नवीन लेखन...

ती पहिली रात्र

आई, माझा हा एकविसावा वाढदिवस आहे. तो नक्की खास झाला पाहिजे.” लेकीने फर्मान काढले.

तसा आजवर कोणता वाढदिवस खास झाला नाही ग असे तोंडापर्यंत आलेले वाक्य परत वादाला तोंड नको म्हणून तसेच गिळून घेतले.

“आता काय खास करायचं आहे ते देखील सांगून टाक ना.”

तिला हवा असलेला प्रश्न मी विचारला.

“आई, तुम्हाला सरप्राईज असे काही देताच येत नाही. तूच सांग बरं मी अगदी लहान असल्यापासून काय मागतेय ते?” लेकीने मलाच प्रतिप्रश्न केला.

“कुत्र्याचं पिल्लू? नाही ग बाई, तेवढे सोडून काहीही माग. तुला माहिती आहे की मला सर्व कीटकांची आणि प्राण्यांची खूप भीती वाटते. तुम्ही सगळे निघून जाल आपापल्या कामांना आणि ते पिल्लू येईल माझ्याच गळ्यात. अजिबात नाही.” मी अगदी निक्षून सांगितले.

खरेतर कुत्र्यांची मला एवढी भीती का आहे मलाच कळत नाही. बाहेर गेल्यावर रस्त्यावर कुठेही कुत्र्याने मला पाहिले की ते माझ्याच मागेमागे येत आहेत असे वाटू लागते. मग माझा खूप गोंधळ उडतो. मला सारखे वाटू लागते की हे कुत्रं मला चोर समजून चावणार तर नाही ना? हातात पिशवी असेल काही खायचे आहे समजून अंगावर धावणार तर नाही ना? त्यामुळे दूरवर कुठेही कुत्रं दिसले रे दिसले कि मी खूप सैरभैर होते. कारण भराभर चालावे तर तेही जोरात मागे येण्याची भीती आणि हळूहळू चालावे तर पटकन चावायची भीती!!! खरतर सर्व माझी टिंगल करतात, पण आहे मला भिती, काय करू? त्यामुळे घरात पिल्लू येणे शक्यच नव्हते.

माझा ठाम विरोध पाहून लेकीचा चेहरा खूप हिरमुसला.

मी तिला परत समजावले,” तुला तुझ्या मनाप्रमाणे कुत्र्यांचे प्रशिक्षण घ्यायला पाठवतो आहोत ना? मग आता पिल्लू आणण्याचा हट्ट सोडून दे.”

लेक कशीबशी गप्प बसली. पण तिची नाराजी वाढदिवसाच्या आदल्या रात्री पर्यंत तशीच होती.

खरंतर तिला प्राण्यांविषयी भयानक म्हणता येईल असे प्रेम आहे. कित्येकदा ती रस्त्यावरची पिल्ले उचलून आणत असते आणि मी मात्र तिला ते कोणालाही द्यायला लावते.

त्यामुळे तिचे नाराज होणे स्वाभाविक होते.

ह्यावेळी मी विचार केला की जाऊ दे, लेक आता एकवीस पूर्ण झाली आहे, चार पाच वर्षांत लग्न होऊन सासरी जाईल. नंतर तिचा हा एकमेव हट्ट आपण पूर्ण न केल्याची खंत मनाला राहील. तेव्हा ह्या वाढदिवसाला तिला पिल्लूच भेट देऊ.

झालं, मी तयारी दाखवल्याबरोबर लेकीच्या वाढदिवसाला सकाळी सकाळी आमच्याकडे बिगल जातीच्या पिल्लाचे आगमन झाले. लेक तर सरप्राईज बघून आनंदाने हुरळून गेली. बरं, एवढं करून मी गप्प बसायचे ना? पण लेकीवरच्या अती प्रेमापायी मी तिला जोरात म्हटले, ” तू कुत्र्यांचे प्रशिक्षण घ्यायला जाशील तेव्हा पंधरा दिवस मी सांभाळ करेन पिल्लाचा. माझ्याकडून तुला ही अजून एक भेट”. लेक प्रेमाने गळ्यात पडली. लेकीला झालेला आनंद पाहून मन समाधानाने भरून पावले.

यथावकाश पिल्लाचं ‘चेरी’ म्हणून नामकरण झाले.

चेरीचा वावर घरभर होऊ लागला तसे आपण काय करून बसलो ह्याची जाणीव झाली. ती सारखी इकडून तिकडे पळून धिंगाणा घालू लागली. चेरीने माझ्याकडे नुसते पाहिले तरी मी धूम ठोकायचे. मला पळताना पाहून ती अजून जोरात माझ्या मागे लागायची. मी अजूनही पळू शकते हे चेरीनेच मला दाखवून दिले. बर, एवढ्या मोठ्या घरात तिला मला सोडून इतरांच्या मागे लागायला काय हरकत होती? पण मी दिसली कि ती जोरात माझ्याकडे येणार!

लेक मला समजवायची,” आई, ती प्रेमाने येते ग, ती खरंच तुला काहीच करणार नाही. तिला फक्त तुझ्याशी खेळायचे असते. एकदा बघ ना ती किती निरागस आहे.” भीतीपुढे मला ना चेरीचे निरागस डोळे दिसायचे, ना तिचे खेळणे दिसायचे. तिला बघून जाणवायची फक्त भीती, भीती आणि भीती. लेक मात्र तिचे शी शू पासून सर्व अगदी मनापासून करत होती.

बघता बघता लेकीची हैद्राबादला प्रशिक्षणाला जायची वेळ आली. चेरीला सांभाळण्याच्या भीतीने पोटात गोळा आला होता. सर्व सूचना देऊन लेक रवाना झाली.

चेरीसोबत काढलेली ती पहिली रात्र…. आठवले तरी धडधड होते. घरात सर्वांना मारे जाहीर केले की मी चेरीसोबत राहीन, तुम्ही झोपा बिनधास्त. मला वाटले रात्री ती खाली झोपेल आणि मी दिवाणावर…..एकदम सुरक्षित!!!

पण झोपायची वेळ होताच तिने रंग दाखवायला सुरवात केली. तिला काहीही करून दिवाणावरच यायचे होते. आधी तिने बारीक आवाजात रडका सूर लावून बघितला. मी दाद देत नाही म्हटल्यावर ती माझ्याकडे बघून भुंकायला लागली. तिची नजर खूप भेदक वाटली. वाटले की आता केव्हांही आपल्यावर हल्ला होऊ शकतो.

मी तिला जीव तोडून सांगत होते,” बाळा, मला तुझी भीती वाटते ना, मी तुला उचलून नाही घेऊ शकत ग!”

पण त्या बिगलच्या लांब लांब कानांमध्ये काही माझा आवाज शिरत नव्हता. तिचे आपले रडणे, भुंकणे चालूच. आता ती खूप चिडली तर रागात दिवाणावर चढेल ह्या भीतीने मला घाम फुटला. मी उशी तोंडावर घेऊन तिची नजर टाळत जोरजोरात सर्वांना बोलावले. काय झाले म्हणून घरातले सर्व दाराजवळ आले तर दरवाजा उघडेचना…चुकून माझ्याकडून दरवाजा लॉक झाला होता. म्हणजे मला दिवाणावरून खाली उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. आता आपले काही खरं नाही असे वाटू लागले. शेवटी सर्व धीर एकवटून उशीची ढाल बनवून कसाबसा दरवाजा उघडला. मुलाने मांडीवर घेतल्यावर चेरी पटकन झोपली.

पण मला झोप कुठे लागते? सतत कानांत चेरीचा आवाज घुमत होता. ती आपल्याला चावायला आली आहे असे वाटून धडधड होत होती. मध्येच दचकायला होत होते. ह्या घाबरण्यातच नेमके माझे पांघरूण धपकन खाली पडले आणि चेरी परत उठून बसली.

परत तिची तशीच चुळबूळ सुरु झाली. आता परत घरातल्यांची झोप मोडायला नको म्हणून मी दुरूनच तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या डोक्यात अचानक विचार आला की जसे लहान मुलांना झोपवायला अंगाईगीत असते तसे आता प्राण्यांसाठीही काही गाणी असतीलच. मग लगेच गुगल वर शोध घेतला आणि गाणे मिळवले. त्या गाण्याने मी पेंगले पण ती काही झोपायलाच तयार नव्हती. आता तिला मांडीवर घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

लेकीचे सर्व बोलणे आठवले. तिने सांगितले होते, “आई, पिल्लू जेव्हा खाण्याच्या आणि झोपेच्या मूड असते ना तेव्हा मस्ती करून चावत नाहीत. तसेच कुत्रं जेव्हा शेपूट हलवत जवळ येतं तेव्हा ते प्रेमाने जवळ येत असते. त्यामुळे तू उगाचच घाबरत जाऊ नको. लहान पिल्लू आपल्याला कधीच चिडून चावत नसतं. ते आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतं.”

सगळं काही आठवून चेरीचे लक्षणे तपासली. ती शेपूट हलवत भुंकत होती आणि झोपेच्या मोडमध्ये गेली होती.

मग खूप खोल श्वास घेतले आणि मनाचा धीर करून मोठं जाड पांघरूण पायांवर घेऊन खाली बसले. ती जोरात येऊन मांडीत बसली आणि माझ्या कुशीत शिरून लगेच गाढ झोपली. मी जीव मुठीत घेऊन घामाने चिंब भिजले होते. पण अजिबात हलले नाही. कारण माझ्या हालचालीने ती परत मस्तीच्या मोडमध्ये जाण्याची भीती होती. पण चेरीच्या त्या स्पर्शाने मी उभा केलेला भीतीचा बागुलबुवा कुठच्या कुठे पळून गेला. मग वाटले की अरे इतकी सोपी गोष्ट होती ही आणि आपण किती मोठा भीतीचा डोंगर उभा केला होता. अखेर तिला हळूच खाली झोपवलं आणि मी देखील झोपेच्या अधीन झाले. अशाप्रकारे चेरीची आणि माझी ती पहिली रात्र यशस्वीपणे पार पडली.

सौ. मंजुषा देशपांडे, पुणे.
www.sahityakatta.blogspot.com

Avatar
About सौ.मंजुषा देशपांडे 11 Articles
I am certified and trained family counselor with a post graduate degree in Psychology (MA) from Pune University. I have done my specialization in Family & Matrimonial Counselling. I have been recognized by Bharati Vidyapeeth with a Bronze Medal for being expert in Relationship Counselling. Along with I am a trained REBT Therapist. I am also certified life skill trainer. I am founder member of non-profitable and non government organization (NGO) LEAF ( Life Empowerment & Awareness Foundation ). Through this we help economically backward children, women and families.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..