंदू देवयानी आजी आजोबा प्रत्येक क्षणी हातात हात घेऊन पुढे जात राहिले. निमेशची कोडकौतुकं पुरवत या त्रिकोणी कुटुंबाचे दिवस आनंदात जात होते. सुख – शांती – समाधानानी घर शिगोशिग भरलं होतं.
नियती मात्र या कुटुंबावर पहिला आघात करण्याला सिद्ध झाली होती. २००६ साली ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चंदू आजोबा आश्चर्यकारकपणे वाचले. अगदी नेमकं सांगायचं तर त्या पहिल्या वर्गाच्या डब्यात ते एकटेच वाचले होते. स्फोटामुळे कानाना प्रचंड दडे बसले होते , रक्त येत होतं , आजूबाजूची अंगावर शहारे आणणारी परिस्थिती पाहून मनावर प्रचंड आघात झाला होता. काही ऐकू येत नव्हतं. वेळीच मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे आणि त्यांच्या साईबाबांवर असलेल्या अपार श्रद्धेने चंदू आजोबा या भीषण अपघातातून पूर्ण बरे झाले. परंतु आपला वार फुकट गेल्याने नियती मात्र या कुटुंबाची पाठ सोडायला तयार नव्हती. मध्ये दोन तीन वर्ष छान गेली. आणि चंदू आजोबांना अर्धांगवायूचा जबरदस्त झटका बसला. पुन्हा एकदा ते घर विस्कटून गेलं. या आजाराने दळवी कुटुंबाला अक्षरशः खिळखिळं करून सोडलं. देवयानी आजींचा पुतण्या मनीष प्रत्येक वेळी अक्षरशः पहाडासारखा त्यांच्या मागे उभा राहिला. आयुष्यात कधीही हार न मानलेल्या चंदू आजोबांनी कमालीची जिद्द दाखवली. वैद्यकीय उपचारांवरांबरोबरच नियमित भरपूर व्यायाम घेऊन त्यांनी बरीच प्रगती केली. या मानसिक तणावातील काळातही दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र कधीही मावळलं नाही. घरी गेल्यावर नेहमीच्याच हास्य विनोदात येणाऱ्याचं स्वागत व्हायचं. आपण आजारावर किती मात केलीय हे ते सविस्तरपणे सांगायचे , तेही तू सांगतेस की मी सांगू या त्या दोघांच्या लाडक्या पद्धतीने. कोणत्याही परिस्थिती समोर गूढगे टेकणं चंदू आजोबांना मान्यच नव्हतं. पण त्यांच्या या संपूर्ण आवेशामागची शक्ती, स्फूर्ती आणि प्रीती होती देवयानी आजी.
असेच दिवस महिने वर्ष जात होती. निमेशला शाळेत सोडायला आणायला आता आजीनाच यावं लागत होतं. चंदू आजोबा त्याचं जिद्दीने आजारातून बरं होण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याला म्हणावं तसं यश येत नव्हतं. आम्ही उभयता कधीही भेटायला गेल्यावर अगदी निरागसपणे विचारायचे ‘ आता कशी वाटते माझी तब्येत ‘ ?
यातच मुलांची दहावीची शालांत परीक्षा पार पडून त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं होतं. देवयानी आजीनाच या सगळ्या व्यापात नवऱ्याचा आजार सांभाळून लक्ष द्यावं लागत होतं. मुलांचा अभ्यास त्यांचे इतर उपक्रम यामध्ये आम्हीही व्यस्त झालो होतो.
आणि याचवेळी नियतीने निर्दयपणे या कुटुंबावर अखेरचा वार केला. अचानक तब्येत बिघडल्याने चंदू आजोबांना तातडीने इस्पितळात दाखल केलं गेलं. तिथेही जरा बरं वाटल्यावर त्यांचा मिस्किल स्वभाव जागा झाला. अगदी आदल्या रात्रीपर्यंत व्यवस्थित बोलणारे चंदू आजोबा दुसऱ्या दिवशी सकाळी या जगातून निघून गेले होते. आपल्या लाडक्या देवू आणि नीमेशला मागे ठेवून त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
चंदू आजोबांना जाऊन २६ जून २०२० रोजी पाच वर्ष पूर्ण होतील. गेलेल्या व्यक्तीला मागे सोडून काळ वेगाने पुढे जात असतो. त्या गोड आठवणीही अंधुक होत जातात , पुसल्या मात्र जात नाहीत.
ही सत्यकथा मी इथेच थांबवतो कारण यानंतर त्या गोड त्रिकोणी कुटुंबाच्या घरातला एक कोन कायमचा निखळला होता आणि यापुढे त्या घरी गेल्यावर ” देवू तू सांगतेस की मी सांगू ” असं आपल्या पत्नीला प्रेमाने विचारणारे चंदू आजोबा तिथे दिसणार नव्हते.
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..