शेवटी तो आलाच तिच्याकडे. आला आणि अगदी ठाणच मांडून बसला. तिलाच काय कुणालाही त्याचे असे कुणीचीही पर्वा न करता येणे पटले नव्हते. त्याच्या अनपेक्षित येण्याने ती तर स्तंभित झाली. पार हादरली. तिचे सारे गणगोत अवाक् झाले. तिच्या ‘का?’ ला उत्तर नव्हतेच कुणाकडे.
तो दिवस आजही मला लख्खपणे आठवतो आहे. आम्ही दोघी सहज तुळशीबागेत फिरायला गेलो होतो. तरुण मुलींप्रमाणे हातगाडीवरुन कानातले वगैरे चांगले घासाघीस करुन हौसेने घेतले. मग आवडत्या हॉटेलमध्ये जाऊन आवडीच्या पदार्थांचा मस्त आस्वाद घेत बसलो. त्यावेळेस बोलता बोलता काहीसे गंभीर होऊन ती म्हणाली की गेल्या तीन चार वर्षांपासून तिच्या काखेत एक गाठ आहे. दुखत नाही म्हणून आतापर्यंत तिने लक्ष दिले नाही किंवा कोणाला सांगितलेही नाही. पण आता ती गाठ थोडी मोठी झाल्यामुळे ब्लाऊजची बाही काचू लागली आहे. ते ऐकताच मन थोडं साशंक झालं. ताबडतोब डॉक्टरांकडे जाण्याविषयी मी तिला शपथा घातल्या व इतके दिवस न सांगण्याबद्दल रागवलेही.
मग ती दवाखान्यात गेली. काही तपासण्या झाल्या. दोन दिवसांनी फोन आला. ‘ज्याची भीती मनात होती तेच आहे.’ ज्या आजाराचं नाव देखील उच्चारावे वाटतही नाही तो त्रासदायक पाहुणा म्हणून तिच्या जीवनात दाखल झाला. पाहुणा काय, आज ना उद्या जातोच परत ! पण याला मात्र परतण्याची घाई नव्हती. भरपूर सवड काढून आला होता तो. मग त्याने लवकरात लवकर निघून जावे यासाठी तिच्यासह घरच्यांचे प्रयत्न सुरू झाले.
एक अवघड पर्व सुरू झालं. केमोथेरपीचा पहिला अंक सुरू झाला. त्यासाठी दर शनिवारी ती सकाळीच हॉस्पिटलमध्ये जाऊ लागली. पूर्ण दिवसभर तिला तिथे थांबावे लागे. लहान मुलाला आई बोट धरुन कशी चालवते तसं मुलगा,मलगी तिचं बोट धरून तिला नेऊ लागले. तिथे तिला तिच्यासारखे अनेक लहान,मोठे भेटले. त्या सर्वांकडे पाहून तिने स्वतःला सावरले. आजार स्वीकारला. पेशण्ट ने ‘पेशण्ट’ राहायला हवे हा तिच्या डॉक्टरांचा सल्ला तिने मनापासून अंगिकारला. मुळातही ती आहेच तशी. आमच्या पंचेचाळीस वर्षांच्या मैत्रीत तिच्या खंबीरपणाचा आणि सोशिकतेचा अनुभव मी सतत घेत आले आहे.
प्रत्येक शनिवार तिचा युध्ददिन! हातात खुपसलेल्या सुईतून औषधरुपी शस्त्र शरीरात प्रवेश करी. मग तो अघोरी पाहुणा व ते शस्त्र यांची घनघोर लढाई होत असे. लढाईचे परिणाम तिच्या देहावर, मनावर होऊ लागले. प्रकृती क्षीण झाली. डोक्यावर स्कार्फ आला. साडीची जागा गाऊनने घेतली. हातापायांना सूज आणि बधीरता, नखांचे व केसांचे गळणे! हे सगळे तिने निमूट स्वीकारले. तिला तसे पाहिले की एक लांबसडक वेणी, गळ्यातली लांब माळ, त्या माळेशी हाताने सतत चाळा करण्याची लकब, हसतमुख व स्निग्ध चेहरा असे तिचे रूप मला आठवायचे. मन गलबलायचे. देहावरचे बदल दृश्य असले तरी तनामनाच्या यातना तिने अबोल ठेवल्या.
ती एक संयत, मितभाषी, अतिशय शिस्तबद्ध तरी विद्यार्थीप्रिय व संवेदनशील कवीहृदयी शिक्षिका! यापेक्षा वेगळे ती वागलीच नसती.ती जणू स्वतःचीच कडक शिक्षिका झाली. तिच्यातला खोल अंतरीचा झुळझुळता अवखळ झरा माझ्यासमोर मात्र अगदी मुक्तपणे वहायचा. हॉस्पिटलमधली आमची शनिवारची भेट नियमित असे. आभाळ दिसणारी खोली मिळाली की ती खुश! रुम मिळाली की ती मला फोन करून रुमनंबर कळवायची व घरची कामे उरकूनच ये म्हणायची. खिडकीतून मोकळे आकाश दिसत असले व जिवलग मैत्रीण सोबत तरी दिवसभर तिथे राहणे कुणाला कसे रुचणार? तिलाही कधी एकदा संध्याकाळ होते व घरी जाते असे होई.
औषधाची शेवटची बाटली लावली की हायसे वाटून तिला हुरुप येई. मग ती जागा कोणती, तिथे येण्याचे कारण काय, हे सगळे बाजूला पडत असे. तिची अधिरता ओळखून डिस्चार्ज प्रोसिजर लवकरात लवकर व्हावे यासाठी तिचा मुलगा आणि मुलगी दोघे सातव्या मजल्यावरून तळमजल्यावर व तळमजल्यावरून सातव्या मजल्यावर सारखे धावपळ करीत असत.
शेवटची बाटली एकदाची संपली की ती उत्साहाने उठे. डबा, थर्मास, पाण्याची बाटली, मोबाईल, भेटायला येणाऱ्यांसाठी, विशेषतः माझ्यासाठी आणलेला खाऊ असे सगळे सामान पिशवीत लगबगीने भरायला लागे. मग दोन्ही पायांना झोके देत पलंगावर बसून राही. हातातली सुई काढण्यासाठी नर्स लवकर येत नाही अशी बालीश तक्रार करे. शाळा सुटताना मुलांची असते, तीच उत्कंठा तिच्या चेहऱ्यावर व हालचालीत दिसे. त्यावेळी कधी ती तिच्या शाळेतल्या आठवणी सांगायची, ” शाळेत असताना घंटा झाली रे झाली की मुलांच्या आधी आम्ही शिक्षकच शाळेबाहेर धावायचो. कारण पुण्याला जाणारी सिटीबस त्याचवेळी असायची.” बोलता बोलता मधेच काळजीने म्हणायची, “तू जा गं घरी,अंधार झालाय. लवकर रिक्षा मिळणार नाही.”
हॉस्पिटलमधील दुपारनंतरचे ते काही तास आमच्यासाठी अतिशय मोलाचे असायचे. निवांतपणे आम्ही जुन्या हसऱ्या,बोचऱ्या आठवणी काढत, सुखदुःखाच्या गोष्टी करत, ये हृदयिचे ते हृदयी टाकत, मैत्रीचे टॉनिक एकमेकींना द्यायचो. एकदा बाकावर बसून लिफ्टची वाट बघताना आमच्या गप्पांमध्ये आम्ही इतक्या रंगलो होतो की रुग्णांना नेणारी लिफ्ट आली तरी, ही पेशण्टची आहे, आपली नाही’ असे म्हणण्याचाही प्रसंग घडला. शेवटी तो लिफ्टवाला,” या की आत! ” असे म्हणाल्यावर आम्हाला वास्तवाचे भान आले आणि आम्ही खुदुखुदू हसू लागलो. हे समजल्यावर तिच्या मुलीने आम्हाला अक्षरशः हात जोडले. खरेतर हे हसणेबोलणे म्हणजे तिच्या अस्वस्थतेवर फुंकर घालणे असे आणि हे समजून उमजून ती ही त्यात समरस होत असे.
दर आठवड्याला एक अशा एकवीस केमोनंतर ऑपरेशनचा दुसरा अंक ! काखेतल्या खोबणीतली गाठ काढण्याचे अवघड ऑपरेशन झाले, तसेच मातृत्वाचे मंगल चिन्हही देहावरुन पुसले गेले. कितीतरी दिवस हात खाली घेता येत नव्हता. त्या त्रासातून शरीर सावरण्यात काही महिने गेले.
मग वाटले की संपले आतातरी ! पण अजून रेडिएशनचा तिसरा अंक बाकीच होता. तो सलग पंचवीस दिवस चालला. त्या सर्व अंगारमय वेदना तिने विनातक्रार शांतपणे सोसल्या. फक्त एकदा, उभे राहिले की पाय थरथरतात हे सांगताना तिचा आवाज आणि डोळ्यातील पाणी किंचित थरथरले.फक्त एकदाच!एरवी तिने कधी दुखण्याची, दुःखांची तक्रार केली नाही, की कधी नशिबाला बोल लावला नाही. त्या आजारासह जगता येतं हा तिचा निग्रह पक्का होता. इच्छाशक्तीच्या आणि सुदैवाच्या बळावर तिच्या शारीरिक व मानसिक शक्तींचा कस पहाणारा तो कर्कासूर अखेर धारातीर्थी पडला.
हे सगळं भोगून ती आज ताठपणे पुन्हा उभी आहे हे विशेष नव्हे काय? मला हे शांतादुर्गेचे वेगळे स्वरूप वाटते.… आणि स्वतःची, घराची शांती भंग होऊ न देता, वेदनेकडे तटस्थतेने पाहण्याचा एक उत्तम आदर्शपाठ!
आराधना कुलकर्णी
Leave a Reply