नवीन लेखन...

ती ‘खूप काही’ करते..

एक शक्ति तत्व

कुठल्याही मालिकेवर/ सिनेमावर केलेली ही टिका किंवा युक्तीवाद नाही..आणि ‘गरळ ओक’ तर नाहीच नाही. एक अनुभव ज्याची आज आठवण झाली तरी मी स्वत: बद्दल नाराज होते..

काही वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट..तेव्हा मी कॉलेज मधे असेन बहुदा..बाबांचे जुने मित्र , त्यांच्या पत्नी आणि मुलं असं कौटुंबिक get together करुन एक दिवस भेटायचं ठरलं..मला आठवतं त्याप्रमाणे बाकी कुणाची मुलं सोबत आलीच नाहीत. त्यामुळे मला कंपनी नव्हती. जमेल तेवढा त्या संभाषणात मी सहभाग घेतला..

या दोघी तिघी एकाच वयाच्या बायका होत्या..मात्र यापैकी माझी आई एकटीच गृहिणी आणि बाकी दोघी नोकरदार..त्यापैकी एकीने बोलता बोलता माझ्या आईला आश्चर्याने विचारलं,” तू काहीच करत नाहीस का!”..हा प्रश्न ऐकून आई जरा ओशाळली..खरं तर आईने ओशाळायचं कारण नव्हतं पण तेव्हा तिला हा प्रश्न अनपेक्षित होता.

मला आजही वाईट या गोष्टीचं वाटतं की तेव्हा मी काहिही बोलले नाही. मोठ्यांच्या मधे लहानांनी बोलू नये हे संस्कार म्हणून ठीक असलं तरी त्या वेळी मी गप्प बसायला नको होतं कारण प्रश्न माझ्या आईच्या आत्मसन्मानाचा होता. त्या बाई ला गप्प केलं नाही याची आजही खंत वाटते..मी आईची बाजू घेऊन बोलले नाही या बद्दल स्वत:ची चीड येते.

माझ्या आई सारख्या कित्येक स्त्रीया स्वानंदाने आणि स्वच्छेने गृहिणी असतात. कधी कधी तडजोड म्हणूनही असे काही निर्णय त्यांना घ्यावे लागतात. पण सर्वात खास गोष्ट ही, की त्यांच्यात पश्चातापाची भावना नसते जी माझ्या मते विलक्षण आहे. गृहिणी पद निभावताना तडजोडीचा लवलेशही नसतो. मी माझ्या आईकडून तरी हे नक्कीच शिकले. तिला काम करण्याची इच्छा होती मात्र तिने पूर्णवेळ गृहिणी होण्याचा निर्णय घेतल्याने आमचं घर किती ‘प्रकाशमान’ झालं हे सांगणं शब्दापलिकडे आहे.

हे सर्व लिहीत असताना नोकरी/व्यवसाय करून स्वतःचं घर सांभाळत असलेल्या स्त्रीयांबद्दलही मला नितांत आदर आहे. कुणालाही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरवण्याचा किंवा कुणाच्या भावना दुखवण्याचा इथे हेतू नाही. एका अनुभवाच्या आधारे मी हे लिहिते आहे.

एका स्त्रीने दुस-या समवयस्क स्त्रीशी बोलताना आपण तिचा स्वाभिमान नकळत दुखावत तर नाही ना या गोष्टींचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कामाचा पगार किंवा मोबदला मिळतो याचा अर्थ समोर बसलेली आपली गृहिणी मैत्रीण आपल्यापेक्षा कुठल्याही अर्थाने कमी ठरत नाही. एखादा व्यवसाय किंवा उद्योग धंदा करणारी व्यक्ती , नोकरी करणा-या व्यक्तीला जसं कमी लेखणार नाही तेच तत्व वरील म्हणण्यात लागू होतं, इतकं हे साधं सरळ आहे.

अलिकडे house wife न म्हणता home maker असा सुंदर शब्द वापरला जातो..आणि तो अत्यंत समर्पक आहे. घरात ‘घरपण’ निर्माण करणारी ती home maker ..the one who converts the house into a ‘home’..

न गृहं गृहमित्याहुर,गृहिणी गृहम् उच्यते|
गृहं तु गृहिणीहीनम् अरण्यसदृशं मतम्||

घराला घर म्हणत नाहीत, तर गृहिणी ला ‘घर’ म्हणतात..कारण गृहिणी शिवाय घर अरण्यासारखं भासेल..महाभारतातील या श्लोकाचा अर्थ हा असा..
यातंच सगळं आलं..याचं अधिक विश्लेषण करायची आवश्यकता नाही.

उलटं आता या ‘गृहिणी’ शब्दाचा एक तत्व म्हणून विचार करायला हवं. गृहकृत्य दक्षता, कुटुंबाचं वेळापत्रक सांभाळणं , व्यवहाराच्या कामात लक्ष घालणं, आर्थिकबाबींत अत्यंत सावध असणं, मुलांच्या अध्ययनापासून ते त्यांच्या प्रकृतीच्या बाबतीत प्रचंड जागरुक असणं, कुठल्याही परिस्थितीत पतीच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणं या आणि अशा कित्येक गोष्टींचं बनलेलं ‘गृहिणी’ हे एक तत्व आहे. ‘ती’ पाठीशी आहे म्हणून पुढे जाता येतं..पुढे जाणा-या माणसाला सारखं मागे बघावं लागत नाही कारण ‘ती’ पाठीशी आहे या बद्दल खात्री असते..आणि हे सर्व एकिकडे लीलया तोलत असताना तिने विकसित केलेले तिचे सूप्त गूण आणि आवड, जगासमोर आल्याशिवाय राहत नाही.

हे तत्व जपणा-या आज कित्येक ‘ती’ आहेत.

तिच्या नकळत ‘ती’ काय काय करते याची जाणीव तिलाही नसते..तेव्हा, अशी आपली एखादी ‘गृहिणी’ मैत्रीण, बहीण, शेजारीण आपल्याला भेटली तर ‘ती’ काही करत नाही असं म्हणून तिला दुखावण्यापेक्षा ‘ती’ खूप काही करते हे तिला सांगुया..’ती’ एक शक्ती तत्व आहे याची तिला जाणीव करून देऊया.

आज, या लेखाच्या निमित्ताने माझ्या आई सारख्या ‘गृहिणी’ पद अत्यंत प्रभावीपणे भूषवत असलेल्या सर्व वयोगटातील स्त्रीयांना माझा सादर नमस्कार..

— गौरी सचिन पावगी 

Image: google

Avatar
About गौरी सचिन पावगी 26 Articles
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..