‘तो’ चहा की ‘ती’ चहा, हा प्रश्न तसा माझ्या मनात नेहेमीच उभा असतो. अगदी ‘टू बी आॅर नाॅट टू बी’च्या धर्तीवर. कुणाला विचारावं, तर काय वेड लागलंय का माणसाला, अशा पद्धतीने बघण्याची भिती. पण धीर करुन काही दिवसांपूर्वी मी तो फेसबुकवरच्या माझ्या मित्रांना विचारायचं ठरवलं आणि लगेच विचारलाही. आणि त्या अवघ्या चार शब्दांच्या प्रश्नांवर घनघोर कमेंट्सही आल्या. मला ‘चहा; तो की ती’चं उत्तर मिळालं की नाही, ते माहित नाही, पण विचार करायला लावणारी बरीच माहिती मात्र मिळाली. बहुसंख्यांच्या मते चहा पुल्लिंगी आहे, तर चहाला स्त्रिलिंगी समजणारे अल्पमतात आहे.
माझ्या मनात हा प्रश्न उभा राहाण्याचं कारण म्हणजे, मी अगदी मला समजायला लागल्यापासून आमच्या मुंबईच्या घरी ‘ती चहा’ असंच ऐकत म्हणत आलोय. माझ्या मुंबईतल्या मित्र-परिवाराच्या, नातेवाईकांच्या घरातही मी चहाचा उल्लेख स्त्रिलिंगीच ऐकत आलोय. माझ्या मनात चहाचा लिंग बदल झाला, तो मी बॅंकेत नोकरीला लागल्यावर.
माझी बॅंक पुण्याची. मी जरी मुंबंईच्या शाखेत नोकरीला होतो तरी, बॅंकेतले बहुतेक अधिकारी आणि काही कर्मचारी पुण्यातले होते. बॅंकेत मी चहाचा उल्लेख पुल्लिंगी होताना ऐकला आणि माझ्या मनात हा गोंधळ सुरू झाला. मी अनेकांना हा प्रष्न विचारला. पण त्यातील बहुतेकांनी बहुतेकवेळा,”पी ना xxx गपचूप”, अशीच किंया याच अर्थाची उत्तरं दिलं. उरलेल्यांनी मी कामातून गेलेली केस आहे अशा नजरेने माझ्याकडे पाहिलं. मला वाटतं, मी आज हा प्रश्न विचारल्यावर आपल्यापैकी अनेकांनीही माझ्याबद्दल असाच विचार केला असेल आणि तो काही अगदीच चुकीचा आहे असं म्हणता येत नाही. मला असे रिकामटेकडे प्रश्न बरेच पडत असतात..असो. चहाला हे लोक ‘तो’ का म्हणतात हे मला समजलं नाही.
मग मी स्वत:च याचं उत्तर शोधायचा प्रयत्न सुरू केला. माझी आई देवगडची. मालवणी भाषेत बोलणारी. मालवणीत चहा स्त्रिलिंगी. आणखी एक, मालवणी मुलकात चहा बऱ्याचदा खाल्ला जातो, पिला जात नाही. ‘चाय खातं वायच’ हा कोणत्याही वेळी कोणीही कोणालाही विचारावा असा प्रश्न. या प्रश्नाला सहसा ‘नाही’ असं उत्तर मिळत नाही. तर, मालवणीत चहा स्त्रिचं रुप घेऊन येते. मग माझ्या आईच्या बोलण्यातून ती मराठीतही स्त्री होऊनच अवतरलू. मी ओळखत असलेल्या बहुतेक सर्वच मालवणी जनतेत मला चहा स्त्री रुपातच आढळली. काल माझ्या चतु:शब्दी प्रश्नावर आलेल्या कमेंटमधेही हेच आढळून आलं. थोडक्यात मी असं गृहीतक मांडलं, की मालवणीत बाईच्या जन्माला गेलेली चहा, मालवणीतून मराठीत येताना, स्त्री बनूनच आली असावी. हे बरचसं पटण्यासारखं होतं (अर्थात मलाच..!).
पण मग माझ्या सासुरवाडीतही चहा स्त्रीलिॅगीच आहे. माझी सासुरवाडी रत्नागिरीतल्या देवरुखची. गांवातही शुद्ध मराठीतच बोलणारी. नाही म्हणायला त्यांच्यापैकी काहीजणांच्या बोलण्यात ‘नाही’ शब्दाला ‘न्हवं’ असा घाटाची जवळीक सांगणारा शब्द येतो आणि जुन्या स्त्रीया स्वत:साठी ‘येतो’, ‘जातो’, ‘खातो’ अशी पुरुषासाठीची क्रियापदं वापरताना मला दिसल्या, पण ते अपवादात्मकच. पण इकडेही चहा मात्र ‘ती’च होती. मालवणीत चहा स्त्रिलिंगी, म्हणून मालवणी माणसाच्या मुखातून मराठीतही चहा ‘ती’ म्हणूनच अवतरली, हे पटतंय न पटतंय तोच, शुद्ध मराठीत बोलणाऱ्या माझ्या सासुरवाडीच्या लोकांतही चा ‘ती’च का, असा प्रश्न माझ्या डोक्यात उभा राहीला आणि पुन्हा मी गोंधळलो.
माझ्या त्या पोस्टवर बऱ्याचजणांनी जरी ‘तो’च्या बाजूने मतदान केलेलं असलं तरी, व्यवहारीक जीवनात मला नेहेमी ‘ती’ चहाच भेटलेली (‘भेटणं’ हा शब्द अनेकजण सरसकट ‘मिळालं’ या अर्थाने वापरताना दिसतात. ‘भेटते’ती व्यक्ती, ‘मिळतं’ ती वस्तू किंवा हरवलेलं काही, अशा ढोबळ अर्थाने हे दोन शब्द आहेत. मी या लेखात ‘चहा’ला एक व्यक्ती मानतोय म्हणून ‘भेटलेली’ असा शब्द वापरलाय)आहे. मग मी याचं उत्तर स्वत:च शोधायचं ठरवलं..स्वत:च म्हणजे स्वत:ची कल्पनाशक्ती ताणून..!!
माझ्या मते चहा महिलाच असावी. चहा हे उत्तेजक पेय आहे असं सगळे म्हणतात आणि सर्वत्र सहज उपलब्ध असलेली सर्वच उत्तेजक पेयं स्त्रिलिंगीच आहेत. उदा. काॅफी, बियर, दारू इत्यादी. या पेयांचं नांव जरी उच्चारलं, तरी पुरुष, मग तो कोणत्याही वयाचा असो, उत्तेजीत होतो. तसाच तो स्त्रीयांचा उल्लेख जरी झाला, तरी उत्तेजीत होतोच. तसं स्त्रियांचं उत्तेजक पेयांच्या बाबतीत होत नसावं. पुरुषांच्या बाबतीत स्त्रियांचं तसं होतं की नाही, ते मला सांगता येत नाही. होत असलं तरी पुरुषांइतकं सातत्य त्यात नसावं. तस्मात चहा स्त्रीच असावी.
आपला समाज पुरुषप्रधान असल्याने उत्तेजना किंवा स्फुर्ती, या चीजा पुरुषांना आवश्यक असतात, असं समजलं जातं. स्त्रियांच्या तुलनेत पुरूष असतातही जास्त चहाभोक्ते. मी स्वत: चहा कितीही वेळ आणि दिवसाच्या आणि रात्रीच्याही कोणत्याही प्रहरी सहज आणि आनंदाने पिऊ शकतो. पिऊ शकतो कशाला, पितोही. असेच अनेक चहाप्रेमी मला माहित आहेत.
मला केवळ चहाच नाही, तर चहाची वेळ झाल्यावर एक अनावर हुरहूर लागून राहाते. लहानपणी आई दुपारी ३-३.३० ला चहा करायची. दुपारी शाळेतून आल्यावर जेवून झोपायची माझी सवय अद्यापही कायम आहे. बॅंकेच्या नोकरीत असतानाही मी दुपारी तास-दोन तास झोपायचो(मीच कशाला सगळेच झोपायचे. कारण बॅंक सकाळ आणि संध्याकाळ अशी दोन वेळात भरायची. मधले दोन-तीन तास जेवणाची सुट्टी..!) लहानपणी चहाची वेळ झाली की, आपसूक जाग यायची. आई स्टोव्ह पेटवण्याच्या आवाजाची चाहूल घेत अंथरुणात पडून राहायचं. स्टोव्ह पेटल्याचा फरफर आवाज आला की चहाची पहिली हाळी मिळायची. मग स्टोव्हवर अॅल्युमिनियमच्या लहानश्या ताटलीत तंबाखू भाजल्याचा उग्र दरवळ घरभर घुमायचा. (तंबाखूची मशेरी हे त्या काळच्या मालवणी स्त्रीयांचं व्यवच्छेदक लक्षण). आता पुढची पाळी चहाची ह्याची आता खात्री व्हायची. तोवर अंथरुणातच पडून राहायचं.
आईचं मुखमार्जन झालं, की मग चहाच्या पातेल्याचा तो चीरपरीचित आवज कानी पडायचा. अगदू त्याच आकाराचं किंवा त्याच प्रकारचं पातेलं असलं तरी, कानाला चहाचं पातेलं आणि तशाच प्रकारचं दुसरं पातेलं, यातला फरक ठळकपणे जाणवायचा. एकदा का तो स्वर्गीय आवाज ऐकली, की मग अंगभर जो काय उत्साह संचारायचा, त्याचं वर्नणं करणं केवळ अशक्य..! कितीही कोलाहल असू देत, आईच्या चहाच्या भांड्याचा तो कोलाहलाच्या मानाने क्षीण असलेला आवाज बरोबर माझ्या कानाचा वेध घ्यायचा. तो आवाज अजुनही कानात घुमतोय. तो आवाज ऐकला की आता लगेच चहा प्यायला मिळणार या आनंदाने मग अंथरुणातून उठून तडक चहाला बसायचं.
ही माझी बालपणाची सवय अद्यापही कायम आहे. नंतर काॅलेजच्या कॅंन्टीनमधल्या चहाची किणकीण इतर भांड्यांच्या आवाजातूनही मला स्पष्टपणे ऐकू यायची. आॅफिसात येणाऱ्या चहाव्ल्याच्या किटलीवरून तो रोजचा चहावाला की दुसराच कोणी हे देखील मला बरोबर ओळखता येतो. अर्थात हे फक्त चहाच्या बाबतीतच होतं, इतर बाबतीत नाही.
प्रेयसीची चाहूल घेणं आणि चहाची ‘चा’हूल घेणं मला सारखंच हुरहूर लावणारं वाटतं. प्रेयसीचा आवाज किंवा पायरव कितीही कलकलातून ऐकायला येतोच. तो आवाज ऐकल्यावर लागणारी एक अनामिक हुरहूर, लवकरच आपली भेट होणार याच्या आनंदाने अंगभर दाटून येणारा उत्साह..! एवढं होऊन ती प्रत्यक्ष भेटल्यावरचा आनंद आणि न भेटल्यास होणारी चिडचीड मला चहाबाबतही अनुभवायला येते.
चहाच्या संदर्भातही माझी भावना प्रेयसीपेक्षा कमी नाही. ‘ती’च्या चहाच्या नुसत्वा उल्लेखानेही मन मोहरुन येते. एक वेगळीच तरतरी येते. चेहेरा लाल गोरा होतो. अगदी तस्संच मला चहामुळे होतं. फरक एकच. चहा सारखी प्यावीशी वाटते. प्यायला मिळतेही. (वयाने वाढलो तरी) प्रेयसीही सारखी यावीशी वाटते, पण येत नाही (बघतही नाही म्हणा कुणी हल्ली, येणं दूरच राहीलं). येवढा एक जालीम फरक सोडला, तर चहा आणि प्रेयसी सारखीच. म्हणून मला तरी चहा ‘ती’ असावी असं वाटतं..
-नितीन साळुंखे
9321811091
06.05.2019
Leave a Reply